ब्लॉगचे कॉपीराईट्स

myfreecopyright.com registered & protected

Thursday, July 28, 2011

एक प्रयत्न -गांधीजींना उलगडण्याचा.


        काही दिवसांपूर्वी एक मेल आला होता. पूर्ण मेल गांधीजींबद्दल होता. मेल वाचला. त्यात पाकिस्तानला दिले गेलेले पंचावन्न कोटी, फाळणीच्या वेळचा गांधीजींचा नौखाली दौरा, त्याच वेळी सीमेवर होत असलेला रक्तपात व भीषण अत्याचार इत्यादी अनेक गोष्टींना गांधीजींना जबाबदार धरण्यात आले होते व त्यामध्ये गोडसेचा गोडवा गायला होता. मेलमध्ये गांधीजींच्या बाबतीत बरचंस गरळ ओकणारं काहीसं लिहिलं होतं. गांधीजींवर हे असे बिनबुडाचे आरोप करुन आपला मूर्खपणा व मनाचा कोतेपणा जगजाहीर करणार्यांचं मला खुप हसु येतं. एकूण काय, गांधीजींवरील या व अशा स्वरुपाच्या इतर आरोपांचे खंडण करण्यासाठी हा ब्लॊग नक्कीच लिहिलेला नाही. कारण खंडणमंडण करण्यामध्ये फक्त वेळ जातो. त्यातून साध्य तर काहीच होत नाही. मी माझ्या साऱ्या वाचन-चिंतन प्रवासात मला उलगडलेले गांधीजी इथे मांडले आहेत.
         
      वाचन तर लहानपणापासून होतंच पण कॉलेजला आल्यावर मात्र त्याची व्याप्ती वाढली. त्यात मग वाचन, चर्चा, व्याख्यानं, चिंतन इ. ची भर पडली.  ’राजाराम’ कॉलेजला असताना असल्या (वर उल्लेखलेल्या) व तत्सम विषयांवर आमच्या अक्षरशः चर्चेच्या फैरी झडायच्या. आपापली बाजू कशी वरचढ आहे हे दाखवायला प्रत्येकजण आटापिटा करायचा. त्यात ’राजाराम’ म्हणजे सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची खाणंच. मग काय, कॉलेजमधल्या अनेक क्लब्स, अभ्यासमंडळांमध्ये जाऊन आम्ही असल्या विषयांचा चुरा पाडायचो. साहजिकच सावरकर,सुभाषबाबू, भगतसिंग इ. क्रांतिकारी विचारांचा पगडा पडणारं हे वय. मग काय, गांधीवाद म्हणजे मवाळपणा हे मनावर पक्कं बिंबलेलं. त्यातून हे असं ’गांधीं’बद्दल मित्रांच्या चर्चेतून व अशाच काही गांधीविरोधी साहित्यातून गांधीविरोधी विचारसरणी तयार झालेली. एकदा सहजच, शिवाजी विद्यापीठात गेलो असताना तिथं जेष्ठय गांधीवादी व गांधी अभ्यासक चंद्रकांत पाटगांवकरांचं गांधीजींवर भाषण ऐकलं. योगायोगानं, नंतर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पाटगांवकरांशी चर्चेचा योग आला. त्यांनी सुचवलं "फक्त एकदा सकारात्मक गांधी साहित्याचं वाचन कर आणि त्यानंतर गांधीजींना नाकारावासं वाटलं तर नाकार ". त्या दरम्यानच्या काळातच अविनाश धर्माधिकारींचं ’अस्वस्थ दशकाची डायरी’ हे पुस्तक वाचनात आलं. ह्या पुस्तकाची अर्पणपत्रिका खुपंच छान आहे. महात्मा गांधींनाच ती अर्पण केलेली आहे. पण  धर्माधिकारींच्या हटके भाषत ती अजुन उठावदार वाटते. धर्माधिकारींच्या बाबतीतसुद्धा हेच झालं होतं. मग त्यांच्या एका मामानं त्यांना एकदा ’गांधी’वाचून काढं अस सुचवलं होतं. सुरुवात करताना धर्माधिकारींना त्यांच्या मामाने मृणालिनी देसाई यांचं ’पुत्र मानवाचा’ हे पुस्तक वाचायला सांगितलं. मी सुद्धा त्यानेच सरुवात केली. वाचत गेलो. गांधीजींबद्दल अनेक पुस्तकं वाचली व गांधींकडे कधी आकृष्ट झालो ते कळलंच नाही. पाटगांवकरांचं म्हणणं पटलं ’ज्याला खरं गांधी तत्वज्ञान  कळलंय तो गांधींना कधी नाकारू शकत नाही.’

          टीकाकार बोलताना नेहमी गांधीजींच्या चुकांबद्दल बोलत असतात. गांधीजींकडून अनेक चुका झालेल्या आहेत हे देखील मान्य आहे. पण त्यांनी चुक केली म्हणून त्यांना मारणारा नथुराम योग्य हे समीकरण लोकं कस कय जुळवतात कुणास ठाऊक? विचारांच्या लढाईला उत्तर हे विचारांनीच द्यायचं असतं. डॉ. आंबेडकर देखील हे जाणून होते आणि म्हणूनच कोट्यवधी दलित जनता पाठीशी असतानादेखील आंबेडकरांनी कोणत्याही हिंसक कॄती अथवा अनीतीचा अवलंब केला नाही. १९५६ साली धर्मांतराच्या भाषणात आंबेडकर म्हटले होते की कोट्यवधी जनतेला मुस्लिम धर्म स्वीकारायला लावून मी भारतातच एक वेगळा पाकिस्तान निर्माण करू शकतो. मात्र ही लढाई विचारांची आहे आणि त्याला उत्तर विचारांनीच द्यायचे आहे, म्हणून मी असं करणार नाही. यावरून विचारांच्या लढाईचे महत्व स्पष्ट होते. आणि म्हणूनच गांधीजींच्या विचारांना उत्तर म्हणून गोडसेची हिंसक कॄती समर्थनीय नाही.    

         गांधीजींमध्ये वैगुण्य नव्हतं असं नाहीये. माणूस म्हटल्यावर गुणही आले व दोषसुद्धा आलेत. पण आम्हा भारतीयांना देव लागतोच. पुराणातले ३३ कोटी देव पुरत नाहीत की काय म्हणून आम्ही ते माणसांत शोधतो. गांधीजींना त्यांच्या अनुयायांनी देव करून टाकलं आणि एकदा का देव म्हटलं की मग त्याला कोणतीही चूक माफ नाही. मग या (अ)न्यायानुसार त्याला नैतिक,सामाजिक,वैयक्तिक,लैंगिक जीवन नाही. ते सारं जीवन भारतीय भक्तांच्या म्हणजेच जनतेच्या हाती. मग सचिनने नारायण नागबळी करायचा कि नाही, अब्दुल कलामांनी सत्य साईबाबांच्या पाया पडायचे की नाही हे सारं ह्या भक्तांनी म्हणजे जनतेने ठरवायचे. हा देव त्यांना हवं तसं नाही वागला की मग तुडवला त्याला पायदळी. जगाच्या या सो कॉल्ड देवाच्या जगण्यातल्या नैतिकतेच्या व्याख्या मात्र त्या भक्तांच्या. व्याख्या कसल्या ते तर कायदेच! गांधीजींचही तेच झालंय. आपण त्यांना "महामानव" केलंय आणि "माणूस" म्हणून स्वीकारण्यात कमी पडलोय.

        गांधीजींच्या अनेक गोष्टींचा ,इतिहासाचा व त्यांच्या तत्वज्ञानाचा विपर्यास झालेला आहे, केला गेलेला आहे. विचार करा, तुमच्या माझ्यासारखा एक सामान्य माणूस , ज्याच्याकडे कोणतेही शस्त्र नसताना जगातली एवढी मोठी क्रांती करणं ही केवढी मोठी गोष्ट आहे. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइनसुद्धा आपल्या आयुष्याच्या शेवटच्या कालावधीत गांधीवादी बनला आणि म्हणूनच त्याने लिहून ठेवले की " गांधी नावाचा रक्ता- मांसाचा माणूस या पृथ्वीतलावर होऊन गेला ह्यावर भविष्यातल्या पिढ्यांचा विश्वास बसणार नाही ". किती स्वप्नवत ना? जगानं मध्ययुगापासून ते अगदी अलिकडील ईजिप्तच्या फेसबुक क्रांतीपर्यंत अनेक क्रांत्या पाहिल्यात. यातील अनेक यशस्वी क्रांत्या ह्या रक्तरंजित होत्या. आधुनिक युगात गांधीजींनी भारताची सत्याग्रहरुपी जी रक्तविहीन क्रांती घडवली, त्या क्रांतीने संपूर्ण जगाला एक नवा आयाम दिला. मग त्यातूनच प्रेरणा घेऊन दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेला, अमेरिकेत मार्टीन ल्युथर तर पूर्व आशियात आंग स्यान स्यु की ह्या नोबेल विजेत्यांनी अहिंसाप्रणित क्रांत्या यशस्वी करून दाखवल्या.

           रघुनाथ माशेलकरांचं ’पत्रिका’ ह्या मराठी विज्ञान मासिकात परवा भाषण वाचलं. माशेलकरांना लंडनच्या रॉयल सोसायटीने १९९८ साली फेलोशिप दिली. २०१० साली सोसायटीला ३५० वर्षे पुर्ण झाली. रॉयल सोसायटी दर ५० वर्षांनी सर्व फेलोजना बोलावते. त्यानिमित्त लंडनला सर्व फेलोजना बोलावण्यात आले होते. माशेलकरांनी तिथे जे भाषण दिले त्या भाषणाच्या संदर्भात असं म्हटलंय की "आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताबद्दल बोलायचे झाले तर फक्त एक दोन देशांपुरते नव्हे तर संपुर्ण जगाला व्यापकपणे माहित असलेले भारतीय दोनंच एक म्हणजे गौतम बुद्ध व दुसरे महात्मा गांधी. म्हणून मी गांधीजींपासून बोलायला सुरुवात केली ". डॉ. माशेलकरांचं बरचंसं करिअर हे अमेरिकेत गेलेलं. गांधीजींबद्दल त्यांना तशी तोकडीच माहिती. भारतात आल्यावर त्यांनी ’गांधी’ वाचायला सुरुवात केली. हळूहळू ’गांधी’ त्यांना उलगडू लागले. मग गांधीजींचा सामाजिक, राजकीय, वैचारिक, तात्विक, वैज्ञानिक, आर्थिक, निसर्ग व पर्यावरणाविषयीचा आणि ट्रस्टीशिपचा दृष्टीकोन जाणवू लागला. तो भावला व गांधीवादाला काळाच्या मर्यादा कशा नाहीत हे कळलं. त्यातूनच मग ’टाईमलेस इन्स्पिरेटर-रिलीव्हींग गांधी’ हे अप्रतिम पुस्तक उदयास आलं. या सगळ्या मांदियाळीत अनेक लेखक-साहित्यिकांची नावं घेता येतील. ’मला भेटलेली माणसं’ ह्या पुस्तकात राजू परूळेकरांनी लिहलंय की गांधींचं  आत्मचरित्र हे जगातलं एकमेव एवढं थेट लिहीलेलं आत्मचरित्र असेल. साधं मराठीतंच बघायचं झालं तर, अगदी विंदा, पुलं, वसंत बापट,पाडगांवकरांसारख्या साहित्यातील सारस्वतांनीदेखील गांधीजींवर अमाप लेखन केलं. 
 
         गांधीजींमध्ये असं काय होतं, की ज्याची जादू साऱ्या जगावर पडली आणि म्हणूनच मंडेलापासून ते स्यू की, फिडेल क्याष्ट्रोपासून ते ओबामा, बाबा आमटेंपासून ते अभय बंग, स्याम पित्रोदा ते नारायण मूर्ती,यांच्यावर पडावी?  कारण गांधीजींचं जगणं थेट होतं. सामान्य माणूस हा त्यांच्या जगण्याचा, कृतीचा व एकूणच विचारांचा दुवा होता. सर्वसामान्य माणसावरचं त्यांचं प्रेम हे  आजच्या " काँग्रेस का हाथ,आम आदमी के साथ" सारख्या तकलादू व पोकळ घोषणेसारखं नव्हतं,तर ते अगदी ' दिल से' होतं. सर्वसामान्य माणसाचा गांधीजींनी जेवढा खोलवर विचार केलेला आहे, तेवढा अख्ख्या जगात क्वचितच कुणी केला असेल. आणि म्हणूनच ते जंतर देऊ शकतात की "जेव्हा तुम्ही द्विधा मनोवस्थेत असाल व तुमचा निर्णय होत नसेल त्यावेळी तुम्ही आजवर पाहिलेल्या सर्वात जास्त गरिबाचा चेहरा आठवा आणि तुमच्या निर्णयाचा त्याला कितपत फायदा होणार आहे ह्याचा विचार करा व आता तुमचे पाउल उचला. मला खात्री आहे तुमची द्विधावस्था सुटली असेल". हे लिहिणं अफाट चिंतनशीलतेतूनच येऊ शकतं.
                    
       गांधीवाद हा कालातीत आहे आणि म्हणूनच त्याला काळाच्या मर्यादा नाहीत. कधी नव्हं तेवढं आता हे स्वच्छपणे स्पष्ट झालंय. मग त्यात सध्याची नैसर्गिक स्त्रोतांची सुरु असलेली ओरबड असो, किंवा कार्पोरेट सेक्टरमधील टारगेट्स- धावणं- ताण- दमछाक- सुखसोई- पुन्हा टारगेट्स- पुन्हा सुखसोई ही शर्यत असो, ह्या साऱ्यावर उतारा म्हणून पर्यावरणवाद्यांपासून ते अगदी मानसोपचारतज्ञांपर्यंत सारे गांधीजींचाच स्लोगन सुचवतात-  There is a sufficiency in the world for man's need but not for man's greed.  एवढंच कशाला, अगदी अलिकडंची दोन ताजी उदाहरणं तर हे सारं प्रकर्षानं अधोरेखीत करतात. एक म्हणजे, भ्रष्टाचारविरोधी अण्णा हजारेंच्या आंदोलनाला देशाच्या सर्व थरांतून मिळालेला अभूतपूर्व पाठींबा हा तर गांधीजींचाच फॉर्म्युला - 'सत्याग्रह' व दुसरं म्हणजे इन्फ़ोसिसचे मावळते अध्यक्ष नारायणमुर्ती. नारायणमूर्तींनी अनेक अमेरिकन कंपन्यांच्या पावलावर पाऊल ठेवून केलेली आपल्या कंपनीसाठी घराबाहेरच्या वारसदाराची निवड. ही तर गांधीजींच्या ग्रामस्वराज्यातील कल्पना. या सगळ्याचा अन्वयार्थ एकच!  काय? तो म्हणजे ..पुन्हा गांधी!
होय..पुन्हा गांधी !!!

काही इतर वाचनीय संदर्भ:-
१. गंगेमध्ये गगन वितळले- अंबरीष मिश्र
२.जिंकुनि मरणाला- वसंत बापट
३.खुला-खलिता- द्वारकानाथ संझगिरी
४.बराक ओबामा-संजय आवटे
५.मला भेटलेली माणसं- राजू परूळेकर
६.इंडिया आफ्टर गांधी- आर.गुहा.