ब्लॉगचे कॉपीराईट्स

myfreecopyright.com registered & protected

Friday, May 28, 2010

दार उघड...

                            आपल्या प्रत्येकाच्या दररोजच्या जगण्यात सुख-दुःखाचे अनेक क्षण येत (व जातसुद्धा) असतात. जसं सुख-दुखाचं तसंच आशा-निराशेचं. Student's life मध्ये तर हे 'फ्रस्ट्रेशन ' जरा जास्तच असतं व ते सुद्धा अगदी छोट्या- छोट्या गोष्टींचं. Exam मध्ये backlog राहिला,  xxx नं चक्क नकार दिला, ह्याला  Practical ला जास्त मार्क्स दिलेत, त्या सरांनी Partiality केली, असे एक ना अनेक प्रश्न ! नेहमी आपण अगदी कॅजुएली म्हणतोच  की  Life म्हणजे हे सगळं चालायचंच ! पण एवढ्या कॅजुएली मात्र आपण सगळ्या प्रश्नांना response  देत नसतो.दुःखाची अथवा निराशेची एखादी वेळ आली की naturally आपले अवसान गळून जाते.मात्र अशा वेळी थांबुनदेखील चालंत नसतं.कारण जग आपल्यासाठी थांबत नसतं.मग त्या समस्येवरती काही ना काही तरी उपाय शोधावा लागतो. उपाय शोधणं ही नंतरची activity आहे, पण त्याच्या पूर्वीच आपल्याला ' स्व:ताला mentally प्रिपेअर ' करावं लागतं, recharged  होण्यासाठी.  हे असे प्रिपेअर करण्याचे (वा recharged  होण्याचे ) अनेक मार्ग आहेत- शांतपणे तासनतास गाणी ऐकणं, Motivational Videos बघणं, Inspiring पुस्तकं वाचणं, झाडाखाली एकटाच बराच वेळ बसणं इ. हे ज्याच्या त्याच्या सोई (व आवडी ) नुसार वेग-वेगळे सुद्धा असू शकतील.
                    
                          कधीतरी असाच एक कवितासंग्रह वाचत असताना एक छान कविता सापडली. खूप आवडली. आता जर कधी कंटाळा आला, थोडसं frustrate वाटलं तर फक्त ही कविता वाचतो अन मग मात्र  सुर सापडतो. ही कविता खाली देत आहे. वरवर पाहता ही कविता लहान मुलांसाठी वाटेल, मात्र त्यातला गर्भितार्थ  हा लहान मुलांपेक्षा मोठ्यांनाच जास्त उपयोगी पडणारा आहे.


चिऊताईसाठी ....


दार उघड...
दार उघड...
चिऊताई, चिऊताई, दार उघड...!

दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील ?
आपलं मन आपणच खात बसशील?

वारा आत यायलाच हवा,
मोकळा श्वास घ्यायलाच हवा,
दार उघड...
दार उघड...
चिऊताई, चिऊताई, दार उघड...!

फुलं जशी असतात
तसे काटे असतात;
सरळ मार्ग असतो
तसे फाटे असतात!

गाणाऱ्या मैना असतात;
पांढरेशुभ्र बगळे असतात;
कधी-कधी कर्कश काळे
कावळेच फक्त सगळे असतात!

कावळ्याचे डावपेच पक्के असतील,
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील !
तरी सुद्धा या जगात वावरावंच लागतं,
आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं!
दार उघड...
दार उघड...
चिऊताई, चिऊताई, दार उघड...!


सगळच कसं  होणार
आपल्या मनासारखं ?
आपलं सुद्धा आपल्याला
होत असतं पारखं!

मोर धुंद नाचतो म्हणून
आपण का सुन्न व्हायचं ?
कोकिळ सुंदर गातो  म्हणून
आपण का खिन्न व्हायचं ?

तुलना करीत बसायचं नसतं गं,
प्रत्येकाचं वेगळपण असतं गं!

प्रत्येकाच्या आत एक
फुलणारं फूल असतं;
प्रत्येकाच्या आत एक
खेळणारं मूल असतं!
फुलणाऱ्या या फुलासाठी,
खेळणाऱ्या या मुलासाठी
दार उघड...
दार उघड...
चिऊताई, चिऊताई, दार उघड...!

निराशेच्या पोकळीमध्ये
काहीसुद्धा घडत नाही!
आपलं दार बंद म्हणून
कुणाचंच अडंत नाही!

आपणच आपला मग
द्वेष करू लागतो!
आपल्याच अंधाराने आपलं
मन भरू लागतो!

पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं,
तुला शोधित फुलपाखरू नाचत आलं!
चिऊताई, चिऊताई, तुला काहीच कळलं नाही!
तुझं घर बंद होतं,
डोळं असून अंध होतं.!

बंद घरात बसून कसं चालेल?
जगावरती रुसून कसं चालेल?

दार उघड...
दार उघड...
चिऊताई, चिऊताई, दार उघड...!


कवी- मंगेश पाडगांवकर 
कवितासंग्रह- बोलगाणी.


Sunday, May 9, 2010

उन्हाळ्याची सुट्टी........" आठवणीतली."              गेल्या काही  दिवसांपूर्वीच  B.Sc.ची Exam  संपली. आमचे सगळ्यांचे  Supervision सुद्धा संपले होते. ज्या सुट्टीची एवढे दिवस वाट पाहत होतो ती उन्हाळ्याची सुट्टी एकदाची सुरु झाली. उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की, माझं मन बालपणातल्या उन्हाळ्याची सुट्टीभोवती पिंगा घालू लागतं. एखाद्या जीर्ण वस्त्रातले एकेक धागे जसे बाहेर यावेत तशा एकेक जुन्या आठवणी जाग्या होऊ  लागतात.
               
              कोल्हापुर जिल्ह्यातालं ' चरण' हे माझं गाव. साधारण १९९४-९५ चा काळ. सगळीकडं जागतिकीकरण सुरु  होऊन  नुकताच काही काळ लोटलेला. त्यावेळी आमच्या चरणाला अजून जागतिकीकरणाची  झळ लागायची होती. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे आम्हा बाल- मंडळीसाठी धम्माल  असायची . सगळी आतेभावंडं उन्हाळ्याची सुट्टी साठी  आजोळी म्हणजे आमच्या घरी आलेली असायची. मग आजी आमच्यापेक्षा त्यांचे खुप लाड करायची, (कारण लेकीची मुलं ना!). घरी असलेले आंबे,काजू,फणसाचे गरे पहिल्यांदा त्यांना द्यायची व मग आम्हाला. त्यावेळी आमच्या शेतात आंब्याची भरपूर झाडे होती. जवळपास  सगळी झाडे आंब्यांनी लदाडलेली असायची. आई सुद्धा लोणच्याच्या आंब्यांचे लोणचे घालीत असे, ते सुद्धा अगदी सात-आठ बरण्या. मग उन्हाळ्याची सुट्टी संपायच्या थोड़े अगोदर किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला त्या बरण्या एकेक करीत मावशी व आत्या यांच्या घरी पोचत्या केल्या जायच्या.
               उन्हाळ्याचं  मला विशेष आकर्षण होतं ते उन्हाळ्यात अगदी सहज मिळणाऱ्या "रान-मेव्या"मुळे. त्यावेळी करवंदं ,जांभळं, काजू, अळू विकणाऱ्या कोकणातल्या  बाया, माणसं  आमच्या  गावी यायच्या. आमच्या गावात दररोज अशा १०-१२ बाया / माणसं यायची. कदाचित त्यांनी गावातील वाड्या  विभागून घेतलेल्या असाव्यात. बऱ्याचदा  एकच बाई करवंदं व जांभळं घेवुन येई. ही बाई/ बाबा (करवंदं ,जांभळं घेवुन येणाऱ्या पुरुषाला आम्ही बाबा म्हणायचो) गल्लीत येताना " करवंदं घ्या करवंदं..." असं ओरडत यायची. मग आमच्यापैकी कुणाचं तरी तिकडे लक्ष जायचं व तो सगळीकड़े ओरडत सुटायचा "अरे करवंदं वाली आली रे...",  मग आम्ही बाकीचे सारे हातातले पत्ते तिथंच टाकुन तसेच करवंदं घ्यायला पळत सुटायचो. त्यावेळी करवंदं व जांभळं ही मक्यावर मिळायची. मक्याने भरलेल्या एका वाटीवर बरोबर एक वाटी करवंदं मिळंत आणि मक्याच्या एका वाटीवर  जांभळं मात्र अर्धीच वाटी मिळायचीत. मग त्यांनी करवंदं / जांभळं  जरा जास्त द्यावीत यासाठी आम्ही सारी पोरे त्यांना, त्यांचं नाव/गाव विचारायचो, त्यांना पाणी  नेऊन द्यायचो. करवंदं / जांभळं,काजू, हे नेहमी मिळंत पण अळू क्वचितंच  मिळायचेत. मला मात्र करवंदं व जांभळानच्यापेक्षा अळू खूप आवडायचेत.
             उन्हाळ्यातलं अजून एक आपुलकीचं व्यक्तिमत्व म्हणजे "गारेगारवाला ". गारेगारवाल्याची वाट आवर्जुन बघत, आम्ही दररोज पत्ते खेळत बसायचो. हा गारेगारवाला त्या वेळी सायकल वरुन यायचा. गारेगारवाला आलाय हे कळायला कुणाला आरडाओरडा करायला लागायचा नाहीं. ह्याचं प्रमुख  कारण होतं ते म्हणजे त्याच्या सायकलला अडकवलेली भली मोठी घंटा! त्यावेळी कदाचित एवढी मोठी घंटा मी देवळानंतर थेट गारेगारवाल्याच्या  सायकललाच बघितली असेल. त्याच्या सायकलला पाठीमागे एक भली मोठी पेटी असायची. त्यात लाल, पिवळ्या, हिरव्या रंगाची गारेगार असत. ( माझी काही आतेभावंड ही मुंबईहून आलेली होती, ती गारेगारला आइस-क्रीम  म्हणत). गारेगारवालासुद्धा गारेगार मका, ज्वारी व पैशांवरती द्यायचा.यात सुद्धा मका व ज्वारीला प्राधान्य व मग पैशाला. करवंदं / जांभळं घेऊन येणाऱ्या  बायका दररोज वेगवेगळ्या असायच्या, गारेगारवाला मात्र तोच असायचा. गावात अलीकडे  करवंदवाली बाईच काय तर गारेगारवाला सुद्धा दिसत नाही, कारण आता 'अमूल' चं दहाचं आइस- क्रीम अगदी छोट्या पान-पट्टीवर सुद्धा मिळतं. 
             मे महिन्याच्या सुट्टीतलं आमचं दररोजचं  outing चं favourite ठिकाण म्हणजे आमच्या गावातली "काजवी". काजवी म्हणजे आमच्या गावच्या डोंगरातली अशी जागा जिथे फक्त काजूची झाडे लावलेली होती. काजवीत काजूची अगदी शंभराहूनही अधिक झाडे होती. (होती...???). आम्ही गल्लीतली सर्व पोरे तेंव्हा सकाळी गारेगार,करवंदं / जांभळं खाऊन झाल्यावर संध्याकाळी म्हैशी घेउन काजवीत जायचो. त्यामुळे आमची तेथे खूप चैन चालायची. तिथे गेल्यावर पहिल्यांदा आमच्यापैकी प्रत्येक जण कुठल्या झाडाला मोठा काजू आहे ते बघायचा. एकदा काजू बघितला की मग मात्र " हा काजू माझा...." असा त्यावर  हक्क सांगितला जायचा. मग एकदा का काजू झाडावर चढून काढला की पोरं त्या काजुच्या बिया फेकून देत. आम्हीसुद्धा सुरुवातीला त्या फेकून द्यायचो, पण काजुच्या बिया फेकून दिल्या की आई ओरडायची, त्यामुळे त्या घरी घेउन यायला लागलो. नंतर पावसाळ्यामध्ये  आई त्याच बिया भाजून त्यातले  काजुगर काढून द्यायची. एके वर्षी तर आईने आम्हा  तिघा भावंडांना काजुच्या ओल्या बिया आणायला लावल्या होत्या. मग त्या दिवशी  आयुष्यात पहिल्यांदा ओल्या काजुगराची भाजी, आम्ही तिघांनी मिटक्या मारत खाल्ली होती.
             
           परवा अगदी सहजच गावी गेलो होतो. संध्याकाळी मित्राबरोबर निवांत गप्पा मारत बसलो होतो. वेळ होता म्हणून मित्र म्हणाला "चल,काजवीतून जाउन येऊ".  त्याच्याबरोबर तिथे गेल्यावर दिसलं की,काजूची झाडं तोडण्याचं काम अगदी युद्ध-पातळीवर सुरू होतं. अनेक जेसीबी'ज, tractor व शेकडो कामगार मिळून काजवीचा डोंगर 'proposed वारणा  कालव्यासाठी' फोड़त होते. ते सारं बघून मानत "कालवा" झाला.तसाच खिन्न मनाने परत आलो. झोपताना मनात एकच विचार आला, ' करवंदवाली बाई, गारेगारवाला बाबा यांच्या बरोबर आपल्या काजवीचंसुद्धा जागतिकीकरण झालं!!' -----------------------------------------------------------------------------------------

वरील पोस्ट दि. २१ मे,२०१० च्या दै. ई-सकाळच्या मुक्तपीठ या सदरात  प्रसिद्ध झाली. (http://www.esakal.com/esakal/20100521/5179597150722905581.htm). या लेखाला प्रकाशित केल्या बद्धल सकाळचे सम्राट फडणीस यांचे आभार.