ब्लॉगचे कॉपीराईट्स

myfreecopyright.com registered & protected

Saturday, September 4, 2010

मिसकॉल..

माझे आवडते व जेष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांची जाहीर माफी मागून...

पाडगावकरांची  एक सुंदर व प्रसिद्ध कविता 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे असतं.. ' ह्या कवितेचं चुकत-माखत विडंबन करण्याचा  प्रयत्न केलेला आहे. तसा विडंबनाचा हा माझा पहिलाच प्रयत्न...काही चूक-भूल असेल तर कृपया माफ करावं. 

 मिसकॉल..


मिसकॉल हा, मिसकॉल हा, मिसकॉल असतो,
तुम्हाला आणि आम्हाला तो कधीतरी येतच असतो!

काय म्हणता? मिसकॉल हा एक त्रास असतो?
कॉल करण्यासाठी दिलेला तो सिग्नल असतो?
आणि परत कॉल केल्यावर आपला खर्च वाढणार असतो?

असला तर असू दे,
वाढला तर वाढू दे!

तरीसुद्धा
तरीसुद्धा,

मिसकॉल हा, मिसकॉल हा, मिसकॉल असतो,
तुम्हाला आणि आम्हाला तो कधीतरी येतच असतो!


नेहमी जमा खर्चाचाच हिशोब मांडणाऱ्या मंडळीना
मिसकॉलचे महत्व काय कळणार?


कॅन्टीन मध्ये मैत्रिणीला बोलवण्यासाठी
मिसकॉल देता येतो,

पऱ्याक्टीकलला लेट होणाराय
हे सांगण्यासाठी मिसकॉल देता येतो;

लेक्चर सुरु झालंय, पटकन ये
हे बजावण्यासाठी मिसकॉल देता येतो;

एवढंच काय, या पुढचं लेक्चर बंक करू हे सांगण्यासाठी
अगदी चालू लेक्चर मध्ये सुद्धा मिसकॉल देता येतो;


आणि म्हणूनच,
मिसकॉल हा, मिसकॉल हा, मिसकॉल असतो,
तुम्हाला आणि आम्हाला तो कधीतरी येतच असतो!



मोबाईल हातात असला कि कधीही मिसकॉल देता येतो;
येस-नो चा साधा सिग्नल शब्दांशिवाय व्यक्त होतो!

कॉल कितीही केलेत तरी त्यात मिसकॉल एवढी गम्मत नाही;
मित्राचा सोडा हो, मैत्रिणीच्या मिसकॉलची हुरहूर कशातच नाही!

मिसकॉलचे हे सारे फायदे तुम्हालाही कळले आहेत,
आणि मलासुद्धा म्हणजे कळले आहेत!

कारण,
मिसकॉल हा, मिसकॉल हा, मिसकॉल असतो,
तुम्हाला आणि आम्हाला तो कधीतरी येतच असतो!


मिसकॉल म्हणजे कंजुषपणा असतो,
असं म्हणणारी माणसं भेटतात,

मिसकॉल म्हणजे दिलदारपणा नसतो
असं मानणारी माणसं भेटतात ! 

असाच एकजण मला म्हणाला,

 "मी कधी कुणाला मिसकॉल देत नाही
आणि मला जर मिसकॉल आला,
तर त्याला शिव्यांनी धुतल्याशिवाय राहत नाही!

मिसकॉल घ्यायला अन द्यायला आम्ही लहान आहोत का?
पोरांचा खेळ हा, आता आमच्या वयाला शोभेल का? "

त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हटलं;

मिसकॉल हा, मिसकॉल हा, मिसकॉल असतो,
तुमच्या आणि आमच्या लेखी त्याचा अर्थ वेगळा असतो!!


तिच्यासोबत तुम्ही कधी
मिसकॉल-मिसकॉल खेळला असाल!
लायब्ररीतून बाहेर ये हे सांगण्यासाठी मिसकॉल दिला असाल!

बागेमध्ये मी आलोय,
हे सांगण्यासाठी मिसकॉल  असतो,
तू अजून कुठे आहेस?
हे विचारण्यासाठी मिसकॉल असतो!

भेटीनंतर संध्याकाळी सुखरूप घरी पोचलीस का?
हे विचारण्यासाठी मिसकॉल असतो,

हो पोचले, काळजी करू नकोस
हे सांगण्यासाठी मिसकॉल असतो!

गुड- नाईट म्हणण्यासाठी मिसकॉल असतो!,
स्वीट ड्रीम्स म्हणण्यासाठी मिसकॉल असतो!,



उद्या नेहमी च्याच बस ने ये
हे सांगण्यासाठी मिसकॉल असतो,

तर पाठीमागून तिसऱ्या सीटवरच बस
हे सुचवण्यासाठी मिसकॉल असतो!



मिसकॉल ही साथ असते ; 
मिसकॉल ही सोबत असते.
 
फोन बदलला तरी मिसकॉल देता येतो,
आणि सिमकार्ड जरी बदललं तरीसुद्धा मिसकॉल देता येतो!
 
आणि म्हणूनच,

मिसकॉल हा, मिसकॉल हा, मिसकॉल असतो,
तुम्हाला आणि आम्हाला तो कधीतरी येतच असतो!!



                                                  -प्रथमेश आडविलकर.