दुर्गा भागवतांचं लेखन: भाग २ ( ऋतुचक्र )

               दुर्गाबाईंचं लिहिणं हा कौतुकाचा नसून चिंतनाचा विषय आहे. बाईंचं लेखन थोडं नीट न्याहाळून बघितलं तर कळतं की बाईंमधल्या लेखिकेवर त्यांच्यातल्या कवयित्रीने मात केलेली आहे. बाई खरंतर कवयित्रीच व्हायच्या, पण चुकून लेखिका झाल्या. त्यामुळेच बाईंच्या लेखनात शब्दांचा ’नाद’ लक्ष वेधून घेतो. ’ऋतुचक्र’ मध्ये हा शब्दनाद प्रकर्षाने आढळतो. ऋतुचक्र हा बाईंच्या सर्व लेखनपसारयातला सुंदर असा मोरपीस आहे. बाईंचं कोणतंही पुस्तक असो, ऋतुचक्र असो वा भावमुद्रा असो किंवा दुपानी असो, त्यांचं निसर्गाशी जडलेलं नातं बाई हळूच खुलवत नेतात. मग या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी पालथे घातलेले डोंगर, दऱ्या,नद्या,नाले, अनेक उपनद्या,ओढे, ओहोळ या साऱ्या प्राकृतिक घटकांपासून ते मग अगदी त्यांच्याशी  संबंधित असलेल्या ऋतु व त्यांचे चक्र,त्याचे समाजजीवनावर व अन्य नैसर्गिक घटकांवर उदा. प्राणी, पक्षी इ.वर होणारे परिणाम ह्या सगळ्यांचं वर्णन ओघानं आलंच. फक्त ऋतुचक्र’ वर जरी लिहायचं म्हटलं तरी वहीची कितीतरी पाने भरून जावीत एवढं लिहिता येईल. साधं ऋतुचक्रच्या मलपृष्ठवरचे वर्णन पाहा. " ऋतूंच्या लावण्यमहोत्सवाची चित्रे रेखाटणारे हे ललित निबंध आहेत. दुर्गाबाईंनी डोळे भरून सृष्टीचे दर्शन घेतले आहे. निसर्गाची बदलती रूपे, पशुपक्षांच्या हालचाली,रंगगंधांच्या बोलक्या संवेदना त्यांनी एखाद्या शास्त्रज्ञाच्या डोळस कुतूहलाने न्याहाळल्या आहेत. परंतु या शास्त्रीय दृष्टीकोनाला काव्यात्म प्रतिभेची मिळालेली जोड हे या ललित निबंधांचे खरे वैशिष्ट्य आहे. या सृष्टीतल्या सर्व सौंदर्याचा भौतिक आणि कलात्मक आस्वाद घेणारे सौंदर्यासक्त मन त्यांच्याजवळ आहे. तसेच, या तरल सौंदर्यानुभावांना सेंद्रिय रूप देण्याचे, या अतींद्रिय क्षणांना इंद्रियांकरवी अनुभवायला लावण्याचे सामर्थ्य त्यांच्या प्रतिभेच्या ठिकाणी आहे. जाईजुईच्या झेल्यासारखे हातात धरून हुंगावेसे वाटणारे पर्जन्यरूप सूर्यबिंब. पोपटाच्या पिलांसारखी दिसणारी वडाची हिरवी पाने,पारिजातकांच्या मोत्यापोवळ्यांच्या राशीतून फुटणारे श्रावणाचे हसू, फुलांच्या पायघड्यांवरून भूतलावर पदार्पण करणारा पुष्पमंडित भाद्रपद... हे सारे रूपरसरंगगंधाचे, लावण्यविभ्रमांचे जग दुर्गाबाईंचे निबंध वाचताना क्षणोक्षणी प्रत्ययाला येते. निसर्गाच्या चित्रलिपीचे  रहस्य दुर्गाबाईंना  उलगडले आहे याची साक्ष या निबंधसंग्रहात पानोपानी मिळते." किती सुंदर नाद या लेखनात आढळतो ना?
          मराठी महिन्यांना नावेदेखील बाईंनी तेवढीच नादवेधक दिलेली आहेत. उदा. वसंतहृदय चैत्र, मेघश्याम आषाढ, पुष्पमंडीत भाद्रपद, संध्यारंजित कार्तिक, तालबद्ध पौष, रूपधर फाल्गुन इ. चैत्राला बाई "रूपरसरंगगंधमय चैत्रमास" म्हणतात. चैत्रातल्या पालवी,मोहोर,पर्णशोभा व फळशोभा इत्यादी वनश्रीचे वर्णन करून बाई थांबत नाहीत तर ऐन चैत्रात असणारी पक्ष्यांची घरटी व त्यांचे आकार, पक्ष्यांच्या हालचाली, त्यांची दैनंदिनी, त्यांच्या प्रेमाच्या अजब तऱ्हा आदी पक्षीजीवन तेवढयाच संवेदनशिलतेने मांडतात आणि थोडया वेळासाठी का होईना आपल्याला 'पक्षीमय' करून सोडतात. तसंच वृक्षवेलींचं. बाईंच्या पाहण्यातल्या एका पिंपळाला मधुमालतीच्या वेलाने जखडले होते. त्याचं वर्णन बाईंनी किती सुरेख केलंय ते पहा. "तरूलतांच्या आलिंगनाची काव्यमय वर्णने मी पुष्कळ वाचली आहेत. पण मधुमालतीला आपल्या पल्लवांनी छातीशी घट्ट घट्ट कवळून धरणाऱ्या आणि लाजवत पालवीने आच्छादलेले आपले सुंदर मस्तक किंचित लववून निर्भर हर्षाचे आणि कोमलतेचे प्रदर्शन करणारा हा पुराणवृक्ष पाहून माझी नजर येत जाता त्याच्यावर खिळून राहते. आणि नुसती पालवीच नाही तर हिरवी फळेही इतर झाडांप्रमाणे यांच्या फांदीफांदीला ओळीने चिकटून बसली आहेत." फक्त काव्यमय शैलीच नाही, तर वर्णन, माहिती व मांडणी यांचा अप्रतिम संगम बाईंनी घडवून आणलाय.
         ऋतुचक्रमध्ये अज्ञात माहितीचा अनमोल खजिना दडलेला आहे हे पुस्तक वाचताना पदोपदी जाणवते. एखाद्या वृक्षाचे,फळाचे, फुलाचे, ऋतुचे पुराणातील अथवा संस्कृत, गुजराती या इतर भाषांतील अफाट व आपल्याला सहसा माहित नसलेले दुर्मिळ असे संदर्भ बाईंना माहित आहेत. मग त्यामध्ये नारळाची निर्गंध व टणक फुले ही तीन पाकळ्यांची व फिक्या पिवळ्या रंगाची असतात ही माहिती तर असतेच पण मग नारळाच्या झाडाचा फाल्गुन ते चैत्र रंग कसा बदलतो हे वर्णनही आपल्या ज्ञानात भर टाकून जाते. इतर बाबी म्हणजे, सुरंगीची पांढऱ्या पाकळ्यांची व सुंदर केशरी परागांची अतिमधुर फुले, उंडीची झाडे, कडुनिंबाचं झाडाचं निळसर फुलांच्या तुऱ्यांनी भरून जाणं, त्याचा रात्रीचा सुगंध मनोरम वाटणं इत्यादी माहित झाल्यावर एखादं गुपित हाती आल्यासारखं वाटतं. खरं सांगतो, तसा कडुनिंब हजारदा पाहिला होता पण एवढं सुक्ष्म निरीक्षण कधीच केलं नव्हतं. अशोकाच्या वृक्षातसुद्धा नर अशोक वा मादी अशोक ही माहिती माझ्यासाठी नवीनच होती. घाणेरी कशी सुशोभित वाटते हे लिहिताना बाई म्हणतात 'सर्व फुलांमध्ये अतिशय हिरीरीने कोणी नटले असेल तर ही उग्रगंधी घाणेरी'. मग घाणेरीचे अनेक सारे रंग व त्यांचं एकमेकांमधलं वर्णन वाचताना जाणवतं की वास्तविक कुठलेच दोन रंग स्वाभाविकपणे एकमेकांच्या शेजारी एरव्ही शोभत नाहीत,पण निसर्गाच्या दुनियेत कुठलेही भडक वा एरव्ही विसंगत वाटणारे रंग विशोभित दिसत नाहीत, उलट एकमेकांची शोभाच वाढवतात. मग आपल्याकडे तिला तुच्छतेने घाणेरी म्हणतात तर गुजरातमध्ये 'चुनडी' हे सुंदर नाव कसे मिळाले वा त्यावरून गुजराती,काठेवाडी वा राजस्थानी चुनऱ्यांचे रंग भडक का असतात वा त्याला हे कारण कसे यथार्थ आहे, हे सहजपणे बाई सांगतात. ही सारी रंगरंगोटी वाचताना भारतीय रंग अभिरुचीचे मूळ हे यांसारख्या नैसर्गिक आविष्कारात आहे हे कळल्यावर निसर्ग व भारतीय जीवनाचं पूर्वांपार चालत आलेलं नातं समजल्याचा जेवढा आनंद होतो तेवढंच दु:ख आज आपण निसर्गापासून तुटत चाललोय याचं होतं.
         भारतीय महिन्यांचं एवढं नितांत सुंदर वर्णन भारतातल्या दुसऱ्या कुठल्याच भाषेत सापडणार नाही, हे माझंच नव्हे तर प्रत्येक वाचकाचं ठाम मत बनत असावं असं मला वाटतंय. सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे ऋतूंच्या लावण्यमहोत्सवाची चित्रे रेखाटणारे हे ललित निबंध आहेत. ते फक्त भारतीय महिन्यांची अथवा ऋतूंची माहिती देणारे लेख नाहीत. पुस्तकाच्या सुरुवातीलाच सर्व महिन्यांकडे वळण्याआधी बाई ऋतू व त्यांचे चक्र,सूर्य,चंद्र व त्यांचा मानवी जीवनाशी असलेला संबंध,मग त्यातूनच आपल्या पूर्वजांनी चंद्राला गर्भाचा अधिष्ठाथा का मानले, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मांडतात. प्राचीन ऋषी-मुनींनी सुक्ष्मातल्या सूक्ष्म व भव्यातल्या भव्य अविश्कारांबद्दल चिंतन केले व मग आपले काही ठोकळ सिद्धांत व संकेत त्यावर मांडले. हे संकेत खूप मार्मिक आहेत. उदाहरणार्थ, चंद्र व गर्भ यांचे नाते पाहिल्यास आपल्या बालगाण्यांतून चंद्राला मामा का म्हणतात हे कोडे लगेच कळते. स्त्रीच्या ऋतूस्रावाचा व चंद्राचा संबंध तर अतोनात जवळचा. ऋतू शब्दातला तो कालमान मोजणारा अर्थही दोन्ही बाबतीत एकच.फिरून फिरून येणारा,सृजनशील.
            
ऋतुचक्रवर एका ब्लॉग मध्ये सारं काही लिहिणं अवघड आहे. एका लेखात पुस्तकातल्या  कोणत्या भागाचा उल्लेख करावा व कोणत्या भागाचा टाळावा हे कळंत नाही. भांबावायला होतं. थोडक्यात, 'ऋतुचक्र'चा आस्वाद घेण्याअगोदरची ही एक झलक आहे असं मी म्हणेन. 'ऋतुचक्र'ची आल्हाददायक पर्वणी कुणीही दवडू नये यासाठी हा ब्लॉग.
                      







Comments

  1. "ऋतुचक्रवर एका ब्लॉग मध्ये सारं काही लिहिणं अवघड आहे..."

    I would say, you can write a small book on that..not just a blog post!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

यशवंतराव.. (भाग १)

जागृती यात्रा भाग ३: एका सुप्ताची सुरुवात.