ब्लॉगचे कॉपीराईट्स

myfreecopyright.com registered & protected

Friday, June 25, 2010

"Goa is Beautiful in Rains...!!"

             विलोभनीय निसर्ग सौंदर्याची देणगी व सोबतीला देखण्या समुद्रकिनाऱ्यांची सुंदर साथ म्हणजे गोवा ! गोव्यावर सौंदर्याची उधळण  करताना परमेश्वरानं कदाचित एकही हातचा स्वतःकडे ठेवलेला नसावा. गोवा  बघताना मन नकळत कुठेतरी हरवून जातं. गोव्यातल्या सौंदर्याला सुरुवात आहे, शेवट मात्र नाही. जिथं जाऊ, तिथं सौंदर्य...! निसर्ग सौंदर्य आपली पाठ इथं सोडतंच नाही असं वाटंत राहतं. गोव्यात आलं की आपलं कुतूहल जागृत होतं. आपल्याच नकळत आपण लहान मुलासारखे ' जिज्ञासू ' बनून जातो. मग कधीतरी संध्याकाळी एकटेच ' मिरामार ' सारख्या एखाद्या समुद्रकिनाऱ्यावर बसलो असता अनेक प्रश्न मनामध्ये रुंजी घालू लागतात; किंवा भूतकाळातले  सोनेरी क्षण समुद्राच्या लाटांसारखे मन:चक्षु समोर गर्दी करतात. इथलं शांत, सुंदर जीवन मनाला भावतं आणि कधी आपण गोव्याच्या प्रेमात पडतो हे आपल्या लक्षातच येत नाही.
          
            गोव्यातलं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे इथला सायंकाळचा ' सूर्यास्त '. इथल्या सायंकाळच्या सूर्यास्तावर पर्यटक किती फिदा असतात हे तर सर्वज्ञात आहे. समुद्रकिनाऱ्यावरचा हा ' सूर्यास्त ' कितीही वेळा बघितला तरी अजिबात कंटाळा  येत नाही. गोव्यातला प्रत्येक दिवशीचा ' सूर्यास्त ' हा नवीन व ताजा वाटत असतो. सूर्य समुद्रात बुडत असताना, त्याच्या त्या हळुवार बुडत जाण्याच्या लयी विसरता येत नाहीत. कदाचित त्यामुळेच सूर्यास्ताच्या वेळेला आपल्याला थोडंस भावनिक व्हायला होत असावं आणि म्हणूनच की काय समुद्राच्या पाण्यावरून पळत जाऊन चटकन त्याला पकडावं अशी कल्पना केल्याशिवाय राहवत नाही. सूर्यास्ताच्या थोडं अगोदर, सुर्याच्या भोवताली त्याच्या तांबुस- सोनेरी रंगाच्या पसरलेल्या छटा व पाण्यात पडलेलं त्याचं ' प्रतिबिंब 'मनाला मोहवून टाकतं .

            गोव्यातलं  खरं सौंदर्य अजून एक गोष्टीत दडलं आहे, ते म्हणजे इथल्या ' पावसात '. गोव्यातला पाऊस किंवा पावसातला गोवा अनुभवणं याच्यासारखी रम्य  बाब अजून काय असू शकेल ? ' सौंदर्य ' व ' पाऊस ' (Beauty and Rains) या दोहोंचा एवढा सुंदर मिलाफ इतर क्वचितच बघायला मिळत असावा. गोव्यातला पावसाळा देखील गोव्या इतकाच सुंदर. गोव्यात उन्हाळ्यातच सगळीकडे हिरवाई पसरलेली असते. इथला संततधार पाऊस त्यात अजून भर टाकतो. पावसात इथल्या समुद्राला उधाण येतं. कदाचित पाऊस त्याच्यासुद्धा सौंदर्यात भर टाकत असावा. पावसाळ्यातलं धुक्यानं  दाटलेलं समुद्राचं रूप, उन्हाळ्याच्या सुर्यास्तापेक्षासुद्धा जास्त मोहवतं. गोव्याच्या पावसात न भिजणं हे अशक्यकोटीतलं काम ! कात टाकलेली हिरवाई व पुन्हा नव्याने खुललेला निसर्ग आपल्याला साद घालत असतो त्यामुळं इथं पावसात न भिजणं हा पर्यायाच तुम्हाला उपलब्ध नसतो.

         सुंदर गोव्यातला हा एवढा सुंदर पावसाळा ! गोव्यातल्या कुणालाही या पावसाबद्दल विचारा, तो तुम्हाला सांगेल, एकदा का पाऊस सुरु झाला की तो थांबायचं नावही काढंत नाही. पण त्या बरोबर तो हे सुद्धा सांगायला विसरणार नाही  "आमचे गोयं पावसान आणीक सोबीत दिसता "..आणि हे खरंच आहे ..." heavy rains but Goa is very beautiful in rains ", मनीषा कोइराला मागे आपल्या एका मुलाखतीत म्हटली होती.
           

Tuesday, June 1, 2010

चावीप्रवास

                                Blog चं  title वाचून धक्का बसला असेल नां? तुम्हाला कदाचित असं सुद्धा वाटलं असेल की ही कोणती उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त एस.टी. महा-मंडळाने सुरु केलेली एखादी नविन प्रवास योजना आहे की काय ? आणि प्रवासात 'चावी'चा काय संबंध ? मग 'चावी' घेउन प्रवास करायचा की काय ? असे एक ना अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील.पण असं काहीही नाहीये. 'चावीप्रवास' हा खरं तर मी माझ्या पुरत्या तयार केलेल्या  dictionary मधला एक शब्द आहे. गेल्या आठवड्यात  माझ्या रुमची चावी हरवली व ती मी कशी शोधली,शोधताना माझी झालेली अवस्था, हे सारं म्हणजे माझा ' चावीप्रवास '.

                       ही घटना आहे माझ्या सध्याच्या  गोव्यातील National Institute of  Oceanography (NIO) च्या stay मधली. शुक्रवारी संध्याकाळी  Lab. मधून थकून NIO कॉलनीकडे परत येत होतो, मात्र उद्या आणि परवा वीक-एण्ड या कल्पनेने जरा बरं वाटत होतं. रात्री मग मित्र  मंडळी बरोबर निवांत गप्पा मारत जेवत असताना ठरलं की दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी जवळच्या बीच वर जायचं. आमच्यापासून  दिडेक किलोमीटर वर "Vanguinium Valley"  नावाचा एक खूप सुंदर बीच आहे. ह्या बीचचं वैशिष्ट्य म्हणजे हा बीच एवढा स्वच्छ ,सुंदर असून देखील  इथे खूप कमी पर्यटक असतात (कदाचित त्यामुळेच तो एवढा स्वच्छ असावा....???). दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून फ्रेश झालो . आम्हाला समुद्रात डुंबायला  जायचं होतं म्हणून अंघोळ काही केली नाही. साधारण आठ वाजता आम्ही चार-पाच जण बीचवर जाण्यासाठी निघालो, अर्ध्या-पाऊण  तासात तिथं पोचलो.सुरुवातीला विसेक मिनिटं बीच न्याहाळला. मग त्यानंतर बराच वेळ समुद्रात डुंबत राहिलो. त्यानंतर तिथल्या मोठ्या दगडांवर  बसून फोटो काढले. जवळपास  अडीच-तीन तास एन्जॉय केल्यानंतर आम्ही जायला निघालो. परत येत असताना वाटेमध्ये आम्हाला एक बाग दिसली.मग त्या बागेत आम्ही '3 Idiots' च्या विविध पोझिशन्स मध्ये फोटोज काढले. मग वाटेत अनेक ठिकाणी फोटोसेशन करता-करता कॉलनीत कधी आलो ते कळलेच  नाही. आम्ही येइपर्यंत एवढा एन्जॉय केला की कॉलनीत येइतोवर पुरते Exhaust झालो होतो.कॉलनीत मग रूमवर आल्यावर बघतोय तर चावी कुठाय... ? Shorts चे दोन्ही खिसे तपासले तरी चावी सापडेना. मनानं कौल दिला की चावी हरवली आहे ; '...again go back to Vanguinium...!'

                       पुन्हा एकदा बीचवर जायचं जीवावर आलं होतं.पण जावंच लागणार होतं. कारण तसा दुसरा काही पर्याय सुद्धा उपलब्ध नव्हता. सूर्य आता डोक्यावर आला होता. खूप ऊन लागत होतं. इथली हवा दमट असल्यामुळे अगदी  पन्नास मीटर जरी चाललं तरी घामानं अख्खा टी-शर्ट भिजत होता. नुसता भिजत नव्हता तर चांगला भिजुन अंगाला चिकटत होता.

                      मनाचा हिय्या केला व तसाच परत फिरलो....चावी शोधायला ! थोडसं  Calculation केलं व चावी हरवण्याच्या Probable जागा कुठल्या असतील याचा अंदाज बांधला. तशा त्या तीन जागा होत्या,पहिली म्हणजे बीचकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेला एक तिरका कडा,   दुसरी- ' बीचजवळची बाग ', आणि तीसरी- बीचवरील मोठे दगड. या तिन्ही ठिकाणी आम्ही फोटो काढण्यासाठी थांबलो  होतो. चावी या तीन पैकीच कुठल्या तरी एक ठिकाणी असण्याची दाट शक्यता आहे, असं 'बुदधी' सांगत होती पण 'मना'ला मात्र  ते पटंत नव्हतं. त्यामुळे पूर्ण रस्ताभर ते प्रत्येक खड्डा, खाच-खळगा बघायला भाग पाडत होतं. कुठेतरी  वाचलेलं एक वाक्य आठवलं, "When there is a conflict between your head and heart, you listens to your heart..!". माझं सुद्धा अगदी तसंच झालं होतं!
                      
                         ज्या-ज्या ठिकाणी आम्ही फोटो काढले होते, त्या - त्या ठिकाणी पुर्वीच्याच पोझिशनमध्ये बसून मी चावी नेमकी कुठल्या दिशेला व कोणत्या बाजूला पडू शकते याचा पुन्हा एकदा अंदाज बांधला. पहिल्या  ठिकाणीं चावी मिळाली नाही.मग तसाच चालत पुढे बागे जवळ गेलो. बागेत कुठं तरी चावी पडली असेल असं मला राहून-राहून वाटंत होतं. पण तिथं सुद्धा चावी मिळाली नाही. हताश होउन मी बीचकडे निघालो. तिथं जाऊन बघतो तर काय...? समुद्रात ' High -tides' सुरु झाल्या होत्या आणि बीचवरचं पाणी बरंचंस वाढलं होतं.मोठ-मोठ्या लाटा बीच वरील दगडांना येउन जोराने धड़कत होत्या अणि पाणी उंच उडत होते. क्षणभर हे नयनरम्य दृश्यच बघंत इथं बसाव असं वाटंत होतं पण...?

                    नंतर मग मी बीच वरील मला शक्य असलेला प्रत्येक दगड चेक केला, पण चावी काही मिळाली नाही, बहुतेक ती समुद्रात विलीन झाली अशी मी माझी समजुत घातली, आणि  तसाच घरी परत यायला निघालो. बागेपर्यंत आलो तेवढ्यात बाग स्वच्छ करणारी एक बाई एक अरुंद रस्त्यातून जात असताना दिसली.मला थोड़ी शंका आली.ती जवळ-जवळ नजरेआड होणार एवढ्यात मी तिला हाक मारली. ती थांबली. मी धावत-धावत तिच्यापाशी गेलो व तिला चावी बद्दल विचारले.ती  खिशातून एक चावी काढत म्हणाली  " मघाशी बाग साफ करताना ही चावी सापडली. तुमची आहे का? ". ती चावी  माझीच होती. माझा आनंद गगनात मावेना. त्या बाईचे आभार कोणत्या शब्दात मानावेत हेच कळंत नव्हंतं.भारावलेल्या मनानं मी तिला "Thank you" म्हटलं व घरी  आलो.

                  चावी  मिळाल्याचा आनंद तर होताच पण मला मनोमन हसू येत होतं ते माझ्या या चावीप्रवासाचं ! त्यातल्या माझ्या head आणि heart यांच्या भांडणाचं ! परत आल्यानंतर पणजीत जाऊन होटेल मध्ये मच्छीवर ताव मारत 'चावी'चा आनंद द्विगुणित केला.