ब्लॉगचे कॉपीराईट्स

myfreecopyright.com registered & protected

Friday, June 25, 2010

"Goa is Beautiful in Rains...!!"

             विलोभनीय निसर्ग सौंदर्याची देणगी व सोबतीला देखण्या समुद्रकिनाऱ्यांची सुंदर साथ म्हणजे गोवा ! गोव्यावर सौंदर्याची उधळण  करताना परमेश्वरानं कदाचित एकही हातचा स्वतःकडे ठेवलेला नसावा. गोवा  बघताना मन नकळत कुठेतरी हरवून जातं. गोव्यातल्या सौंदर्याला सुरुवात आहे, शेवट मात्र नाही. जिथं जाऊ, तिथं सौंदर्य...! निसर्ग सौंदर्य आपली पाठ इथं सोडतंच नाही असं वाटंत राहतं. गोव्यात आलं की आपलं कुतूहल जागृत होतं. आपल्याच नकळत आपण लहान मुलासारखे ' जिज्ञासू ' बनून जातो. मग कधीतरी संध्याकाळी एकटेच ' मिरामार ' सारख्या एखाद्या समुद्रकिनाऱ्यावर बसलो असता अनेक प्रश्न मनामध्ये रुंजी घालू लागतात; किंवा भूतकाळातले  सोनेरी क्षण समुद्राच्या लाटांसारखे मन:चक्षु समोर गर्दी करतात. इथलं शांत, सुंदर जीवन मनाला भावतं आणि कधी आपण गोव्याच्या प्रेमात पडतो हे आपल्या लक्षातच येत नाही.
          
            गोव्यातलं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे इथला सायंकाळचा ' सूर्यास्त '. इथल्या सायंकाळच्या सूर्यास्तावर पर्यटक किती फिदा असतात हे तर सर्वज्ञात आहे. समुद्रकिनाऱ्यावरचा हा ' सूर्यास्त ' कितीही वेळा बघितला तरी अजिबात कंटाळा  येत नाही. गोव्यातला प्रत्येक दिवशीचा ' सूर्यास्त ' हा नवीन व ताजा वाटत असतो. सूर्य समुद्रात बुडत असताना, त्याच्या त्या हळुवार बुडत जाण्याच्या लयी विसरता येत नाहीत. कदाचित त्यामुळेच सूर्यास्ताच्या वेळेला आपल्याला थोडंस भावनिक व्हायला होत असावं आणि म्हणूनच की काय समुद्राच्या पाण्यावरून पळत जाऊन चटकन त्याला पकडावं अशी कल्पना केल्याशिवाय राहवत नाही. सूर्यास्ताच्या थोडं अगोदर, सुर्याच्या भोवताली त्याच्या तांबुस- सोनेरी रंगाच्या पसरलेल्या छटा व पाण्यात पडलेलं त्याचं ' प्रतिबिंब 'मनाला मोहवून टाकतं .

            गोव्यातलं  खरं सौंदर्य अजून एक गोष्टीत दडलं आहे, ते म्हणजे इथल्या ' पावसात '. गोव्यातला पाऊस किंवा पावसातला गोवा अनुभवणं याच्यासारखी रम्य  बाब अजून काय असू शकेल ? ' सौंदर्य ' व ' पाऊस ' (Beauty and Rains) या दोहोंचा एवढा सुंदर मिलाफ इतर क्वचितच बघायला मिळत असावा. गोव्यातला पावसाळा देखील गोव्या इतकाच सुंदर. गोव्यात उन्हाळ्यातच सगळीकडे हिरवाई पसरलेली असते. इथला संततधार पाऊस त्यात अजून भर टाकतो. पावसात इथल्या समुद्राला उधाण येतं. कदाचित पाऊस त्याच्यासुद्धा सौंदर्यात भर टाकत असावा. पावसाळ्यातलं धुक्यानं  दाटलेलं समुद्राचं रूप, उन्हाळ्याच्या सुर्यास्तापेक्षासुद्धा जास्त मोहवतं. गोव्याच्या पावसात न भिजणं हे अशक्यकोटीतलं काम ! कात टाकलेली हिरवाई व पुन्हा नव्याने खुललेला निसर्ग आपल्याला साद घालत असतो त्यामुळं इथं पावसात न भिजणं हा पर्यायाच तुम्हाला उपलब्ध नसतो.

         सुंदर गोव्यातला हा एवढा सुंदर पावसाळा ! गोव्यातल्या कुणालाही या पावसाबद्दल विचारा, तो तुम्हाला सांगेल, एकदा का पाऊस सुरु झाला की तो थांबायचं नावही काढंत नाही. पण त्या बरोबर तो हे सुद्धा सांगायला विसरणार नाही  "आमचे गोयं पावसान आणीक सोबीत दिसता "..आणि हे खरंच आहे ..." heavy rains but Goa is very beautiful in rains ", मनीषा कोइराला मागे आपल्या एका मुलाखतीत म्हटली होती.
           

2 comments: