यशवंतराव.. (भाग १)

    २०१२-१३ हे यशवंतराव चव्हाणांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने हिमालयाएवढं उत्तुंग कर्तृत्व असणाऱ्या या मराठी माणसाबद्दल...


    यशवंतरावांवर लेख लिहायला सुरुवात केली तेव्हा या लेखाला शीर्षक म्हणून कोणतं नाव शोभेल याची चाचपणी मनातल्या मनात करू लागलो. मग एकापेक्षा एक सरस अशी विशेषणं यशवंतरावांसाठी सुचू लागली. महाराष्ट्राचा महानेता, अस्सल साहित्यरसिक, कृष्णाकाठचा सह्यकडा, युगपुरुष, हिमालयाची ढाल, किर्तीवंत वगैरे, वगैरे. पण कोणत्याच शीर्षकावर एकमत होईना. मग ठरवलं की आधी अख्खा लेख लिहून काढायचा व शेवटी त्यातलं समर्पक विशेषण शीर्षकासाठी निवडायचं. दररोज थोडं-थोडं वाचन जवळपास पंधराएक दिवस करत होतो. या पंधरा दिवसांत हळूहळू यशवंतराव उलगडू लागले आणि मग क़ळत गेलं की यशवंतरावांचं व्यक्तिमत्त्वच एवढं व्यामिश्र व विविधांगी पैलूंच होतं की त्यांना कोणत्याही एका विशेषणानं संबोधणं हा त्यांच्या बहुपेडी व समृद्ध व्यक्तिमत्त्वावर एक प्रकारे अन्यायच ठरला असता. काल एकदाचा लेख लिहून पूर्ण झाला. उरली ती कागदावर थोडीशी जागा नि मनात यशवंतराव...

   आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांचा सार्थ गौरव केला जातो, ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण हे सर्वाथाने लोकोत्तर लोकनेता होते. समतोल राजकारणी, कुशल मुत्सद्दी, व्यवहारचतुर, कुशल प्रशासक, अफाट लोकसंग्राहक, साहित्यिक व साहित्यप्रेमी, उत्तम वक्ता, कलारसिक, तत्वचिंतक, कुटुंबवत्सल अशा विविध पैलूंनी त्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध होतं. यापैकी कोणत्याही एका पैलूवर भरपूर लेखन केलं जाऊ शकतंय. इतिहासात त्यांची ओळख ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि केंद्रात संरक्षण, परराष्ट्र, गृह, अर्थ इ. महत्वाच्या खात्यांसह देशाचं उपपंतप्रधानपद भूषवणार यशवंतराव हे पहिलं मराठी व्यक्तिमत्व होते म्हणून जरी असली तरी महाराष्ट्राला यशवंतरावांचं खरं आकर्षण 'हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री धावला' या पार्श्वभूमीमुळे आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतरावांनी आणला किंवा  आणला नाही असे दोन मतप्रवाह महाराष्ट्रात प्रचलित आहेत. खरंतर यशवंतराव हे सुरुवातीपासून संयुक्त महाराष्ट्रवादी होते पण ते कट्टर नेहरूनिष्ठ असल्याने नंतर त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या भूमिकेपासून फारकत घेतली. यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. पण फक्त एवढ्या एका बाबीमुळे यशवंतरावांचे हिमालयएवढे कर्तृत्व डोळ्यांआड करता येत नाही.

    स्वातंत्र्यानंतर देशाला तसेच महाराष्ट्राला फक्त कायदा व सुव्यवस्था या स्वरूपाच्या प्रशासनाची गरज नसून, विकासाभिमुख प्रशासानाची गरज आहे हे ओळखून यशवंतरावांनी महाराष्ट्रात त्याची यशस्वी अंमलबजावणी करून दाखवली. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक धोरणांचा पाया त्यांनी १९६०च्या दशकात घातला व त्यामध्ये कृषी व औद्योगिक वाढ परस्परांना पूरक व पोषक ठरेल हे सूत्र त्यांनी ठेवले होते. डॉ.धनंजयराव गाडगीळांसारख्या महान अर्थतज्ञाला बरोबर घेऊन सहकारी तत्वावर महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेची वीट रोवली. महाराष्ट्राच्या आर्थिक व औद्योगिक व्यवस्थापनाची घडी नीट बसावी यासाठी आर्थिक व्यवस्थापन जाणणारे कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे हे यशवंतरावांनी जाणले होते. म्हणूनच त्यांनी त्यावेळी स.गो. बर्व्यांसारख्या अर्थतज्ञ व सनदी अधिकार्यांना महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात नुसते समाविष्ट करून घेतले नव्हते तर अशा तज्ञ व्यक्तींना निर्णयाचे पुरेसे स्वातंत्र्य दिले. हा आर्थिक विकास होत असताना तो फक्त पुण्या-मुंबईतच केंद्रीभूत होऊ नये तर महाराष्ट्रात सर्वत्र पसरावा असे धोरण ठेवले. म्हणूनच त्यांनी ठाणे, पनवेल, कोल्हापूर, औरंगाबाद्, नागपूर, नाशिक इत्यादी ठिकाणी कारखानदारी वाढवली. यशवंतरावांनी फक्त सहकारी साखर कारखानेच नव्हेत तर खरेदी-विक्री, दूध संघ, प्रक्रिया संघ, ग्राहकांचे संघ, प्राथमिक सोसायट्या व सहकारी बॅंकांची स्थापना व्हावी यासाठी प्रयत्न केले. या चळवळीत मग विठ्ठलराव विखे-पाटील, डॉ.धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, वसंतदादा पाटील यांसारखे अनेकजण होते. यामुळे सरकारेतर नविन सत्ताकेंद्रे वाढत गेली. त्यातल्या सत्ताकारण व अर्थकारणामुळे लोकशाही प्रक्रिया पसरत जाण्यास मदत झाली. या सर्व प्रक्रियेत यशवंतरावांनी समाजातील सर्व घटकांना- विविध जातीपातीच्या लोकांना सहभागी करून एक सर्वसमावेशक बेरजेचे राजकारण केले.

    यशवंतराव चव्हाण म्हणजे साहित्य, संगीत व कला यांचा संगम होता. केंद्रात असताना रात्री काम संपल्यावर ते फिल्म फेस्टिव्हलला जाऊन विदेशी चित्रपट बघत. इंग्रजी- मराठी वृत्तपत्रांची ग्रंथसमीक्षणे वाचून मुंबई-दिल्लीतून महिन्याला १५-२० पुस्तके खरेदी करत असत. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, गोवर्धन पारीख, गोविंद तळवलकर प्रभृतींशी ग्रंथविषयक चर्चा करीत असत. यशवंतराव प्रचंड साहित्यवेडे होते. अनेकविध क्षेत्रांतील पुस्तके त्यांनी वाचली होती. शरद पवारांनीही आपल्या या राजकीय गुरुच्या पुस्तकप्रेमाच्या आठवणी जागवल्या आहेत. पु.ल. देशपांडेंशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती आणि पु.लं.चे वक्तृत्व ऐकताना यशवंतराव पोट धरून हसल्याच्या आठवणी जेष्ठ पत्रकार हेमंत देसाईंनी सांगितल्या आहेत. पु.लं, गदिमा, पु.भा.भावे, वसंत कानेटकर, वसंत सबनीस, बा.भ. बोरकर, पाडगांवकर, कवी अनिल, रणजीत देसाई, ना.धों. आदी सारस्वतांशी त्यांचे स्नेहानुबंध होते. 'कृष्णाकाठ' हे त्यांचं आत्मचरित्र त्यांच्यातली ही साहित्यरसिकता अधोरेखित करते.

                          
     सामान्य माणूस हा यशवंतरावांच्या राजकारण व समाजकारणाचा केंद्रबिंदू होता. यशवंतराव माणूसवेडे होते. यशवंतरावांचे व्यक्तिमत्व अस्सल ग्रामीण बाजाचे होते पण आचार-विचाराने ते पुरोगामी, सुसंकृत व संवेदनशील असल्यानेच त्यांची नाळ सामान्य माणसासाएवढीच लोककला कलावंत, कुस्तीपटू, शास्त्रीय गायक, पत्रकार, चित्रपट-नाटक कलावंत, साहित्यिक, विचारवंत व बुद्धीवादी वर्ग यांच्याबरोबरही जोडली गेली होती. यशवंतराव साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, कलावंतांसहित सर्वांनाच आपले वाटायचे म्हणूनच ह्या लेखकवर्गाने यशवंतरावांवर भरपूर लेखन केले. कवी राजा मंगसुळीकर व गदिमांनी त्यांच्यावर कविता केल्या होत्या. त्या इथे देतोय.


हिमालयावर येत घाला  
सह्यगिरी हा धाऊन गेला
मराठमोळ्या पराक्रमाने 
दिला दिलासा इतिहासाला
 
या मातीच्या कणाकणातून
तुझ्या स्फूर्तीची फुलतील सुमने
जोवर भाषा असे मराठी
'यशवंताची' घुमतील कवने 

 - राजा मंगसुळीकर

प्रियतम यशवंता

कोटि मुखानी आशिर्वच दे, महाराष्ट्र माता
औक्षवंत व्हा, विजयवंत व्हा, प्रियतम यशवंता

तुमच्या लेखी नगरी नगरी देवराष्ट्र होई
घरांघरातून उभ्या ठाकल्या विठाबाई
'स्वति' वांछितो जनपुरूषोत्तम, उंचावून शतां...

सह्याद्रीच्या शिखरी उठती स्वांयभव नाद
सातपुड्याच्या कड्यात घुमती त्याचे पडसाद
'अजातशत्रु'आज लाभला अम्हा राष्ट्रनेता...

शिवस्मृतीची शाल अर्पिती लोक लोकमान्या
टिळकपणाचा तिलक लाविती तुम्हा नागकन्या
प्रतिपच्चंद्रापरी वाढू द्या अशीच जयगाथा...
                                                        
लोकशाहीचे तुम्ही पेशवे, सेवेचे स्वामी
तुमच्या मागे राहो जनता नित्य पुरोगामी
समर्थ होवो महाराष्ट्र हा, भारत भू-त्राता..

                           - ग.दि. माडगूळकर.

                                                                              क्रमश:


संदर्भ: लोकराज्य मार्च २०१२.

(वरील लेख हा लोकराज्यमधील कोणत्याही लेखाचं पुनर्लेखन नसून लेखकाने 'लोकराज्य' या महाराष्ट्र शासनाच्या मासिकाच्या काही लेखांतील संदर्भ वापरले आहेत.)                                 
Comments

Popular posts from this blog

जागृती यात्रा भाग २: यात्रेबद्दल थोडसं..

जागृती यात्रा भाग ३: एका सुप्ताची सुरुवात.