बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडीयमच्या इतिहासात रविवार, दि.१० ऑक्टोबर २०१० (१०/१०/१०) हा दिवस सुवर्णाक्षरात कोरला गेला असेल. रविवारी सचिनने कसोटीतल्या १४००० धावा पूर्ण केल्या व भारतीय क्रिकेटच्या शिरपेचात मानाचा अजून एक तुरा रोवला. चौकार मारून सचिनने चौदा हजारावी धाव जमवली आणि अख्खं स्टेडीयम त्याला मानवंदना (Standing Ovation) देण्यासाठी उभं राहिलं, तो क्षण अगदी डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा होता. चक्क रिकी पॉनटिंगने सुद्धा सचिनचं अभिनंदन करावं यातंच सारं आलं. सचिनच्या कसोटीतल्या चौदा हजार धावा असोत किंवा एकदिवसीय – कसोटीतल्या दोन्ही मिळून त्याच्या पंचवीस हजार धावा असोत अथवा त्याचे शतक-अर्धशतकाचे विक्रम असोत; सचिनची क्रिकेटमधली आकडेवारी व विक्रम यांचं नवल आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. सचिन नुसता मैदानावर सामना जरी खेळायला आला तरी तो एक नवीन विक्रम होऊन जातो. सचिनची मैदानावरची फक्त उपस्थिती ही भारतीय संघाला व करोडो भारतीयांना केवढा मोठा दिलासा असतो हे साऱ्यानाच माहिती आहे. सचिनची खिलाडू वृत्ती फक्त क्रिकेटच नव्हे तर क्रीडा जगतातील सर्व खेळाडूंनी आदर्श ठेवावी अशी आहे. सचिनचा फिटनेस, त्याची कठोर मेहनत, दीर्घ चिकाटी, चिवटपणे झुंज देण्याची वृत्ती,अवघड परिस्थितीतूनदेखील मार्ग काढण्याची सकारात्मक वृत्ती ह्या सगळ्याबद्दल बोलावं व लिहावं तेवढं कमीच.. !
‘सचिन रमेश तेंडूलकर’ हे नाव क्रिकेटच्या इतिहासात कायमचं अजरामर होऊन राहणार आहे. आपल्याकडे सचिनचा जेव्हा लेखा-जोखा केला जातो,तेव्हा पोरांना (विशेषत: अपयशी विद्यार्थ्यांना वगैरे) सचिनचं उदाहरण ( की सचिन बारावीत नापास होऊन देखील आज एक यशस्वी क्रिकेटपटू आहे ) द्यायचा मोह कुणालाच आवरत नाही. खरेतर,सचिन बारावीत असताना त्याची भारतीय संघात निवड झाल्यामुळे तो बारावीची परीक्षा देऊ शकला नाही ते आजतागायत.सचिनचे वडील ‘ रमेश तेंडूलकर ’ हे मराठीतले एक उत्तम साहित्यिक होते. सचिनचा भाऊ अजितने तर आपलं अख्खं आयुष्यच सचिनसाठी दिलंय. अजूनही प्रत्येक सामन्याच्या वेळी अजित सचिनच्या बरोबर असतो.
एक माणूस म्हणून सचिन निर्विवादपणे श्रेष्ठ आहे. मुळातच सचिनचा स्वभाव शांत आहे. सचिनचा नम्रपणा तर त्याच्याबद्दलचा आदर अजूनच द्विगुणीत करून टाकतो. इतकं प्रचंड यश मिळवूनसुद्धा सचिनचे पाय जमिनीवरच आहेत. यश मिळाल्यावर अनेकांना स्वर्ग दोन बोटे कसा उरतो हे बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटीजनी आपल्या बोलण्या- वागण्यातून दाखवून दिलेले आहेच. अगदी काही वर्षापर्यंत अमिताभदेखील मला सचिनएवढाच नम्र वाटायचा. पण त्याची मागची काही विधाने, ट्विटरवरील स्टेटमेंट्स व ब्लॉग पाहिल्यावर त्याच्या नम्रतेबद्दल थोडाफार फोलपणा जाणवला. अमिताभ काही वादांशी तरी संबंधित आहे, मात्र सचिन कधी कुठल्याच वादात अडकला नाही. ‘नारायण नागबळी ’सारख्या बाबीचा मिडीयाने जरी ‘इश्यू ’बनवला असला, तरी सचिनने अमिताभसारखे अशा ‘इश्यू’जना कधीच प्रत्युत्तर (व महत्व) सुद्धा दिले नाही. ‘ तुम्हाला काय बोलायचे ते बोला,मी आपला असाच शांत ’ अशीच याची नेहमीची भूमिका राहिली आहे. कोणतीही गोष्ट, मग ती आपल्या बाजूने असो किंवा विरोधात असो, त्याचा बाऊ करायचा नाही हा सचिनचा स्वभावंच असावा. मध्यंतरी एक बातमी वाचल्याचे आठवते,एक माजी क्रिकेट खेळाडू (रणजीपटू),सचिनबरोबर कधीतर क्रिकेट खेळला होता व कोणत्यातरी आजारावरती तो मुंबईत वैद्यकीय उपचार घेत होता. त्यादरम्यान त्याला आर्थिक मदत सचिनने केली होती. आजवर सचिनने अनेक अनाथालयांना,खेळाडूंना व गरजूंना आर्थिक मदत केली आहे. पण त्याची खबरबात कुणालाच लागू दिलेली नाही.
‘ संयम’ हा सचिनकडे असलेला अजून एक गुण. मैदानावर सचिन बाद नसावा व चुकून पंचानी त्याला बाद ठरवावे असे कितीतरी वेळा झालेले आहे. पण तेव्हादेखील सचिन शांतपणे हातातील ग्लोव्ज काढून पव्हेलीयनकडे परतताना दिसेल. इथे कुठेही आपण 'विक्रमादित्य'वगैरे असल्याचा भाव चेहऱ्यावर नाही की पंचांना वा इतर खेळाडूंना उद्दामपणे दिलेली ‘खुन्नस’ नाही. मिडियासमोर कधीही बोलायचे असेल तेव्हा तो विचारपूर्वक बोलतो. सचिनच्या एखाद्या विधानाचा विपर्यास क्वचितच झाला आहे. इतर खेळाडूंसारखा तो आज कुठे ह्या ‘रियालिटी शो’मध्ये गाणं म्हणा तर उद्या कुठे तिकडे ‘भांगडा’ करताना कधीच दिसत नाही. टोकाच्या क्षणीसुद्धा शांत व संयमी वृत्ती ठेवणं आणि तोल ढळू न देणं हे सचिनचं वैशिष्य आहे. त्याच्या ह्या एवढ्या शांततेबद्दल उद्या त्याला ‘शांततेचा नोबेल’ पुरस्कार जरी जाहीर झाला तरी आश्चर्य वाटायला नको. कधी-कधी वाटतं,क्रीडा विभागात आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘नोबेल’सारखा एखादा सर्वोच्च पुरस्कार नाहीये ते बरंय! कारण जरी असता, तरी गेल्या पंधरा वर्षात तो कमीत कमी पाच-सहा वेळा तरी सचिनला देण्याची नामुष्की त्या समितीवर आली असती.
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आईनस्टाइनने ‘गांधीं’बद्दल “ गांधी नावाचा रक्ता- मांसाचा माणूस या पृथ्वीतलावर होऊन गेला ह्यावर भविष्यातल्या पिढ्यांचा विश्वास बसणार नाही ” असं साऱ्या भारताला सुखावणारं एक वाक्य लिहून ठेवलंय. उद्या सचिनच्या बाबतीतसुद्धा असं लिहून ठेवलं जाईल,असं म्हणणं वावगं ठरणार नाही .