जागृती यात्रा भाग ४: सेलको: जगणं उजळवताना..

       यात्रेत जमलेले सर्व यात्री हे एकाच मांदियाळीतले होते. या साऱ्यांच्या तोंडी स्वत:च्या देशाच्या भावी विकासाचं सुप्त होतं. भारताच्या विविध भागांतून आलेली ही टीम सारा भारत बघायला,शोधायला जाते हे खरंय, पण त्याच्याच अगोदर या ट्रेन मध्ये विविधरंगी-विविधढंगी भारत जमलेला होता. ट्रेनमध्ये अगदी पहिल्या दिवशीच भारताच्या २४ राज्यांतले व २३ देशातील असे ४७ रंग एकमेकांत लीलया मिसळले. पहिला दिवस ही पुढच्या चौदा दिवसांची रिहर्सल होती. पुढील चौदा दिवस ट्रेनमध्येच अर्ध्यापेक्षा अधिक वेळ रहायचं होतं व म्हणून या नव्या रुटीनला रूळावं म्हणून पहिला दिवस सर्वांनी जागृतीच्या शेड्युलनुसार ट्रेनमध्येच घालवला. पहिल्या दिवशीच पुढच्या चौदा दिवसांच्या खडतरपणाची जाणीव झाली. जागृती ही एक 'अ‍ॅडवेंचर जर्नी' असल्याने मनाची तशी तयारीही झाली होतीच. दुसऱ्या दिवशी यात्रेतली पहिली भेट आम्ही देणार होतो हुबळी-धारवाड व तिथून काही अंतरावर असलेली खेडी. बेंगलोरमधील 'सेलको' नावाच्या सौरउर्जेच्या क्षेत्रात लक्षणीय काम करणाऱ्या या कंपनीची खेडयातील कामगिरी, त्यांनी तिथं उभारलेलं आर्थिक मॉडेल व गावकऱ्यांशी संवाद असा हा तिहेरी कार्यक्रम होता. त्याअगोदर सेलकोची सुरुवात, तिचं नेमकं काम इ. बाबी सर्वांना माहिती व्हाव्यात यासाठी सेलकोतर्फे धारवाडच्या कृषी विद्यापीठात सेमिनार आयोजित केला होता.

        सध्या सेलको ही सौर उर्जेच्या क्षेत्रात काम करणारी एक नावाजलेली भारतीय कंपनी आहे. तीची स्थापना १९९५ मध्ये श्री.हरीश हांडे यांनी केली. तेव्हापासून सेलको सौरवीज व सौरवीजेशी संबंधित इतर सेवा प्रामुख्याने कर्नाटक व दक्षिण भारतातील ग्रामीण भागात देत आली आहे. फक्त वीजच नव्हे तर त्यच्यशी संलंग्न तंत्रज्ञानाची योग्य माहिती, आर्थिक साहाय्य व नंतर कार्यक्षम सेवा देणे ही आता सेलकोची ओळख बनलेली आहे. सेलकोने अनेक घरांना फक्त वीजच नाही तर या क्षेत्रातील लघुद्योगसुद्धा दिलेले आहेत. हरीश हा आयआयटी खरगपूरचा एनर्जी स्टडीजमधला इंजिनिअर. पुढे एमएस व पीएचडी त्याने अमेरिकेतल्या म्यासाच्युसेट्समधून केल्यानंतर तिथलं ऐशारामी जीवन नाकारून भारतात परत येऊन सेलकोची स्थापना केली. सौरउर्जेवर काम करणारी कंपनी सुरू करायची हे ठरल्यानंतर ग्रामीण भागात तिची उपयुक्तता कितपत असेल हे अभ्यासण्यासाठी त्याने बेंगलोरजवळच्या एका खेडयातील शेतकऱ्याच्या घरी सौर-व्यवस्था बसवली. थोडया दिवसांनी हरीश व त्याचे दोन सहकारी त्या शेतकऱ्याकडे पैसे आणण्यासाठी गेले असता, काही कारणास्तव त्यांना पैसे मिळाले नाहीत. तिघांकडे मिळून तेव्हा चाळीस रूपये, त्यात मग तिघांनीही कसेबसे जेवण उरकले. आता बेंगलोरला परत जायचा प्रश्न. एका अनोळखी खेडयात एवढे पैसे कुठून मिळणार? हरीशचे दोन्ही सहकारी अल्पशिक्षित. ते इकडं-तिकडं फिरुन कुठं काही काम मिळंतय का बघू लागले. बेंगलोरवरुन दक्षिणेत कुठंतरी जाणाऱ्या बसेस तिथं जवळपास थांबायच्या. हरीशच्या दोन्ही सहकाऱ्यांनी तिथं हमाली केली व पैसे मिळवले. अर्थार्जन व शिक्षण यांचा वानगीदाखलही संबंध न दर्शवणारा तो प्रसंग हरीशच्या मनावर कायमचा कोरला गेला आणि म्हणूनच उत्तमोत्तम कौशल्ये असूनही फक्त अशिक्षित किंवा अल्पशिक्षित असल्याने सध्याच्या अर्थकारणात मागे पडल्यामुळे हिणवल्या जाणाऱ्या या वर्गाकडे हरीशचा ओढा जरा जास्तच आहे.

       हुबळीच्या जंक्शनवर उतरल्यावर बसने आम्ही धारवाडच्या कृषी विद्यापीठाकडे प्रयाण केले. विद्यापीठाच्या आवारात सेलकोकडून आमचे स्वागत करण्यात आले. हरीश या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता. पण आमच्या पुढच्या प्रवासात अहमदाबादमध्ये आम्हाला तो भेटला. कार्यक्रमात सेलकोचे आर्थिक संचालक श्री.उडुपा यांनी कंपनीचा सारा प्रवास आमच्यासमोर मांडला. सेलकोवरील त्यांचं भाषण माहितीपूर्ण होतं. श्री.उडुपा हे पूर्वी कर्नाटक ग्रामीण विकास बँ
केचे (KGVB) चेअरमन होते. १९९५ मध्ये सेलकोची स्थापना झाल्यावर हरीशकडे कोणत्याच प्रकारचं आर्थिक पाठबळ नव्हतं. तरीसुद्धा कर्नाटकतल्या गावांगावांतून, खेडयाखेडयातून सौर उर्जेच्या मॉडेल्सचे डेमोज देत, त्याचे फायदे सांगत फिरत होता. पण आपल्याकडे सेल्समन घरी आला की लोकांना मनात शंका येते की हा काहीतरी गळ्यात मारायला आलांय. हरीशच्या बाबतीतही तेच झालं. त्यात अगोदर तिथं शासकीय यंत्रणा हा सौर प्रकल्प राबवायच्या. त्यांच्या कामांचा निकृष्ट दर्जा, अनियमित देखभाल, काही ठिकाणी खंडित सेवासुद्धा आणि सोलार पनेल्सची न परवडणारी किंमत यामुळे तेव्हा सौर व्यवस्था हा प्रकार आपली विश्वासार्हता गमावून बसला होता. या साऱ्यामुळे हरीशसमोर मोठी आव्हाने उभी होती. या आव्हानांना संधी समजत सेलकोने मग वर्षानुवर्षे दारिद्ऱ्याने गांजलेल्या या जनतेसाठी आपले आर्थिक मॉडेल उभारले. खेडयातल्या या अल्पशिक्षित व गरीब जनतेपर्यत सौर व्यवस्थेची सोय पोचली तर लोडशेडींगच्या त्रासातून त्यांची सुटका होइल हा हरीशचा विचार. मग हरीशने ग्रामीण अर्थव्यवस्था व तिचे बेभरवशाच्या शेतीवरील अवलंबित्व समजून घेतले. ग्रामीण जनतेच्या या अशा आर्थिक परिस्थितीचा विचार केल्यावर यांना सौरव्यवस्था खरेदी करण्यासाठी बॆंकेचं आर्थिक साहाय्य, प्रतिमहिना अल्प हप्ता म्हणजे अगदी १० रुपयांपसून ते ३५० रुपयांपर्यंत, सौर व्यवस्थेची कायमस्वरुपी विनाशुल्क देखभाल व दुरुस्ती, तसेच कर्जाच्या परतफेडीची बहुकालीन मुदत अशा कल्पना राबवायला सुरुवात केली. या गरीब शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी मघाशी उल्लेख केलेल्या श्री. उडुपांच्या कर्नाटक ग्रामीण विकास बंकेने त्यावेळी हरीशला खूप मदत केली. आता तर निवृत्त झाल्यावर त्यांनी सेलकोचे पूर्ण वेळ संचालक म्हणून काम पाहायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर बी-स्कूलमधल्या शिकलेल्या एखाद्या आंत्रप्रीनरसारखे ’डिमांड मार्केट’ शोधून प्रोडक्ट विकण्याऐवजी, जिथे आपल्या प्रोडक्टला डिमांडच नाही, चक्क तिथे तो प्रोडक्ट यशस्वीरित्या विकायचा व चक्क डिमांड मार्केट तयार करायचे, हे विशेषच म्हणायला हवे. बँकांची व शासकीय यंत्रंणांची आर्थिक मदतीस अनिच्छा असतानाही हरीशने सेलकोला यशस्वी करुन दाखवले.


   
यात्रींसमोर बोलताना श्री. उडुपा
    श्री. उडुपांच्या भाषणानंतर ’अभ्यासलेल्या प्रतिरुपाचा परिणाम’(Case study of an Impact) या आमच्या प्रकल्पांतर्गत आम्ही धारवाडजवळच्या ’होन्नापूर’ या गावात तिथंल्या गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी गेलो. सेलकोचा त्यांच्या वर्तमान वीजेच्या स्थितीवर चांगला परिणाम असल्याचे अनेकांनी मान्य केले. तिथल्या सौर-व्यवस्था बसवलेल्या एका घरात आम्ही काही यात्री गेलो. गृहिणीशी बोलताना कळलं की, सेलकोचे बरेचसे ग्राहक प्रतिदिन १०० रुपयांपेक्षाही कमी उत्पन्नात जगत असतानादेखील त्यांनी ३-४ वर्षांपूर्वी अठरा-वीस हजारांची सौर-व्यवस्था बसवून घेतलेली आहे. ज्यातले ९५% रक्कम बँक ग्राहकाला देते. हरीश अहमदाबादमध्ये आम्हाला सांगत होता " देशभरात आतापर्यंत अशाच १,२०,००० घरांमध्ये सेलकोनं आपली सौर-व्यवस्था बसवली आहे. सध्यातरी भारतात फक्त कर्नाटक व गुजरात या दोन राज्यापर्यंत हा विस्तार मऱ्यादीत आहे. या दोन राज्यांत मिळून सेलकोच्या २५ शाखा आहेत. सौर व्यवस्थेसाठी लागणाऱ्या बॆटरीजचा लघुद्योगही सेलकोने रस्त्यांवरील विक्रेत्यांना घेउन सुरु केला आहे."
       स्वत:बरोबर तळागाळातल्या अल्पशिक्षित ग्रामीण जनतेचा विकास साधण्याचा चंग कर्नाटकतल्या हंडट्टू नावाच्या छोट्या खेडयात जन्मलेल्या हरीश हांडे या ’सोशल आंत्रप्रीनरने’ बांधला आहे.  आपल्याला ज्या भागात काम करायचे आहे, तिथल्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा सगळ्याच व्यावसायिक कंपन्या विचार करतात पण तो फक्त स्वत:च्या फायद्यासाठी. त्यांच्या तिथं आपलं उत्पादन खपवण्यासाठी. (उगाच खेडयातली पोरं-पोरी एक रुपयाचा शांपू आणि ५ रुपयांची कॅडबरी घेत नाहीत.) त्यांच्या अभावांचा, त्रुटींचा विचार करुन तिथं वेगळं असं मॉडेल उभा करणारा हरीशसारखा एखादा रोल मॉडेल वेगळाच. ग्रामीण भारताशी हरीशची नाळ जोडली गेली आहे. ’भारता’ला बरोबर घेउन चालल्याशिवाय ’इंडिया’ महासत्ता बनू शकणार नाही असं तो म्हणतो व त्या भारताकडे होत असलेलं दुर्लक्ष त्याला चीड आणतं. यू ट्यूबवरील त्याचे हे व्हिडीओज बघितले तरी हे लक्षात येतं. अंधारात ठेचकळल्याशिवाय उजेडाची किंमत कळत नाही. हा ’असा’ अंधार आयुष्यात येणंही गरजेचं असतं. हरीशच्या आयुष्यात तो आला. सहा महिने श्रीलंकेत व दोन वर्षे कर्नाटकात झोपडीत अशी तब्बल अडीच वर्षे अंधारात काढल्यावर त्याला ’प्रकाश’ म्हणजे काय ते कळलं. आशियाचं नोबेल समजल्या जाणाऱ्या मॆगसेसे पुरस्कार व दोनदा अ‍ॅश्डेन पुरस्कार मिळवल्यानंतरही आपलं काम आता कुठं सुरु झालंय असं त्याला वाटतंय. कारण अजूनही ४० कोटी भारतीय अंधारात राहतात, त्यांचं घरंच नव्हे तर जगणं उजळवणं हा हरीशसाठी खरा मॆगसेसे असेल.

Comments

Popular posts from this blog

दुर्गा भागवतांचं लेखन: भाग २ ( ऋतुचक्र )

यशवंतराव.. (भाग १)

मिसकॉल..