काही दिवसांपूर्वी एका मैत्रिणीचा मेल आला होता. त्यात साईबाबांचे चित्र होते व खाली लिहिले होते की हा मेसेज अमुक-अमुक जणांना पाठवा, तेवढया जणांना पाठवला की येत्या दहा दिवसांत तुमची इच्छा पूर्ण होईल आणि जर मेसेज नाही पाठवला तर येत्या २४ तासांत तुम्हाला एखादी वाईट घटना कळेल. मेल वरून कळंत होतं की तो बराच फिरून आलाय (म्हणजे बरेच बकरे बळी पडलेत ).
काय गंमत आहे ना ? आपण एकविसाव्या शतकात, विज्ञान युगात वगैरे जगतो, इंटरनेटच्या युगात राहतो वगैरे, वगैरे पण युवा व उच्चशिक्षित असलो म्हणून काय झालं, लादून घेतलेल्या अनेक कल्पना मात्र अगदी जशाच्या तशा जगतो. अंधश्रद्धा ही त्यापैकीच एक, फक्त स्वरूप बदलले. पूर्वी काही लोकं ठराविक मायन्याची पत्रं पाठवायचीत की हे पत्र अजून एकवीस जणांना पाठवा. मग पाठवले तर..., नाही पाठवले तर... तोच प्रकार. फक्त तो पत्रप्रकार आता इंटरनेट वर आला एवढंच. चक्क इंटरनेट वर सुद्धा हे अशा प्रकारचे ई-अंधश्रद्धेचे नमुने बघितले की मग मात्र आपल्या मागासलेपणाची खात्रीच होते. (मोबाईलवर सुद्धा हा प्रकार सर्रास सुरु आहे.) असे मेल्स आपल्याला भावनिक बळी पाडतात व आपल्याच नकळत आपण चुकीचे संदर्भ सगळीकडे फॉंरवर्ड करतोय (आणि पर्यायाने पुढल्या पिढीलादेखील देतोय ) असे मला वाटते. हा वारसा असल्याप्रमाणे पुढे ही साखळी चालू राहते (आपल्या भावनेचा गैर-वापर करीत). मनाला नेहमी एकाच प्रश्न पडतो की ही मंडळी याबाबतीत कधीच विचार करत नसतील का? यांना कधी स्वत:ला प्रश्न विचारावेसे वाटत असेल की नाही ? की प्रश्न पडूनसुद्धा, विचार करून देखील हे घाबरत असावेत ?
सहजच विचार केला की अनेकजण हे मेल का फॉंरवर्ड करत असावेत? त्याची मी माझ्या परीने काही उत्तरे शोधून काढलीत. ती अशी :
१)हा मेल फॉंरवर्ड केल्याने आपलं काहीच जात नाही, उलट काही मिळालं तर फायदाच.
२)बऱ्याच जणांना मोकळा वेळ असतो, ते विचार करतात की काही काम नाही तर चला हे मेल फॉंरवर्ड करू.
३)मेल मधील भावनिक आवाहनाला फसतात व न पाठवून उगीच कशाला रिस्क घ्यायची म्हणून फॉंरवर्ड करतात.
४)अनेकांना हा मेल जवळच्या नातेवाईक अथवा मित्रांकडून आलेला असतो, म्हणून ते डोळे झाकून त्यावरती विश्वास ठेवतात आणि मग तो मेल इतरांना फॉंरवर्ड करतात.
- हे असे मेल्स फॉंरवर्ड करून आपण चुकीचे समाज जन-माणसांमध्ये रुजवत आहोत व दुर्दैवाने यासाठी इंटरनेटसारख्या नवीन आणि वेगवान तंत्रज्ञानाचा आधार घेतला जातोय. डोळस आणि विज्ञानवादी बनायच्या ऐवजी आपण अजूनच अंधश्रद्ध्येच्या आहारी जात आहोत. देवतेचे चित्र असल्याने हे मेल्स डिलीट करणे नकोसं वाटतं. ठीक आहे, डिलीट करायचे राहू द्या कमीत कमी फॉंरवर्ड करायचे तरी आपण थांबवू शकतो. एवढे जरी झाले तरी गैर-समज पसरणं थोड्या प्रमाणात तरी कमी होईल असं मला वाटतं.