जागृती यात्रा भाग १० : बिहारचं 'निदान'

     ३१ डिसेंबर ट्रेनमध्ये साजरा करणे ह्यात वेगळं काहीही नाही. पण नववर्षारंभाचा डान्स ट्रेनमध्ये करणं हा पूर्णपणे नवा अनुभव आमच्यापैकी प्रत्येकजण अनुभवत होता. नवीन वर्ष असल्याने म्हणा किंवा शेड्युलमध्ये असल्याने म्हणा १ जानेवारीला आम्हाला सुट्टी दिली होती. त्या दिवशी ट्रेनमध्ये मात्र विविध सेशन आयोजित केले होते. ट्रेनने अजून ओरिसा सोडलं नव्हतं. ओरिसाच्या सीमेजवळ  कुठेतरी आम्ही होतो. डायरीमध्ये मी काहीतरी टिपत बसलो होतो. साधारणत: दुपारच्या सुमारास ओरिसाची सीमा संपवून पश्चिम बंगालमध्ये आम्ही प्रवेश केला. डायरी तशीच ठेवून मी खिडकी पकडली. बंगभूमी..! रवींद्रनाथ टागोरांची भूमी, विवेकानंदाची भूमी, सुभाषबाबूंची भूमी, सत्यजित रेंची भूमी, कम्युनिस्टांची भूमी. बंगाल या प्रांताबद्दल मला नेहमीच आकर्षण वाटत आलेले आहे. या भूमीने देशाला अनेक बुद्धिवंत माणके दिलेली आहेत हे तर सर्वश्रुत आणि सर्वमान्य आहेच. पण त्याहीपेक्षा या ठिकाणी साचलेले एक विलक्षण वेगळेपण, एक मंतरलेलेपण या भूमीने देशाला दिलेलं आहे असं मला नेहमीच वाटतं. साहित्य, कला, क्रीडा, चित्रपट, राजकारण अशा अनेक क्षेत्रात ते वेगळेपण व मंतरलेलेपण जगाला दिसलेलं आहे. किती नावं घ्यावीत तेवढी कमी. रवींद्रनाथांच्या कवितांनी प्रभावित होऊन पु.लं. बंगाली शिकायला पन्नाशीत बंगालला गेले. सत्यजित रेंनी चित्रपटाला मोठ्या उंचीवर नेवून ठेवले. बिमल रॉय, मृणाल सेन, रित्विक घटक,श्याम बेनेगल आदींनी त्यांचा वारसा फक्त समर्थपणे नव्हे तर स्वत:च्या सृजनशीलतेने जपला. बिमलदांनी त्यांच्या चित्रपटांतून सामान्यांचं 'असामान्य' जगणं टिपलं.सांगायचा मुद्दा हा की, अशा या मंतरलेल्या बंगभूमीला निदान चरणस्पर्श तरी करता यावा असं मला मनोमन वाटत होतं. दुपारी खरगपूरजवळच्या हिजली नामक स्टेशनवर ट्रेन काही वेळासाठी थांबली. सुरक्षा रक्षकाला थोडीशी विनंती करून मी पंधरा-वीस मिनिटांसाठी खाली उतरलो; म्हटलं मातीला नाही निदान इथल्या सिमेंटला (प्लाटफॉर्मला) तरी स्पर्श करावा. काही वेळाने ट्रेन निघाली तसा परत चढलो. थंडीचे दिवस जरी असले तरी, दुपारी अडीचच्या सुमारासच प्रचंड थंडगार वारा सुटला. खूप थंडी वाजायला लागली. दिवसभर ढगाळ वातावरण होतंच पण अजिबात उन नव्हतं. हिजलीच्या पुढच्याच सिरजाम नामक गावात लोकं दुपारीच शेकोटी पेटवून बसले होते. लहान मुलं, स्त्रिया नखशिखांत गरम कपड्यांनी लपेटून बसली होती. काही वेळानंतर आदरा रेल्वे स्टेशनवर पुन्हा ट्रेन थांबली. सायकल रिक्षातून प्रवाशांना स्टेशनवर वेळेवर पोचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारा चाळीशीतला एक माणूस बघितला व बलराज साहनींच्या सर्वांगसुंदर अभिनयाने नटलेला बिमलदांचा 'दो बिघा जमीन' आठवला.

    रात्री काही सेशन्स, गृहपाठ व नंतर जेवण, गप्पा आणि झोप असं काहीसं गेल्या पाचसहा दिवसांपेक्षा वेगळं शेड्यूल होतं. शिक्षण,टीम अण्णा,राजकारण,भ्रष्टाचार,करिअर,शहरीकरण,पुस्तकं,व्यवस्थापन अशा अनेक विषयांवर यात्रींच्या गप्पा रंगायच्या. रात्रभरात आम्ही बंगाल,झारखंड करीत बिहारमध्ये प्रवेश केला. दुसऱ्या दिवशी सकाळीच पटनामध्ये पोचलो. 'सुधारित' आवृत्तीच्या बिहारबद्दल कुतूहल मनात होतंच. पटना स्टेशनवर उतरलो. स्टेशन छोटं आहे. गेल्या पंधरा वर्षात इथंले दोन रेल्वे मंत्री होऊनही हे स्टेशन पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेले आहे. स्टेशनमधला गलिच्छपणा नाकाला रुमाल धरायला लावणारा होता. पायऱ्यांवरून खाली उतरताना एवढ्या सकाळी जी गर्दी होती ती आपल्याकडे मुंबईतल्या कोणत्याही फास्ट लोकलच्या स्टेशनवर असावी एवढीच होती. स्टेशनबाहेर इथेही बंगालसारखेच सायकल रिक्षावाले उभे होते. पटनातल्या 'निदान' या संस्थेला भेट द्यायला आम्ही जात असताना, हळूहळू बदलणाऱ्या बिहारच्या खुणा दिसत होत्या. रस्ते चांगले बनवले जात आहेत, मोठया इमारतीही उभ्या राहताहेत. एकूणच बिहार 'कात' टाकतंय.

     'निदान' ही संस्था मिश्र गैरलाभाचे (Hybrid Non-Profit) मॉडेल आहे. 'निदान'ची स्थापना १९९६ साली 'निदान'चे संस्थापक-कार्यकारी अध्यक्ष अरविंद सिंग यांनी केली. अंगमेहनत करणाऱ्या  तळागाळातील कामगारांसाठी 'निदान' काम करतंय. शहरातील असंघटीत क्षेत्रातील या श्रमिकांना म्हणजे रस्त्यावरील सफाई करणारे कर्मचारी, भाजीपाला विक्रेते, गवंडी, छोटे सुतार, प्लंबर्स, भंगी इत्यादींना आर्थिकदृष्ट्या सक्षमरीत्या बांधण्याचं व त्यांना त्यांचे कायदेशीर अधिकार मिळवून देण्याचं व्रत 'निदान'ने हाती घेतलंय. 'निदान'मध्ये सकाळी पोचल्यानंतर तिथंल्या टीमने सर्व यात्रींचं स्वागत केलं. औपचारिकतेनंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.तिथंला सेशन म्हणजे अरविंद सिंग यांचं भाषण होतं. भाषणात त्यांनी 'निदान' ची सुरुवात कशी झाली,निदान कसं काम करतेय इथं पासून ते सध्याच्या 'बदलत्या' बिहारमध्ये 'निदान'ही कसं बदलतंय, सरकारबरोबर कसे काम करतंय हे सविस्तरपणे सांगितलं. निदान असंघटीत क्षेत्रात आपल्या अनेक उपक्रमांची एक साखळी बांधलेली आहे. वरती उल्लेख केलेल्या असंघटीत क्षेत्रातल्या या कष्टकऱ्यांसाठी बँक कोणतीही सुविधा द्यायची नाही, तेव्हा त्यांच्या या कमजोरीचा खाजगी सावकार फायदा घ्यायचेत व अकारण कर्जाच्या विळख्यात हे कष्टकरी अडकून जायचेत. त्यांची ही बँकेची गरज ओळखून निदानने कामांची सुरुवात लघुवित्त व बचत गटांपासून केली. निदान एकूण बजेटपैकी ४७% पैसे त्यांच्या उत्पादन व विक्री उपक्रमांतून गोळा करते तर राहिलेले ५३% देणगीदार व सरकारी निधीमधून मिळवते. गेल्यावर्षी मिळालेल्या साधारण साडेचार कोटींच्या निधीपैकी जवळपास पावणेदोन कोटींचा निधी राष्ट्रीय महिला आयोगाकडून मिळाला होता, हे नमूद करायला अरविंद सिंग विसरत नाहीत. निदानमधल्या सेशननंतर केस-स्टडीसाठी यात्रींची विभागणी तीन वेगवेगळ्या गटांमध्ये करण्यात आली. 'निदान'मधील कर्मचाऱ्यांबरोबर मग आम्हाला त्या-त्या ठिकाणी पाठवण्यात आले.

   सेशन आटोपून आम्ही पटनाच्या नालापर भागातल्या झोपडपट्टीत निघालो होतो. वाटेत काही गमतीदार गोष्टी पाहायला मिळाल्या. पुणेरी पाट्यासारख्या इथे काही 'बिहारी पाट्या'ही बघायला मिळाल्या. त्यातील एका पाटीवर गेल्या काही महिन्यांत पेटलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर इथं अधोरेखित करावासा वाटणारा वेगळा संदेश लिहिला होता. बिहार आता सुधारतंय तर देश भ्रष्टाचारामुळे पिछाडीवर येतोय हे सांगावसं वाटणारा हा संदेश त्या पाटीवर "बिहार जागे, देश हागे" असा थोडक्यात मांडला होता. एका ठिकाणी तर चक्क 'घाशीराम कोतवाल' नाटकाची हिंदी आवृत्ती लागली असल्याचा बोर्ड बघितल्यावर आम्हा मराठी यात्रींचा तेंडुलकरांबद्दलचा 'मराठी अभिमान' जागृत झाला. नालापरमधल्या झोपडपट्ट्यांची अवस्था कोणत्याही शहरातील सर्वसाधारण झोपडपट्ट्यांची असते तशीच होती. अनेक कामगारांशी तिथं संवाद साधायला मिळाला. इथंले जवळपास सर्व पुरुष व बायका पटनातील कचरा गोळा करण्याच काम करतात. तो सर्व कचरा एका ठिकाणी एकत्र करून मग त्याची 'ओला कचरा' व 'सुका कचरा' अशी विभागणी करण्यात येते. आपापला सुका कचरा मग जो तो विकून त्याच्यावर थोडेफार पैसे मिळवतो व ओला कचरा 'निदान'च्या निदान स्वच्छधारा प्रायव्हेट लिमिटेड (NSPL) या कंपनीकडे सुपूर्द केला जातो. त्यापासून विविध प्रकारची खते बनवते. ती विकून या सफाई कामगारांचे पैसे चुकते केले जातात. सुधारत्या बिहारमध्ये आता मोठमोठ्या कंपन्याही येवू लागल्या आहेत. त्या कंपन्यांना हवा असणारा स्वच्छता कर्मचारी वर्ग निदानमधूनच पुरवला जातो. कचरा जमा करणाऱ्यांना 'सफाईमित्र' म्हणून संबोधले जाते. एका ठराविक संख्येत असलेल्या सफाईमित्रांवर एक निरीक्षक असतो. सौ. मंजुदेवी ही एक निरीक्षक आम्हाला भेटली. सफाईमित्रांना घरे,पाणी, महिला आरोग्य, मुलांसाठी शाळेसारख्या सोयी निदानकडून पुरवल्या जातात ही माहिती आम्हाला मंजुदेवीकडूनच मिळाली.

      
    'निदान'ने पटनात प्रचंड सामाजिक बदल घडवून आणल्याची चिन्हे दिसतात. आता संपूर्ण बिहार, उत्तरप्रदेश व राजस्थानमध्ये 'निदान' पसरलंय. असंघटीत कामगारांना कायदेशीर अधिकार मिळवून देतानासुद्धा अनेक अडचणी येतात. त्यांना "माणूस" म्हणून गृहीत न धरणारी व्यवस्था व या व्यवस्थेतील प्रत्येक चांगल्या गोष्टीला नाही म्हणणारे भ्रष्ट अधिकारी, तळागाळातल्या या श्रमिकांसाठी कोणत्याही  पॉलिसिज नसणारे सरकार या विरोधात ते लढताहेत. सध्याच्या बदलणाऱ्या बिहारमध्ये ते व त्यांचे उपक्रम यशस्वी ठरताहेत ही खूप चांगली बाब आहे. त्यांच्यासाठी नव्हे तर,बिहारसाठी आणि एकूणच भारतासाठी. एकेकाळी, राज्यातल्या अभद्र गुंडगिरीने देशाच्या नकाशावर नाव कमावलेल्या बिहारमध्ये स्थैर्य व विकास नांदतोय. स्वच्छतेतूनच सौंदर्य निर्माण होत असते. कुणीही न सांगता, अरविंद सिंगांसारखं बिहारच्या "स्वच्छतेचं" व्रत बिहारमधल्या अशा हजारो हातांनी स्वत:कडे घेतलंय. मग त्या "स्वच्छते"तून बिहारचं सौंदर्य अजून फुलेल ह्याचं 'निदान' करायला कुणा ज्योतिषाची गरज नाहीये. 




महिलाआरोग्याबद्दल प्रश्न विचारताना 




नालापरमधल्या सफाईमित्रांचं मनोगत लिहून घेताना 










Comments

Popular posts from this blog

दुर्गा भागवतांचं लेखन: भाग २ ( ऋतुचक्र )

यशवंतराव.. (भाग १)

मिसकॉल..