ब्लॉगचे कॉपीराईट्स

myfreecopyright.com registered & protected

Sunday, July 1, 2012

यशवंतरावांची दिल्ली कारकीर्द (भाग २).

    यशवंतरावांनी केंद्रात संरक्षण, परराष्ट्र, गृह, अर्थ इ. महत्वाच्या खात्यांसह देशाचं उपपंतप्रधानपद आदी विविध पदे भूषवलीत हे खरं व ही सारी पदे भूषवणारे यशवंतराव हे पहिलं मराठी व्यक्तिमत्व हेही तेवढंच खरं. पण नाण्याची ही एक बाजू झाली. यशवंतरावांच्या दिल्ली कारकिर्दीला दुसरी एक बाजू होती, जी खूप कमीजणांना माहित असेल. यशवंतराव दिल्लीसाठी नेहमीच होते. पण दिल्ली त्यांच्यासाठी नव्हती. यशवंतरावांनी दिल्लीला आपलं सर्वस्व दिलं पण दिल्लीनं त्यांना कधीच आपलंसं करून घेतलं नाही. अर्थात खुद्द यशवंतरावही याला बरेचसे जबाबदार होते.

      १९६२ साली चीनच्या आक्रमणानंतर केंद्रात नेहरूंना कणखर संरक्षणमंत्र्याची गरज भासू लागली. म्हणून यशवंतरावांना नेहरूंनी केंद्रात बोलवून घेतले. यशवंतरावांची दिल्ली कारकीर्द आरंभीच्या १० वर्षांत त्यांची लोकप्रियता व देशातील मान्यता वाढविणारी ठरली. या काळात महाराष्ट्राच्या राजकारणावरही त्यांची पकड घट्ट राहिली. राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर कोणीही असले तरी सत्तेची खरी सुत्रे त्यांच्याच हातात राहिली. १९६३ मध्ये कन्नमवारांच्या मृत्यूनंतर बाळासाहेब देसाईंसारख्या अनेक मातब्बर मराठा नेत्यांना बाजूला सारून त्यांनी विदर्भातील बंजारा जातीच्या वसंतराव नाईकांना दिले. आपल्या मागेही महाराष्ट्र आपल्या ताब्यात राहील अशी व्यवस्था त्यांना करायची होती आणि आपल्या सर्वंकष अधिकाराला आव्हान देउ शकेल असा माणूस त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसवायचा नव्हता. व त्यांनी ते केले. वसंतराव नाईक हे कुशल प्रशासक व मनमिळावू होते मात्र स्वत:चे सामर्थ्य वाढविणे किंवा त्यासाठी कोणाशी स्पर्धा करणे हा त्यांचा स्वभाव नव्हता. स्वाभाविकपणे, यशवंतराव दिल्लीत बसूनही वसंतरावांमार्फत महाराष्ट्र आपल्या हाती राखू शकले.

     नेहरुंच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या राजकारणातही बदल होत गेले. इंदिरा गांधींना नमविण्याच्या जुन्या काँग्रेस श्रेष्ठींच्या प्रयत्नातून सिंडीकेट काँग्रेस नावाची इंदिराविरोधी आघाडी उभी राहिली. त्या आघाडीने संजीव रेड्डींना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली. तिला आरंभी इंदिरा गांधींनी पाठींबा दिला व यशवंतरावही रेड्डीसमर्थक बनले. पुढे सिंडीकेटला शह द्यायला इंदिरा गांधींनी व्ही.व्ही.गिरी यांची उमेदवारी पुढे रेटून "विवेकाचा कौल देईल" तसे मतदान करण्याचे खुले आवाहनच पक्षाला केले. यशवंतरावांची कोंडी व्हायला खरी सुरुवात इथूनच झाली. पक्षनिष्ठा म्हणत ज्यांच्यासोबत राहिलो ती माणसे मनाने, विचाराने, प्रकृतीने किंवा राजकीय भूमिकांखातरही आपली नाहीत आणि ज्या इंदिरा गांधींविरुद्ध आपण त्यांच्यात अडकलो त्या दीर्घकाळ राजकारणाचे नेतृत्व करणार आहेत हे त्यांना जाणवायला लागले. रेड्डी पडले, गिरी विजयी झाले. सिंडीकेट खचली आणि इंदिरा गांधी समर्थ बनल्या. त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले, संस्थानिकांचे तनखे थांबविले. यशवंतरावांनी या पुरोगामी पावलांचे स्वागत करत गांधींची बाजू नव्याने उचलून धरली. ७१ ची निवडणूक आणि नंतरचा बांगला विजय यांनी इंदिरा गांधींचे रुपांतर एका विजयी देवतेत केले. हा विजयोन्माद १९७४ पर्यंत टिकला. त्यानंतर जे.पींच्या "संपूर्ण क्रांती"ने  प्रथम गुजरात मग बिहार व पुढे सारा देश ढवळून काढायला सुरुवात केली. ५ जून १९७५ या दिवशी अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवून त्यांना सहा वर्षे निवडणूक लढवता येणार नाही असा निकाल दिला. आणि इथे खरी ठिणगी पेटली...
          
    यावर मात करायची तर घटना बाजूला सारणे हा एकमेव उपाय इंदिरा गांधींसमोर होता. २५ जूनला इंदिराबाईंनी देशात अंतर्गत आणीबाणी लागू करून नागरिकांचे मुलभूत अधिकार गोठवले आणि जे.पींसह मोरारजी देसाई, जगजीवनराम, चंद्रशेखर, धारिया हे लोकशाहीचे सारे विरोधक तुरुंगात डांबले. स्वातंत्र्य, समता, न्याय, लोकशाही आणि नीतिधर्म ही सगळी मुल्ये एका बाजूला आणि हुकुमशाही, सत्ता, नागरी अधिकारांचे दमन व इंदिरा गांधींची एकाधिकारशाही दुसऱ्या बाजूला होती. देशाने व सर्व भारतीय जनतेने आपली बाजू निश्चित केली होती. आता यशवंतरावांना यातील एक बाजू निवडायची होती. हा क्षण यशवंतरावांच्या परीक्षेचा होता.यशवंतराव मूल्यनिष्ठतेचा आग्रह धरणारे नेते असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे डोळे लागले होते.

                 ... यशवंतरावांनी इंदिरा गांधींची बाजू घेतली.

     आणि इथे यशवंतरावांचा मूल्यांशी असलेला संबंध संपला. यानंतर सत्तेला चिकटून राहणारा व फक्त पोपटपंची किंवा हांजी हांजी करणारा नेता अशी प्रतिमा त्यांना कायमची चिकटली. यात त्यांनी खूप काही गमावले. नंतरच्या काळात ते सत्तेत राहिले, मोठी पदे त्यांच्या वाट्याला आली, ते देशाचे उपपंतप्रधानही झाले...पण ते पूर्वीचे यशवंतराव राहिले नव्हते. अनुयायांच्या मनात व जनतेच्या दृष्टिकोनात त्यांची प्रतिमा लहान व दयनीय होऊन ढासळली होती.

     यशवंतरावांना त्यांनी मोजलेल्या या किमतीचे मोल कळत होते पण, ज्या पक्षात हयात घालविली त्यासोबत ते शेवटपर्यंत निष्ठावंत राहिले. तडजोडवादी, पडखाऊ, लाचार असली सगळी विशेषणे त्यांनी या काळात अंगावर घेतली. हा माणूस आपल्याला सोडून जाणार नाही याची खात्री पटल्यानंतर इंदिरा गांधी आणि दिल्लीतल्या इतर पुढाऱ्यानीही त्यांना गृहीत धरायला सुरुवात केली. आपले निर्णय त्यांना सांगायचे व त्यांची त्या निर्णयांना संमती असणारच असे समजायचे असाच प्रकार पुढे चालू राहिला.या काळात महाराष्ट्रातील राजकारणही त्यांच्या हातून सुटत गेले व ते तसे सुटत राहील अशाच कारवाया दिल्लीतून चालू ठेवल्या गेल्या. नाईकांनंतर म्हणूनच मुख्यमंत्री म्हणून शंकरराव चव्हाणांना दिल्लीच्या वरदह्स्ताने आणण्यात आले. नंतरच्या काळातही शरद पवारांनी जेव्हा राज्यात वसंतदादांविरुद्ध बंड पुकारून त्यांना पायऊतार व्हायला लावले व जनता पक्षाच्या मदतीने मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली तेव्हा "आपण हे यशवंतरावांच्या सल्यानुसारच करत असल्याचे" चित्र काहीएक न बोलता त्यांनी उभे केले. यशवंतरावांची अडचण ही की पवारांच्या त्या काँग्रेस सोडण्याच्या काळात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांच्याकडेच होते. स्वाभाविकच, तुम्ही पक्षाध्यक्षपदावर असताना तुम्हीच वाढवून मोठा केलेला कार्यकर्ता पक्षाबाहेर पडतोच कसा, असा संशयचिन्हांकित प्रश्न त्यांना विचारला गेला.त्यांच्या जवळ त्याचे खरे उत्तर होते; पण् त्यावर 'दिल्ली'चा विश्वास बसणार नव्हता आणि ज्यांनी त्यांना न विचारता पक्षाविरूद्ध बंड केले होते त्यांच्याशी आपले सर्व संबंध तोडून टाकणे हा यशवंतरावांचा स्वभाव नव्हता. परिणामी, महाराष्ट्र हातात नाही आणि दिल्लीत विश्वास नाही अशा अघांतरी अवस्थेत ह्या थोर नेत्याचे राजकारण जाऊन पोहोचले. विचारवंत, पत्रकार आणि तत्त्वनिष्ठ म्हणवणाऱ्यानी आणीबाणीच्या काळातच त्यांना आपल्या विचारातून वजा केले होते. सारेच विरोधात वा संशयाने पाहणारे आणि विश्वासाने जोडलेली माणसे आपली न राहिलेली अशी एकाकी, विचित्र व प्रचंड दयनीय अवस्था त्यांच्या वाट्याला आली होती.

   चरणसिंगांच्या मंत्रिमंडळात ते उपपंतप्रधान होते, पण ते पद इंदिरा गांधींनी एक खेळी म्हणून त्यांना घ्यायला लावले होते. चरणसिंग सरकारवर विश्वास दर्शवण्याची वेळ आली तेव्हा त्याला दिलेला पाठिंबा इंदिरा गांधींनी काढून घेतला. त्यात यशवंतरावांचे उपपंतप्रधानही गेले. १९८० च्या निवडणुकीत  इंदिरा गांधींच्या नेतृत्वातल्या काँग्रेसने स्वबळावर सत्ता हस्तगत केली. पण त्याचबरोबर काँग्रेस व इंदिरा गांधींना यशवंतरावांचा असलेला उरलासुरला उपयोगही संपला. त्यानंतरचा काळ यशवंतरावांनी नुसती वाट पाहण्यात काढला. पंतप्रधानांचे बोलावणे आले तर जायचे, विचारलेला सल्ला द्यायचा आणि परत आपल्या एकांतात गढायचे. याच काळात वेणूताईंच्या निधनाने त्यांना जवळपास मृतवतच केले. अशा अवस्थेतच त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करावे लागले. ज्या माणसाने महाराष्ट्राची सर्वार्थाने सर्व क्षेत्रांतील पायाभरणी केली, महाराष्ट्राच्या भावी वाटचालीची दिशा निश्चित केली, त्या यशवंतरावांजवळ त्यांच्या अखेरच्या काळात कोणीही नव्हते. त्यांच्या अखेरच्या दिवसांत महाराष्ट्रातला एकही नेता त्यांना बघायला अथवा भेटायला गेला नाही. तशाच अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला. या महान माणसाचा असा शेवट ही एक दुर्दैवी शोकांतिका आहे.

     यशवंतरावांच्या अशा शोकांतिकेची मीमांसा कशी करता येईल? त्यांची अतिरिक्त पक्षनिष्ठा त्यांच्या पडझडीला कारण ठरली म्हणणार की त्यांनी आपली म्हणून जवळ केलेल्या माणसांनी त्यांचा केलेला विश्वासघात या साऱ्याला कारणीभूत ठरवणार? प्रत्येकाची या प्रश्नांची उत्तरे वेगवेगळी असतील. इथं मग काहीजण यशवंतरावांनादेखील दोष देतील पण एक गोष्ट इथे मात्र लक्षात ठेवावी लागेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद चारवेळा व केंद्रातील चार महत्वाची मंत्रीपदे भूषविलेल्या आणि अखेर उपपंतप्रधानपदासारख्या मोठ्या पदावर राहिलेल्या या माणसाने दिल्लीत स्वतःचे घर बांधले नाही की पुण्यामुंबईसारख्या एखाद्या शहरात एखादा फ्लॅट घेतला नाही. डझनांनी साखर कारखाने उभारणाऱ्या या नेत्याच्या नावावर एक एकरही जमीन नव्हती. महाराष्ट्राच्या उभारणीची पायाभरणी करणारा आणि आपल्या असामान्य कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्राला त्याची नवी ओळख मिळवून देणारा लोकमान्यांच्या नंतर हा महाराष्ट्रातला हे एकमेव महानेता होता, हे महाराष्ट्राला कधी विसरता येणार नाही.

                                                                           
                                                                       (समाप्त) 

संदर्भ: लोकराज्य , मार्च २०१२.


  







Thursday, June 28, 2012

यशवंतराव.. (भाग १)

    २०१२-१३ हे यशवंतराव चव्हाणांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने हिमालयाएवढं उत्तुंग कर्तृत्व असणाऱ्या या मराठी माणसाबद्दल...


    यशवंतरावांवर लेख लिहायला सुरुवात केली तेव्हा या लेखाला शीर्षक म्हणून कोणतं नाव शोभेल याची चाचपणी मनातल्या मनात करू लागलो. मग एकापेक्षा एक सरस अशी विशेषणं यशवंतरावांसाठी सुचू लागली. महाराष्ट्राचा महानेता, अस्सल साहित्यरसिक, कृष्णाकाठचा सह्यकडा, युगपुरुष, हिमालयाची ढाल, किर्तीवंत वगैरे, वगैरे. पण कोणत्याच शीर्षकावर एकमत होईना. मग ठरवलं की आधी अख्खा लेख लिहून काढायचा व शेवटी त्यातलं समर्पक विशेषण शीर्षकासाठी निवडायचं. दररोज थोडं-थोडं वाचन जवळपास पंधराएक दिवस करत होतो. या पंधरा दिवसांत हळूहळू यशवंतराव उलगडू लागले आणि मग क़ळत गेलं की यशवंतरावांचं व्यक्तिमत्त्वच एवढं व्यामिश्र व विविधांगी पैलूंच होतं की त्यांना कोणत्याही एका विशेषणानं संबोधणं हा त्यांच्या बहुपेडी व समृद्ध व्यक्तिमत्त्वावर एक प्रकारे अन्यायच ठरला असता. काल एकदाचा लेख लिहून पूर्ण झाला. उरली ती कागदावर थोडीशी जागा नि मनात यशवंतराव...

   आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांचा सार्थ गौरव केला जातो, ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण हे सर्वाथाने लोकोत्तर लोकनेता होते. समतोल राजकारणी, कुशल मुत्सद्दी, व्यवहारचतुर, कुशल प्रशासक, अफाट लोकसंग्राहक, साहित्यिक व साहित्यप्रेमी, उत्तम वक्ता, कलारसिक, तत्वचिंतक, कुटुंबवत्सल अशा विविध पैलूंनी त्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध होतं. यापैकी कोणत्याही एका पैलूवर भरपूर लेखन केलं जाऊ शकतंय. इतिहासात त्यांची ओळख ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि केंद्रात संरक्षण, परराष्ट्र, गृह, अर्थ इ. महत्वाच्या खात्यांसह देशाचं उपपंतप्रधानपद भूषवणार यशवंतराव हे पहिलं मराठी व्यक्तिमत्व होते म्हणून जरी असली तरी महाराष्ट्राला यशवंतरावांचं खरं आकर्षण 'हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री धावला' या पार्श्वभूमीमुळे आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतरावांनी आणला किंवा  आणला नाही असे दोन मतप्रवाह महाराष्ट्रात प्रचलित आहेत. खरंतर यशवंतराव हे सुरुवातीपासून संयुक्त महाराष्ट्रवादी होते पण ते कट्टर नेहरूनिष्ठ असल्याने नंतर त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या भूमिकेपासून फारकत घेतली. यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. पण फक्त एवढ्या एका बाबीमुळे यशवंतरावांचे हिमालयएवढे कर्तृत्व डोळ्यांआड करता येत नाही.

    स्वातंत्र्यानंतर देशाला तसेच महाराष्ट्राला फक्त कायदा व सुव्यवस्था या स्वरूपाच्या प्रशासनाची गरज नसून, विकासाभिमुख प्रशासानाची गरज आहे हे ओळखून यशवंतरावांनी महाराष्ट्रात त्याची यशस्वी अंमलबजावणी करून दाखवली. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक धोरणांचा पाया त्यांनी १९६०च्या दशकात घातला व त्यामध्ये कृषी व औद्योगिक वाढ परस्परांना पूरक व पोषक ठरेल हे सूत्र त्यांनी ठेवले होते. डॉ.धनंजयराव गाडगीळांसारख्या महान अर्थतज्ञाला बरोबर घेऊन सहकारी तत्वावर महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेची वीट रोवली. महाराष्ट्राच्या आर्थिक व औद्योगिक व्यवस्थापनाची घडी नीट बसावी यासाठी आर्थिक व्यवस्थापन जाणणारे कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे हे यशवंतरावांनी जाणले होते. म्हणूनच त्यांनी त्यावेळी स.गो. बर्व्यांसारख्या अर्थतज्ञ व सनदी अधिकार्यांना महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात नुसते समाविष्ट करून घेतले नव्हते तर अशा तज्ञ व्यक्तींना निर्णयाचे पुरेसे स्वातंत्र्य दिले. हा आर्थिक विकास होत असताना तो फक्त पुण्या-मुंबईतच केंद्रीभूत होऊ नये तर महाराष्ट्रात सर्वत्र पसरावा असे धोरण ठेवले. म्हणूनच त्यांनी ठाणे, पनवेल, कोल्हापूर, औरंगाबाद्, नागपूर, नाशिक इत्यादी ठिकाणी कारखानदारी वाढवली. यशवंतरावांनी फक्त सहकारी साखर कारखानेच नव्हेत तर खरेदी-विक्री, दूध संघ, प्रक्रिया संघ, ग्राहकांचे संघ, प्राथमिक सोसायट्या व सहकारी बॅंकांची स्थापना व्हावी यासाठी प्रयत्न केले. या चळवळीत मग विठ्ठलराव विखे-पाटील, डॉ.धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, वसंतदादा पाटील यांसारखे अनेकजण होते. यामुळे सरकारेतर नविन सत्ताकेंद्रे वाढत गेली. त्यातल्या सत्ताकारण व अर्थकारणामुळे लोकशाही प्रक्रिया पसरत जाण्यास मदत झाली. या सर्व प्रक्रियेत यशवंतरावांनी समाजातील सर्व घटकांना- विविध जातीपातीच्या लोकांना सहभागी करून एक सर्वसमावेशक बेरजेचे राजकारण केले.

    यशवंतराव चव्हाण म्हणजे साहित्य, संगीत व कला यांचा संगम होता. केंद्रात असताना रात्री काम संपल्यावर ते फिल्म फेस्टिव्हलला जाऊन विदेशी चित्रपट बघत. इंग्रजी- मराठी वृत्तपत्रांची ग्रंथसमीक्षणे वाचून मुंबई-दिल्लीतून महिन्याला १५-२० पुस्तके खरेदी करत असत. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, गोवर्धन पारीख, गोविंद तळवलकर प्रभृतींशी ग्रंथविषयक चर्चा करीत असत. यशवंतराव प्रचंड साहित्यवेडे होते. अनेकविध क्षेत्रांतील पुस्तके त्यांनी वाचली होती. शरद पवारांनीही आपल्या या राजकीय गुरुच्या पुस्तकप्रेमाच्या आठवणी जागवल्या आहेत. पु.ल. देशपांडेंशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती आणि पु.लं.चे वक्तृत्व ऐकताना यशवंतराव पोट धरून हसल्याच्या आठवणी जेष्ठ पत्रकार हेमंत देसाईंनी सांगितल्या आहेत. पु.लं, गदिमा, पु.भा.भावे, वसंत कानेटकर, वसंत सबनीस, बा.भ. बोरकर, पाडगांवकर, कवी अनिल, रणजीत देसाई, ना.धों. आदी सारस्वतांशी त्यांचे स्नेहानुबंध होते. 'कृष्णाकाठ' हे त्यांचं आत्मचरित्र त्यांच्यातली ही साहित्यरसिकता अधोरेखित करते.

                          
     सामान्य माणूस हा यशवंतरावांच्या राजकारण व समाजकारणाचा केंद्रबिंदू होता. यशवंतराव माणूसवेडे होते. यशवंतरावांचे व्यक्तिमत्व अस्सल ग्रामीण बाजाचे होते पण आचार-विचाराने ते पुरोगामी, सुसंकृत व संवेदनशील असल्यानेच त्यांची नाळ सामान्य माणसासाएवढीच लोककला कलावंत, कुस्तीपटू, शास्त्रीय गायक, पत्रकार, चित्रपट-नाटक कलावंत, साहित्यिक, विचारवंत व बुद्धीवादी वर्ग यांच्याबरोबरही जोडली गेली होती. यशवंतराव साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, कलावंतांसहित सर्वांनाच आपले वाटायचे म्हणूनच ह्या लेखकवर्गाने यशवंतरावांवर भरपूर लेखन केले. कवी राजा मंगसुळीकर व गदिमांनी त्यांच्यावर कविता केल्या होत्या. त्या इथे देतोय.


हिमालयावर येत घाला  
सह्यगिरी हा धाऊन गेला
मराठमोळ्या पराक्रमाने 
दिला दिलासा इतिहासाला
 
या मातीच्या कणाकणातून
तुझ्या स्फूर्तीची फुलतील सुमने
जोवर भाषा असे मराठी
'यशवंताची' घुमतील कवने 

 - राजा मंगसुळीकर

प्रियतम यशवंता

कोटि मुखानी आशिर्वच दे, महाराष्ट्र माता
औक्षवंत व्हा, विजयवंत व्हा, प्रियतम यशवंता

तुमच्या लेखी नगरी नगरी देवराष्ट्र होई
घरांघरातून उभ्या ठाकल्या विठाबाई
'स्वति' वांछितो जनपुरूषोत्तम, उंचावून शतां...

सह्याद्रीच्या शिखरी उठती स्वांयभव नाद
सातपुड्याच्या कड्यात घुमती त्याचे पडसाद
'अजातशत्रु'आज लाभला अम्हा राष्ट्रनेता...

शिवस्मृतीची शाल अर्पिती लोक लोकमान्या
टिळकपणाचा तिलक लाविती तुम्हा नागकन्या
प्रतिपच्चंद्रापरी वाढू द्या अशीच जयगाथा...
                                                        
लोकशाहीचे तुम्ही पेशवे, सेवेचे स्वामी
तुमच्या मागे राहो जनता नित्य पुरोगामी
समर्थ होवो महाराष्ट्र हा, भारत भू-त्राता..

                           - ग.दि. माडगूळकर.

                                                                              क्रमश:


संदर्भ: लोकराज्य मार्च २०१२.

(वरील लेख हा लोकराज्यमधील कोणत्याही लेखाचं पुनर्लेखन नसून लेखकाने 'लोकराज्य' या महाराष्ट्र शासनाच्या मासिकाच्या काही लेखांतील संदर्भ वापरले आहेत.)                                 




Sunday, June 17, 2012

मुक्तायन:'बारसं ब्लॉगचं'

 
           Prathamesh's Blog या नावाने सुरू असलेला माझा ब्लॉग आता 'मुक्तायन' या नव्या नावाने कात टाकतोय. या ब्लॉगपोस्टचं शीर्षक जरी 'बारसं ब्लॉगचं' असलं तरी हे बारसं नाहीये. एखाद्या नवजात शिशूच्या नामकरणासारखं नव्या ब्लॉगच्या नामकरणाला बारसं उल्लेखणं यथार्थ ठरलं असतं. त्यामुळेच दोन वर्षे पूर्ण केल्यानंतर होणार्या बदलाला बारसं कसं म्हणता, असा आक्षेप जर कुणी घेत असेल तर त्यात नक्कीच तथ्य आहे. ब्लॉगचं नवं नामकरण असंही शीर्षक योग्य ठरलं असत पण बारसं म्हणण्यामागे थोडा वेगळा विचार आहे. घरात होणारा बारशाचा सोहळा हा आनंददायी असतो. खचितच ब्लॉगच्या नामकरणाचा क्षणही मग ते दोन वर्षानंतर का असेना, तेवढाच आनंद ब्लॉग ब्लॉगलेखकाच्या आयुष्यात घेऊन येतो. अर्थातच हा बदल फक्त नावापुरता आहे, विषय अथवा लेखनातला नाही.ब्लॉग सुरू करून तशी आता दोन वर्षे झालेली आहेत् सुरुवातीला काहीच माहित नव्हतं- ब्लॉग कसा असतो, काय लिहायचं असतं. नंतर मग इतरांचे ब्लॉग्ज वाचता वाचता ते कळू लागलं. मग हळूहळू एकेक करत ब्लॉग्ज लिहायला घेतले. सुरुवातीचे ब्लॉग्ज काहीसे आत्मकेंद्री होते. अर्थात सुरुवातीला काही प्रमाणात ते तसे असतातच असं मला वाटतंय. कारण प्रारंभी 'स्व'मधून बाहेर पडल्यशिवाय तुम्ही इतरत्र दृष्टीक्षेप टाकू शकत नाही.लेखनाबाबतही तसंच आहे. त्यामूळे सुरुवातीचं लेखन स्व' मध्ये घुटमळलेलं असणं साहजिकच आहे. इतर ब्लॉगमित्रांचे ब्लॉग्ज वाचल्यावर मग लेखनाचे वेगेळे विषयदेखील सुचत गेले. हळूहळू मग वाचनाबरोबर लेखनाच्याही कक्षा रुंदावत गेल्या, लेखनात प्रगल्भता यायला लागली. मागे वळून पाहताना आता हे प्रकर्षाने जाणवतंय. ब्लॉगचं नवं नाव 'मुक्तायन' हे मला सुचलेलं नाही. घरातलं माझ छोटेखानी ग्रंथालय नीट लावत असताना पाच-सहा वर्षांपुर्वीचं 'चतुरा' हे तेव्हाच्या लोकसत्ताचं मासिक सापडलं. सहजंच चाळलं. मुक्तायन या नावासकट त्याचं परिपूर्ण वर्णन (वर उल्लेखलेलं- जगण्याचा अर्थ...) तिथंच सापडलं. त्याबद्दल लोकसत्ताचे अनेक आभार. विषयांच्या अनेक अंगांना स्पर्श करत असतानाच कुठंही मुक्तपणे विहरणार्या ब्लॉगला हे नाव अगदी पक्क वाटतं. विशीतल्या एखाद्या पोरा-पोरीप्रमाणे विचार करता प्रेमात पडावं तसं मी 'मुक्तायन' या नावाच्या प्रेमात पडलो आणि ब्लॉगसाठी मला हे नवं नाव सापडलं. 
   
      मध्य़ंतरीचा दोन-तीन महिन्यांचा कालावधी वैयक्तिक पातळीवर काही संक्रमणाचा होता. त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम ब्लॉगलेखनावर झाला. परिणामी जागृती मालिकेत खंड पडला व वाचकांची लय तुटली. अर्थातच ही अशी अनैच्छिक लेखनविश्रांती सुखावह नव्हतीच. म्हणूनच पुनर्लेखन करताना काही बदलांसह परतणं हे खचितच आनंददायी आहे. जागृती मालिकेतील राहिलेल्या लेखांचं लेखन सुरू आहे. मात्र, त्यांचं प्रकाशन उशिरा पण एकाचवेळी करेन. जागृती यात्रेतील अनुभव शब्दबद्ध करत असताना मध्यंतरी एका महिन्यात किमान पाच ब्लॉग्ज तरी लिहित होतो. ते डेडलाइनअगोदर टारगेट संपवण्यासारखं होतं. मात्र त्याचा परिणाम लेखनाच्या दर्जावर झाला. त्यामुळे जागृतीमालिकेतील सुरुवातीचे काही लेख वगळता इतर लेखांमध्ये 'बेस्ट' देऊ शकलो नाही याची खंत अजूनही मनात आहेच.

      ब्लॉगमध्ये वेगवेगळे विषय हाताळत असताना लेखनाचा दर्जाही उत्तम राखणं हे सुद्धा एक मोठं आव्हान ब्लॉगलेखकासमोर असतं. आतादेखील नेहमीची दैनंदिन कामे व इतर जबाबदार्यांमधून वेळ काढणं अनेकदा इच्छा असूनही जमत नाही त्यात मनात अनेक विषय रेंगाळत असतानाही ते कागदावर उतरवण्याच्या आळसामुळे ब्लॉग प्रकाशित व्हायला दिरंगाई होते. तरीसुद्धा प्रत्येक ब्लॉग प्रकाशित करताना वाचन, चिंतन व लेखनाला दिलेला वेळ कारणीभूत ठरतो आहे, याचा विशेष आनंद होत असतोच यशवंतराव चव्हाणांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्यावर लेख लिहिण्याची सूप्त मनिषा बरेच दिवस मी बाळगून आहे. त्याचप्रमाणे सुरेश भटांच्या कविता, पाऊस व पत्रलेखन ह्या हळव्या विषयांचं 'मुक्तायन' मांडायचं आहे तर दुर्गाबाईंवर राहिलेले ब्लॉग्ज, वर्तमान अवस्थेतून जाणारं मराठी साहित्य व आर्थिक बदलांबरोबर होणारं सामाजिक संक्रमण इत्यादी गोष्टींना पुढील प्रवासात लेखांकित करायचं आहे. एकूनच, 'मुक्तायना'ची भावी वाटचाल नावाप्रमाणेच मुक्त असेल. वाचकमित्रांच्या प्रेमामुळेच Prathamesh's Blog ला इथंपर्यंतचा प्रवास करता आला. इथून पुढचं 'मुक्तायन' गातानाही आपल्या अशाच निर्व्याज प्रेमाची गरज पडणार आहे. आतपर्यंतचं चांगलं-वाईट सर्व लेखन आपण सार्यांनी मोठ्या मनाने स्वीकारलं. इथून पुढेही हे प्रेम असंच राहो ही आपणा सर्वांना नम्र विनंती.



Tuesday, March 6, 2012

जागृती यात्रा भाग १० : बिहारचं 'निदान'

     ३१ डिसेंबर ट्रेनमध्ये साजरा करणे ह्यात वेगळं काहीही नाही. पण नववर्षारंभाचा डान्स ट्रेनमध्ये करणं हा पूर्णपणे नवा अनुभव आमच्यापैकी प्रत्येकजण अनुभवत होता. नवीन वर्ष असल्याने म्हणा किंवा शेड्युलमध्ये असल्याने म्हणा १ जानेवारीला आम्हाला सुट्टी दिली होती. त्या दिवशी ट्रेनमध्ये मात्र विविध सेशन आयोजित केले होते. ट्रेनने अजून ओरिसा सोडलं नव्हतं. ओरिसाच्या सीमेजवळ  कुठेतरी आम्ही होतो. डायरीमध्ये मी काहीतरी टिपत बसलो होतो. साधारणत: दुपारच्या सुमारास ओरिसाची सीमा संपवून पश्चिम बंगालमध्ये आम्ही प्रवेश केला. डायरी तशीच ठेवून मी खिडकी पकडली. बंगभूमी..! रवींद्रनाथ टागोरांची भूमी, विवेकानंदाची भूमी, सुभाषबाबूंची भूमी, सत्यजित रेंची भूमी, कम्युनिस्टांची भूमी. बंगाल या प्रांताबद्दल मला नेहमीच आकर्षण वाटत आलेले आहे. या भूमीने देशाला अनेक बुद्धिवंत माणके दिलेली आहेत हे तर सर्वश्रुत आणि सर्वमान्य आहेच. पण त्याहीपेक्षा या ठिकाणी साचलेले एक विलक्षण वेगळेपण, एक मंतरलेलेपण या भूमीने देशाला दिलेलं आहे असं मला नेहमीच वाटतं. साहित्य, कला, क्रीडा, चित्रपट, राजकारण अशा अनेक क्षेत्रात ते वेगळेपण व मंतरलेलेपण जगाला दिसलेलं आहे. किती नावं घ्यावीत तेवढी कमी. रवींद्रनाथांच्या कवितांनी प्रभावित होऊन पु.लं. बंगाली शिकायला पन्नाशीत बंगालला गेले. सत्यजित रेंनी चित्रपटाला मोठ्या उंचीवर नेवून ठेवले. बिमल रॉय, मृणाल सेन, रित्विक घटक,श्याम बेनेगल आदींनी त्यांचा वारसा फक्त समर्थपणे नव्हे तर स्वत:च्या सृजनशीलतेने जपला. बिमलदांनी त्यांच्या चित्रपटांतून सामान्यांचं 'असामान्य' जगणं टिपलं.सांगायचा मुद्दा हा की, अशा या मंतरलेल्या बंगभूमीला निदान चरणस्पर्श तरी करता यावा असं मला मनोमन वाटत होतं. दुपारी खरगपूरजवळच्या हिजली नामक स्टेशनवर ट्रेन काही वेळासाठी थांबली. सुरक्षा रक्षकाला थोडीशी विनंती करून मी पंधरा-वीस मिनिटांसाठी खाली उतरलो; म्हटलं मातीला नाही निदान इथल्या सिमेंटला (प्लाटफॉर्मला) तरी स्पर्श करावा. काही वेळाने ट्रेन निघाली तसा परत चढलो. थंडीचे दिवस जरी असले तरी, दुपारी अडीचच्या सुमारासच प्रचंड थंडगार वारा सुटला. खूप थंडी वाजायला लागली. दिवसभर ढगाळ वातावरण होतंच पण अजिबात उन नव्हतं. हिजलीच्या पुढच्याच सिरजाम नामक गावात लोकं दुपारीच शेकोटी पेटवून बसले होते. लहान मुलं, स्त्रिया नखशिखांत गरम कपड्यांनी लपेटून बसली होती. काही वेळानंतर आदरा रेल्वे स्टेशनवर पुन्हा ट्रेन थांबली. सायकल रिक्षातून प्रवाशांना स्टेशनवर वेळेवर पोचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारा चाळीशीतला एक माणूस बघितला व बलराज साहनींच्या सर्वांगसुंदर अभिनयाने नटलेला बिमलदांचा 'दो बिघा जमीन' आठवला.

    रात्री काही सेशन्स, गृहपाठ व नंतर जेवण, गप्पा आणि झोप असं काहीसं गेल्या पाचसहा दिवसांपेक्षा वेगळं शेड्यूल होतं. शिक्षण,टीम अण्णा,राजकारण,भ्रष्टाचार,करिअर,शहरीकरण,पुस्तकं,व्यवस्थापन अशा अनेक विषयांवर यात्रींच्या गप्पा रंगायच्या. रात्रभरात आम्ही बंगाल,झारखंड करीत बिहारमध्ये प्रवेश केला. दुसऱ्या दिवशी सकाळीच पटनामध्ये पोचलो. 'सुधारित' आवृत्तीच्या बिहारबद्दल कुतूहल मनात होतंच. पटना स्टेशनवर उतरलो. स्टेशन छोटं आहे. गेल्या पंधरा वर्षात इथंले दोन रेल्वे मंत्री होऊनही हे स्टेशन पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेले आहे. स्टेशनमधला गलिच्छपणा नाकाला रुमाल धरायला लावणारा होता. पायऱ्यांवरून खाली उतरताना एवढ्या सकाळी जी गर्दी होती ती आपल्याकडे मुंबईतल्या कोणत्याही फास्ट लोकलच्या स्टेशनवर असावी एवढीच होती. स्टेशनबाहेर इथेही बंगालसारखेच सायकल रिक्षावाले उभे होते. पटनातल्या 'निदान' या संस्थेला भेट द्यायला आम्ही जात असताना, हळूहळू बदलणाऱ्या बिहारच्या खुणा दिसत होत्या. रस्ते चांगले बनवले जात आहेत, मोठया इमारतीही उभ्या राहताहेत. एकूणच बिहार 'कात' टाकतंय.

     'निदान' ही संस्था मिश्र गैरलाभाचे (Hybrid Non-Profit) मॉडेल आहे. 'निदान'ची स्थापना १९९६ साली 'निदान'चे संस्थापक-कार्यकारी अध्यक्ष अरविंद सिंग यांनी केली. अंगमेहनत करणाऱ्या  तळागाळातील कामगारांसाठी 'निदान' काम करतंय. शहरातील असंघटीत क्षेत्रातील या श्रमिकांना म्हणजे रस्त्यावरील सफाई करणारे कर्मचारी, भाजीपाला विक्रेते, गवंडी, छोटे सुतार, प्लंबर्स, भंगी इत्यादींना आर्थिकदृष्ट्या सक्षमरीत्या बांधण्याचं व त्यांना त्यांचे कायदेशीर अधिकार मिळवून देण्याचं व्रत 'निदान'ने हाती घेतलंय. 'निदान'मध्ये सकाळी पोचल्यानंतर तिथंल्या टीमने सर्व यात्रींचं स्वागत केलं. औपचारिकतेनंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.तिथंला सेशन म्हणजे अरविंद सिंग यांचं भाषण होतं. भाषणात त्यांनी 'निदान' ची सुरुवात कशी झाली,निदान कसं काम करतेय इथं पासून ते सध्याच्या 'बदलत्या' बिहारमध्ये 'निदान'ही कसं बदलतंय, सरकारबरोबर कसे काम करतंय हे सविस्तरपणे सांगितलं. निदान असंघटीत क्षेत्रात आपल्या अनेक उपक्रमांची एक साखळी बांधलेली आहे. वरती उल्लेख केलेल्या असंघटीत क्षेत्रातल्या या कष्टकऱ्यांसाठी बँक कोणतीही सुविधा द्यायची नाही, तेव्हा त्यांच्या या कमजोरीचा खाजगी सावकार फायदा घ्यायचेत व अकारण कर्जाच्या विळख्यात हे कष्टकरी अडकून जायचेत. त्यांची ही बँकेची गरज ओळखून निदानने कामांची सुरुवात लघुवित्त व बचत गटांपासून केली. निदान एकूण बजेटपैकी ४७% पैसे त्यांच्या उत्पादन व विक्री उपक्रमांतून गोळा करते तर राहिलेले ५३% देणगीदार व सरकारी निधीमधून मिळवते. गेल्यावर्षी मिळालेल्या साधारण साडेचार कोटींच्या निधीपैकी जवळपास पावणेदोन कोटींचा निधी राष्ट्रीय महिला आयोगाकडून मिळाला होता, हे नमूद करायला अरविंद सिंग विसरत नाहीत. निदानमधल्या सेशननंतर केस-स्टडीसाठी यात्रींची विभागणी तीन वेगवेगळ्या गटांमध्ये करण्यात आली. 'निदान'मधील कर्मचाऱ्यांबरोबर मग आम्हाला त्या-त्या ठिकाणी पाठवण्यात आले.

   सेशन आटोपून आम्ही पटनाच्या नालापर भागातल्या झोपडपट्टीत निघालो होतो. वाटेत काही गमतीदार गोष्टी पाहायला मिळाल्या. पुणेरी पाट्यासारख्या इथे काही 'बिहारी पाट्या'ही बघायला मिळाल्या. त्यातील एका पाटीवर गेल्या काही महिन्यांत पेटलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर इथं अधोरेखित करावासा वाटणारा वेगळा संदेश लिहिला होता. बिहार आता सुधारतंय तर देश भ्रष्टाचारामुळे पिछाडीवर येतोय हे सांगावसं वाटणारा हा संदेश त्या पाटीवर "बिहार जागे, देश हागे" असा थोडक्यात मांडला होता. एका ठिकाणी तर चक्क 'घाशीराम कोतवाल' नाटकाची हिंदी आवृत्ती लागली असल्याचा बोर्ड बघितल्यावर आम्हा मराठी यात्रींचा तेंडुलकरांबद्दलचा 'मराठी अभिमान' जागृत झाला. नालापरमधल्या झोपडपट्ट्यांची अवस्था कोणत्याही शहरातील सर्वसाधारण झोपडपट्ट्यांची असते तशीच होती. अनेक कामगारांशी तिथं संवाद साधायला मिळाला. इथंले जवळपास सर्व पुरुष व बायका पटनातील कचरा गोळा करण्याच काम करतात. तो सर्व कचरा एका ठिकाणी एकत्र करून मग त्याची 'ओला कचरा' व 'सुका कचरा' अशी विभागणी करण्यात येते. आपापला सुका कचरा मग जो तो विकून त्याच्यावर थोडेफार पैसे मिळवतो व ओला कचरा 'निदान'च्या निदान स्वच्छधारा प्रायव्हेट लिमिटेड (NSPL) या कंपनीकडे सुपूर्द केला जातो. त्यापासून विविध प्रकारची खते बनवते. ती विकून या सफाई कामगारांचे पैसे चुकते केले जातात. सुधारत्या बिहारमध्ये आता मोठमोठ्या कंपन्याही येवू लागल्या आहेत. त्या कंपन्यांना हवा असणारा स्वच्छता कर्मचारी वर्ग निदानमधूनच पुरवला जातो. कचरा जमा करणाऱ्यांना 'सफाईमित्र' म्हणून संबोधले जाते. एका ठराविक संख्येत असलेल्या सफाईमित्रांवर एक निरीक्षक असतो. सौ. मंजुदेवी ही एक निरीक्षक आम्हाला भेटली. सफाईमित्रांना घरे,पाणी, महिला आरोग्य, मुलांसाठी शाळेसारख्या सोयी निदानकडून पुरवल्या जातात ही माहिती आम्हाला मंजुदेवीकडूनच मिळाली.

      
    'निदान'ने पटनात प्रचंड सामाजिक बदल घडवून आणल्याची चिन्हे दिसतात. आता संपूर्ण बिहार, उत्तरप्रदेश व राजस्थानमध्ये 'निदान' पसरलंय. असंघटीत कामगारांना कायदेशीर अधिकार मिळवून देतानासुद्धा अनेक अडचणी येतात. त्यांना "माणूस" म्हणून गृहीत न धरणारी व्यवस्था व या व्यवस्थेतील प्रत्येक चांगल्या गोष्टीला नाही म्हणणारे भ्रष्ट अधिकारी, तळागाळातल्या या श्रमिकांसाठी कोणत्याही  पॉलिसिज नसणारे सरकार या विरोधात ते लढताहेत. सध्याच्या बदलणाऱ्या बिहारमध्ये ते व त्यांचे उपक्रम यशस्वी ठरताहेत ही खूप चांगली बाब आहे. त्यांच्यासाठी नव्हे तर,बिहारसाठी आणि एकूणच भारतासाठी. एकेकाळी, राज्यातल्या अभद्र गुंडगिरीने देशाच्या नकाशावर नाव कमावलेल्या बिहारमध्ये स्थैर्य व विकास नांदतोय. स्वच्छतेतूनच सौंदर्य निर्माण होत असते. कुणीही न सांगता, अरविंद सिंगांसारखं बिहारच्या "स्वच्छतेचं" व्रत बिहारमधल्या अशा हजारो हातांनी स्वत:कडे घेतलंय. मग त्या "स्वच्छते"तून बिहारचं सौंदर्य अजून फुलेल ह्याचं 'निदान' करायला कुणा ज्योतिषाची गरज नाहीये. 




महिलाआरोग्याबद्दल प्रश्न विचारताना 




नालापरमधल्या सफाईमित्रांचं मनोगत लिहून घेताना 










Sunday, February 26, 2012

जागृती यात्रा भाग ९ : गाथा 'ग्रामविकासा'ची.


      दक्षिणेतून ट्रेनने उत्तरेत शिरकाव केला. भौगोलिक बदलांनुसार साहजिकच वातावरणात गारवाही हळूहळू वाढत चालला होता. पहाटेच आम्ही ओरिसातील जगन्नाथपूर स्टेशनवर उतरलो. धुक्याने दाटलेल्या जगन्नाथपूरातून वाट काढत बसेसपर्यंत पोहोचलो. सर्व यात्रींना घेवून बसेसनी बहरामपूराकडे प्रयाण केले. बहरामपूरातील 'जो मडीएथ' यांच्या 'ग्रामविकास' या संस्थेला आज भेट द्यायची होती. ग्रामविकासमध्ये 'जो'चं भाषण, त्याच्याशी संवाद त्यानंतर दुपारचं जेवण व नंतर केस स्टडी असा एकदम भरगच्च कार्यक्रम होता. ग्रामविकासला पोचल्यानंतर लगेचच कार्यक्रमास सुरुवात झाली. 'जो' हा मूळचा केरळातल्या कांजीरपल्ली या गावचा. मद्रास विद्यापीठात शिकत असताना अभ्यासेतर कार्यक्रमांत आघाडीवर असलेला 'जो' मद्रास विद्यापीठाच्या स्टूडंटस् युनियनचा अध्यक्ष न बनेल तरच नवल. याच काळात 'जो'ने Young Students Movement for Development (YSMD) ची स्थापना केली. ७०चं दशक हे अस्वस्थतेचं दशक होतं. आफ्रिका, द.अमेरिका, व्हिएतनाम आदी ठिकाणी युवक चळवळींनी जोर पकडला होता. भारतातसुद्धा त्याची ठिणगी कुठे न कुठेतरी पडतच होती. काहीतरी करायचं या ध्येयाने पछाडलेल्या 'जो'ने एक वेगळं साहस म्हणून याच काळात एक वर्षभर सायकलवरून तेव्हा भारत, नेपाळ व बांगलादेश हे तीन देश पिंजून काढले होते. माणसातला परकेपणा अनोळखी असेपर्यंत असतो; ओळख झाली की आपुलकी निर्माण होते, प्रेम निर्माण होतं, तिथे मग जात,धर्म वा देश अशा कोणत्याच सीमा आड येत नाहीत हे 'जो'ला या संपूर्ण प्रवासात जाणवलं. आणि म्हणूनच की काय 'जो' १९७१ च्या बांगलादेश मुक्ती संग्रामातील बांगला शरणार्थींच्या रिलीफ कॅंप्समध्ये काम करायला YSMDच्या ४०० युवकांसहित आला होता. नंतरच्या काळात मग 'जो'ने नैसर्गिक आपत्तीमुळे हैराण झालेल्या ओरिसात काम करायला सुरुवात केली आणि त्यातूनच १९७९मध्ये इथे 'ग्रामविकास'चा जन्म झाला. 
 
ओरिसातील आदिवासींमध्ये लग्नानिमित्त भिंतीवर रेखाटलेलं एक चित्र
      ग्रामविकास ही एक सामाजिक संस्था आहे. जो मडीएथ हे ग्रामविकासचे कार्यकारी संचालक आहेत. सध्या ग्रामविकास मध्ये एकूण ५०० कर्मचारी कार्यरत आहेत. ग्रामविकास अनेक क्षेत्रांत काम करतंय- बायोगॅस, ड्रीप इरिगेशन, शौचालय व्यवस्था, पाणी, स्वच्छता, शिक्षण, महिला सशक्तीकरण  इत्यादी. ग्रामविकास ही पूर्णपणे बहिस्थ आर्थिक निधीवर अवलंबून असलेली संस्था आहे. आदिवासी क्षेत्र असल्यामुळे कामांसाठी लागणारा बराचसा निधी ग्रामविकासला भारत सरकारकडून दिला जातो. काही आंतरराष्ट्रीय संस्थांकडूनही निधी मिळतो. ग्रामीण भागातील पाणी व स्वच्छतेशी संबंधित योजना अचूक राबवल्या जाव्यात यासाठी बऱ्याचदा ही कामे शासनाकडून ग्रामविकासला आउटसोर्स केली जातात. ग्रामस्थांचं १००% सहकार्य ही ग्रामविकासच्या आजपर्यंतच्या कामांची पावती राहिलेली आहे. छोटया गावांतूनही २४ X ७ पाणी उपलब्ध करून देणे हे ग्रामविकासचं सर्वात मोठं यश आहे असं मला वाटतंय. 'जो'च्या भाषणानंतर एका मुलगीने त्याला छान प्रश्न विचारला होता की आदिवासींसाठी शिक्षण हा महत्वाचा मुद्दा असताना तुम्ही काम करायला पाणी व स्वच्छता असे वेगळे विषय का निवडले? 'जो'ने उत्तरही तेवढेच सुंदर दिले होते " पूर्वी जेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा पाहिलं तर आदिवासी बायका ६-७ किलोमीटर लांब असलेल्या अंतरावरून पाणी आणायच्या. इथंल्या आदिवासींच्या प्रथेप्रमाणे पुरुष कधीच पाणी आणत नव्हते. मग एका खेपेत जास्त पाणी आणता यावं म्हणून त्या पोरांना शाळेत पाठवण्याऐवजी पाणी आणायला न्यायच्या. पोरांचा सारा दिवस शाळेबाहेर जायचा आणि दिवसातील १४-१५ तास बायका फक्त पाणी आणण्यातच घालावयाच्या. आता हे चित्र बदललंय. २४ तास पाणी उपलब्ध झाल्याने मुला-मुलींची शाळेतील उपस्थिती चांगली आहे.तसेच त्यांच्या आयांनाही आता इतर कामे करण्यासाठी वेळ मिळत आहे."  ग्रामविकासच्या या निर्भेळ यशामुळे अनेकदा गावांनी शासकीय किंवा ग्रामविकासच्या आर्थिक मदतीवर न अवलंबून राहता स्व-वर्गणीतून गावातील कामे केलेली आहेत. ग्रामविकासच्या प्रयत्नाने बचत गटांची चळवळसुद्धा सुरु झालेली आम्हाला दिसली. आदिवासी खेड्यांत अनेक स्त्रियांशी संवाद साधता आला. काही  स्त्रिया आता राजकारणाच्या माध्यमातून विकास कार्यात स्थिरावताहेत. आदिवासींच्या घरी पूर्वी शौचालय काय बाथरूम्ससुद्धा नसायचीत. ग्रामविकासने इथं आल्यावर याबाबतीत  स्त्रियांना, पहिल्यांदा शौचालय व मग बाथरूम्सबद्दल जागरूक केले. पारंपारिक मानसिकतेमुळे सुरुवातीलादेखील स्त्रिया शौचासाठी शौचालयात जायला संकोच करायच्या. पण ग्रामविकासच्या सातत्यपूर्ण जागृतीने शौचालय-बाथरूम्सचं हे प्रस्थ आता ओरिसात इतकं फैलावलंय की मुली होणाऱ्या नवऱ्याच्या घरी जर शौचालय-बाथरूम असेल तरच  लग्नाला तयार होतात.
ग्रामविकासने त्यांच्या कामांची लावलेली ओरिया भाषेतील ही यादी.
     
       'जो' म्हणतो की खेड्यांत काम करताना माझं एक तत्व आहे ते म्हणजे पहिल्यांदा इथंल्या लोकांचा विश्वास जिंका व मग कामाला सुरुवात करा. त्यामुळेच अजूनही नव्या खेडयात  काम करताना 'जो' तिथंल्या सर्व गावकऱ्यांकडे सहकार्य मागतो. अनेकदा काही गावांत एखादं घर जरी ग्रामविकासची योजना स्वीकारत नसेल तरी 'जो'ने ते काम सोडलेलं आहे. ८५% स्त्रोत वापरून जिथे शासकीय यंत्रणांनी फक्त १५ % बायोगॅसचे प्रकल्प उभे केले तिथे ग्रामविकासने उलटे प्रमाण म्हणजे १५ % स्त्रोत वापरून एकूण  ८५%  बायोगॅस उभारले आहेत. ओरिसातील ९४३ गावांत आतापर्यंत ग्रामविकासने एकूण सत्तर हजार शौचालये बांधून दिलेली आहेत. तरीसुद्धा हे काम अजून संपलेले नाही असे 'जो' ला वाटते. म्हणूनच तो खेदाने म्हणतो की 'India has more Cellphones than toilets.'

     ग्रामविकासनंतर केस स्टडीसाठी आम्ही तमन्ना,बटापल्ली, सिंदुरापूर व कांकीया या आदिवासी गावांना भेट दिली. तिथंल्या प्रकल्पांची माहिती द्यायला स्वत: 'जो' व ग्रामविकासचे काही कार्यकर्ते आले होते. गंजम जिल्ह्यातील या खेडयांत संपूर्ण कंद जमातीची आदिवासी लोकसंख्या आहे. डोंगरातील पाण्याचा साठा करून त्याचं प्रत्येक घरापर्यंत विजेशिवाय केलेले वहन थक्क करणारे होते. शाळा, ग्रंथालये, ग्रामपंचायत इत्यादी सार्वजनिक ठिकाणची शौचालये व मुताऱ्यांची स्वच्छता २४ तास पाणी असल्याने सुखावणारी होती. ग्रामस्थांच्या जबाबदाऱ्या व ग्रामविकासचे योगदान यांनी ग्रामीण स्वच्छतेचा चेहराच बदलला होता. तिथंल्या आदिवासी स्त्रियांशी आम्ही स्त्रीआरोग्य व बालआरोग्य संदर्भात चर्चा केली. घरातल्या पुरुषांशी रोजगार, शेती,  शिक्षण इत्यादी विषयांवर चर्वितचर्वण केले. तमन्नासारख्या ३३९ लोकसंख्येच्या गावात मोठे ग्रंथालय आहे हे बघून आनंद झाला. तिथले ग्रंथपाल श्री.भाग्य यांच्याशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली. दिवसाच्या शेवटी ग्रामविकासने बांधलेल्या एका शाळेत जावून तिथंल्या विद्यार्थ्यांबरोबर आम्हाला मिसळता आलं. अनेकांनी मग त्यांच्याबरोबर ओरिया लोकगीते म्हटली, त्यांच्या तालावर ताल धरत नाच केला. 

ग्रामविकासचे कार्यकर्ते यात्रींशी संवाद साधताना
          दिवस संपला तसं वर्षही संपलं. २०११ या वर्षाचा तो अखेरचा दिवस होता. दिवसभर मात्र आज ३१ डिसेंबर आहे हे कुठेच जाणवत नव्हतं. 'जो' ने आम्हाला व आम्ही ग्रामविकासला गुड बाय केला. सूर्यास्त झाला होता. बस परतीच्या प्रवासाला निघाली होती. नव्या वर्षात. मी डायरी उघडली. दत्ता हलसगीकरांच्या कवितेतील ओळी मला आठवल्या.
     
                        आभाळाएवढी ज्यांची उंची 
                        त्यांनी थोडे खाली यावे
                        ज्यांचे जन्म मातीत मळले
                        त्यांना वरती उचलून घ्यावे.  

     
                          





Tuesday, February 21, 2012

जागृती यात्रा भाग ८: 'नांदी' नव्या युगाची..

        ट्रेनमधील आजचा पाचवा दिवस. ट्रेनमधील एकूण वातावरणाला आता आम्ही चांगलेच सरावलो होतो. प्रेझेंटेशन, सेमिनार्स, ग्रुप अ‍ॅक्टीव्हीटिज, ट्रेनमधल्याच एका डब्यात जागृती स्टाफच्या अभिनव कल्पनेतून तयार झालेल्या कापडी बाथरूम्समध्ये होणारी आमची हलती अंघोळ इ.सगळ्या गोष्टींत जाम मजा यायची. सहकारी यात्रींबरोबर चांगली ओळख होऊ लागली होती. त्यांच्याकडूनसुद्धा बरंच काही शिकण्यासारखं होतं.संपूर्ण यात्रेत जेवढयाजणांना भेटता येईल तेवढ्यांना भेटत होतो, जे काही घेता येईल ते ते वेचत चाललो होतो. काही यात्री स्वत:च रोल मॉडेल्स असल्यासारखे होते. त्यांची माहिती समारोपाच्या ब्लॉगमध्ये देईनच. 

     तमिळनाडूतला प्रवास संपल्यानंतर आमची ट्रेन आंध्राकडे निघाली. आंध्रपदेशसुद्धा तमिळनाडूसारखंच. तशीच वनराई, मोकळं रान व चरणारी गुरे. तुलनेतला वेगळेपणा म्हटलं तर इथे असलेल्या शंकूच्या आकाराच्या राहुट्या. खिडकीतून दुरून साजरे दिसणारे अचल डोंगर एखाद्या ध्यानस्थ ऋषीसारखे दिसत होते. इथंली सुंदर वृक्षराजी मनात व्यापून जाते व नकळत हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर ठेवून जाते. भव्य गोदावरी नदी पाहिल्यावर 'ना. धों.'ची  "विस्तीर्ण नदीचा काठ, पसरली दाट फुलांची नक्षी; गर्दीत हरवली वाट, कुणी सैराट बावरा पक्षी" ही कवितेची ओळ आठवल्याशिवाय राहत नाही. आज ट्रेनने चांगलाच वेग पकडला होता. वाटेतली तुनी, गुल्लीपाडू, एलमांचील्ली, अनकापल्ली ही स्टेशनं पटापट मागे टाकत ट्रेन एकदाची विशाखापट्टणममध्ये पोचली.

     विशाखापट्टणममध्ये आम्ही 'नांदी' या एनजीओला भेट देण्यास गेलो. नांदी फाउंडेशन हे गैरलाभाचे (Non-Profit) मॉडेल आहे. नांदी हे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचं (PPP) देशातलं एक उत्तम उदाहरण आहे. नांदीची स्थापना १९९८ मध्ये श्री.मनोजकुमार यांनी केली. भारतातील गरिबीचं समूळ उच्चाटन हे नांदीचं मिशन आहे. सध्या नांदी बालहक्क, शिक्षण, माध्यान्ह आहार व  स्वच्छ पेयजल या विषयांवर मोठया पातळीवर काम करत आहे. विशाखापट्टणममध्ये नांदी'त पोचल्यानंतर सर्वप्रथम आम्ही तिथंल्या  माध्यान्ह आहाराचा प्रकल्प बघितला. संपूर्ण परिसर, तिथलं एकूण काम, अन्नदानाच्या अशा या चांगल्या कार्यात आपला हातभार लागतोय म्हणून झपाटून काम करणारे कर्मचारी व प्रकल्पासाठी लागणाऱ्या मुलभूत सुविधा  जसे की तांदूळ स्वच्छ करण्याचे मशीन, मोठया प्रमाणात भात बनवणारी यांत्रिक सुविधा आदी बघितल्यावर आम्हाला माध्यान्ह आहार प्रकल्पाच्या संचालिका लीना जोसेफ यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. लीना जोसेफ यांच्याबरोबरच्या या लघुसंवादानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमात मग पहिल्यांदा लीना जोसेफ यांनी प्रकल्पाचा थोडक्यात आढावा घेतला. त्यात मग त्यांनी विशाखापट्टणम, हैदराबाद यांसारख्या मोठया शहरांपासून ते अगदी आरकूसारख्या आदिवासी क्षेत्रापर्यंत संपूर्ण राज्यात हे अन्न परिवहन कसे केले जाते हे सांगितले. नांदीसमोर सध्या असलेल्या निधी कमी पडणे, अन्नाचा दर्जा कायम ठेवणे, तसेच मदत म्हणून मिळणा
ऱ्या सरकारी व वैयक्तिक तांदळाचा दर्जा अतिशय खराब असणे इत्यादी अडचणी त्यांनी विस्तृतपणे आमच्यासमोर मांडल्या. तसेच अन्न थंड व्हायच्या अगोदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला हवे म्हणून केल्या जाणाऱ्या उपायांची चर्चा केली. लीना जोसेफ यांनी त्यांच्या छोटयाशा भाषणात भूकेचं एक वेगळं चित्र आमच्यासमोर उभं केलं. शिकण्यासाठी नाही तर पोटाची भूक भागवण्यासाठीच आजसुद्धा अनेक पोरं शाळेत येतात हे वास्तव त्यांनी परखडपणे मांडलं. श्रीमती जोसेफ यांचं भाषण सुरू असतानाच नांदीचे प्रमुख श्री. मनोजकुमार यांचं आगमन झालं. उंच, सडपातळ, डोळ्यांवर असलेला नवीन स्टाईलचा चष्मा आणि गव्हाळ रंगाच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असलेला आत्मविश्वास.

      मनोजकुमारांचं भाषण अप्रतिम झालं. विशेष म्हणजे त्यांच्या भाषणात त्यांनी नांदीबद्दल एक शब्दही काढला नाही. देशप्रेमाने  भारलेल्या या तरुणाचा प्रत्येक शब्द न शब्द कानात साठवून ठेवावासा वाटणारा होता. भाषणाची सुरुवातच मनोजने काश्मीरमधील व्यवस्थेचे वाभाडे काढत केली. काश्मीरमध्ये नव्यानेच सुरु झालेला 'अर्ध
-विधवा' (Half-widows)  ह्या अतिशय विचित्र समस्येबद्दल आम्हाला  त्यांनी सांगितले. काश्मीरमध्ये अनेक तरुण स्त्रियांचे नवरे काही वर्षांपासून गायब झालेले आहेत. सरकारकडून त्यांना अजूनपर्यंत मृत घोषित केले गेलेले नाही. त्यामुळे या अर्ध-विधवांना कोणत्याही प्रकारची मदत सरकाकडून केली जात नाही. तसेच प्रश्न नवऱ्याच्या अस्तित्वाचा असल्याने त्यांना स्वत:च्या कौटुंबिक संपत्तीवर हक्क सांगता येत नाही. या जटील समस्येने हजारो स्त्रियांना हताश, बेघर व असहाय्य बनवलेले असून, त्यांच्या मुलांना निराधार अवस्थेत लोटून दिले आहे. तिथंल्या तरुणांची अवस्था काही याहून वेगळी नाही. सध्या असलेली मोठया प्रमाणातील बेरोजगारी, समोरच दहशतवादाने घातलेले थैमान, सीमेपलीकडून येणारी जिहादची 'अर्थ'पूर्ण हाक व जगभरातल्या तरुणांसारखे माहिती-तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार होवून बदल करावेत असं वाटणारी क्रांतिकारी मानसिकता अशा या विचित्र "आयडेंटिटी क्रायसिस"मध्ये काश्मीरमधलं तरुण मन हेलकावे खात आहे. काश्मीरमधील अर्धविधवा व तरुणांची ही दुख:द समस्यांची कहाणी ऐकल्यानंतर तिथंल्या अदृश्य असुरक्षिततेचा भयंकर चेहरा समोर आला अन क्षणभरासाठी सर्वांचे डोळे पाणावले. 

   नांदी त्यांच्या इतर प्रकल्पांबरोबरच काश्मीरमधल्या या समस्यांवरसुद्धा सध्या काम करत आहे. महिंद्रा उद्योग समूहाच्या मदतीने त्यांनी उभारलेल्या "महिंद्रा प्राईड स्कूल"च्या अनेक शाखा या काश्मिरी युवकांच्या कौशल्यबांधणीचं कार्य भारतातल्या विविध महानगरांतून करत आहेत. तिथे काश्मिरमधल्या या अल्पशिक्षित युवकांना इंग्रजी शिकवण्यापासून ते व्यक्तिमत्व विकासासाठी गरज असलेल्या इतर  अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला जातोय. फक्त काश्मिरच नव्हे, तर देशातल्या इतरही अडचणींचा एक लेखाजोखा या निमित्ताने मनोजकुमारांनी आमच्यासमोर मांडला. आंध्रप्रदेशमधल्या आरकू या आदिवासीबहुल भागात नांदीने घडवलेली क्रांती त्यांनी सर्व यात्रींसमोर विषद केली. आज तिथले अनेक आदिवासी नक्षलवाद नाकारत आहेत. एवढंच नाही तर तिथलं उत्पादन असणाऱ्या कॉफीची निर्यात युरोपमध्ये व्हावी यासाठी पुढे येत आहेत. पुढच्या काही मुद्द्यांत तर त्यांनी ओरिसामधल्या कुपोषणाचे  अविश्वसनीय वास्तव उलगडवले. सरकार दरबारी असलेला लालफितीचा कारभार व स्थानिक व्यवस्थेची अकार्यक्षमता यांमुळे होणाऱ्या दिरंगाईने तिथंल्या कुपोषणात अजून कशी भर पडतेय हे ऐकताना अक्षरश: चीड आली. चटकन ज्येष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांच्या मध्यंतरीच्या कुपोषणावरील अहवालाची आठवण झाली. त्यातलं एक वाक्य काळजाला स्पर्शून गेलं होतं. आजही त्याची आठवण झाली तरी तो चटका जाणवतो. साईनाथांनी लिहिलं होतं " लालफितीच्या या कारभारामुळे ओरिसातील कोठारात धान्य तसंच पडलंय. कुपोषितापर्यंत पोचायच्या अगोदर ते तिथंल्या उंदरांच्या घशात जातंय. कलहंडीत (ओरिसातील एक जिल्हा, जो भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात जास्त कुपोषित जिल्हा मानला जातो) तर कुपोषित अर्भकांपेक्षा तिथले उंदीर जास्त स्थूल आहेत, कारण कोठारातलं धान्य खाऊन ते उंदीर फुगत चाललेत व पोरं मरायला लागलेत.  

     भारत, भारत, भारत! थोडथोडक्या नव्हे तर ढिगाऱ्याने असल्या अनेक समस्या पुढे असलेला भारत कसा आणि कधी महासत्ता बनेल? मनोजच्याच वाक्यांत सांगायचंच तर " भारतातले सर्वात श्रेष्ठ मेंदू (आयआयटीयन्स, कारण आमच्या यात्रेत आयआयटीयन्सचा भरणा खूप होता)  हे सॉफ्टवेअर,शाम्पू व कोकाकोला विकत असतात (कॉलेजमधून चांगल्या कंपनीत प्लेस होतात), त्या 'गरीब' कंपन्यांचा फायदा करण्यासाठी. कुपोषण व त्यासारख्या इतर समस्यांवर मात करण्यासाठी जेव्हा देशातील हे सर्वोत्तम मेंदू पुढे येतील तेव्हा भारताची खऱ्या अर्थाने महासत्तेकडे वाटचाल सुरु झालेली असेल. नव्या युगाची ती खरी 'नांदी' असेल "
 

       नांदीचा कार्यक्रम संपल्यानंतर विशाखापट्टणममध्ये आम्ही नौदलाच्या तळाला भेट दिली. नेव्हीनेसुद्धा आमच्यासाठी त्यांच्या "समुद्रिका" या भव्य सभागृहात कार्यक्रम आयोजित केला होता. तिथे आम्हाला युद्धनौका व पाणबुड्यांची बांधणी बघता आली. संध्याकाळच्या चहापानाने तिथंल्या सेशनचा समारोप झाला. पण तिथून पाय निघाल्यापासून मनावर रेंगाळत राहिला तो मनोजकुमार.


Wednesday, February 8, 2012

जागृती यात्रा भाग ७ : खेडयाकडे चला...?

         मदुराईपासून खरं तर चेन्नई अवघ्या काही तासांच्या अंतरावर. पण ट्रेनचा वेग कमी असल्याने दुपारी बारानंतर आम्ही चेन्नईत पोहोचलो. चेन्नईमध्ये परतीच्या मान्सूनची भीती होतीच. ती खरी ठरली. ऐन हिवाळ्यातसुद्धा तिथं हलकासा पाऊस पडत होता. दुपारी साडेबारा-एकच्या सुमारास आम्ही चेन्नईतील 'कांचीपूरम' स्टेशनवर उतरलो. स्टेशनबाहेर कुठेही 'जागृती'च्या बसेस नव्हत्या. त्याचं कारण आजची भेट मुळी धावतीच नव्हती. सर्व यात्रींना स्टेशनपासून जवळच असलेल्या एका ठिकाणी जायच्या सूचना दिल्या गेल्या. स्वयंसेवकांच्या दिशादर्शनानुसार आम्ही सर्व यात्री सुमारे एक किलोमीटरभर चालत एका जुन्या इमारतीत गेलो. ही इमारत म्हणजे कोणतेही कार्यालय नव्हते की कोणतीही कंपनी. आज ज्या संस्थेला-'ट्रॅव्हल अनादर इंडिया' (TAI) ला आम्ही भेट देणार होतो त्यांचा कार्यक्रम इथे आयोजित केला होता. हॉल साधाच होता. बसण्यासाठी फक्त कार्पेटची सोय केली होती, ज्यावर फक्त अर्धेच यात्री मावू शकले. राहिलेल्यांच्या कार्पेट नाहीय, आवाज नीट ऐकू येत नाही इत्यादी कुरबुरी सुरु झाल्यात. मात्र, लगेचच कार्यक्रमाला सुरुवात झाली.
  
     औपचारिकता पार पडल्यावर TAI च्या संस्थापिका गौतमी यांच्या भाषणाला सुरुवात झाली. त्यांच्या संपूर्ण भाषणात TAI बद्दल भरपूर माहिती मिळाली. 'ट्रॅव्हल अनादर इंडिया' हा भारतातील ग्रामीण पर्यटनाच्या क्षेत्रात काम करणारा चेन्नईस्थित एक मोठा सामाजिक उद्योग (Social enterprise) आहे. तसे ग्रामीण पर्यटनाचा व्यवसाय करणारे अनेक उद्योजक आहेत. पण गौतमीचं वेगळेपण हे की ती ज्या पर्यटनस्थळांना भेट देते तिथंल्या ग्रामीण समुदायाला बरोबर घेवून हे सर्व काम करत आहे. सामाजिक उद्योग असल्याने त्याचं व त्यातील पर्यटन उपक्रमांचं व्यवस्थापन आणि नियंत्रण त्या पर्यटनस्थळीच्या ग्रामीण समुदायाकडूनच केले जाते. पर्यटनासाठी भारत म्हटल्यावर डोळ्यासमोर काय येतं? संस्कृती व परंपरा यांचा सुंदर मिलाफ असलेला देश. पण भारत बघायचा म्हटल्यावर खरंच हा भारत बघायला मिळतो का? नाहीतर भारतात फिरताना आजसुद्धा काय बघितलं जातं? भारत फिरताना, भारतीय अथवा परदेशी पर्यटक बघतात तो एक टिपीकल भारत असतो- ठराविक शहरांतील प्राचीन वास्तू, गर्दीने भरलेले बाजार, मेट्रो, आणि बीचेस. पण यापलीकडेदेखील एक वेगळा भारत या ’इंडिया’त नांदतोय. खरंतर तिथेच तो मिळतो, पर्यटकाला हवा असलेला 'खरा भारत'. हो. तो भारत म्हणजे भारतातील लोकं, त्यांचं जगणं, त्यांच्या परंपरा, त्यांची संस्कृती. अजूनही ६९% भारत गावांतून राहतो. पण गावांकडं फिरतं कोण? पहिल्या पोस्टमध्ये मी म्हटल्याप्रमाणे भारतात नांदणाऱ्या या विविधतेतील एकतेचा अनुभव इथेच येऊ शकतो. उदाहरणार्थ,TAI ने तयार केलेल्या निसर्गाशी समतोल राखणाऱ्या झोपड्यांमध्ये राहत असतानाच गावरान रानातला उस, राजस्थानमधील ऊंटावरील सफर, कर्नाटकातल्या खेड्यांतून बैलगाडीतून मनमुराद फिरणे, त्याच वेळी बैलांच्या गळ्यात वाजत असलेल्या घुंगरांच्या पार्श्वसंगीतात म्हटलेली अंताक्षरी या साऱ्याची व इतर अनेक गोष्टींची मजा शहरी-परदेशी पर्यटकांना घेता यावी, शहरांतील आणि परदेशी पर्यटकांना खेडयातील हे जगणं जगता यावं, निराळा आनंद लुटता यावा आणि त्याच बरोबर खेडुतांना अर्थार्जनाची एक संधी मिळावी हा गौतमीचा या उद्योगामागील प्रमुख उद्देश आहे.                             

        इरमा (IRMA)- इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट,
आणंदमधून पदवी घेतल्यानंतर गौतमीने ग्रामीण विकासाशी संबंधित कार्य करणाऱ्या अनेक बहुराष्टीय कंपन्यांमध्ये जवळपास १८ वर्षे काम केले. अठरा वर्षांच्या या अनुभवानंतर मग गौतमीने TAI ची स्थापना दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१० मध्ये केली. सध्या TAI ची पर्यटनवारी देशातील फक्त ८ ठिकाणांवरच चालू आहे. यामध्ये सहा गावं व दोन निमशहरं आहेत. त्यात मग हिमालयातील लदाखसारखं निमशहरी सोयी असलेलं तर अजूनही आपला खेडवळ स्पर्श जपलेलं स्पिती हे गाव आहे. मध्य भारतातील होडका व प्राणपूर ही छोटीशी गावं तर दक्षिणेतील कुर्तोरीम, खानापूर, कुंदापूर आणि म्हैसूर अशा आठ ठिकाणांचा या सहलीत समावेश आहे. गावांची ही संख्या २०१३ पर्यंत गौतमीला ३५ पर्यंत न्यायची आहे. भाषणात गौतमी आमच्याबरोबर खूप मोकळेपणाने बोलली. यात्रींनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तिने अगदी हसतखेळत दिली. एका प्रश्नाचं उत्तर देताना तर तिने आपला पहिल्या वर्षाचं नेट प्रॉफिट २३ लाख आहे असं सहजरित्या सांगितलं. हे सगळं करणाऱ्या खेडुतांना योग्य आर्थिक मोबदला मिळतो हे सांगतानाच गौतमी म्हणाली की TAI ने आर्थिक बदलांबरोबरच अनेक सामाजिक व सांस्कृतिक बदलही घडवून आणले. उदा. अनेक स्त्रियांना रोजगार मिळाले. खेड्यांत राहणाऱ्या सुशिक्षित स्त्रिया यांमुळे घराबाहेर पडू लागल्या. जुन्या हस्तकलांना परत वाव मिळाला. ग्रामपंचायतीला दर वर्षी एक नवं कर उत्पन्नाचं साधन मिळालं. शहरांतील लोकही आता ग्रामीण संस्कृतीशी जवळून परिचित होताहेत. असे अनेक बदल गावात आता हळूहळू होवू लागले आहेत.
 

     गौतमीच्या भाषणानंतर दुपारच्या जेवणासाठी ब्रेक घेण्यात आला. ब्रेकनंतर पुन्हा त्याच ठिकाणी सारेजण जमले. आज दुपारच्या सत्रात, यात्रेतील दुसरं पॅनेल डिस्कशन कृषीशी संलग्न विषयावर होणार होतं. पॅनेल डिस्कशनचा विषय होता -Enabling Rural and Agri Enterprises. कृषीतील तीन अनुभवी तज्ञ यात सहभागी झाले होते. पॉल बॅसिल, गाइज्स् स्पूर व वेंकट सुब्रमनियन ही त्या तिघांची नावं. हे सर्व कृषी आंत्रप्रीनर्स आहेत. व्यापकपणे कृषी व विशेषतः भारतीय कृषीवर तिघेही चांगले बोलले. गाइज्स् स्पूर हा मूळचा इंग्लंडचा. २००९ मध्ये त्याला कृषीवर काम करण्यासाठी अशोका फेलोशिप मिळाली आणि तो भारतात आला. सध्या आपल्या 'कॉटन कॉनवर्सेशन्स' या कंपनीच्या माध्यमातून तो राजस्थान,आंध्रप्रदेश,विदर्भात शेतकऱ्यांसाठी काम करतोय. भारतात वस्त्रोद्योग मोठया प्रमाणावर चालतो. पण गाइज्स् म्हणतो तसा तो विखुरलेला आहे. म्हणजे आपल्याकडे कापसाचा उत्पादक-शेतकरी, त्यानंतर कापूस खरेदीदार, विणकर, नंतर हातमाग-यंत्रमागवाले लघु उद्योजक मग मोठे उद्योजक व सर्वात शेवटी ग्राहक अशी साखळी तयार झाली आहे. उत्पादक ते उपभोक्ता अशी थेट साखळी निर्माण झालेली नाही. गाइज्स् म्हणतो त्यामुळे दलालांचं फावतं. ही साखळी तुटली पाहिजे. तर ह्या संपूर्ण प्रक्रियेत एक स्थिरता यावी, प्रत्येक घटकाला योग्य नफा मिळावा व पूर्ण व्यवस्थेमध्ये एक प्रकारची व्यावसायिक दक्षता निर्माण व्हावी यासाठी 'कॉटन कॉनवर्सेशन्स' काम करतंय. शिक्षणाने अभियंता पण कृषिला वाहून घेतलेला पॉल हा 'व्हिलग्रो' ह्या कंपनीचा संस्थापक. 'व्हिलग्रो'चं ध्येय आहे शेतीतील सृजनशीलता व व्यावसायिकता या माध्यमातून ग्रामीण भारत सुपीक व संपन्न बनवणे व खेडयांचा विकास करणे. पॉलने Villgro चा अर्थ Village + grow असाही सांगितला. व्हिलग्रोचं कार्यक्षेत्र फक्त आंध्रप्रदेश आहे. वेंकट सुब्रमनियन हा शेतकरी असून 'ई-फार्म' या चेन्नईस्थित उद्योगाचा संस्थापकसुद्धा आहे. आयआयटी खरगपूरमधून अभियांत्रिकी झाल्यावर घरच्या सदस्यांचा विरोध स्वीकारून वेंकटने थेट शेती करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे मार्केटमधल्या दलाली पद्धतीला वेंकटचा पाठींबा आहे. त्याचं म्हणणं हे की दलाल पाहिजेच नाहीतर शेतकऱ्याला शेतीतील कामं सोडून दररोज बाजारात जाऊन बसावं लागेल. वेंकटचं काम गाइज्सच्या बरोबर उलटं. म्हणजे उत्पादक व उपभोक्ता यांच्यात थेट संबंध निर्माण करणे. असंघटीत दलालीमुळे शेतमालाचं जवळपास ४०% नुकसान होतं व बरेचसे शेतकरी अल्प अथवा अशिक्षित असल्याने त्यांना या असंघटीत दलालीमध्ये फसवलं जातं. मग हे टाळण्यासाठी शेतकरी, दलाल यांच्यापासून ते मॉल व रस्त्यांवरील भाजीपाला विक्रेते यांच्यामध्ये योग्य समन्वय निर्माण करणे गरजेचे आहे. 'ई-फार्म' समूह तंत्रज्ञानाच्या मदतीने या सगळ्या गोष्टींवर मात करत आहे. 


ट्रॅव्हल अनादर इंडियाच्या पर्यटन सहलीतील काही क्षणचित्रे   
सौजन्य:  ट्रॅव्हल अनादर इंडिया वेब साईट व ब्लॉग






 

Friday, February 3, 2012

जागृती यात्रा भाग ६ : 'अरविंद आय केअर'

     बेंगलोरमधून निघाल्यानंतर ट्रेनने रात्रीच्या प्रवासात कर्नाटक, आंध्रप्रदेश ह्या राज्यांच्या सीमा पार करत पहाटेच कधीतरी तमिळनाडूत प्रवेश केला. दररोज सकाळी उठण्यासाठी आम्हाला ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून सूचना दिली जायची. आज मला त्याच्याही अगोदर जाग आली. प्रातर्विधी व अंघोळ उरकल्यानंतर खिडकीशेजारी येऊन बसलो. बाहेर दिसणारे तमिळ फलक, गावातल्या घरांची ती विशिष्ट रचना, गर्द हिरवळीनं बहरलेली भोवतालची सुपीक शेतं, घराभोवती एका ओळीत उभी असलेली नारळाची झाडे, हिरव्यागार गवताचं पसरलेलं लांबसडक कुरण व त्यात चरणाऱ्या गायी, नुकत्याच पडलेल्या सोनेरी उन्हात चमकणाऱ्या केळीच्या बागा असं डोळ्यांचं पारणं फेडणारं विलोभनीय दृश्य दिसत होतं. खिडकीबाहेरचा दिसणारा हा एवढा सुंदर नजरा व हलक्याश्या थंडीच्या या सौंदर्यात भर टाकायला लगेच आलेलं गरमागरम उप्पीट,ब्रेडजाम व वाफाळलेली कॉफी... अहाहा! खरंच आनंदाचा हा क्षण हातातून कधीच निसटू नये असं मनोमन वाटत होतं. आपल्या आयुष्यतले क्षण पकडून ठेबता आले असते तर? असा एक कवीकल्पनेतील विचार माझ्या मनात पटकन उमटून गेला. नाश्ता करत असतानाच मी कॅमेरा काढला व ते क्षण टिपण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागलो. शब्ददेखील अपुरे पडावेत असं हे निसर्गसौंदर्य थोडंच कॅमेराबद्ध होईल? हेलन केलरने किती मस्त म्हटलंय  "The most beautiful things in the world cannot be seen or even touched, they must be felt with the heart". मनातल्या मनात ही सर्व फिलोसोफी सुरु असतानाच थोडयाच वेळात मदुराई येईल, तयार रहा अशी अनाउन्समेंट झाली. गडबडीत सगळं आटोपलं व मदुराईची वाट पाहत दरवाजाजवळ जाऊन उभा राहिलो. 

    मीनाक्षी मंदिरामुळे मदुराईचं तसं मला पहिल्यापासून आकर्षण होतंच. मीनाक्षी मंदिरासाठी जगभर प्रसिद्ध असलेलं हे मदुराई पांड्य राजवटीच्या काळात राज्याची राजधानीचं शहर होतं. मीनाक्षी मंदिरासारखी द्राविडीयन शैलीतील अनेक प्रसिद्ध मंदिरे मदुराईत आहेत. त्यातली बहुतांश मंदिरे ही पांड्य राजांनी बांधलेली आहेत. 'मदुराई'च्या या नावाबद्दल अनेक आख्यायिका आहेत. त्यातली एक प्रसिद्ध आख्यायिका अशी आहे की पूर्वी कधीतरी जेव्हा या नगराला नावच नव्हतं, तेव्हा नगराला नाव द्यायचं म्हणून नगराच्या मध्यभागी सर्व नगरवासी जमले. आता अशा महत्वपूर्ण सोहळ्यात देवाला कसं विसरायचं, म्हणून सर्वांनी त्याची प्रार्थना करायचं ठरवलं. नगरवासींच्या प्रार्थनेने भगवान शिव प्रसन्न झालेत व त्यांनी आशीर्वाद म्हणून आकाशातून सर्व नगरवासींवर मधाचा वर्षाव केला. या घटनेवरून या नगराला 'मधुरापुरी' हे नाव पडले व पुढे त्याचंच मदुराई झालं. आजदेखील मदुराईला कुडल मानगर (चार बंदरांच शहर), मल्लीगाई मानगर (मोगऱ्याचं शहर) आणि थुंगनगरम (कधीही न झोपणारं शहर) आदी नावांनी ओळखलं जातं. मदुराईत कोणी कधीही, कोणत्याही वेळी जावो, तो उपाशी परतणार नाही कारण दिवस व रात्रीच्या हरेक वेळी इथंल्या कुठल्या ना कुठल्या घरात काहीतरी खायचं बनतच असतं म्हणूनच या शहराला कधीही न झोपणारं शहर असं म्हटलं जातं. मदुराई स्टेशनवर उतरल्यावर तिथल्या अन्नानगरमध्ये असलेल्या अरविंद नेत्र रुग्णालयात (Aravind Eye Care) आम्हाला जायचं होतं. मदुराईतील रस्ते स्वच्छ आहेत पण त्यांच्या बाजूला लावलेल्या राजकीय 'अम्मा'च्या फ्लेक्सनी त्या रस्त्यांना अरुंद करून टाकले आहे. वाटेत, बाजारात, दुकानांत पांढरा सदरा व लुंगी या पेहरावातील 'अन्नां'चा भरपूर वावर दिसत होता. तमिळ लोकांचं चित्रपट वेड तर जगजाहीर आहे. मदुराईत काही घरांच्या भिंतींवर फिल्मस्टार्सची मोठी चित्रे रंगवलेली दिसत होती. चित्रांच्या खाली जाहिरातवजा एखादा शब्दही दिसत नव्हता. कदाचित हौस म्हणून घर मालकांनी ती चित्रे रंगवून घेतली असावीत. शहरातले बरेचसे फलक तमिळ व इंग्रजीमध्ये होते. संपूर्ण मदुराईत हिंदीचा अजिबात गंध नाही. नाही म्हणायला,परतीच्या वेळी आम्हाला रेल्वे स्टेशनवर हिंदी कवी मैथिलीशरण गुप्त यांच्या नावाने असलेली एक कुलुपबंद लायब्ररी दिसली. आपल्यासारखंच इथेही अनेक दुकाने,कॉलेज,व कन्या शाळांची नावे 'मीनाक्षी'पासून सुरु होताना दिसतील. भगवान शिवाच्या इच्छेनुसार इथल्या प्रत्येक दुसऱ्या मुलीचं नाव मीनाक्षी ठेवावं असंही मानलं जातं. 

     काही वेळातच आम्ही अन्नानगरातल्या 'अरविंद आय केअर'मध्ये पोहोचलो. अरविंद आय केअरच्या या तीन मजली नवीन वास्तूचं उद्घाटन माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या हस्ते १९९८ मध्ये झालं होतं. हे हॉस्पिटल १९७७ मध्ये डॉ.जी.वेंकटस्वामी यांनी सुरु केलं. तेव्हा ४ डॉक्टर्स व अकरा खाटांचं हे रुग्णालय आता डोळ्यांच्या सर्व सुविधा देणारं जगातलं सर्वात मोठं हॉस्पिटल बनलंय. डॉ.वेंकटस्वामींना प्रेमाने डॉ.व्ही म्हटले जायचे. डॉ.व्हीं'नी त्यांच्या हयातीत या हॉस्पिटलमध्ये एक लाखांहून जास्त डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या. डॉ.व्हीं'चा जन्म १९१८ साली तमिळनाडूमधील वदमलपूरम या गावी झाला. अमेरिकन कॉलेज मदुराई व स्टेनले मेडिकल कॉलेज मद्रास येथे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी १९४५-४८ पर्यंत भारतीय लष्करात वैद्यकीय सेवेत काम केले. नंतर त्यांनी शासकीय वैद्यकीय मदुराई रुग्णालयात ओप्थामोलॉजी विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहिले ते अगदी निवृत्तीपर्यंत. डॉ.व्हीं'नी तिथे भरपूर संशोधन केले. या पदावर २० वर्षे काम केल्यानंतर १९७७ मध्ये डॉ.व्ही निवृत्त झाले. मानवी जगण्यातून अंधत्वाचा अंधार नष्ट करायचा अशा उदात्त ध्येयाने पछाडलेला हा महामानव निवृत्तीनंतर आरामात वेळ काढत कसा बसेल? वयाच्या ५८ व्या वर्षी या 'तरुणा'ने अरविंद आयकेअरची स्थापना केली. योगी अरविंद यांच्या आध्यात्मिक शिकवणीचा डॉ.व्हीं'वरती प्रचंड पगडा होता. अरविंद आय केअरमध्ये हे प्रत्येक छोटया-मोठया गोष्टीत आढळतं. रुग्णालयाला त्यांनी दिलेलं नाव 'अरविंद' ते यामुळेच. डॉ. व्हीं'च्या अथक संशोधनातून साकार झालेल्या वैद्यकीय साधनांतून मोतीबिंदूवर कमीत कमी खर्चात शस्त्रक्रिया करता येई. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात वैद्यकीय सुविधा पोचवताना सरकारला प्रत्येकापर्यंत पोहोचता येणार नाही म्हणून 'अरविंद'सारखी अनेक केंद्रे असायला हवीत असं त्यांना वाटायचं. 

मदुराईतल्या 'अरविंद आय केअरमध्ये  
     सोशल आंत्रप्रीनरशीप कोळून प्यालेल्या 'अरविंद'चं आर्थिक प्रतिरूप (Financial Model) बरचसं वेगळं आहे. गरीब रुग्णांना मोफत उपचार देतानाच मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय हॉस्पिटलपासून दुरावले जाणार नाहीत याची हॉस्पिटल काळजी घेते. पण त्याच वेळी अगरीब रुग्णांच्या उपचारासाठी गरीब रुग्णांना दिल्या जाणाऱ्या एकूण सेवेच्या दर्जात कोणतीच तडजोड होणार नाही याचीही काळजी घेतली जाते. अगरीब रुग्णांकडून मिळणाऱ्या पैशांतून एकूण गरीब रुग्णांपैकी ४०% रुग्णांचे उपचार केले जातात. तसेच 'अरविंद'मधून तयार होणाऱ्या लेन्सेस, सुया, सर्जिकल ब्लेड्स इत्यादी वैद्यकीय साधनांची सुमारे १२० देशांना निर्यात केली जाते. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून अनेकानेक गरजू रुग्णांचे अल्प किमतीत किंवा मोफत उपचार केले जातात.नेहमीप्रमाणे आम्ही सर्वसामान्यांवर या प्रतिरुपाचा परिणाम (Case study of an Impact) तपासण्यासाठी मदुराईपासून २८ किमी एका गावात 'अरविंद'चं केंद्र होतं, तिथं गेलो. तिथला अनुभवही चांगला होता. 'अरविंद'ची उत्तम सेवा, गरजूंसाठी अल्पदरात उपलब्ध उपचार व सोबत असलेली अध्यात्मिक जोड यांमुळे फक्त मदुराईतच नव्हे तर संपूर्ण तमिळनाडूत 'अरविंद'बद्दल कसा विश्वास निर्माण झाला आहे हे तिथं पाहता आलं. डॉ.व्ही नेहमी त्यांच्या हॉस्पिटलची तुलना मीनाक्षी मंदिराबरोबर करायचे. २००६ मध्ये ते निर्वतल्यानंतर अजूनदेखील 'अरविंद' त्यांनी दाखवलेल्या वाटेवर आहे. डॉ.व्हीं'ची बहिण डॉ.नतचेअर, ज्या तिथे आता डॉक्टर आहेत, त्यांना आम्ही भेटल्यानंतर त्या म्हटल्या " पुढे 'अरविंद' असं असेलच हे खात्रीने कोणीही सांगू शकत नाही. इथे येणाऱ्या नव्या डॉक्टर्सवर ते अवलंबून आहे."
    
       मीन-अक्षी म्हणजे जिच्या डोळ्यांचा आकार माशासारखा आहे ती. मत्स्यासारखे सुंदर नेत्र लाभलेल्या देवी पार्वतीचं हे मीनाक्षी मंदिर २००० वर्षांपूर्वी मदुराईत वसलं होतं. आज त्याच मदुराईत 'अरविंद आय केअर' नेत्रसेवेच्या माध्यमातून गरीब-मध्यम वर्गीय गरजूंचं 'बघणं' सोपं करत आहे. सर्वसाधारणपणे एकेकाळी मंदिरातल्या देवाचा लवकर बरा होवो असा आशीर्वाद घेऊन रुग्ण दवाखान्यात भरती होत असे. पण 'अरविंद'मध्ये घेतलेल्या सुंदर नजरेकडून ते मंदिरात असलेल्या देखण्या नेत्रांकडे असा आज मदुराईतल्या रुग्णांचा प्रवास होतोय.