ब्लॉगचे कॉपीराईट्स

myfreecopyright.com registered & protected

Wednesday, October 15, 2014

मतदान



मी आज मतदान केलंय
होय, मी आज मतदान केलंय.
सैल जिभेने बरळणाऱ्या आणि धरणात मुतणाऱ्यांच्या ढुंगणावर
लाथ मारण्यासाठी मी आज मतदान केलंय .
उठसूठ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर राडा संस्कृतीत शोधणाऱ्या झुंडशाहीला
लोकशाहीचं खरं बळदाखवण्यासाठी मी आज मतदान केलंय .
समोर सगळं जळतंय हे दिसत असतानाही काहीही न करणाऱ्या
धोरणलकव्याला ठोसा मारण्यासाठी मी आज मतदान केलंय.
विज्ञानाच्या या युगात अजूनही ढाल- तलवारीची भाषा करून
दिशाभूल करणाऱ्या स्वार्थी प्रवृत्तीला ठेचण्यासाठी मी आज मतदान केलंय .
देशासाठी, भविष्यासाठी, उज्ज्वल उद्यासाठी किंवा भावी पिढीसाठी नव्हे तर 
माझ्यासाठी स्वत:साठी मी आज मतदान केलंय.








Friday, February 14, 2014

‘इट्स कॉंप्लिकेटेड’




 “टाईमपास बघितलास का? “ मित्राचा फोनवर पहिलाच प्रश्न.
“हो. आजच तू?”
“मीसुद्धा आजच पाहिला.”
“कसा वाटला?”  
“ठीक. मात्र हा विषय वेगळा आहे.”

‘टाईमपास’बद्दल एकदोन मित्रांनी बरंच काही सांगितलं, की ‘हा विषय वेगळा आहे.’, ‘ दिग्दर्शकाने पौगंडावस्थेतील प्रेम अलगदपणे हळुवार मांडलंय’, एका मित्राने तर रिलेशनशिप, स्पेस वगैरे जाडजूड शब्द वापरून काहीबाही सांगितलं. आता तर व्हॅलेंटाईन डेनिमित्ताने येणारे लेखही तेच - पौगंडावस्थेतील मुलांच्या प्रेमाबद्दल लिहिताहेत.

त्याच पौगंडावस्थेतील मुलांच्या प्रेमाची ही एक बाजू .

 ‘टाईमपास’मुळे म्हणा, उत्सुकता म्हणून म्हणा किंवा लेख लिहायच्या निमित्ताने म्हणा फेसबुकवर काही निवडक ‘यंगस्टर्सच्या’ प्रोफाइल्स पाहिल्या. (यंगस्टर्स शब्द लिहिताना स्वत: म्हातारे झालोय अशा अविर्भावात लिहावयाचा असावा बहुधा. कारण  इथं लिहिताना आपोआप तसा अभिनिवेश अंगात शिरतोय असं वाटतंय.) हे ‘यंगस्टर्स’ म्हणजे आमच्यापेक्षा अजून थोडे यंग - पंधरा, सोळा आणि सतरा या वयोगटातले. यातल्या अनेकांसाठी ‘रिलेशनशिपमध्ये असणे’ हे कॉमन होते. काहींच्या प्रोफाइल्स किंवा त्यांच्या स्टेटस अपडेटवरून ते रिलेशनशिपमध्ये असल्याचे स्पष्टपणे जाणवले तर ब्रेकअप झालेले इतर काही ‘देवदास’ किंवा ‘देवदासी’ही सापडल्या. विशेष म्हणजे रिलेशनशिपमध्ये असलेल्यांपेक्षा या देवदास/देवदासींचे क्वचित  ‘दर्दभरे’ स्टेटस अपडेट असायचेच. दोन्ही प्रकारात अशाच संदर्भाच्या इतर गोष्टीही होत्याच सोबतीला - फोटोज, कमेंट्स वगैरे. अर्थातच हे सर्व या सगळ्याच वयोगटाला सरसकट लागू होईल असं नाही मात्र बव्हंशी सर्वत्र थोडीफार अशीच वस्तुस्थिती आहे हेदेखील नाकारता येत नाही.

ठीकाय. या वयोगटाला समजून घेऊन त्यांची ‘ही’ अवस्थाही स्वीकारू. ‘रिलेशनशिप’ नंतर काय? या सर्व गोष्टींबद्दल विचार करण्याएवढी प्रगल्भता असते की नसते ही दुसरी बाजू आहे. तूर्तास ती विचारात घ्यायला नको.  

पौगंडावस्थेतील मुलांबद्दलच कशाला, सर्वसाधारणपणे जरी बोलायचं झालं तरी एखाद्याला रिलेशनशिपमध्ये असावं असं का वाटत असतं? या प्रश्नाचं उत्तर आहे की प्रत्येकाला आपल्याला समजून घेण्यासाठी एक स्वत:चं किंवा हक्काचं असं विश्व हवं असं वाटत असतं. ते साहजिकच आहे. त्यामुळे कुठूनही मिळणाऱ्या या ‘विश्वा’ला तो किंवा ती पटकन पकडते. हे काय विचारपूर्वक उचललेलं पाऊल नसतं. काही वेळा असंही असतं की जेव्हा एखादं अपयश, दु:ख किंवा कौटुंबिक पातळीवरील दुर्लक्ष अथवा त्रास यामुळे कोणत्याही बाजूने प्रेम मिळत नाही, तेव्हा माणूस कुठूनही येणाऱ्या प्रेमाच्या एका कवडश्याची वाट पाहत असतो. तो प्रेमाचा कवडसा त्याला मिळाला की तो इतर सर्व काही विसरून जातो. ‘टाईमपास’मध्ये दिग्दर्शकाने नेमका हाच धागा पकडलेला आहे. चित्रपटात दाखवलेली नायिका ‘प्राजक्ता’ ही मुलगी घरून न मिळणाऱ्या प्रेमाच्या शोधात आहे, तर सगळ्या जगाचा दुस्वास  सहन करणाऱ्या नायक ‘दगडू’ला समवयस्क प्रेमाची गरज आहे. किंवा कदाचित त्याची आई नसल्यामुळे त्याला तशा प्रेमाची गरज वाटतेय असंही म्हणता येईल.
  
इथंपर्यंत नेहमीचंच. म्हणजे एखाद्याला आवडणाऱ्या व्यक्तीशी संबंधित असणं (किंवा इथे -रिलेशनशिपमध्ये असणे)- कोणत्याही वयात अगदी पौगंडावस्थेत असल्यापासून-  हे नेहमीचेच आहे. पण...

इथून पुढे (आताच्या काळानुसार) होणाऱ्या बदलांशी आताचे हे ‘यंगस्टर्स’ लगेच एकरूप होऊ पाहताहेत का?

 ….. म्हणजे आता रिलेशन्समध्येही प्रचंड बदल होताहेत. म्हणजे ब्रेकअप्स तर आता खूप कॉमन झालेत. ब्रेकअप्सचं काही वाटेनाही झालंय कारण जेवढ्या लवकर ब्रेकअप होतोय तेवढ्याच लवकर ‘तो’ किंवा ती दुसरीकडे कुठेतरी ‘एंगेज’ होतेय. पूर्वी प्रेमात पडणं हे जेवढ नेहमीचं होतं तेवढंच नेहमीचं आता लगेच ब्रेकअप होणं झालंय. ब्रेकअपची कारणं काहीही असोत पण खऱ्या प्रेमाची भावना एवढी थंड असू शकते का? म्हणजे ‘ऑब्सेशन’ किंवा पछाडलं जाणं वगैरे काहीच नाही का? म्हणजे एकमेकांच्या प्रेमात पडल्यावर ते ‘रिलेशनशिप’ टिकवता येणं जमतंय का या यंगस्टर्सना? लहानपणापासूनच अनेक गोष्टींना पटकन अॅक्सेस असलेल्या या मुलामुलींना नात्याची- ‘रिलेशनशिपची’ घाई तर होत नाही?

फेसबुकवर स्वत:चं रिलेशनशिप स्टेटस ‘इट्स कॉंप्लिकेटेड’ म्हणून सांगणारी ही पिढी खरंच एवढी कॉंप्लिकेटेड बनू पाहतेय का?






Sunday, July 1, 2012

यशवंतरावांची दिल्ली कारकीर्द (भाग २).

    यशवंतरावांनी केंद्रात संरक्षण, परराष्ट्र, गृह, अर्थ इ. महत्वाच्या खात्यांसह देशाचं उपपंतप्रधानपद आदी विविध पदे भूषवलीत हे खरं व ही सारी पदे भूषवणारे यशवंतराव हे पहिलं मराठी व्यक्तिमत्व हेही तेवढंच खरं. पण नाण्याची ही एक बाजू झाली. यशवंतरावांच्या दिल्ली कारकिर्दीला दुसरी एक बाजू होती, जी खूप कमीजणांना माहित असेल. यशवंतराव दिल्लीसाठी नेहमीच होते. पण दिल्ली त्यांच्यासाठी नव्हती. यशवंतरावांनी दिल्लीला आपलं सर्वस्व दिलं पण दिल्लीनं त्यांना कधीच आपलंसं करून घेतलं नाही. अर्थात खुद्द यशवंतरावही याला बरेचसे जबाबदार होते.

      १९६२ साली चीनच्या आक्रमणानंतर केंद्रात नेहरूंना कणखर संरक्षणमंत्र्याची गरज भासू लागली. म्हणून यशवंतरावांना नेहरूंनी केंद्रात बोलवून घेतले. यशवंतरावांची दिल्ली कारकीर्द आरंभीच्या १० वर्षांत त्यांची लोकप्रियता व देशातील मान्यता वाढविणारी ठरली. या काळात महाराष्ट्राच्या राजकारणावरही त्यांची पकड घट्ट राहिली. राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर कोणीही असले तरी सत्तेची खरी सुत्रे त्यांच्याच हातात राहिली. १९६३ मध्ये कन्नमवारांच्या मृत्यूनंतर बाळासाहेब देसाईंसारख्या अनेक मातब्बर मराठा नेत्यांना बाजूला सारून त्यांनी विदर्भातील बंजारा जातीच्या वसंतराव नाईकांना दिले. आपल्या मागेही महाराष्ट्र आपल्या ताब्यात राहील अशी व्यवस्था त्यांना करायची होती आणि आपल्या सर्वंकष अधिकाराला आव्हान देउ शकेल असा माणूस त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसवायचा नव्हता. व त्यांनी ते केले. वसंतराव नाईक हे कुशल प्रशासक व मनमिळावू होते मात्र स्वत:चे सामर्थ्य वाढविणे किंवा त्यासाठी कोणाशी स्पर्धा करणे हा त्यांचा स्वभाव नव्हता. स्वाभाविकपणे, यशवंतराव दिल्लीत बसूनही वसंतरावांमार्फत महाराष्ट्र आपल्या हाती राखू शकले.

     नेहरुंच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या राजकारणातही बदल होत गेले. इंदिरा गांधींना नमविण्याच्या जुन्या काँग्रेस श्रेष्ठींच्या प्रयत्नातून सिंडीकेट काँग्रेस नावाची इंदिराविरोधी आघाडी उभी राहिली. त्या आघाडीने संजीव रेड्डींना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली. तिला आरंभी इंदिरा गांधींनी पाठींबा दिला व यशवंतरावही रेड्डीसमर्थक बनले. पुढे सिंडीकेटला शह द्यायला इंदिरा गांधींनी व्ही.व्ही.गिरी यांची उमेदवारी पुढे रेटून "विवेकाचा कौल देईल" तसे मतदान करण्याचे खुले आवाहनच पक्षाला केले. यशवंतरावांची कोंडी व्हायला खरी सुरुवात इथूनच झाली. पक्षनिष्ठा म्हणत ज्यांच्यासोबत राहिलो ती माणसे मनाने, विचाराने, प्रकृतीने किंवा राजकीय भूमिकांखातरही आपली नाहीत आणि ज्या इंदिरा गांधींविरुद्ध आपण त्यांच्यात अडकलो त्या दीर्घकाळ राजकारणाचे नेतृत्व करणार आहेत हे त्यांना जाणवायला लागले. रेड्डी पडले, गिरी विजयी झाले. सिंडीकेट खचली आणि इंदिरा गांधी समर्थ बनल्या. त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले, संस्थानिकांचे तनखे थांबविले. यशवंतरावांनी या पुरोगामी पावलांचे स्वागत करत गांधींची बाजू नव्याने उचलून धरली. ७१ ची निवडणूक आणि नंतरचा बांगला विजय यांनी इंदिरा गांधींचे रुपांतर एका विजयी देवतेत केले. हा विजयोन्माद १९७४ पर्यंत टिकला. त्यानंतर जे.पींच्या "संपूर्ण क्रांती"ने  प्रथम गुजरात मग बिहार व पुढे सारा देश ढवळून काढायला सुरुवात केली. ५ जून १९७५ या दिवशी अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवून त्यांना सहा वर्षे निवडणूक लढवता येणार नाही असा निकाल दिला. आणि इथे खरी ठिणगी पेटली...
          
    यावर मात करायची तर घटना बाजूला सारणे हा एकमेव उपाय इंदिरा गांधींसमोर होता. २५ जूनला इंदिराबाईंनी देशात अंतर्गत आणीबाणी लागू करून नागरिकांचे मुलभूत अधिकार गोठवले आणि जे.पींसह मोरारजी देसाई, जगजीवनराम, चंद्रशेखर, धारिया हे लोकशाहीचे सारे विरोधक तुरुंगात डांबले. स्वातंत्र्य, समता, न्याय, लोकशाही आणि नीतिधर्म ही सगळी मुल्ये एका बाजूला आणि हुकुमशाही, सत्ता, नागरी अधिकारांचे दमन व इंदिरा गांधींची एकाधिकारशाही दुसऱ्या बाजूला होती. देशाने व सर्व भारतीय जनतेने आपली बाजू निश्चित केली होती. आता यशवंतरावांना यातील एक बाजू निवडायची होती. हा क्षण यशवंतरावांच्या परीक्षेचा होता.यशवंतराव मूल्यनिष्ठतेचा आग्रह धरणारे नेते असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे डोळे लागले होते.

                 ... यशवंतरावांनी इंदिरा गांधींची बाजू घेतली.

     आणि इथे यशवंतरावांचा मूल्यांशी असलेला संबंध संपला. यानंतर सत्तेला चिकटून राहणारा व फक्त पोपटपंची किंवा हांजी हांजी करणारा नेता अशी प्रतिमा त्यांना कायमची चिकटली. यात त्यांनी खूप काही गमावले. नंतरच्या काळात ते सत्तेत राहिले, मोठी पदे त्यांच्या वाट्याला आली, ते देशाचे उपपंतप्रधानही झाले...पण ते पूर्वीचे यशवंतराव राहिले नव्हते. अनुयायांच्या मनात व जनतेच्या दृष्टिकोनात त्यांची प्रतिमा लहान व दयनीय होऊन ढासळली होती.

     यशवंतरावांना त्यांनी मोजलेल्या या किमतीचे मोल कळत होते पण, ज्या पक्षात हयात घालविली त्यासोबत ते शेवटपर्यंत निष्ठावंत राहिले. तडजोडवादी, पडखाऊ, लाचार असली सगळी विशेषणे त्यांनी या काळात अंगावर घेतली. हा माणूस आपल्याला सोडून जाणार नाही याची खात्री पटल्यानंतर इंदिरा गांधी आणि दिल्लीतल्या इतर पुढाऱ्यानीही त्यांना गृहीत धरायला सुरुवात केली. आपले निर्णय त्यांना सांगायचे व त्यांची त्या निर्णयांना संमती असणारच असे समजायचे असाच प्रकार पुढे चालू राहिला.या काळात महाराष्ट्रातील राजकारणही त्यांच्या हातून सुटत गेले व ते तसे सुटत राहील अशाच कारवाया दिल्लीतून चालू ठेवल्या गेल्या. नाईकांनंतर म्हणूनच मुख्यमंत्री म्हणून शंकरराव चव्हाणांना दिल्लीच्या वरदह्स्ताने आणण्यात आले. नंतरच्या काळातही शरद पवारांनी जेव्हा राज्यात वसंतदादांविरुद्ध बंड पुकारून त्यांना पायऊतार व्हायला लावले व जनता पक्षाच्या मदतीने मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली तेव्हा "आपण हे यशवंतरावांच्या सल्यानुसारच करत असल्याचे" चित्र काहीएक न बोलता त्यांनी उभे केले. यशवंतरावांची अडचण ही की पवारांच्या त्या काँग्रेस सोडण्याच्या काळात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांच्याकडेच होते. स्वाभाविकच, तुम्ही पक्षाध्यक्षपदावर असताना तुम्हीच वाढवून मोठा केलेला कार्यकर्ता पक्षाबाहेर पडतोच कसा, असा संशयचिन्हांकित प्रश्न त्यांना विचारला गेला.त्यांच्या जवळ त्याचे खरे उत्तर होते; पण् त्यावर 'दिल्ली'चा विश्वास बसणार नव्हता आणि ज्यांनी त्यांना न विचारता पक्षाविरूद्ध बंड केले होते त्यांच्याशी आपले सर्व संबंध तोडून टाकणे हा यशवंतरावांचा स्वभाव नव्हता. परिणामी, महाराष्ट्र हातात नाही आणि दिल्लीत विश्वास नाही अशा अघांतरी अवस्थेत ह्या थोर नेत्याचे राजकारण जाऊन पोहोचले. विचारवंत, पत्रकार आणि तत्त्वनिष्ठ म्हणवणाऱ्यानी आणीबाणीच्या काळातच त्यांना आपल्या विचारातून वजा केले होते. सारेच विरोधात वा संशयाने पाहणारे आणि विश्वासाने जोडलेली माणसे आपली न राहिलेली अशी एकाकी, विचित्र व प्रचंड दयनीय अवस्था त्यांच्या वाट्याला आली होती.

   चरणसिंगांच्या मंत्रिमंडळात ते उपपंतप्रधान होते, पण ते पद इंदिरा गांधींनी एक खेळी म्हणून त्यांना घ्यायला लावले होते. चरणसिंग सरकारवर विश्वास दर्शवण्याची वेळ आली तेव्हा त्याला दिलेला पाठिंबा इंदिरा गांधींनी काढून घेतला. त्यात यशवंतरावांचे उपपंतप्रधानही गेले. १९८० च्या निवडणुकीत  इंदिरा गांधींच्या नेतृत्वातल्या काँग्रेसने स्वबळावर सत्ता हस्तगत केली. पण त्याचबरोबर काँग्रेस व इंदिरा गांधींना यशवंतरावांचा असलेला उरलासुरला उपयोगही संपला. त्यानंतरचा काळ यशवंतरावांनी नुसती वाट पाहण्यात काढला. पंतप्रधानांचे बोलावणे आले तर जायचे, विचारलेला सल्ला द्यायचा आणि परत आपल्या एकांतात गढायचे. याच काळात वेणूताईंच्या निधनाने त्यांना जवळपास मृतवतच केले. अशा अवस्थेतच त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करावे लागले. ज्या माणसाने महाराष्ट्राची सर्वार्थाने सर्व क्षेत्रांतील पायाभरणी केली, महाराष्ट्राच्या भावी वाटचालीची दिशा निश्चित केली, त्या यशवंतरावांजवळ त्यांच्या अखेरच्या काळात कोणीही नव्हते. त्यांच्या अखेरच्या दिवसांत महाराष्ट्रातला एकही नेता त्यांना बघायला अथवा भेटायला गेला नाही. तशाच अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला. या महान माणसाचा असा शेवट ही एक दुर्दैवी शोकांतिका आहे.

     यशवंतरावांच्या अशा शोकांतिकेची मीमांसा कशी करता येईल? त्यांची अतिरिक्त पक्षनिष्ठा त्यांच्या पडझडीला कारण ठरली म्हणणार की त्यांनी आपली म्हणून जवळ केलेल्या माणसांनी त्यांचा केलेला विश्वासघात या साऱ्याला कारणीभूत ठरवणार? प्रत्येकाची या प्रश्नांची उत्तरे वेगवेगळी असतील. इथं मग काहीजण यशवंतरावांनादेखील दोष देतील पण एक गोष्ट इथे मात्र लक्षात ठेवावी लागेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद चारवेळा व केंद्रातील चार महत्वाची मंत्रीपदे भूषविलेल्या आणि अखेर उपपंतप्रधानपदासारख्या मोठ्या पदावर राहिलेल्या या माणसाने दिल्लीत स्वतःचे घर बांधले नाही की पुण्यामुंबईसारख्या एखाद्या शहरात एखादा फ्लॅट घेतला नाही. डझनांनी साखर कारखाने उभारणाऱ्या या नेत्याच्या नावावर एक एकरही जमीन नव्हती. महाराष्ट्राच्या उभारणीची पायाभरणी करणारा आणि आपल्या असामान्य कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्राला त्याची नवी ओळख मिळवून देणारा लोकमान्यांच्या नंतर हा महाराष्ट्रातला हे एकमेव महानेता होता, हे महाराष्ट्राला कधी विसरता येणार नाही.

                                                                           
                                                                       (समाप्त) 

संदर्भ: लोकराज्य , मार्च २०१२.


  







Thursday, June 28, 2012

यशवंतराव.. (भाग १)

    २०१२-१३ हे यशवंतराव चव्हाणांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने हिमालयाएवढं उत्तुंग कर्तृत्व असणाऱ्या या मराठी माणसाबद्दल...


    यशवंतरावांवर लेख लिहायला सुरुवात केली तेव्हा या लेखाला शीर्षक म्हणून कोणतं नाव शोभेल याची चाचपणी मनातल्या मनात करू लागलो. मग एकापेक्षा एक सरस अशी विशेषणं यशवंतरावांसाठी सुचू लागली. महाराष्ट्राचा महानेता, अस्सल साहित्यरसिक, कृष्णाकाठचा सह्यकडा, युगपुरुष, हिमालयाची ढाल, किर्तीवंत वगैरे, वगैरे. पण कोणत्याच शीर्षकावर एकमत होईना. मग ठरवलं की आधी अख्खा लेख लिहून काढायचा व शेवटी त्यातलं समर्पक विशेषण शीर्षकासाठी निवडायचं. दररोज थोडं-थोडं वाचन जवळपास पंधराएक दिवस करत होतो. या पंधरा दिवसांत हळूहळू यशवंतराव उलगडू लागले आणि मग क़ळत गेलं की यशवंतरावांचं व्यक्तिमत्त्वच एवढं व्यामिश्र व विविधांगी पैलूंच होतं की त्यांना कोणत्याही एका विशेषणानं संबोधणं हा त्यांच्या बहुपेडी व समृद्ध व्यक्तिमत्त्वावर एक प्रकारे अन्यायच ठरला असता. काल एकदाचा लेख लिहून पूर्ण झाला. उरली ती कागदावर थोडीशी जागा नि मनात यशवंतराव...

   आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांचा सार्थ गौरव केला जातो, ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण हे सर्वाथाने लोकोत्तर लोकनेता होते. समतोल राजकारणी, कुशल मुत्सद्दी, व्यवहारचतुर, कुशल प्रशासक, अफाट लोकसंग्राहक, साहित्यिक व साहित्यप्रेमी, उत्तम वक्ता, कलारसिक, तत्वचिंतक, कुटुंबवत्सल अशा विविध पैलूंनी त्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध होतं. यापैकी कोणत्याही एका पैलूवर भरपूर लेखन केलं जाऊ शकतंय. इतिहासात त्यांची ओळख ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि केंद्रात संरक्षण, परराष्ट्र, गृह, अर्थ इ. महत्वाच्या खात्यांसह देशाचं उपपंतप्रधानपद भूषवणार यशवंतराव हे पहिलं मराठी व्यक्तिमत्व होते म्हणून जरी असली तरी महाराष्ट्राला यशवंतरावांचं खरं आकर्षण 'हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री धावला' या पार्श्वभूमीमुळे आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतरावांनी आणला किंवा  आणला नाही असे दोन मतप्रवाह महाराष्ट्रात प्रचलित आहेत. खरंतर यशवंतराव हे सुरुवातीपासून संयुक्त महाराष्ट्रवादी होते पण ते कट्टर नेहरूनिष्ठ असल्याने नंतर त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या भूमिकेपासून फारकत घेतली. यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. पण फक्त एवढ्या एका बाबीमुळे यशवंतरावांचे हिमालयएवढे कर्तृत्व डोळ्यांआड करता येत नाही.

    स्वातंत्र्यानंतर देशाला तसेच महाराष्ट्राला फक्त कायदा व सुव्यवस्था या स्वरूपाच्या प्रशासनाची गरज नसून, विकासाभिमुख प्रशासानाची गरज आहे हे ओळखून यशवंतरावांनी महाराष्ट्रात त्याची यशस्वी अंमलबजावणी करून दाखवली. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक धोरणांचा पाया त्यांनी १९६०च्या दशकात घातला व त्यामध्ये कृषी व औद्योगिक वाढ परस्परांना पूरक व पोषक ठरेल हे सूत्र त्यांनी ठेवले होते. डॉ.धनंजयराव गाडगीळांसारख्या महान अर्थतज्ञाला बरोबर घेऊन सहकारी तत्वावर महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेची वीट रोवली. महाराष्ट्राच्या आर्थिक व औद्योगिक व्यवस्थापनाची घडी नीट बसावी यासाठी आर्थिक व्यवस्थापन जाणणारे कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे हे यशवंतरावांनी जाणले होते. म्हणूनच त्यांनी त्यावेळी स.गो. बर्व्यांसारख्या अर्थतज्ञ व सनदी अधिकार्यांना महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात नुसते समाविष्ट करून घेतले नव्हते तर अशा तज्ञ व्यक्तींना निर्णयाचे पुरेसे स्वातंत्र्य दिले. हा आर्थिक विकास होत असताना तो फक्त पुण्या-मुंबईतच केंद्रीभूत होऊ नये तर महाराष्ट्रात सर्वत्र पसरावा असे धोरण ठेवले. म्हणूनच त्यांनी ठाणे, पनवेल, कोल्हापूर, औरंगाबाद्, नागपूर, नाशिक इत्यादी ठिकाणी कारखानदारी वाढवली. यशवंतरावांनी फक्त सहकारी साखर कारखानेच नव्हेत तर खरेदी-विक्री, दूध संघ, प्रक्रिया संघ, ग्राहकांचे संघ, प्राथमिक सोसायट्या व सहकारी बॅंकांची स्थापना व्हावी यासाठी प्रयत्न केले. या चळवळीत मग विठ्ठलराव विखे-पाटील, डॉ.धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, वसंतदादा पाटील यांसारखे अनेकजण होते. यामुळे सरकारेतर नविन सत्ताकेंद्रे वाढत गेली. त्यातल्या सत्ताकारण व अर्थकारणामुळे लोकशाही प्रक्रिया पसरत जाण्यास मदत झाली. या सर्व प्रक्रियेत यशवंतरावांनी समाजातील सर्व घटकांना- विविध जातीपातीच्या लोकांना सहभागी करून एक सर्वसमावेशक बेरजेचे राजकारण केले.

    यशवंतराव चव्हाण म्हणजे साहित्य, संगीत व कला यांचा संगम होता. केंद्रात असताना रात्री काम संपल्यावर ते फिल्म फेस्टिव्हलला जाऊन विदेशी चित्रपट बघत. इंग्रजी- मराठी वृत्तपत्रांची ग्रंथसमीक्षणे वाचून मुंबई-दिल्लीतून महिन्याला १५-२० पुस्तके खरेदी करत असत. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, गोवर्धन पारीख, गोविंद तळवलकर प्रभृतींशी ग्रंथविषयक चर्चा करीत असत. यशवंतराव प्रचंड साहित्यवेडे होते. अनेकविध क्षेत्रांतील पुस्तके त्यांनी वाचली होती. शरद पवारांनीही आपल्या या राजकीय गुरुच्या पुस्तकप्रेमाच्या आठवणी जागवल्या आहेत. पु.ल. देशपांडेंशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती आणि पु.लं.चे वक्तृत्व ऐकताना यशवंतराव पोट धरून हसल्याच्या आठवणी जेष्ठ पत्रकार हेमंत देसाईंनी सांगितल्या आहेत. पु.लं, गदिमा, पु.भा.भावे, वसंत कानेटकर, वसंत सबनीस, बा.भ. बोरकर, पाडगांवकर, कवी अनिल, रणजीत देसाई, ना.धों. आदी सारस्वतांशी त्यांचे स्नेहानुबंध होते. 'कृष्णाकाठ' हे त्यांचं आत्मचरित्र त्यांच्यातली ही साहित्यरसिकता अधोरेखित करते.

                          
     सामान्य माणूस हा यशवंतरावांच्या राजकारण व समाजकारणाचा केंद्रबिंदू होता. यशवंतराव माणूसवेडे होते. यशवंतरावांचे व्यक्तिमत्व अस्सल ग्रामीण बाजाचे होते पण आचार-विचाराने ते पुरोगामी, सुसंकृत व संवेदनशील असल्यानेच त्यांची नाळ सामान्य माणसासाएवढीच लोककला कलावंत, कुस्तीपटू, शास्त्रीय गायक, पत्रकार, चित्रपट-नाटक कलावंत, साहित्यिक, विचारवंत व बुद्धीवादी वर्ग यांच्याबरोबरही जोडली गेली होती. यशवंतराव साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, कलावंतांसहित सर्वांनाच आपले वाटायचे म्हणूनच ह्या लेखकवर्गाने यशवंतरावांवर भरपूर लेखन केले. कवी राजा मंगसुळीकर व गदिमांनी त्यांच्यावर कविता केल्या होत्या. त्या इथे देतोय.


हिमालयावर येत घाला  
सह्यगिरी हा धाऊन गेला
मराठमोळ्या पराक्रमाने 
दिला दिलासा इतिहासाला
 
या मातीच्या कणाकणातून
तुझ्या स्फूर्तीची फुलतील सुमने
जोवर भाषा असे मराठी
'यशवंताची' घुमतील कवने 

 - राजा मंगसुळीकर

प्रियतम यशवंता

कोटि मुखानी आशिर्वच दे, महाराष्ट्र माता
औक्षवंत व्हा, विजयवंत व्हा, प्रियतम यशवंता

तुमच्या लेखी नगरी नगरी देवराष्ट्र होई
घरांघरातून उभ्या ठाकल्या विठाबाई
'स्वति' वांछितो जनपुरूषोत्तम, उंचावून शतां...

सह्याद्रीच्या शिखरी उठती स्वांयभव नाद
सातपुड्याच्या कड्यात घुमती त्याचे पडसाद
'अजातशत्रु'आज लाभला अम्हा राष्ट्रनेता...

शिवस्मृतीची शाल अर्पिती लोक लोकमान्या
टिळकपणाचा तिलक लाविती तुम्हा नागकन्या
प्रतिपच्चंद्रापरी वाढू द्या अशीच जयगाथा...
                                                        
लोकशाहीचे तुम्ही पेशवे, सेवेचे स्वामी
तुमच्या मागे राहो जनता नित्य पुरोगामी
समर्थ होवो महाराष्ट्र हा, भारत भू-त्राता..

                           - ग.दि. माडगूळकर.

                                                                              क्रमश:


संदर्भ: लोकराज्य मार्च २०१२.

(वरील लेख हा लोकराज्यमधील कोणत्याही लेखाचं पुनर्लेखन नसून लेखकाने 'लोकराज्य' या महाराष्ट्र शासनाच्या मासिकाच्या काही लेखांतील संदर्भ वापरले आहेत.)                                 




Sunday, June 17, 2012

मुक्तायन:'बारसं ब्लॉगचं'

 
           Prathamesh's Blog या नावाने सुरू असलेला माझा ब्लॉग आता 'मुक्तायन' या नव्या नावाने कात टाकतोय. या ब्लॉगपोस्टचं शीर्षक जरी 'बारसं ब्लॉगचं' असलं तरी हे बारसं नाहीये. एखाद्या नवजात शिशूच्या नामकरणासारखं नव्या ब्लॉगच्या नामकरणाला बारसं उल्लेखणं यथार्थ ठरलं असतं. त्यामुळेच दोन वर्षे पूर्ण केल्यानंतर होणार्या बदलाला बारसं कसं म्हणता, असा आक्षेप जर कुणी घेत असेल तर त्यात नक्कीच तथ्य आहे. ब्लॉगचं नवं नामकरण असंही शीर्षक योग्य ठरलं असत पण बारसं म्हणण्यामागे थोडा वेगळा विचार आहे. घरात होणारा बारशाचा सोहळा हा आनंददायी असतो. खचितच ब्लॉगच्या नामकरणाचा क्षणही मग ते दोन वर्षानंतर का असेना, तेवढाच आनंद ब्लॉग ब्लॉगलेखकाच्या आयुष्यात घेऊन येतो. अर्थातच हा बदल फक्त नावापुरता आहे, विषय अथवा लेखनातला नाही.ब्लॉग सुरू करून तशी आता दोन वर्षे झालेली आहेत् सुरुवातीला काहीच माहित नव्हतं- ब्लॉग कसा असतो, काय लिहायचं असतं. नंतर मग इतरांचे ब्लॉग्ज वाचता वाचता ते कळू लागलं. मग हळूहळू एकेक करत ब्लॉग्ज लिहायला घेतले. सुरुवातीचे ब्लॉग्ज काहीसे आत्मकेंद्री होते. अर्थात सुरुवातीला काही प्रमाणात ते तसे असतातच असं मला वाटतंय. कारण प्रारंभी 'स्व'मधून बाहेर पडल्यशिवाय तुम्ही इतरत्र दृष्टीक्षेप टाकू शकत नाही.लेखनाबाबतही तसंच आहे. त्यामूळे सुरुवातीचं लेखन स्व' मध्ये घुटमळलेलं असणं साहजिकच आहे. इतर ब्लॉगमित्रांचे ब्लॉग्ज वाचल्यावर मग लेखनाचे वेगेळे विषयदेखील सुचत गेले. हळूहळू मग वाचनाबरोबर लेखनाच्याही कक्षा रुंदावत गेल्या, लेखनात प्रगल्भता यायला लागली. मागे वळून पाहताना आता हे प्रकर्षाने जाणवतंय. ब्लॉगचं नवं नाव 'मुक्तायन' हे मला सुचलेलं नाही. घरातलं माझ छोटेखानी ग्रंथालय नीट लावत असताना पाच-सहा वर्षांपुर्वीचं 'चतुरा' हे तेव्हाच्या लोकसत्ताचं मासिक सापडलं. सहजंच चाळलं. मुक्तायन या नावासकट त्याचं परिपूर्ण वर्णन (वर उल्लेखलेलं- जगण्याचा अर्थ...) तिथंच सापडलं. त्याबद्दल लोकसत्ताचे अनेक आभार. विषयांच्या अनेक अंगांना स्पर्श करत असतानाच कुठंही मुक्तपणे विहरणार्या ब्लॉगला हे नाव अगदी पक्क वाटतं. विशीतल्या एखाद्या पोरा-पोरीप्रमाणे विचार करता प्रेमात पडावं तसं मी 'मुक्तायन' या नावाच्या प्रेमात पडलो आणि ब्लॉगसाठी मला हे नवं नाव सापडलं. 
   
      मध्य़ंतरीचा दोन-तीन महिन्यांचा कालावधी वैयक्तिक पातळीवर काही संक्रमणाचा होता. त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम ब्लॉगलेखनावर झाला. परिणामी जागृती मालिकेत खंड पडला व वाचकांची लय तुटली. अर्थातच ही अशी अनैच्छिक लेखनविश्रांती सुखावह नव्हतीच. म्हणूनच पुनर्लेखन करताना काही बदलांसह परतणं हे खचितच आनंददायी आहे. जागृती मालिकेतील राहिलेल्या लेखांचं लेखन सुरू आहे. मात्र, त्यांचं प्रकाशन उशिरा पण एकाचवेळी करेन. जागृती यात्रेतील अनुभव शब्दबद्ध करत असताना मध्यंतरी एका महिन्यात किमान पाच ब्लॉग्ज तरी लिहित होतो. ते डेडलाइनअगोदर टारगेट संपवण्यासारखं होतं. मात्र त्याचा परिणाम लेखनाच्या दर्जावर झाला. त्यामुळे जागृतीमालिकेतील सुरुवातीचे काही लेख वगळता इतर लेखांमध्ये 'बेस्ट' देऊ शकलो नाही याची खंत अजूनही मनात आहेच.

      ब्लॉगमध्ये वेगवेगळे विषय हाताळत असताना लेखनाचा दर्जाही उत्तम राखणं हे सुद्धा एक मोठं आव्हान ब्लॉगलेखकासमोर असतं. आतादेखील नेहमीची दैनंदिन कामे व इतर जबाबदार्यांमधून वेळ काढणं अनेकदा इच्छा असूनही जमत नाही त्यात मनात अनेक विषय रेंगाळत असतानाही ते कागदावर उतरवण्याच्या आळसामुळे ब्लॉग प्रकाशित व्हायला दिरंगाई होते. तरीसुद्धा प्रत्येक ब्लॉग प्रकाशित करताना वाचन, चिंतन व लेखनाला दिलेला वेळ कारणीभूत ठरतो आहे, याचा विशेष आनंद होत असतोच यशवंतराव चव्हाणांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्यावर लेख लिहिण्याची सूप्त मनिषा बरेच दिवस मी बाळगून आहे. त्याचप्रमाणे सुरेश भटांच्या कविता, पाऊस व पत्रलेखन ह्या हळव्या विषयांचं 'मुक्तायन' मांडायचं आहे तर दुर्गाबाईंवर राहिलेले ब्लॉग्ज, वर्तमान अवस्थेतून जाणारं मराठी साहित्य व आर्थिक बदलांबरोबर होणारं सामाजिक संक्रमण इत्यादी गोष्टींना पुढील प्रवासात लेखांकित करायचं आहे. एकूनच, 'मुक्तायना'ची भावी वाटचाल नावाप्रमाणेच मुक्त असेल. वाचकमित्रांच्या प्रेमामुळेच Prathamesh's Blog ला इथंपर्यंतचा प्रवास करता आला. इथून पुढचं 'मुक्तायन' गातानाही आपल्या अशाच निर्व्याज प्रेमाची गरज पडणार आहे. आतपर्यंतचं चांगलं-वाईट सर्व लेखन आपण सार्यांनी मोठ्या मनाने स्वीकारलं. इथून पुढेही हे प्रेम असंच राहो ही आपणा सर्वांना नम्र विनंती.