ब्लॉगचे कॉपीराईट्स

myfreecopyright.com registered & protected

Wednesday, October 14, 2015

मोदींनी खरंच भूमिका घेतली का?

अलीकडे जो काही धार्मिक उन्माद चाललेला आहे, त्यावरुन स्वत:ला सांस्कृतिक जगतातील सर्वात मोठी महासत्ता समजणाऱ्या भारत देशाची कीव यावी अशीच एकंदरीत परिस्थिती असल्याची जाणीव होत आहे. असं वाटण्याची मुख्य कारणं दोन. एक म्हणजे सर्वश्रुत किंवा सर्वज्ञात असे दादरी प्रकरण व दुसरे मोदी सरकार सत्तेवर आहे म्हणजे आपल्याला हात लावणारे कुणीच नाही असे समजून वागणारे अर्धज्ञानी मात्र स्वयंघोषित धर्मपंडित व त्यांचा तथाकथित अनुयायी गणंगवर्ग. बेअक्कल वाचाळवीर महेश शर्मा व तत्सम वाचाळ साधू साध्वींची फौज व या अशा गटामध्ये मोडणाऱ्या अविचारी फेसबूकी समस्त अनुयायीवर्गाला देश व राष्ट्रीय एकात्मतेचे काहीही देणेघेणे नाही. दादरी येथे जे काही झाले ते अत्यंत घृणास्पद, निंदनीय आणि देशाच्या प्रतिमेस काळिमा लावणारे आहे, यात तिळमात्र शंका नाही. याचा निषेध करावा तितका थोडाच. या हत्येने हिंदुत्ववाद्यांचा भीषण असहिष्णू चेहरा समोर आला. त्याने देश हादरला. तसे होणे साहजिक होते. ही हत्या म्हणजे धर्मवादी विचारांना मिळालेली राजकीय फूस होती आणि आहे, हेदेखील यातून दिसून आले. अशा प्रकारच्या घटना या देशाच्या अखंडतेस बाधा आणतात. समाजात दुफळी तयार होते. आपल्यासारख्या आधीच जातपात आदी मुद्दय़ांवर दुभंगलेल्या समाजात अशा स्वरूपाच्या घटनांमुळे नवे खंड तयार होतात आणि देशाची एकात्मता एकूणच धोक्यात येते. हे सारेच काळजी वाढवणारे आहे  
राजधानी नवी दिल्लीपासून अवघ्या ४५ किमीवरील बिसारा गावात घडलेला प्रसंग. या गावातील महंमद अखलाख याची दोन दिवसांपूर्वी एका क्षुल्लक कारणावरून गावकऱ्यांकडून हत्या झाली. हे क्षुल्लक कारण होते एका अफवेचे. हा महंमद गोमांस खातो अशी वदंता पसरली, पसरवली गेली आणि हिंदुहितरक्षणाचा दावा करणाऱ्या गटांनी महंमदच्या घरावर चाल करून त्यास ठार केले. हा महंमद जेथे राहतो ती हिंदुबहुल वस्ती आहे आणि गेली कित्येक वष्रे त्याचे तेथे वास्तव्य आहे. तेव्हा अर्थातच तो आणि त्याचे कुटुंबीय हिंदू रीतिरिवाजांशी परिचित आहेत. इतके की बकरी ईदच्या मुहूर्तावरही महंमदने कधी बकऱ्यांची कुर्बानी दिलेली नाही. आपल्या आसपासच्यांना ते आवडणार नाही, याची जाणीव असल्याने त्याने तसे करणे कायम टाळले. परंतु तरीही तो घरात गोमांस खातो, ही बाब पसरवली गेली आणि भडकलेल्या जमावाने त्याच्या घरावर चाल केली. त्या आधी सदर गावाच्या परिसरात वातावरण इतके बिघडवले गेले होते की जाहीररीत्या मारले जात असताना महंमदच्या मदतीस कोणीही आले नाही. इतकेच काय, त्याला मारले ते योग्यच झाले, अशा स्वरूपाची प्रतिक्रिया स्थानिक हिंदुहितरक्षकांनी दिली. या जमावाने केवळ महंमदला लक्ष्य केले असे नाही, महंमदच्या मुलासही जीवघेणी मारहाण झाली. तो कसाबसा वाचला इतकेच. या बापलेकांना ज्या वेळी मारले जात होते त्यावेळी महंमदची मुलगी गयावया करून मारेकऱ्यांना सांगत होती, घरात जा, तपासा, गोमांस आहे का याची निदान खात्री तरी करून घ्या. परंतु धर्मरक्षणाचा उन्माद चढलेल्या जमावास याची गरज वाटली नाही. आमच्या घरात गोमांस नव्हते हे आता सगळ्यांना कळले, आम्ही गोमांस खात असल्याची केवळ अफवा होती हेही आता सर्वाना लक्षात आले..तेव्हा माझ्या वडिलांना मारणारे त्यांना परत जिवंत करतील का, इतकाच साधा प्रश्न महंमदच्या तरुण मुलीने विचारलेला आहे. त्याचे उत्तर देण्याची हिंमत सरकारने दाखवावी.
नुकतेच बिहार निवडणुकीनिमित्ताने घेतलेल्या प्रचारसभेत दादरीतील मुस्लीम व्यक्तीस घरात गोमांस असल्याच्या संशयावरून ठार मारणे आणि पाकिस्तानी गझल गायक गुलाम अलींच्या कार्यक्रमाला झालेला विरोध ह्या अतिशय दु:खद घटना असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याविषयी आपले मौन सोडले. मात्र, यामध्ये केंद्र सरकारची भूमिका काय आहे? असा सवाल देखील केला आहे. १५ ऑगस्ट रोजी ‘आधी रात को भी बुला लेना’ असं आवाहन करणारे मोदी असा प्रश्न विचारतात तेव्हा आश्चर्य वाटत नाही, तर मोदींनी भूमिका घेतली का असा प्रश्न पडतो. प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांचा एक ताजा लेख नुकताच वाचनात आला त्यामध्ये त्यांनी माजी व आजी पंतप्रधानांच्या कार्याचे मूल्यमापन केलेले आहे. ते म्हणतात ‘मनमोहन सिंग कमी बोलत असत व कामही खूपच कमी करत असत आणि मोदी बोलतातही खूप व कामही खूपच कमी करतात’. लेखक, कलावंत व इतर सर्जनशील मंडळींनी असं म्हणणं किंवा पुरस्कार परत देणं हे चांगल्या राज्यकारभाराचं लक्षण नव्हे. महेश शर्मा व तत्सम वाचाळ साधू साध्वींवर्गाला मोदी आवर घालू शकत नाहीत का? त्यांच्याबाबत मोदी कोणतीही भूमिका घेण्यास तयार नाहीत. पावला पावलावर जात, धर्म, खाणंपिणं, राहणं- ल्यानं, भाषा, सण-संस्कृती यांची प्रचंड विविधता असलेल्या या देशाच्या पंतप्रधानास एकचालकानुवर्तीत्व अशा भूमिकेतून देशाचा राज्यकारभार हाकता येईल का?  


No comments:

Post a Comment