मुक्तायन:'बारसं ब्लॉगचं'
Prathamesh's Blog या नावाने सुरू असलेला माझा ब्लॉग आता 'मुक्तायन' या नव्या नावाने कात टाकतोय. या ब्लॉगपोस्टचं शीर्षक जरी 'बारसं ब्लॉगचं' असलं तरी हे बारसं नाहीये. एखाद्या नवजात शिशूच्या नामकरणासारखं नव्या ब्लॉगच्या नामकरणाला बारसं उल्लेखणं यथार्थ ठरलं असतं. त्यामुळेच दोन वर्षे पूर्ण केल्यानंतर होणार्या बदलाला बारसं कसं म्हणता, असा आक्षेप जर कुणी घेत असेल तर त्यात नक्कीच तथ्य आहे. ब्लॉगचं नवं नामकरण असंही शीर्षक योग्य ठरलं असत पण बारसं म्हणण्यामागे थोडा वेगळा विचार आहे. घरात होणारा बारशाचा सोहळा हा आनंददायी असतो. खचितच ब्लॉगच्या नामकरणाचा क्षणही मग ते दोन वर्षानंतर का असेना, तेवढाच आनंद ब्लॉग व ब्लॉगलेखकाच्या आयुष्यात घेऊन येतो. अर्थातच हा बदल फक्त नावापुरता आहे, विषय अथवा लेखनातला नाही.ब्लॉग सुरू करून तशी आता दोन वर्षे झालेली आहेत् सुरुवातीला काहीच माहित नव्हतं- ब्लॉग कसा असतो, काय लिहायचं असतं. नंतर मग इतरांचे ब्लॉग्ज वाचता वाचता ते कळू लागलं. मग हळूहळू एकेक करत ब्लॉग्ज लिहायला घेतले. सुरुवातीचे ब्लॉग्ज काहीसे आत्मकेंद्री होते. अर्थात सुरुवातीला काही प्रमाणात ते तसे असतातच असं मला वाटतंय. कारण प्रारंभी 'स्व'मधून बाहेर पडल्यशिवाय तुम्ही इतरत्र दृष्टीक्षेप टाकू शकत नाही.लेखनाबाबतही तसंच आहे. त्यामूळे सुरुवातीचं लेखन स्व' मध्ये घुटमळलेलं असणं साहजिकच आहे. इतर ब्लॉगमित्रांचे ब्लॉग्ज वाचल्यावर मग लेखनाचे वेगेळे विषयदेखील सुचत गेले. हळूहळू मग वाचनाबरोबर लेखनाच्याही कक्षा रुंदावत गेल्या, लेखनात प्रगल्भता यायला लागली. मागे वळून पाहताना आता हे प्रकर्षाने जाणवतंय. ब्लॉगचं नवं नाव 'मुक्तायन' हे मला सुचलेलं नाही. घरातलं माझ छोटेखानी ग्रंथालय नीट लावत असताना पाच-सहा वर्षांपुर्वीचं 'चतुरा' हे तेव्हाच्या लोकसत्ताचं मासिक सापडलं. सहजंच चाळलं. मुक्तायन या नावासकट त्याचं परिपूर्ण वर्णन (वर उल्लेखलेलं- जगण्याचा अर्थ...) तिथंच सापडलं. त्याबद्दल लोकसत्ताचे अनेक आभार. विषयांच्या अनेक अंगांना स्पर्श करत असतानाच कुठंही मुक्तपणे विहरणार्या ब्लॉगला हे नाव अगदी पक्क वाटतं. विशीतल्या एखाद्या पोरा-पोरीप्रमाणे न विचार करता प्रेमात पडावं तसं मी 'मुक्तायन' या नावाच्या प्रेमात पडलो आणि ब्लॉगसाठी मला हे नवं नाव सापडलं.
मध्य़ंतरीचा दोन-तीन महिन्यांचा कालावधी
वैयक्तिक पातळीवर काही संक्रमणाचा होता. त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम ब्लॉगलेखनावर
झाला. परिणामी जागृती मालिकेत खंड पडला व वाचकांची लय तुटली. अर्थातच ही अशी अनैच्छिक
लेखनविश्रांती सुखावह नव्हतीच. म्हणूनच पुनर्लेखन करताना काही बदलांसह परतणं हे खचितच
आनंददायी आहे. जागृती मालिकेतील राहिलेल्या लेखांचं लेखन सुरू आहे. मात्र, त्यांचं
प्रकाशन उशिरा पण एकाचवेळी करेन. जागृती यात्रेतील अनुभव शब्दबद्ध करत असताना मध्यंतरी
एका महिन्यात किमान पाच ब्लॉग्ज तरी लिहित होतो. ते डेडलाइनअगोदर टारगेट संपवण्यासारखं
होतं. मात्र त्याचा परिणाम लेखनाच्या दर्जावर झाला. त्यामुळे जागृतीमालिकेतील
सुरुवातीचे काही लेख वगळता इतर लेखांमध्ये 'बेस्ट' देऊ शकलो नाही याची खंत अजूनही मनात
आहेच.
ब्लॉगमध्ये वेगवेगळे विषय हाताळत असताना
लेखनाचा दर्जाही उत्तम राखणं हे सुद्धा एक मोठं आव्हान ब्लॉगलेखकासमोर असतं. आतादेखील
नेहमीची दैनंदिन कामे व इतर जबाबदार्यांमधून वेळ काढणं अनेकदा इच्छा असूनही जमत नाही
त्यात मनात अनेक विषय रेंगाळत असतानाही ते कागदावर उतरवण्याच्या आळसामुळे ब्लॉग प्रकाशित
व्हायला दिरंगाई होते. तरीसुद्धा प्रत्येक ब्लॉग प्रकाशित करताना वाचन, चिंतन व लेखनाला
दिलेला वेळ कारणीभूत ठरतो आहे, याचा विशेष आनंद होत असतोच यशवंतराव चव्हाणांच्या जन्मशताब्दी
वर्षानिमित्त त्यांच्यावर लेख लिहिण्याची सूप्त मनिषा बरेच दिवस मी बाळगून आहे. त्याचप्रमाणे
सुरेश भटांच्या कविता, पाऊस व पत्रलेखन ह्या हळव्या विषयांचं 'मुक्तायन' मांडायचं आहे
तर दुर्गाबाईंवर राहिलेले ब्लॉग्ज, वर्तमान अवस्थेतून जाणारं मराठी साहित्य व आर्थिक
बदलांबरोबर होणारं सामाजिक संक्रमण इत्यादी गोष्टींना पुढील प्रवासात लेखांकित करायचं
आहे. एकूनच, 'मुक्तायना'ची भावी वाटचाल नावाप्रमाणेच मुक्त असेल. वाचकमित्रांच्या
प्रेमामुळेच Prathamesh's Blog ला इथंपर्यंतचा प्रवास करता आला. इथून पुढचं 'मुक्तायन'
गातानाही आपल्या अशाच निर्व्याज प्रेमाची गरज पडणार आहे. आतपर्यंतचं चांगलं-वाईट सर्व
लेखन आपण सार्यांनी मोठ्या मनाने स्वीकारलं. इथून पुढेही हे प्रेम असंच राहो ही आपणा
सर्वांना नम्र विनंती.
Comments
Post a Comment