जागृती यात्रा भाग ११: हरितप्रदेशातून..

    खिडकीतून बघताना चोहीकडे सगळं कसं हिरवंगार दिसत होतं. मनाने अलवारसा कौल दिला 'उत्तरप्रदेश' आलं. मुबलक पाणी, सुपिक मृदा आणि आपल्याकडे नसते तशी लांबसडक शेती - 'हरितप्रदेश' व्याख्येला या तीन गोष्टी पुरेशा आहेत. उत्तरप्रदेशात पूर्वांचल या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या प्रादेशिक विभागातलं देवरिया हे एक जिल्ह्याचं ठिकाण आहे. देवरियाची विशेष अशी काहीच ओळख नाही पण 'जागृती यात्रा' राबवणाऱ्या जागृती सेवा संस्थानचं हे माहेरघर. देवरियापासून तासाभराच्या अंतरावर असलेलं 'बरपार' हे शशांक मणी (जागृतीचे संचालक) यांचं गाव. स्टेशनवर उतरताच देवरियात 'जागृती'चं ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत झालं. तिथून मग लगेच आम्ही बरपारकडे पोहोचते झालो. अगोदर ठरल्याप्रमाणे 'बिझग्यान वृक्ष' (Bizgyan Tree) या स्वाध्यायासाठी आम्हाला बरपार व आसपासची दोन-तीन गावे पालथी घालायची होती. सर्व संघ मग एकत्र जमले. बिझग्यान ही स्वाध्यायाबरोबरच एकमेकांमध्ये स्पर्धाही असल्याने प्रत्येक संघ आपापली व्यूहरचना रचायच्या तयारीला लागला. गावे छोटी-छोटी व जवळ असल्याने एकदम तीन चार गावांचा पल्ला पार करणे सहज शक्य होते. मग बरपारजवळच्याच चतुर्भुजपूर,पदरौना,कासिया व मोहद्दीपूर ही चार गावे आमच्या संघाच्या वाटणीला आली. संघातील अनघा तोडलबागी,गरिमा तिवारी,विनोद ननावरे आदी सदस्य झाडून कामाला लागले. गावकऱ्यांची मुलाखत घेताना आम्ही मुद्दामहूनच वेगवेगळ्या वयोगटांतील,व्यवसायातील स्त्री-पुरुष निवडले होते.


     जेमतेम २०० घरं असलेल्या या गावाला मग आम्ही शिक्षण, रोजगार, आरोग्य, स्त्री-पुरूष व जातीय (अ)समानता अशा अनेक निकषांवर तोलायचे प्रयत्न केले. त्यातून मग बरीचशी ठीकठाक व काहीशी धक्कादायक माहिती समोर आली.जातीपातींच्या समीकरणांवर उत्तरप्रदेशात निवडणुका कशा लढवल्या गेल्यात हे तर कालच्या निवडणुकीत सर्वांनी बघितलेच. पण ही जातीपातीची मुळे यूपीच्या छोट्या-छोट्या गावांत कशी घट्ट रुजली आहेत. हे आम्हांला तिथे कळाले; दुसरी गोष्ट म्हणजे  उत्तरप्रदेशात अस्तित्वात असलेली पडदा पध्दत.
     
     ’पिछड्यां’मधल्या एखाद्या बाईला सात ते आठ मुलं असणं हे तिथं सहजी आढळण्यासारखं आहे. शिक्षणाची एकूणच सरळमिसळ स्थिती दिसून आली. तरी तरुणांमध्ये तंत्रशिक्षणाचा ओढा कमीच आहे.देवरिया,गोरखपूर अथवा तत्सम शहरांत काम करणाऱ्या युवकांना साधारणत: तीन ते चार हजार रुपये प्रतिमहिना वेतन मिळते पण महिन्याकाठी दहा ते बारा हजार रुपये कमवण्यासाठी दिल्ली,गाझियाबाद किंवा हैदराबादला जाणाऱ्या युवकांची संख्या जास्त आहे असं तिथल्या २२ वर्षीय रविकर पटेल या पदवीधर तरुणाशी बोलल्यावर कळालं.फिरल्यानंतर आमची बिझग्यान वृक्ष (Bizgyan Tree) ही स्पर्धा सुरु झाली.बिझग्यानचं विस्तृत वर्णन इथं देत नाही. एकूण एकवीस संघातून शेवटी सात विजेते निवडण्यात आले.                                                                                                 

    

Comments

Popular posts from this blog

दुर्गा भागवतांचं लेखन: भाग २ ( ऋतुचक्र )

यशवंतराव.. (भाग १)

मिसकॉल..