ब्लॉगचे कॉपीराईट्स

myfreecopyright.com registered & protected

Friday, December 9, 2011

अण्णा हजारेंना पत्र.

अण्णांना, 

     खरं सांगू अण्णा, चांगदेवाला तो ज्ञानदेवापेक्षा वयाने मोठा असूनही ज्ञानदेवाला पत्र लिहिताना कोणत्या वचनाने लिहावे असा प्रश्न पडला होता. मी तुमच्यापेक्षा वयाने लहान असूनही मला तो पडलेला नाही. कारण आदरणीय म्हणावे असे तुम्ही नाही आहात,एवढं मात्र खरं.  

     अलीकडील तुमची बरीचशी विधाने ही अनेकांना बेदरकार वाटताहेत मात्र आम्हाला तुमच्या (अ)संयमाची माहिती असल्याने त्यात काहीही विशेष वाटले नाही. तुमचा बेतालपणा व फटकळ बोलणं ह्यामुळे तुम्ही स्वत:च्याच लोकपाल आंदोलनाची हवा घालवलेली आहे हे सगळ्यांना आता कळून चुकले आहे. दिल्लीत काही दिवसांपूर्वी शरद पवारांवर हल्ला झाला आणि तुम्हाला हे कळताच पटकन तुमच्या तोंडातून बाहेर पडलेल्या "एकही मारा" या शब्दांनी तुम्ही तुमच्या खऱ्या अंतरंगाचे दर्शन साऱ्या भारताला घडवले. काही वेळानंतर तुम्हाला तुमची चूक लक्षात आल्यानंतर आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ मिडीयाने घेतला अशी सारवासारव करू लागला व हा हल्ला पवारांवर नाही तर लोकशाहीवर आहे अशी टोटल 'बेदी'छाप वाक्ये फेकू लागला. हे सारं पाहिल्यानंतर तुमच्यावर ओढवलेल्या केविलवाण्या परिस्थितीची जाणीव झाली व तुमची कीव आली. तसा, मी शरद पवारांचा समर्थक नाहीये मात्र तुमच्या तथाकथित 'गांधीवादाचा' बुरखा फाटला हे मला इथं ठळकपणे मांडायचं आहे. अण्णा, तुम्ही कधीच 'गांधीवादी' नव्हता, आजही नाही आहात हे उघडं-नागडं सत्य आहे.

       अण्णा, परवा तुम्ही सहज म्हणाला, ( तुमचं असं का होतं कुणास ठाऊक? तुम्ही सहज म्हणायला जाता आणि जग मात्र  निराळेच अर्थ काढून बसतं - तुमच्या म्हणण्याप्रमाणे आणि मग तुम्हाला परत परत मौनात जावं लागतं ), हां तर परवा तुम्ही सहज म्हणाला की देश व समाज सुधारणेसाठी केलेली हिंसा तुम्हाला मान्य आहे. तुम्ही मग राळेगणसिद्धी मध्ये दारू पिणाऱ्या महाभागांना झाडाला उलटे बांधून कसे फटकावलेत हे नमूद केलतं. तसेच पवारांवरच्या हल्ल्याचं तुम्ही पुन्हा एकदा समर्थन केलंत. शेतकऱ्यांनी गोळीबार झेलला, तर मग कृषीमंत्र्यानं व  ज्या माणसानं भ्रष्टाचार केलाय त्यानं एक थप्पड सोसायला काय हरकत आहे असा सवालही केला. पण, अण्णा यातली खरी गोम वेगळीच आहे. हा तुमचा पवारद्वेष लहान पोरालाही स्वच्छपणे कळतोय हो. ज्या 'गांधी'चा फोटो चिकटवून रामलीलावर तुम्ही आपल्या लीलांचं प्रकट दर्शन संपूर्ण जगाला घडवलं, त्या फोटोला तरी निदान जागायचं? अहो, गांधींनी त्यांच्या शत्रूंचा-इंग्रजांचा देखील कधी द्वेष केला नाही. त्यांचा इंग्रजांना विरोध होता मात्र इंग्रजांबद्दल गांधीजींना द्वेष नव्हता. गांधीजी म्हणायचे विरोध व्यक्तीला नको तर प्रवृत्तीला करा. त्या माणसाचं जगणंच वेगळं होतं हो. गांधीजींचे प्रयोगच अंतर्शुद्धीचे होते म्हणून ते सत्याचे प्रयोग होते. मात्र तुम्ही गांधींचं नाव घेता आणि सरळसोटपणे हिंसेचं समर्थन करता. अहो, इथंच तुमच्यातला अज्ञानी गांधी दिसतोय.गांधीजींची अहिंसेबद्दल खूप चिंतन केलं होतं. त्यांची हिंसेची व्याख्या  खूप सूक्ष्म आहे. गांधीजी म्हणायचे," एखाद्याला फक्त शारीरिक मारहाण अथवा दुखापत करणे हीच हिंसा नसून त्याला आपल्या शब्दांनी दुखावणे हीदेखील हिंसाच आहे."

       अण्णा, गांधी आपल्या तत्वांसाठी जगला होता आणि त्या तत्वांसाठी त्याने कोणतीही तडजोड केली नव्हती. गांधीजींच्या मृत्युनंतर एका शोकसभेत एका व्यक्तीने म्हटले होते की ' गांधीजींनी, सत्य व अहिंसा या तत्वांना मोठं केलं'. विनोबांनी ते चुकीचे आहे असे सांगत म्हटले होते की ' सत्य व अहिंसा या तत्वांनी गांधीजींना मोठं केलं'. असं असतं तत्वांसाठी जगणं. तुमची तत्त्वं तर इथं दर आंदोलनागणिक बदलतायंत. लोकपालसाठी  गांधीवाद, आणि त्यानंतर मारामारीचा तलवारवाद. ते राहूदे, साधं स्वत:च्या खोटं बोलण्याचंसुद्धा (पवारांवरच्या हल्ल्याची नंतरची प्रतिक्रिया)  तुम्हाला काहीच वाटत  नाही. स्वत:च्या चुकीचे प्रायश्चित घ्यायचे सोडून तुम्ही त्या चुकीची सारवासारव करता त्याचवेळी तुमच्या गांधीबद्दल असलेल्या आस्थेची पोच कळते. दारू पिणारयांचा प्रश्न गांधीजींच्या वेळीही ऐरणीवर आला होता. पण म्हणून त्यांनी तुमच्या सारखी कुणाला झाडाला उलटे बांधून फटकावले नाही. त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या की आपले भांडण व्यसनाशी आहे, व्यसनी माणसाशी नाही. त्याला किंवा त्याच्या मानसिकतेला इजा होईल असे काहीही करू नका.

     अण्णा,राजेश खन्नाच्या एका चित्रपटातले वाक्य आठवतंय, " It is simple to be happy but it is difficult to be simple". म्हणून सांगतो साधं बनणं एवढं सोपं नसतं. त्या दिवशी तुमच्यापेक्षा पवार जास्त गांधीवादी आणि साधे वाटलेत (नसूनसुद्धा). त्यांचा संयम वाखाणण्याजोगा होता. असुदे, तुमची चूक नाही आहे ही. कुणीतरी म्हटलेच आहे नाहीतरी, प्रसिद्धीचा वारा न लागो बापडां...

                                                                                                             
                                                                तुमचा एक परखड कटू सत्य चिंतक,  
                                                                      प्रथमेश आडविलकर.

Thursday, December 1, 2011

उद्योगविश्वातला तारा..

              कुठेतरी वाचनात उपनिषदांचा संदर्भ आला होता. उपनिषदांमधलं एक संस्कृत वचन तिथे दिलं होतं. ते वचन नेमकं आता आठवत नाही. मात्र अर्थ लक्षात आहे. अर्थ असा होता "सज्जनाला नेहमी दुर्बलतेचा शाप असतो व समर्थला दुर्जनेतच वरदान असतं." मग पुढे लेखकाने सज्जन हे चारित्र्यवान असतात पण समाजात घडण्याऱ्या अपप्रवृत्तींविरुद्ध लढण्यासाठी कमी पडतात किंवा अनेकदा दुर्बल ठरतात. तर जो हे सगळं करू शकेल तो 'समर्थ', दुर्दैवाने बऱ्याचदा दुर्जन कसा असतो हे मार्मिकपणे पटवून दिले होते. तसेच, शेवटी तुम्ही 'समर्थ सज्जन' बना असा गोड संदेशही दिला होता आणि मूल्यांचं   महत्व  अधोरेखित केलं होतं. हे आठवण्याचं कारण एवढंच, की मानवी मुल्ये व नैतिकतेचा हळूहळू ऱ्हास होत असलेल्या या ढासळत्या युगातही या मूल्यांना केंद्रबिंदू मानून जगणारी काही माणसं अथवा संस्था अजून आहेत. खऱ्या अर्थाने ज्यांना "समर्थ सज्जन" म्हणावं अशी चारित्र्यवान व कार्यक्षम माणसं, अशा संस्था. टाटा उद्योगसमूह हा त्यापैकीच एक. टाटा उद्योगसमूह हा फक्त उद्योगसमूह कधीच नव्हता तर स्वच्छ  कारभार, सामाजिक बांधिलकी व मानवी मूल्यांची जपणूक यामुळे तो एक ब्रँड बनला होता. अजूनही आहे. १९९० साली जेव्हा रतन टाटांकडे या उद्योगसमूहाची सूत्रे आलीत तेव्हा समूहात एकूण १४  कंपन्या होत्या. आज त्यांची संख्या शंभरावर असून ८० देशांमध्ये त्यांचा पसारा पसरलाय. एवढा पसारा म्हणजे हे फक्त जाळं नाही तर टाटा म्हणजे एक क्लास आहे, एक ब्रँड आहे, एक standard आहे. आज युरोपातील टेटली चहा, अमेरिकेतील रिट्झ कार्लटन हॉटेल, जग्वार व लॅण्ड रोव्हर सारख्या गाड्या हा सारा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा श्रीमंती थाट ही आजच्या या 'क्लास'ची ओळख आहे.

 
          टाटा उद्योगसमुहाची सर्वाधिक सुत्रे राहिलीत ती जेआरडी टाटांकडे. ती पण तब्बल पन्नास वर्षांसाठी. त्यांच्या कालावधीत या समुहाने खऱ्या अर्थाने कात टाकली. जेआरडी द्रष्टे होते. काळाच्या पुढे चार पावलं पाहायचा त्यांचा गुण केवळ टाटा उद्योगसमुहालाच नव्हे तर भारतालाही बदलवणारा होता. आणि म्हणुनच ज्यावेळी नुकताच देश स्वतंत्र झाला होता तेव्हा जवाहरलाल नेहरू यांना देशात उत्तम अभियंते तयार व्हावेत यासाठी तुझ्याकडे काय योजना आहेत, असे विचारण्याचा अधिकार त्यांच्याकडे होता आणि तशी काही योजना नाही, हे सांगण्याचा प्रामाणिकपणा पं. नेहरू यांच्याकडे होता. तेव्हा द्रष्टय़ा जेआरडींनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेचा (TIFR) पाया घातला आणि त्यातून आज देशाला अणुतंत्रज्ञानात स्वावलंबत्व देणारी यंत्रणा आणि अभियंते उभे राहिले. तीच बाब मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, बेंगलोरमधील इंडिय़न इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, मुंबईतील नॅशनल सेन्टर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, टाटा मेमोरियल हॉस्पिटल अथवा पुर्वीचं एअर इंडिया यांसारख्या देशाच्या प्रगतीत भर टाकणार्या अनेक संस्था वा यंत्रणा ही टाटांची देशाला मिळालेली अनमोल देणगी आहे. 

          क्रिएटिव्ह काहीही करायचं असलं तर त्यासाठी संवेदनशीलता गरजेची असते. संवेदनशील असल्याशिवाय माणसाला नविन काही घडवता येत नाही. ही संवेदनशीलता हर क्षणी जागृत असावी लागते. मग क्षेत्र कोणतंही असो, साहित्य,कला इथंपासून ते उद्योगापर्यंत; सर्वांना हा नियम लागू. म्हणूनच भारतात कुठेतरी स्कूटरवरून निघालेल्या चारजणांच्या कुटुंबाचा प्रवास बघून मन हेलावणं आणि त्यातून जगातल्या सर्वात स्वस्त अशा नॅ
नो कारचा जन्म होणं हे कारुण्यमयी संवेदनशीलतेचंच उदाहरण आहे. टाटा उद्योगसमुहाची सृजनशीलता ही नेहमी अशीच संवेदनशीलतेतून व हलाखीचं जगणं जगणाऱ्या सामान्यजनांबद्दल असलेल्या करुणेतून प्रसवत राहिली आहे. यामुळेच अगदी सर्वसामांन्यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये बनवलेला वॉटर प्युरीफायर असो वा कर्करोगाशी लढण्यासाठी मुलभूत संशोधन करणारे रुग्णालय असो; मिठापासून ते मोटारीपर्यंत भारतीयांच्या जीवनास सर्वांगाने स्पर्श करणाऱ्या या उद्योगसमुहाने अशा अनेक प्रकारे देशाच्या उभारणीसाठी मदत केलेली आहे. टाटांनी त्यांच्या ट्रस्ट्सच्या माध्यमातून आजपर्यंत शेकडो रुग्ण,विद्यार्थी, आदिवासी,वंचित इ. गरजूंना कोट्यवधींची मदत केलेली आहे. अगदी आपदग्रस्तांसाठी कायमस्वरूपी मदतदेखील या ग्रुपने केलेली आहे. 'ताज' हल्ला हे त्याचं ताजं उदाहरण. या हल्ल्यातील जखमी व मृतांच्या नातेवाईकांना सरकारनं व रेल्वेनं आर्थिक मदत दिली. मात्र ती तुटपुंजी होती. या पार्श्वभूमीवर टाटांनी त्यांच्या वेल्फेअर ट्रस्टकडून गेली तीन वर्षे १३८ कुटुंबांना कोट्यवधींची मदत केली आहे. यांतील अनेक कुटुंबे टाटा समूहाशी काडीमात्रही संबंध नसलेली होती, हे विशेष.

           समाजाच्या व देशाच्या प्रती असलेलं हे उत्तरदायित्व हे केवळ 'ताज'सारख्या एखाद्या घटनेनं येत नसतं तर ते मुळातंच असावं लागतं. ते असणं हीच संवेदनशीलता. हे असं उत्तरदायित्व मनात येण्याची वा सहकाऱ्यांच्याही मनात रुजवलं जाण्याची प्रक्रिया टाटा उद्योगसमुहात गेल्या शंभर वर्षांपेक्षाही जास्त काळाहून अबोलपणे घडत आहे. अलीकडच्या 'वर्क-कल्चर'ने त्याला "कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी" हे नाव दिलं. पण ते कुणाच्याही स्वप्नातदेखील नव्हतं तेव्हापासून टाटा उद्योगघराण्यात ते जपलं जात आहे. अशा गोष्टी नुसत्या ट्रस्ट स्थापन करून आणि कर लो दुनिया मुठ्ठी में अशी साद घालून होत नाहीत तर कर्तृत्वाबरोबरच तिथे हवा असतो तो ओलावा, सहानुभूती व संवेदनशीलता. म्हणूनच या कर्तृत्ववान समूहाने नेहमीच संवेदनशीलता व मुल्ये यांची कावड खांद्यावरून कधीच उतरून दिली नाही. जेआरडींच्या शेवटच्या दिवसात गल्लाभरू व नफेखोर कंपन्यांची व्यवस्था जन्माला येत होती. यावर एका पत्रकाराने त्यांना प्रतिक्रिया विचारली होती, त्यावेळी जेआरडींनी म्हटले होते "Class is permanent,Form is temporary." या अशा 'क्लास'ची,एका standardची, एका संस्कृतीची धुरा आता विनम्र अशा सायरस मिस्त्रींकडे जात आहे. टाटा उद्योगसमूहाला साजेल असेच त्यांचे व्यक्तिमत्व आहे.मितभाषी,प्रसिद्धीपासून कोसो दूर असलेल्या सायरसना सभा, भाषणे व पेज थ्री कल्चरचे वावडे आहे. वाचन हा त्यांचा आवडता छंद आहे. सायरस हे सूर्यमंडळातल्या एका ताऱ्याचे नाव आहे. 'टाटा उद्योगसमूह'  हादेखील भारतातील उद्योगविश्वात तारा म्हणून चमकलेला आहे. आता सायरस यांना स्वत:च्या नावाप्रमाणे या उद्योगसमूहाला जगभरातील उद्योगविश्वात चमकावयाचे आहे आणि सायरस ते करतीलच. 

Tuesday, October 11, 2011

दुर्गा भागवतांचं लेखन: भाग २ ( ऋतुचक्र )

               दुर्गाबाईंचं लिहिणं हा कौतुकाचा नसून चिंतनाचा विषय आहे. बाईंचं लेखन थोडं नीट न्याहाळून बघितलं तर कळतं की बाईंमधल्या लेखिकेवर त्यांच्यातल्या कवयित्रीने मात केलेली आहे. बाई खरंतर कवयित्रीच व्हायच्या, पण चुकून लेखिका झाल्या. त्यामुळेच बाईंच्या लेखनात शब्दांचा ’नाद’ लक्ष वेधून घेतो. ’ऋतुचक्र’ मध्ये हा शब्दनाद प्रकर्षाने आढळतो. ऋतुचक्र हा बाईंच्या सर्व लेखनपसारयातला सुंदर असा मोरपीस आहे. बाईंचं कोणतंही पुस्तक असो, ऋतुचक्र असो वा भावमुद्रा असो किंवा दुपानी असो, त्यांचं निसर्गाशी जडलेलं नातं बाई हळूच खुलवत नेतात. मग या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी पालथे घातलेले डोंगर, दऱ्या,नद्या,नाले, अनेक उपनद्या,ओढे, ओहोळ या साऱ्या प्राकृतिक घटकांपासून ते मग अगदी त्यांच्याशी  संबंधित असलेल्या ऋतु व त्यांचे चक्र,त्याचे समाजजीवनावर व अन्य नैसर्गिक घटकांवर उदा. प्राणी, पक्षी इ.वर होणारे परिणाम ह्या सगळ्यांचं वर्णन ओघानं आलंच. फक्त ऋतुचक्र’ वर जरी लिहायचं म्हटलं तरी वहीची कितीतरी पाने भरून जावीत एवढं लिहिता येईल. साधं ऋतुचक्रच्या मलपृष्ठवरचे वर्णन पाहा. " ऋतूंच्या लावण्यमहोत्सवाची चित्रे रेखाटणारे हे ललित निबंध आहेत. दुर्गाबाईंनी डोळे भरून सृष्टीचे दर्शन घेतले आहे. निसर्गाची बदलती रूपे, पशुपक्षांच्या हालचाली,रंगगंधांच्या बोलक्या संवेदना त्यांनी एखाद्या शास्त्रज्ञाच्या डोळस कुतूहलाने न्याहाळल्या आहेत. परंतु या शास्त्रीय दृष्टीकोनाला काव्यात्म प्रतिभेची मिळालेली जोड हे या ललित निबंधांचे खरे वैशिष्ट्य आहे. या सृष्टीतल्या सर्व सौंदर्याचा भौतिक आणि कलात्मक आस्वाद घेणारे सौंदर्यासक्त मन त्यांच्याजवळ आहे. तसेच, या तरल सौंदर्यानुभावांना सेंद्रिय रूप देण्याचे, या अतींद्रिय क्षणांना इंद्रियांकरवी अनुभवायला लावण्याचे सामर्थ्य त्यांच्या प्रतिभेच्या ठिकाणी आहे. जाईजुईच्या झेल्यासारखे हातात धरून हुंगावेसे वाटणारे पर्जन्यरूप सूर्यबिंब. पोपटाच्या पिलांसारखी दिसणारी वडाची हिरवी पाने,पारिजातकांच्या मोत्यापोवळ्यांच्या राशीतून फुटणारे श्रावणाचे हसू, फुलांच्या पायघड्यांवरून भूतलावर पदार्पण करणारा पुष्पमंडित भाद्रपद... हे सारे रूपरसरंगगंधाचे, लावण्यविभ्रमांचे जग दुर्गाबाईंचे निबंध वाचताना क्षणोक्षणी प्रत्ययाला येते. निसर्गाच्या चित्रलिपीचे  रहस्य दुर्गाबाईंना  उलगडले आहे याची साक्ष या निबंधसंग्रहात पानोपानी मिळते." किती सुंदर नाद या लेखनात आढळतो ना?
          मराठी महिन्यांना नावेदेखील बाईंनी तेवढीच नादवेधक दिलेली आहेत. उदा. वसंतहृदय चैत्र, मेघश्याम आषाढ, पुष्पमंडीत भाद्रपद, संध्यारंजित कार्तिक, तालबद्ध पौष, रूपधर फाल्गुन इ. चैत्राला बाई "रूपरसरंगगंधमय चैत्रमास" म्हणतात. चैत्रातल्या पालवी,मोहोर,पर्णशोभा व फळशोभा इत्यादी वनश्रीचे वर्णन करून बाई थांबत नाहीत तर ऐन चैत्रात असणारी पक्ष्यांची घरटी व त्यांचे आकार, पक्ष्यांच्या हालचाली, त्यांची दैनंदिनी, त्यांच्या प्रेमाच्या अजब तऱ्हा आदी पक्षीजीवन तेवढयाच संवेदनशिलतेने मांडतात आणि थोडया वेळासाठी का होईना आपल्याला 'पक्षीमय' करून सोडतात. तसंच वृक्षवेलींचं. बाईंच्या पाहण्यातल्या एका पिंपळाला मधुमालतीच्या वेलाने जखडले होते. त्याचं वर्णन बाईंनी किती सुरेख केलंय ते पहा. "तरूलतांच्या आलिंगनाची काव्यमय वर्णने मी पुष्कळ वाचली आहेत. पण मधुमालतीला आपल्या पल्लवांनी छातीशी घट्ट घट्ट कवळून धरणाऱ्या आणि लाजवत पालवीने आच्छादलेले आपले सुंदर मस्तक किंचित लववून निर्भर हर्षाचे आणि कोमलतेचे प्रदर्शन करणारा हा पुराणवृक्ष पाहून माझी नजर येत जाता त्याच्यावर खिळून राहते. आणि नुसती पालवीच नाही तर हिरवी फळेही इतर झाडांप्रमाणे यांच्या फांदीफांदीला ओळीने चिकटून बसली आहेत." फक्त काव्यमय शैलीच नाही, तर वर्णन, माहिती व मांडणी यांचा अप्रतिम संगम बाईंनी घडवून आणलाय.
         ऋतुचक्रमध्ये अज्ञात माहितीचा अनमोल खजिना दडलेला आहे हे पुस्तक वाचताना पदोपदी जाणवते. एखाद्या वृक्षाचे,फळाचे, फुलाचे, ऋतुचे पुराणातील अथवा संस्कृत, गुजराती या इतर भाषांतील अफाट व आपल्याला सहसा माहित नसलेले दुर्मिळ असे संदर्भ बाईंना माहित आहेत. मग त्यामध्ये नारळाची निर्गंध व टणक फुले ही तीन पाकळ्यांची व फिक्या पिवळ्या रंगाची असतात ही माहिती तर असतेच पण मग नारळाच्या झाडाचा फाल्गुन ते चैत्र रंग कसा बदलतो हे वर्णनही आपल्या ज्ञानात भर टाकून जाते. इतर बाबी म्हणजे, सुरंगीची पांढऱ्या पाकळ्यांची व सुंदर केशरी परागांची अतिमधुर फुले, उंडीची झाडे, कडुनिंबाचं झाडाचं निळसर फुलांच्या तुऱ्यांनी भरून जाणं, त्याचा रात्रीचा सुगंध मनोरम वाटणं इत्यादी माहित झाल्यावर एखादं गुपित हाती आल्यासारखं वाटतं. खरं सांगतो, तसा कडुनिंब हजारदा पाहिला होता पण एवढं सुक्ष्म निरीक्षण कधीच केलं नव्हतं. अशोकाच्या वृक्षातसुद्धा नर अशोक वा मादी अशोक ही माहिती माझ्यासाठी नवीनच होती. घाणेरी कशी सुशोभित वाटते हे लिहिताना बाई म्हणतात 'सर्व फुलांमध्ये अतिशय हिरीरीने कोणी नटले असेल तर ही उग्रगंधी घाणेरी'. मग घाणेरीचे अनेक सारे रंग व त्यांचं एकमेकांमधलं वर्णन वाचताना जाणवतं की वास्तविक कुठलेच दोन रंग स्वाभाविकपणे एकमेकांच्या शेजारी एरव्ही शोभत नाहीत,पण निसर्गाच्या दुनियेत कुठलेही भडक वा एरव्ही विसंगत वाटणारे रंग विशोभित दिसत नाहीत, उलट एकमेकांची शोभाच वाढवतात. मग आपल्याकडे तिला तुच्छतेने घाणेरी म्हणतात तर गुजरातमध्ये 'चुनडी' हे सुंदर नाव कसे मिळाले वा त्यावरून गुजराती,काठेवाडी वा राजस्थानी चुनऱ्यांचे रंग भडक का असतात वा त्याला हे कारण कसे यथार्थ आहे, हे सहजपणे बाई सांगतात. ही सारी रंगरंगोटी वाचताना भारतीय रंग अभिरुचीचे मूळ हे यांसारख्या नैसर्गिक आविष्कारात आहे हे कळल्यावर निसर्ग व भारतीय जीवनाचं पूर्वांपार चालत आलेलं नातं समजल्याचा जेवढा आनंद होतो तेवढंच दु:ख आज आपण निसर्गापासून तुटत चाललोय याचं होतं.
         भारतीय महिन्यांचं एवढं नितांत सुंदर वर्णन भारतातल्या दुसऱ्या कुठल्याच भाषेत सापडणार नाही, हे माझंच नव्हे तर प्रत्येक वाचकाचं ठाम मत बनत असावं असं मला वाटतंय. सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे ऋतूंच्या लावण्यमहोत्सवाची चित्रे रेखाटणारे हे ललित निबंध आहेत. ते फक्त भारतीय महिन्यांची अथवा ऋतूंची माहिती देणारे लेख नाहीत. पुस्तकाच्या सुरुवातीलाच सर्व महिन्यांकडे वळण्याआधी बाई ऋतू व त्यांचे चक्र,सूर्य,चंद्र व त्यांचा मानवी जीवनाशी असलेला संबंध,मग त्यातूनच आपल्या पूर्वजांनी चंद्राला गर्भाचा अधिष्ठाथा का मानले, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मांडतात. प्राचीन ऋषी-मुनींनी सुक्ष्मातल्या सूक्ष्म व भव्यातल्या भव्य अविश्कारांबद्दल चिंतन केले व मग आपले काही ठोकळ सिद्धांत व संकेत त्यावर मांडले. हे संकेत खूप मार्मिक आहेत. उदाहरणार्थ, चंद्र व गर्भ यांचे नाते पाहिल्यास आपल्या बालगाण्यांतून चंद्राला मामा का म्हणतात हे कोडे लगेच कळते. स्त्रीच्या ऋतूस्रावाचा व चंद्राचा संबंध तर अतोनात जवळचा. ऋतू शब्दातला तो कालमान मोजणारा अर्थही दोन्ही बाबतीत एकच.फिरून फिरून येणारा,सृजनशील.
            
ऋतुचक्रवर एका ब्लॉग मध्ये सारं काही लिहिणं अवघड आहे. एका लेखात पुस्तकातल्या  कोणत्या भागाचा उल्लेख करावा व कोणत्या भागाचा टाळावा हे कळंत नाही. भांबावायला होतं. थोडक्यात, 'ऋतुचक्र'चा आस्वाद घेण्याअगोदरची ही एक झलक आहे असं मी म्हणेन. 'ऋतुचक्र'ची आल्हाददायक पर्वणी कुणीही दवडू नये यासाठी हा ब्लॉग.
                      







Thursday, July 28, 2011

एक प्रयत्न -गांधीजींना उलगडण्याचा.


        काही दिवसांपूर्वी एक मेल आला होता. पूर्ण मेल गांधीजींबद्दल होता. मेल वाचला. त्यात पाकिस्तानला दिले गेलेले पंचावन्न कोटी, फाळणीच्या वेळचा गांधीजींचा नौखाली दौरा, त्याच वेळी सीमेवर होत असलेला रक्तपात व भीषण अत्याचार इत्यादी अनेक गोष्टींना गांधीजींना जबाबदार धरण्यात आले होते व त्यामध्ये गोडसेचा गोडवा गायला होता. मेलमध्ये गांधीजींच्या बाबतीत बरचंस गरळ ओकणारं काहीसं लिहिलं होतं. गांधीजींवर हे असे बिनबुडाचे आरोप करुन आपला मूर्खपणा व मनाचा कोतेपणा जगजाहीर करणार्यांचं मला खुप हसु येतं. एकूण काय, गांधीजींवरील या व अशा स्वरुपाच्या इतर आरोपांचे खंडण करण्यासाठी हा ब्लॊग नक्कीच लिहिलेला नाही. कारण खंडणमंडण करण्यामध्ये फक्त वेळ जातो. त्यातून साध्य तर काहीच होत नाही. मी माझ्या साऱ्या वाचन-चिंतन प्रवासात मला उलगडलेले गांधीजी इथे मांडले आहेत.
         
      वाचन तर लहानपणापासून होतंच पण कॉलेजला आल्यावर मात्र त्याची व्याप्ती वाढली. त्यात मग वाचन, चर्चा, व्याख्यानं, चिंतन इ. ची भर पडली.  ’राजाराम’ कॉलेजला असताना असल्या (वर उल्लेखलेल्या) व तत्सम विषयांवर आमच्या अक्षरशः चर्चेच्या फैरी झडायच्या. आपापली बाजू कशी वरचढ आहे हे दाखवायला प्रत्येकजण आटापिटा करायचा. त्यात ’राजाराम’ म्हणजे सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची खाणंच. मग काय, कॉलेजमधल्या अनेक क्लब्स, अभ्यासमंडळांमध्ये जाऊन आम्ही असल्या विषयांचा चुरा पाडायचो. साहजिकच सावरकर,सुभाषबाबू, भगतसिंग इ. क्रांतिकारी विचारांचा पगडा पडणारं हे वय. मग काय, गांधीवाद म्हणजे मवाळपणा हे मनावर पक्कं बिंबलेलं. त्यातून हे असं ’गांधीं’बद्दल मित्रांच्या चर्चेतून व अशाच काही गांधीविरोधी साहित्यातून गांधीविरोधी विचारसरणी तयार झालेली. एकदा सहजच, शिवाजी विद्यापीठात गेलो असताना तिथं जेष्ठय गांधीवादी व गांधी अभ्यासक चंद्रकांत पाटगांवकरांचं गांधीजींवर भाषण ऐकलं. योगायोगानं, नंतर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पाटगांवकरांशी चर्चेचा योग आला. त्यांनी सुचवलं "फक्त एकदा सकारात्मक गांधी साहित्याचं वाचन कर आणि त्यानंतर गांधीजींना नाकारावासं वाटलं तर नाकार ". त्या दरम्यानच्या काळातच अविनाश धर्माधिकारींचं ’अस्वस्थ दशकाची डायरी’ हे पुस्तक वाचनात आलं. ह्या पुस्तकाची अर्पणपत्रिका खुपंच छान आहे. महात्मा गांधींनाच ती अर्पण केलेली आहे. पण  धर्माधिकारींच्या हटके भाषत ती अजुन उठावदार वाटते. धर्माधिकारींच्या बाबतीतसुद्धा हेच झालं होतं. मग त्यांच्या एका मामानं त्यांना एकदा ’गांधी’वाचून काढं अस सुचवलं होतं. सुरुवात करताना धर्माधिकारींना त्यांच्या मामाने मृणालिनी देसाई यांचं ’पुत्र मानवाचा’ हे पुस्तक वाचायला सांगितलं. मी सुद्धा त्यानेच सरुवात केली. वाचत गेलो. गांधीजींबद्दल अनेक पुस्तकं वाचली व गांधींकडे कधी आकृष्ट झालो ते कळलंच नाही. पाटगांवकरांचं म्हणणं पटलं ’ज्याला खरं गांधी तत्वज्ञान  कळलंय तो गांधींना कधी नाकारू शकत नाही.’

          टीकाकार बोलताना नेहमी गांधीजींच्या चुकांबद्दल बोलत असतात. गांधीजींकडून अनेक चुका झालेल्या आहेत हे देखील मान्य आहे. पण त्यांनी चुक केली म्हणून त्यांना मारणारा नथुराम योग्य हे समीकरण लोकं कस कय जुळवतात कुणास ठाऊक? विचारांच्या लढाईला उत्तर हे विचारांनीच द्यायचं असतं. डॉ. आंबेडकर देखील हे जाणून होते आणि म्हणूनच कोट्यवधी दलित जनता पाठीशी असतानादेखील आंबेडकरांनी कोणत्याही हिंसक कॄती अथवा अनीतीचा अवलंब केला नाही. १९५६ साली धर्मांतराच्या भाषणात आंबेडकर म्हटले होते की कोट्यवधी जनतेला मुस्लिम धर्म स्वीकारायला लावून मी भारतातच एक वेगळा पाकिस्तान निर्माण करू शकतो. मात्र ही लढाई विचारांची आहे आणि त्याला उत्तर विचारांनीच द्यायचे आहे, म्हणून मी असं करणार नाही. यावरून विचारांच्या लढाईचे महत्व स्पष्ट होते. आणि म्हणूनच गांधीजींच्या विचारांना उत्तर म्हणून गोडसेची हिंसक कॄती समर्थनीय नाही.    

         गांधीजींमध्ये वैगुण्य नव्हतं असं नाहीये. माणूस म्हटल्यावर गुणही आले व दोषसुद्धा आलेत. पण आम्हा भारतीयांना देव लागतोच. पुराणातले ३३ कोटी देव पुरत नाहीत की काय म्हणून आम्ही ते माणसांत शोधतो. गांधीजींना त्यांच्या अनुयायांनी देव करून टाकलं आणि एकदा का देव म्हटलं की मग त्याला कोणतीही चूक माफ नाही. मग या (अ)न्यायानुसार त्याला नैतिक,सामाजिक,वैयक्तिक,लैंगिक जीवन नाही. ते सारं जीवन भारतीय भक्तांच्या म्हणजेच जनतेच्या हाती. मग सचिनने नारायण नागबळी करायचा कि नाही, अब्दुल कलामांनी सत्य साईबाबांच्या पाया पडायचे की नाही हे सारं ह्या भक्तांनी म्हणजे जनतेने ठरवायचे. हा देव त्यांना हवं तसं नाही वागला की मग तुडवला त्याला पायदळी. जगाच्या या सो कॉल्ड देवाच्या जगण्यातल्या नैतिकतेच्या व्याख्या मात्र त्या भक्तांच्या. व्याख्या कसल्या ते तर कायदेच! गांधीजींचही तेच झालंय. आपण त्यांना "महामानव" केलंय आणि "माणूस" म्हणून स्वीकारण्यात कमी पडलोय.

        गांधीजींच्या अनेक गोष्टींचा ,इतिहासाचा व त्यांच्या तत्वज्ञानाचा विपर्यास झालेला आहे, केला गेलेला आहे. विचार करा, तुमच्या माझ्यासारखा एक सामान्य माणूस , ज्याच्याकडे कोणतेही शस्त्र नसताना जगातली एवढी मोठी क्रांती करणं ही केवढी मोठी गोष्ट आहे. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइनसुद्धा आपल्या आयुष्याच्या शेवटच्या कालावधीत गांधीवादी बनला आणि म्हणूनच त्याने लिहून ठेवले की " गांधी नावाचा रक्ता- मांसाचा माणूस या पृथ्वीतलावर होऊन गेला ह्यावर भविष्यातल्या पिढ्यांचा विश्वास बसणार नाही ". किती स्वप्नवत ना? जगानं मध्ययुगापासून ते अगदी अलिकडील ईजिप्तच्या फेसबुक क्रांतीपर्यंत अनेक क्रांत्या पाहिल्यात. यातील अनेक यशस्वी क्रांत्या ह्या रक्तरंजित होत्या. आधुनिक युगात गांधीजींनी भारताची सत्याग्रहरुपी जी रक्तविहीन क्रांती घडवली, त्या क्रांतीने संपूर्ण जगाला एक नवा आयाम दिला. मग त्यातूनच प्रेरणा घेऊन दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेला, अमेरिकेत मार्टीन ल्युथर तर पूर्व आशियात आंग स्यान स्यु की ह्या नोबेल विजेत्यांनी अहिंसाप्रणित क्रांत्या यशस्वी करून दाखवल्या.

           रघुनाथ माशेलकरांचं ’पत्रिका’ ह्या मराठी विज्ञान मासिकात परवा भाषण वाचलं. माशेलकरांना लंडनच्या रॉयल सोसायटीने १९९८ साली फेलोशिप दिली. २०१० साली सोसायटीला ३५० वर्षे पुर्ण झाली. रॉयल सोसायटी दर ५० वर्षांनी सर्व फेलोजना बोलावते. त्यानिमित्त लंडनला सर्व फेलोजना बोलावण्यात आले होते. माशेलकरांनी तिथे जे भाषण दिले त्या भाषणाच्या संदर्भात असं म्हटलंय की "आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताबद्दल बोलायचे झाले तर फक्त एक दोन देशांपुरते नव्हे तर संपुर्ण जगाला व्यापकपणे माहित असलेले भारतीय दोनंच एक म्हणजे गौतम बुद्ध व दुसरे महात्मा गांधी. म्हणून मी गांधीजींपासून बोलायला सुरुवात केली ". डॉ. माशेलकरांचं बरचंसं करिअर हे अमेरिकेत गेलेलं. गांधीजींबद्दल त्यांना तशी तोकडीच माहिती. भारतात आल्यावर त्यांनी ’गांधी’ वाचायला सुरुवात केली. हळूहळू ’गांधी’ त्यांना उलगडू लागले. मग गांधीजींचा सामाजिक, राजकीय, वैचारिक, तात्विक, वैज्ञानिक, आर्थिक, निसर्ग व पर्यावरणाविषयीचा आणि ट्रस्टीशिपचा दृष्टीकोन जाणवू लागला. तो भावला व गांधीवादाला काळाच्या मर्यादा कशा नाहीत हे कळलं. त्यातूनच मग ’टाईमलेस इन्स्पिरेटर-रिलीव्हींग गांधी’ हे अप्रतिम पुस्तक उदयास आलं. या सगळ्या मांदियाळीत अनेक लेखक-साहित्यिकांची नावं घेता येतील. ’मला भेटलेली माणसं’ ह्या पुस्तकात राजू परूळेकरांनी लिहलंय की गांधींचं  आत्मचरित्र हे जगातलं एकमेव एवढं थेट लिहीलेलं आत्मचरित्र असेल. साधं मराठीतंच बघायचं झालं तर, अगदी विंदा, पुलं, वसंत बापट,पाडगांवकरांसारख्या साहित्यातील सारस्वतांनीदेखील गांधीजींवर अमाप लेखन केलं. 
 
         गांधीजींमध्ये असं काय होतं, की ज्याची जादू साऱ्या जगावर पडली आणि म्हणूनच मंडेलापासून ते स्यू की, फिडेल क्याष्ट्रोपासून ते ओबामा, बाबा आमटेंपासून ते अभय बंग, स्याम पित्रोदा ते नारायण मूर्ती,यांच्यावर पडावी?  कारण गांधीजींचं जगणं थेट होतं. सामान्य माणूस हा त्यांच्या जगण्याचा, कृतीचा व एकूणच विचारांचा दुवा होता. सर्वसामान्य माणसावरचं त्यांचं प्रेम हे  आजच्या " काँग्रेस का हाथ,आम आदमी के साथ" सारख्या तकलादू व पोकळ घोषणेसारखं नव्हतं,तर ते अगदी ' दिल से' होतं. सर्वसामान्य माणसाचा गांधीजींनी जेवढा खोलवर विचार केलेला आहे, तेवढा अख्ख्या जगात क्वचितच कुणी केला असेल. आणि म्हणूनच ते जंतर देऊ शकतात की "जेव्हा तुम्ही द्विधा मनोवस्थेत असाल व तुमचा निर्णय होत नसेल त्यावेळी तुम्ही आजवर पाहिलेल्या सर्वात जास्त गरिबाचा चेहरा आठवा आणि तुमच्या निर्णयाचा त्याला कितपत फायदा होणार आहे ह्याचा विचार करा व आता तुमचे पाउल उचला. मला खात्री आहे तुमची द्विधावस्था सुटली असेल". हे लिहिणं अफाट चिंतनशीलतेतूनच येऊ शकतं.
                    
       गांधीवाद हा कालातीत आहे आणि म्हणूनच त्याला काळाच्या मर्यादा नाहीत. कधी नव्हं तेवढं आता हे स्वच्छपणे स्पष्ट झालंय. मग त्यात सध्याची नैसर्गिक स्त्रोतांची सुरु असलेली ओरबड असो, किंवा कार्पोरेट सेक्टरमधील टारगेट्स- धावणं- ताण- दमछाक- सुखसोई- पुन्हा टारगेट्स- पुन्हा सुखसोई ही शर्यत असो, ह्या साऱ्यावर उतारा म्हणून पर्यावरणवाद्यांपासून ते अगदी मानसोपचारतज्ञांपर्यंत सारे गांधीजींचाच स्लोगन सुचवतात-  There is a sufficiency in the world for man's need but not for man's greed.  एवढंच कशाला, अगदी अलिकडंची दोन ताजी उदाहरणं तर हे सारं प्रकर्षानं अधोरेखीत करतात. एक म्हणजे, भ्रष्टाचारविरोधी अण्णा हजारेंच्या आंदोलनाला देशाच्या सर्व थरांतून मिळालेला अभूतपूर्व पाठींबा हा तर गांधीजींचाच फॉर्म्युला - 'सत्याग्रह' व दुसरं म्हणजे इन्फ़ोसिसचे मावळते अध्यक्ष नारायणमुर्ती. नारायणमूर्तींनी अनेक अमेरिकन कंपन्यांच्या पावलावर पाऊल ठेवून केलेली आपल्या कंपनीसाठी घराबाहेरच्या वारसदाराची निवड. ही तर गांधीजींच्या ग्रामस्वराज्यातील कल्पना. या सगळ्याचा अन्वयार्थ एकच!  काय? तो म्हणजे ..पुन्हा गांधी!
होय..पुन्हा गांधी !!!

काही इतर वाचनीय संदर्भ:-
१. गंगेमध्ये गगन वितळले- अंबरीष मिश्र
२.जिंकुनि मरणाला- वसंत बापट
३.खुला-खलिता- द्वारकानाथ संझगिरी
४.बराक ओबामा-संजय आवटे
५.मला भेटलेली माणसं- राजू परूळेकर
६.इंडिया आफ्टर गांधी- आर.गुहा.







Saturday, February 26, 2011

दुर्गा भागवतांचं लेखन: भाग १


                सध्या दुर्गा भागवतांचं ' भावमुद्रा ' नावाचं पुस्तक वाचतोय. ' भावमुद्रा ' मध्ये  दुर्गाबाईंच्या काही निवडक लघु निबंधांचा समावेश आहे. दुर्गाबाईंच्या एकूण साहित्यावर एक ओझरती नजर जरी टाकली तरी आपल्या लक्षात येते की, बाई निसर्गवेड्या आहेत. त्यांच्या निसर्गप्रेमाचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे त्यांचं ' ऋतुचक्र '. 'ऋतुचक्र' ने दुर्गाबाईंना तमाम मराठी वाचनवेड्या रसिकांच्या हृदयात स्थान मिळवून दिलेलं आहे. दुर्गाबाईंबद्दल बोलायचं अथवा लिहायचं  म्हटलं तर निसर्गाचा उल्लेख ओघानंच येतो. निसर्गावर दुर्गाबाईंनी अतोनात प्रेम केले. फक्त निसर्गावरच नव्हे तर निसर्गातल्या प्रत्येक पशु-पक्षी, जीव-जंतुंवरती त्यांनी प्रेम केलं. निसर्गाचं, सृष्टीचं दर्शन त्यांनी अगदी डोळे भरून घेतलेलं आहे. त्यातल्या पशु-पक्ष्यांचं व छोट्या जीव-जंतुंचं  जीणं बाईंनी लहान मुलाच्या डोळस कुतूहलानं टिपलेलं आहे. पशु-पक्ष्यांच्या, जीव-जंतुंच्या बारीक-सारीक हालचालींचा अभ्यास त्यांनी अगदी निरागसपणे केलेला आहे. त्यामुळेच दुर्गाबाई फक्त मोठे पशु-पक्षीच नव्हे तर फुलपाखरू, विंचू, कुंभारमाशी,  मुंग्या,गांधीलमाशी इ. कीटकांचे जगणे,खाणे, प्रणय व प्रजनन यांविषयी अधिकाराने लिहू शकतात. दुर्गाबाईंचे सूक्ष्म निरीक्षण थक्क करायला लावणारे आहे, ह्याची साक्ष यातला प्रत्येक निबंध वाचताना पानोपानी मिळते.

               ' वात्सल्याचा आविष्कार ' नावाच्या निबंधात दुर्गाबाईंनी निसर्गातील विविध जीवांचे वात्सल्य व प्रणय प्रकट करण्याच्या तर्र्हाविषयी अत्यंत सुंदर लेखन केलेले आहे. सदर लेखात बाईंचे एक वाक्य आहे " विशेषत: प्रणयाच्या वेळी प्रकट होणारे प्राण्यांचे उत्कट मनोधर्म आणि तितक्याच पण वेगळ्या तर्हेने प्रकट होणारे अपत्यधर्म यांत कोणते अधिक मनोहर व गंभीर ते सांगणे कठीण असते ". खरंच! किती चिंतनपूर्वक हे वाक्य बाईंनी  लिहिले असेल ? वर म्हटल्याप्रमाणे, बाईंनी, प्राण्यांचा उत्कट प्रणय बघितलाय तसेच त्या प्राण्यांनी पोटच्या पिला-बाळावर केलेले जीवापाड प्रेम देखील पाहिलेय.  बाईंनी विंचवाच्या प्रणयाचे, आपल्याला कधी माहित देखील नसलेले, वेगळेच वर्णन या निबंधात एका ठिकाणी केलेले आहे. विंचवाच्या शृंगारात , प्रणयाच्या अगदी उत्कट क्षणी, मादी विंचूमध्ये काही बदल होतात. नराच्या तृप्तीच्या क्षणी (म्हणजे तो गाफील असताना), मादीमध्ये अचानक मातृभाव निर्माण होतो व त्या वात्सल्यापायी ती नराला मारून टाकते आणि (स्वत:च्या व पिलांच्या पोषणासाठी ) त्याचे भक्षण करते. वाचलं आणि अगदी थक्क झालो! बाईंच्या एवढ्या सूक्ष्म निरीक्षणाला मनापासून सलाम करावासा वाटला. विंचवाच्या बाबतीतल्या या सगळ्या घडामोडीचं (हो  घडा आणि मोडीचं...) बाईंच्या शब्दात जसं आहे तसं खाली दिलंय.

 
             " एकदा मी जंगलात विंचवांचा प्रणय पहिला. आपल्या प्रियेपुढे पिसारा उभारून नाचणारा मोर   साधारणपणे आतुर आणि रसिक प्रियकरांचा प्रतिनिधी समजला जातो. पण विंचू, मेळाव्याने आपल्या प्रियांचे आराधन नांग्या उभारून करतात. त्या त्यांच्या प्रेमनृत्यासारखे सुंदर दृश्य दुसरे नसेल. विंचवाच्या नांग्या आणि आकडे यावेळी किती नाजूक दिसतात. त्यांचे भयाकारी स्वरूप यावेळी कोठच्या कोठे गेलेले असते. साधारणपणे उन्हाळ्याच्या अखेरीस काही दिवस हे उत्कट प्रियाराधन चालते. खरोखर विंचवाप्रमाणे  प्रेम करण्याची शक्ती इतर कोणत्याही प्राण्यात असेल की नाही याबद्दल त्यावेळी शंका येते. पण हा शृंगार म्हणजे नराचे प्रलयकाळचे  तांडवनृत्य असते.  नराचे वीर्य शोषून घेऊन पुष्ट झालेली मादी अपत्यसंभवाची खात्री झाल्याबरोबर जो अखेरचा शृंगार त्याच्या बरोबर करते तो काही विलक्षणच असतो. या वेळेस ती आपले सारे कौशल्य खर्च करून नराला असा काही कैफ आणते की व्वा!  आतापर्यंतच्या प्रेमसाधनेत ती जणू काही अत्यंत सावधपणे आपले फासे टाकीत असते. तिचे प्रेम खरे की खोटे?  शेवटच्या वेळी सारा उन्माद व भीषण मातृभाव तिच्या ठिकाणी जागृत झाल्यासारखा वाटतो. नर तृप्तीने बेहोष झाला की ती आपल्या तीक्ष्ण आकड्यांनी तीव्र प्रहार करून त्याला घायाळ करते, मारते आणि भक्षण करते. आता ती केवळ नारी असते. अपत्यसंभव हेच तिचे अंतिम कार्य असते. त्याच्यात ती कोणताही अडथळा येऊ देत नाही. तिचे पहिले चैतन्य व लालसा गळून जाते. तिला सुस्ती येते. पुष्टी, गांभीर्य आणि बळ येते. आता आपल्या पिलांना ती कोमलतेने जोपासते. क्रौर्य आणि माधुर्य यांचा संगम विंचवात असा दिसतो. "


                 इतर प्राण्यांच्या- पक्ष्यांच्या बाबतीतलं पिलांच्या संगोपनाचं असंच वर्णन दुर्गाबाईंनी तुलनात्मक रीतीने केलेलं आहे. त्यात मग मांजर,कुत्रा,गाय आदी पाळीव तर माकड, वाघ हे जंगली किंवा चिमणी,कावळा,कोकिळा इ.पक्षी यांचा संक्षिप्त उल्लेख आढळतो. आश्चर्य म्हणजे अगदी मुंग्या, मधमाश्या, गांधीलमाशी यांसारख्या कीटकांच्या वात्सल्याचा प्रकट साक्षात्कार  दुर्गाबाईंनी  त्यांच्या लेखणीने घडवलेला आहे. कुंभारीण माशीचं प्रणय-वात्सल्य या दोहोंचा आविष्कार विंचवासारखाच मनाला चटका लाऊन जातो. विविधरंगी सौंदर्याने सजलेल्या एका मादी फुलपाखराची प्रसूती व अखेर यांतल्या पुसत सीमारेषा लेखिकेने प्रचंड कौशल्याने दाखवलेल्या आहेत. 

                सभोवतालच्या निसर्गाचा ऱ्हास होत असतानाच आज ' सेव्ह टायगर'  योजना राबवावी लागते. दुर्गाबाईंनी निसर्गातल्या हरेक घटकाचा - अगदी सूक्ष्म कीटकांपासून ते मोठ्या प्राण्यापर्यंत सर्वांचा तेवढ्याच संवेदनशीलतेने  विचार केलेला होता. निसर्गातल्या ह्या साऱ्या जीवांचं हे रहस्यमय जगणं हेच दुर्गाबाईंच्या उर्जेच केंद्र होतं. आज बाई हयात नाहीत. पण आजदेखील भुंग्याचं  गुणगुणणं  असो वा मधमाश्यांचं फुलाभोवती भिरभिरणं असो; सारं पाहिल्यावर बाईंची प्रकर्षाने आठवण होते. कारण बाई फक्त संवेदनशील लेखिका नव्हत्या तर त्या अस्सल निसर्गप्रेमी होत्या.






Monday, February 14, 2011

प्रेमात तुझ्या मी...

प्रेमात तुझ्या मी माझ्यात नकळत पडलो,
कळले न कसे मला, मी मजला कधी विसरलो.

सौंदर्य नितळ तुझे हे असे
मन धुंद वेडे होई जसे,
सांगू तुला मी आता कसे
पाहता तुजला मला काय भासे.

केशसंभार तुझा जेव्हा तू हळूच सावरशी
,
हाय! हृदयातून तेव्हा सुप्त ज्वाला पेटवीशी.
निशा तुझ्या केसांमधली अंधारी ही अशी,
सांजेला त्यात उगवण्यासाठी वेडा होई शशी.

लोचनांच्या तुझ्या त्या लडिवाळ हरकती
एकांतात असलो की अजूनही आठवती.
चंचल नयन तुझे, कधीतरी नजरानजर होई,
अन नकळत तनी माझ्या वीज चमकून जाई.

ओठ तुझे ते गुलाबी-कोमल, फुलांच्या पाकळ्या जणू

चुम्बुनी घ्यावे अन विलग करावे ओले दव कणु.
अधर नव्हेत, हे तर आसुसलेले क्षण गं बावरी !
कवेत ये आता माझ्या, मला मोह न आवरी.

                     

                            - प्रथमेश आडविलकर.