ब्लॉगचे कॉपीराईट्स

myfreecopyright.com registered & protected

Thursday, December 9, 2010

‘उन्हाळी संशोधन पाठ्यवृत्ती कार्यक्रम २०११ ’


         उन्हाळी संशोधन पाठ्यवृत्ती (Summer Research Fellowship) ही भारत सरकारच्या विज्ञानातील तीन अग्रगण्य संस्था अनुक्रमे  इंडियन अकॅडेमी ऑफ सायन्सेस, बंगलोर, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडेमी, नवी दिल्ली व नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस, इंडिया, अलाहाबाद यांच्याकडून दरवर्षी देण्यात येते.  ही पाठ्यवृत्ती हुशार व संशोधनाच्या आवडीने झपाटलेल्या विज्ञान शाखेतील महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांना उन्हाळी प्रकल्पासाठी देण्यात येते. या पाठ्यवृत्तीचा कालावधी दोन महिन्यांचा असतो. विद्यार्थी-शिक्षकांच्या सोयीसाठी हे प्रकल्प उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पूर्ण करता यावेत अशी योजना असते. २०११ मधील या  पाठ्यवृत्तीसाठी विज्ञान शाखेतील विविध विषयांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

पार्श्वभूमी:

               उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड वाढावी हा या पाठ्यवृत्तीमागील  प्रमुख उद्देश आहे. सुरुवातीला म्हणजे अगदी मार्च २००७ पर्यंत ही पाठ्यवृत्ती फक्त इंडियन अकॅडेमी ऑफ सायन्सेस, बंगलोर यांच्याकडून देण्यात येत होती. त्यानंतर मात्र २००७ मध्ये विज्ञानातील  अजून दोन प्रमुख संस्था अनुक्रमे इंडियन नॅशनल सायन्स अकॅडेमी, नवी दिल्ली व नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस, अलाहाबाद यादेखील या उपक्रमात सहभागी झाल्या. या तिन्ही संस्थांना एकत्रित  'अकॅडमिक्स' असे संबोधण्यात येते.  
               १९९५ मध्ये ही पाठ्यवृत्ती अगदी छोट्या पातळीवर सुरु करण्यात आली. १९९५ साली  एकूण फक्त तीन जणांना ही पाठ्यवृत्ती देण्यात आली होती.  मात्र २०१० साली ही संख्या वाढून १२०० पर्यंत पोहोचली. यातूनच या पाठ्यवृत्तीची व्यापकता किती वाढली आहे याचा अंदाज येतो. २०१० साली सर्व विषयांतून एकूण १०३५४ विद्यार्थ्यांनी तर ६६२ शिक्षकांनी या पाठ्यवृत्तीसाठी अर्ज केले होते.  त्यामधून पाठ्यवृत्तीसाठी एकूण १३१२ जणांची निवड झाली परंतु संस्थांनी शेवटी मात्र १२०० जणांना ही पाठ्यवृत्ती बहाल केली.

आवश्यक पात्रता:

वरील पाठ्यवृत्तीसाठी कोणत्याही महाविद्यालयातील खालील विषयांतील  विद्यार्थी अथवा शिक्षक अर्ज करू शकतात.
१ ) कृषी
) पदार्थविज्ञान
३) रसायन शास्त्र 
४) जैविकविज्ञान 
५) गणित 
६) अभियांत्रिकी व संगणकशास्त्र
७) भूशास्त्र 
  
           विद्यार्थ्यांसाठी संस्थांनी तशी कोणतीच आवश्यक पात्रता जाहीर केलेली नाही. मात्र  शक्यतो पदवीच्या अगोदरच्या वर्षात शिकत असलेलेल्या  विद्यार्थ्यांचा
(Pre-final year students of degree) या उपक्रमाला जास्त प्रतिसाद असतो हे दिसून येते. उदा. बी.एस्सीच्या द्वितीय किंवा एम.एस्सीच्या  प्रथम वर्षातील अथवा अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षातील विद्यार्थी ह्या पाठ्यवृत्तीसाठी प्रामुख्याने अर्ज करू शकतात. याचे प्रमुख कारण म्हणजे पदवी संपताना या विद्यार्थ्यांना ह्या  पाठ्यवृत्तीअंतर्गत पूर्ण झालेला प्रकल्प त्यांच्या महाविद्यालयाला सादर करता येतो.

अर्ज प्रक्रिया:

            अर्ज संस्थांच्या वेबसाईटवर दिलेल्या विहित नमुन्यात ऑनलाईन भरायचा आहे. ऑनलाईन अर्ज वरील तिन्ही संस्थांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. (लेखाच्या शेवटी वेब साईट्सची यादी दिलेली आहे). अर्जाबरोबर अर्जदाराचा बायोडाटा व अर्जदाराला जे संशोधन करायचे आहे त्याचे २५० शब्दांत संक्षिप्त वर्णन (Write Up) पाठवावे लागते. सोबत अर्जदाराला ज्या गाईडबरोबर संशोधन करायचे आहे त्याचे नाव पाठवावे लागते. तिन्ही संस्थांशी संलग्नित सर्व गाईड्सची व त्यंच्या संबंधित विषयांची यादी कॅडमिक्सच्या वेबसाईटवर दिलेली आहे. तसेच भरलेल्या अर्जाची प्रिंट घेऊन ती संस्थेला पुन्हा स्पीड पोस्टाने पाठवायची आहे. त्या बरोबर अर्जदार विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित विषयातील एका प्राध्यापकाचे शिफारस पत्र  (Recommendation Letter) बंद लिफाफ्यात संस्थेकडे पाठवावे लागेल. हे पत्र विद्यार्थ्याने न पाठवता संबंधित प्राध्यापकाने थेट संस्थेकडे पाठवायचे आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Coordinator, Science Education Programme, Indian Academy of Sciences, C.V. Raman Avenue, Near Mekri Circle ,Sadashivanagar, Bangalore 560 080. 

निवड प्रक्रिया:

            पाठ्यवृत्तीसाठी निवड झालेल्या अर्जदाराला शक्यतो मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कळवले जाते. यामध्ये त्याला विषयाशी संबंधित संशोधन संस्था व त्याला कॅडमिक्सने दिलेल्या शास्त्रज्ञाची (गाईड) माहिती असते. एकदा मिळालेली संशोधन संस्था व गाईड बदलता येत नाहीत. निवड झालेल्या विद्यार्थी अर्जदाराला रु.६०००/- प्रतिमहिना तर शिक्षक अर्जदाराला रु.९०००/- प्रतिमहिना पाठ्यवृत्ती दिली जाते. तसेच रेल्वेचे द्वितीय श्रेणीचे  येण्या-जाण्याचे भाडे दिले जाते. तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यावर संस्थेचे विज्ञान मासिक ' रेझोनन्स ' दर महिन्याला मोफत पाठवले जाते.

शेवटची मुदत: 
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची मुदत दि. ३१ डिसेंबर,२०१०आहे. तर त्याच अर्जाची प्रिंट काढून ती स्पीड पोस्टाने पाठवण्याची शेवटची मुदत ७ जानेवारी, २०११ आहे.  
 
महत्वाच्या वेब साईट्स: 
www.ias.ac.in

                

                                                      - प्रथमेश आडविलकर 


वरील लेख दि.०९/१२/२०१० च्या दै.लोकसत्तातील " करिअर काऊन्सेलर " या पुरवणीसाठी लोकसत्तामध्ये (http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=123660:2010-12-21-20-00-27&catid=103:2009-08-05-07-14-08&Itemid=116) ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी प्रकाशित केला. त्याबद्दल त्यांचे आभार !
          


दै.सकाळमध्ये दि. २२/१२/२०१० च्या पुणे टुडे च्या " एज्यु मंत्रा " पुरवणीमध्ये (http://72.78.249.107/Sakal/22Dec2010/Normal/PuneCity/PuneToday/page5.htm) प्रकाशित झाला
.
  
Friday, October 15, 2010

एका खेळीयाने ...


बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडीयमच्या इतिहासात रविवार, दि.१० ऑक्टोबर २०१० (१०/१०/१०) हा दिवस सुवर्णाक्षरात कोरला गेला असेल. रविवारी सचिनने कसोटीतल्या १४००० धावा पूर्ण केल्या व भारतीय  क्रिकेटच्या शिरपेचात मानाचा अजून एक तुरा रोवला. चौकार मारून सचिनने चौदा हजारावी धाव जमवली आणि अख्खं स्टेडीयम त्याला मानवंदना (Standing Ovation) देण्यासाठी उभं राहिलं, तो  क्षण अगदी डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा होता. चक्क रिकी पॉनटिंगने सुद्धा सचिनचं अभिनंदन  करावं यातंच सारं आलं. सचिनच्या कसोटीतल्या चौदा हजार धावा असोत किंवा एकदिवसीय – कसोटीतल्या  दोन्ही मिळून त्याच्या पंचवीस हजार धावा असोत अथवा त्याचे शतक-अर्धशतकाचे विक्रम असोत; सचिनची क्रिकेटमधली आकडेवारी व विक्रम यांचं नवल आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. सचिन नुसता   मैदानावर सामना जरी खेळायला आला तरी तो एक नवीन विक्रम होऊन जातो. सचिनची मैदानावरची  फक्त उपस्थिती ही भारतीय संघाला व करोडो भारतीयांना केवढा मोठा दिलासा असतो हे साऱ्यानाच  माहिती आहे. सचिनची खिलाडू वृत्ती फक्त क्रिकेटच नव्हे तर क्रीडा जगतातील सर्व खेळाडूंनी आदर्श  ठेवावी अशी आहे. सचिनचा फिटनेस, त्याची कठोर मेहनत, दीर्घ चिकाटी, चिवटपणे झुंज देण्याची वृत्ती,अवघड  परिस्थितीतूनदेखील मार्ग काढण्याची सकारात्मक वृत्ती ह्या सगळ्याबद्दल बोलावं व लिहावं तेवढं कमीच.. !

‘सचिन  रमेश  तेंडूलकर’ हे नाव क्रिकेटच्या इतिहासात कायमचं अजरामर होऊन राहणार आहे. आपल्याकडे सचिनचा जेव्हा लेखा-जोखा केला जातो,तेव्हा पोरांना (विशेषत: अपयशी विद्यार्थ्यांना वगैरे) सचिनचं उदाहरण ( की सचिन बारावीत नापास होऊन देखील आज एक यशस्वी क्रिकेटपटू आहे ) द्यायचा  मोह कुणालाच आवरत नाही. खरेतर,सचिन बारावीत असताना त्याची भारतीय संघात निवड झाल्यामुळे  तो बारावीची परीक्षा देऊ शकला नाही ते आजतागायत.सचिनचे वडील ‘ रमेश तेंडूलकर ’ हे मराठीतले एक उत्तम साहित्यिक होते. सचिनचा भाऊ अजितने तर आपलं अख्खं आयुष्यच सचिनसाठी दिलंय. अजूनही  प्रत्येक सामन्याच्या वेळी अजित सचिनच्या बरोबर असतो.

एक माणूस म्हणून सचिन निर्विवादपणे श्रेष्ठ आहे. मुळातच सचिनचा स्वभाव शांत आहे. सचिनचा  नम्रपणा तर त्याच्याबद्दलचा आदर अजूनच द्विगुणीत करून टाकतो. इतकं प्रचंड यश मिळवूनसुद्धा  सचिनचे पाय जमिनीवरच आहेत. यश मिळाल्यावर अनेकांना स्वर्ग दोन बोटे कसा उरतो हे बॉलीवूडच्या  अनेक सेलिब्रेटीजनी आपल्या बोलण्या- वागण्यातून दाखवून दिलेले आहेच. अगदी काही वर्षापर्यंत अमिताभदेखील मला सचिनएवढाच नम्र वाटायचा. पण त्याची मागची काही विधाने, ट्विटरवरील  स्टेटमेंट्स व ब्लॉग पाहिल्यावर त्याच्या नम्रतेबद्दल थोडाफार फोलपणा जाणवला. अमिताभ काही वादांशी  तरी संबंधित आहे, मात्र सचिन कधी कुठल्याच वादात अडकला नाही. ‘नारायण नागबळी ’सारख्या  बाबीचा मिडीयाने जरी ‘इश्यू ’बनवला असला, तरी सचिनने अमिताभसारखे अशा ‘इश्यू’जना कधीच प्रत्युत्तर (व महत्व) सुद्धा दिले नाही. ‘ तुम्हाला काय बोलायचे ते बोला,मी आपला असाच शांत ’ अशीच  याची नेहमीची भूमिका राहिली आहे. कोणतीही गोष्ट, मग ती आपल्या बाजूने असो किंवा विरोधात असो, त्याचा बाऊ करायचा नाही हा सचिनचा स्वभावंच असावा. मध्यंतरी एक बातमी वाचल्याचे आठवते,एक  माजी क्रिकेट खेळाडू (रणजीपटू),सचिनबरोबर कधीतर क्रिकेट खेळला होता व कोणत्यातरी  आजारावरती तो मुंबईत वैद्यकीय उपचार घेत होता. त्यादरम्यान त्याला आर्थिक मदत सचिनने केली होती. आजवर  सचिनने अनेक अनाथालयांना,खेळाडूंना व गरजूंना आर्थिक मदत केली आहे. पण त्याची खबरबात कुणालाच लागू दिलेली नाही.

‘ संयम’ हा सचिनकडे असलेला अजून एक गुण. मैदानावर सचिन बाद नसावा व चुकून पंचानी त्याला  बाद ठरवावे असे कितीतरी वेळा झालेले आहे. पण तेव्हादेखील सचिन शांतपणे हातातील ग्लोव्ज काढून   पव्हेलीयनकडे परतताना दिसेल. इथे कुठेही आपण 'विक्रमादित्य'वगैरे असल्याचा भाव चेहऱ्यावर नाही  की पंचांना वा इतर खेळाडूंना उद्दामपणे दिलेली ‘खुन्नस’ नाही. मिडियासमोर कधीही बोलायचे असेल तेव्हा तो विचारपूर्वक बोलतो. सचिनच्या एखाद्या विधानाचा विपर्यास क्वचितच झाला आहे. इतर खेळाडूंसारखा  तो आज कुठे ह्या ‘रियालिटी शो’मध्ये गाणं म्हणा तर उद्या कुठे तिकडे ‘भांगडा’ करताना कधीच दिसत नाही. टोकाच्या क्षणीसुद्धा शांत व संयमी वृत्ती ठेवणं आणि तोल ढळू न देणं हे सचिनचं वैशिष्य आहे. त्याच्या ह्या एवढ्या शांततेबद्दल उद्या त्याला ‘शांततेचा नोबेल’ पुरस्कार जरी जाहीर झाला तरी आश्चर्य  वाटायला नको. कधी-कधी वाटतं,क्रीडा विभागात आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘नोबेल’सारखा एखादा सर्वोच्च  पुरस्कार नाहीये ते बरंय!  कारण जरी असता, तरी गेल्या पंधरा वर्षात तो कमीत कमी पाच-सहा वेळा  तरी सचिनला देण्याची नामुष्की त्या समितीवर आली असती.

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आईनस्टाइनने ‘गांधीं’बद्दल “ गांधी नावाचा रक्ता- मांसाचा माणूस या पृथ्वीतलावर  होऊन गेला ह्यावर भविष्यातल्या पिढ्यांचा विश्वास बसणार नाही ” असं साऱ्या भारताला सुखावणारं    एक वाक्य लिहून ठेवलंय. उद्या सचिनच्या बाबतीतसुद्धा असं लिहून ठेवलं जाईल,असं म्हणणं वावगं ठरणार नाही .


Saturday, September 4, 2010

मिसकॉल..

माझे आवडते व जेष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांची जाहीर माफी मागून...

पाडगावकरांची  एक सुंदर व प्रसिद्ध कविता 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे असतं.. ' ह्या कवितेचं चुकत-माखत विडंबन करण्याचा  प्रयत्न केलेला आहे. तसा विडंबनाचा हा माझा पहिलाच प्रयत्न...काही चूक-भूल असेल तर कृपया माफ करावं. 

 मिसकॉल..


मिसकॉल हा, मिसकॉल हा, मिसकॉल असतो,
तुम्हाला आणि आम्हाला तो कधीतरी येतच असतो!

काय म्हणता? मिसकॉल हा एक त्रास असतो?
कॉल करण्यासाठी दिलेला तो सिग्नल असतो?
आणि परत कॉल केल्यावर आपला खर्च वाढणार असतो?

असला तर असू दे,
वाढला तर वाढू दे!

तरीसुद्धा
तरीसुद्धा,

मिसकॉल हा, मिसकॉल हा, मिसकॉल असतो,
तुम्हाला आणि आम्हाला तो कधीतरी येतच असतो!


नेहमी जमा खर्चाचाच हिशोब मांडणाऱ्या मंडळीना
मिसकॉलचे महत्व काय कळणार?


कॅन्टीन मध्ये मैत्रिणीला बोलवण्यासाठी
मिसकॉल देता येतो,

पऱ्याक्टीकलला लेट होणाराय
हे सांगण्यासाठी मिसकॉल देता येतो;

लेक्चर सुरु झालंय, पटकन ये
हे बजावण्यासाठी मिसकॉल देता येतो;

एवढंच काय, या पुढचं लेक्चर बंक करू हे सांगण्यासाठी
अगदी चालू लेक्चर मध्ये सुद्धा मिसकॉल देता येतो;


आणि म्हणूनच,
मिसकॉल हा, मिसकॉल हा, मिसकॉल असतो,
तुम्हाला आणि आम्हाला तो कधीतरी येतच असतो!मोबाईल हातात असला कि कधीही मिसकॉल देता येतो;
येस-नो चा साधा सिग्नल शब्दांशिवाय व्यक्त होतो!

कॉल कितीही केलेत तरी त्यात मिसकॉल एवढी गम्मत नाही;
मित्राचा सोडा हो, मैत्रिणीच्या मिसकॉलची हुरहूर कशातच नाही!

मिसकॉलचे हे सारे फायदे तुम्हालाही कळले आहेत,
आणि मलासुद्धा म्हणजे कळले आहेत!

कारण,
मिसकॉल हा, मिसकॉल हा, मिसकॉल असतो,
तुम्हाला आणि आम्हाला तो कधीतरी येतच असतो!


मिसकॉल म्हणजे कंजुषपणा असतो,
असं म्हणणारी माणसं भेटतात,

मिसकॉल म्हणजे दिलदारपणा नसतो
असं मानणारी माणसं भेटतात ! 

असाच एकजण मला म्हणाला,

 "मी कधी कुणाला मिसकॉल देत नाही
आणि मला जर मिसकॉल आला,
तर त्याला शिव्यांनी धुतल्याशिवाय राहत नाही!

मिसकॉल घ्यायला अन द्यायला आम्ही लहान आहोत का?
पोरांचा खेळ हा, आता आमच्या वयाला शोभेल का? "

त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हटलं;

मिसकॉल हा, मिसकॉल हा, मिसकॉल असतो,
तुमच्या आणि आमच्या लेखी त्याचा अर्थ वेगळा असतो!!


तिच्यासोबत तुम्ही कधी
मिसकॉल-मिसकॉल खेळला असाल!
लायब्ररीतून बाहेर ये हे सांगण्यासाठी मिसकॉल दिला असाल!

बागेमध्ये मी आलोय,
हे सांगण्यासाठी मिसकॉल  असतो,
तू अजून कुठे आहेस?
हे विचारण्यासाठी मिसकॉल असतो!

भेटीनंतर संध्याकाळी सुखरूप घरी पोचलीस का?
हे विचारण्यासाठी मिसकॉल असतो,

हो पोचले, काळजी करू नकोस
हे सांगण्यासाठी मिसकॉल असतो!

गुड- नाईट म्हणण्यासाठी मिसकॉल असतो!,
स्वीट ड्रीम्स म्हणण्यासाठी मिसकॉल असतो!,उद्या नेहमी च्याच बस ने ये
हे सांगण्यासाठी मिसकॉल असतो,

तर पाठीमागून तिसऱ्या सीटवरच बस
हे सुचवण्यासाठी मिसकॉल असतो!मिसकॉल ही साथ असते ; 
मिसकॉल ही सोबत असते.
 
फोन बदलला तरी मिसकॉल देता येतो,
आणि सिमकार्ड जरी बदललं तरीसुद्धा मिसकॉल देता येतो!
 
आणि म्हणूनच,

मिसकॉल हा, मिसकॉल हा, मिसकॉल असतो,
तुम्हाला आणि आम्हाला तो कधीतरी येतच असतो!!                                                  -प्रथमेश आडविलकर.


Friday, August 27, 2010

उत्तरे

प्रश्न गुंतागुंतीचे बनत चालले आहेत,

त्याची उत्तरे कशी शोधू आता ?  असं नेहमीच वाटतं.

पण परमेश्वरा नेहमी तूच मदत करतोस,

त्या प्रश्नांची अनोखी उत्तरे तुझ्या भाषेत देऊन.

कदाचित त्यावेळेपुरता तूच माणसात अवतरत असावास, ती उत्तरे शोधण्यासाठी,

अन लुप्त होत असावास माणसातून, एकदाची उत्तरे सापडल्यावर.

म्हणूनच तर जे जे उत्तम, उदात्त व चांगले ते ते सर्व तू माणसात अवतरल्यावर होत असावे,

अन राहिलेलं सगळं मात्र माणूस स्वत: करतो, तुझा अंश त्यावेळी त्याच्यात नसताना.

व त्या वाईट गोष्टींचे खापर मात्र तो फोडतो तुझ्यावर.

पण हे परमेश्वरा तुझ्याशिवाय कोण सांभाळेल तुझ्या या लेकराला - या माणसाला ?

अन म्हणूनच तू म्हणतोस की '' क्षमा कर त्यांना. त्यांना हे कळत नाही की ते काय करताहेत "

Thursday, August 12, 2010

ब्लॉंगायन...?

         आज बऱ्याच दिवसांनी माझं ब्लॉंगायन परत एकदाचं सुरु होतयं. मध्यंतरी कामाच्या व्यस्ततेमुळे ब्लॉगकडे ढुंकूनही बघता आले नाही आणि याची दररोज मनात खंतदेखील असायची. मध्यंतरीच्या या काळात प्रवासही भरपूर झाला, मनासारख्या व मनाविरुद्ध घटनाही अनेक घडल्या. त्यामुळे ब्लॉगसाठी बरेचसे विषय मनात दाटले होते पण मोकळा वेळ व कामाचा व्यस्तपणा हे यावेळी एकमेकांच्या व्यस्त मात्रेत ( inversaly proportional to each other ) होते. त्यामुळे मनातले ब्लॉग मनातच राहिले. भिरभिर पडणारा पाऊस, 'पीएमटी'तली गर्दी व त्यातली भांडणे, पावसातला चहा व गरम भजी, नुकताच सुरु होणारा श्रावण, पांढरा व तांबडा रस्सा, 'सिम्बी'चे थेऊर प्रकरण असे एक ना अनेक विषय, उद्या-परवा कधीतरी ब्लॉग लिहू म्हणून डायरीत टिपून ठेवत होतो. त्यातच 'महेंद्र'जींच्या एका पूर्वीच्या ब्लॉगवरील 'ब्लॉगरने आठवड्यात कमीत कमी चार ब्लॉग तरी लिहावेत' ही सूचना सारखी आठवायची पण ब्लॉग न लिहिणं व स्वत:च्या आळशीपणाची लाज वाटणं याखेरीज काहीही करत नव्हतो. आज शेवटी त्या निर्लज्जपणाचीच थोडीशी लाज वाटली व काहीतरी लिहायचं म्हणून पेन हाती घेतलं.
     
          कामाच्या या व्यस्तपणात दोन-तीन पुस्तकं, शनिवार- रविवारच्या पुरवण्या, व घरी येणारी काही मासिके वाचून काढलीत. वाचलेली प्रमुख पुस्तकं म्हणजे चेतन भगतचं 'टू स्टेट्स' व श्रीनिवास ठाणेदारांचं ' ही 'श्री'ची इच्छा'. या दोन्ही पुस्तकांबद्दल बरचसं ऐकलं होतं. विशेषत: ठाणेदारांचं पुस्तक या अगोदर एकदा वाचायला सुद्धा घेतलं होतं, पण कुठं माशी शिंकली कुणास ठाऊक? त्यावेळी ते जेमतेम पंचवीस-तीस पानांच्या पलीकडे जाऊ शकलं नाही. यावेळी मात्र ते एक-दोन बैठकीतच वाचून काढलं. दोन्ही पुस्तकं ठीक वाटलीत, म्हणजे " नाद खुळा..!! " किंवा " जबरदस्त.." म्हणण्याजोगं एकही वाटलं नाही हे यांचं साम्यस्थळ. चेतन भगतकडे काहीच नाविन्य वाटलं नाही. कथा ओढत नेल्यासारखी वाटतेय. पुस्तकात व स्वत:च्या वेब-साईटवरही त्यानं ही कथा कितपत त्याची आहे हे वाचकांनी ठरवायचं असं सांगून उगीचच भाव खाण्याचा व चर्चेत राहून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केलाय हे स्पष्टपणे दिसतंय. बाकी लेखन ठीकाय. कथेतली सुसूत्रता उत्तम आहे. कथा अनेक ठिकाणी घडत असूनसुद्धा त्यात तुटकपणा जाणवत नाही, हे त्याचं यश.


         दुसरं पुस्तक म्हणजे ठाणेदारांचं ' ही 'श्री'ची इच्छा'. मराठी माणूस व त्याची अमेरिकेतील प्रगती ह्याभोवती हे लेखन फिरतंय. पुस्तक तसं ठीक आहे. ठाणेदारांचा प्रवास उल्लेखनीय आहे, यात शंकाच नाही. पण पुस्तकात अधेमध्ये काहीतरी रिकामेपण जाणवते. ते रिकामेपण नेमकं कसलं आहे हेच बऱ्याचदा कळत नाही. म्हणजे उदा. त्यांचं मुंबईतलं जीवन त्यांनी योग्य रेखाटलंय. त्यामानाने त्यांच्या बेळगावातल्या पूर्वायुष्याबद्दल खूपच कमी माहिती पुस्तकात दिलेली आहे. अमेरिकेतल्या जीवनाचे काही प्रश्न अनुत्तरीत आहेत असं वाटतंय.        सुरेश भटांचा एक कवितासंग्रह वाचायला घेतलाय " रंग माझा वेगळा .." मस्तच ! ' रंगुनी रंगात साऱ्या... ', ' मागता न आले म्हणुनी राहिलो मी भिकारी ' यांसारख्या अनेक कविता " लई भारी " वाटल्या.

       थोडासा वेळ काढून फोटोग्राफीही केली. बाकी रविवार वगळता इतर दिवसांची वर्तमानपत्रे फक्त चाळलीत. गेल्या महिन्याभरात फिरायला बाहेर कुठं जाण्याचा योगही आला नाही. यापेक्षाही मोठ्ठ दु:ख  म्हणजे ' राजनीती' पासून ते ' वन्स अपॉन अ टाइम..' पर्यंत एकही चित्रपटाला जाता आलं नाही.

          थोडक्यात काय, हळूहळू आता थोडा-थोडा वेळ मिळत जाईल असं वाटतंय. डोक्यात गर्दी करून असलेले थोडेफार व काही नवीन विषय घेऊन पुन्हा एकदा नव्या जोमानं ब्लॉगायान सुरु करायला हरकत नाही. आजच्या या ब्लॉगायानामुळे पुस्तकांची असो वा नसो मात्र ब्लॉगची व स्वत:ची गेल्या महिन्याभरातली थोडीफार समीक्षा झाल्यासारखं वाटतयं.Thursday, July 1, 2010

ई-अंधश्रद्धा

काही दिवसांपूर्वी एका मैत्रिणीचा मेल आला होता. त्यात साईबाबांचे चित्र होते व खाली लिहिले होते की हा मेसेज अमुक-अमुक जणांना पाठवा, तेवढया जणांना पाठवला की येत्या दहा दिवसांत तुमची इच्छा  पूर्ण होईल आणि जर मेसेज नाही पाठवला तर येत्या २४ तासांत तुम्हाला एखादी वाईट घटना कळेल. मेल वरून कळंत होतं की तो बराच फिरून आलाय (म्हणजे बरेच बकरे बळी पडलेत ).

काय गंमत आहे ना ? आपण एकविसाव्या शतकात, विज्ञान युगात  वगैरे जगतो, इंटरनेटच्या युगात राहतो वगैरे, वगैरे पण युवा व उच्चशिक्षित असलो म्हणून काय झालं, लादून  घेतलेल्या अनेक कल्पना मात्र अगदी जशाच्या तशा जगतो. अंधश्रद्धा ही त्यापैकीच एक, फक्त स्वरूप बदलले. पूर्वी काही लोकं ठराविक मायन्याची पत्रं पाठवायचीत की हे पत्र अजून एकवीस जणांना पाठवा. मग पाठवले तर..., नाही  पाठवले तर... तोच प्रकार. फक्त तो पत्रप्रकार आता इंटरनेट वर आला एवढंच. चक्क इंटरनेट वर सुद्धा हे अशा प्रकारचे  ई-अंधश्रद्धेचे नमुने बघितले की मग मात्र  आपल्या मागासलेपणाची  खात्रीच होते. (मोबाईलवर सुद्धा हा प्रकार सर्रास सुरु आहे.) असे मेल्स आपल्याला भावनिक बळी पाडतात व आपल्याच  नकळत आपण चुकीचे संदर्भ सगळीकडे फॉंरवर्ड करतोय (आणि पर्यायाने पुढल्या पिढीलादेखील देतोय ) असे मला वाटते. हा वारसा असल्याप्रमाणे पुढे  ही साखळी चालू राहते (आपल्या भावनेचा गैर-वापर करीत). मनाला नेहमी एकाच प्रश्न पडतो की ही मंडळी याबाबतीत कधीच विचार करत नसतील का? यांना कधी स्वत:ला प्रश्न विचारावेसे वाटत असेल की नाही ? की प्रश्न पडूनसुद्धा, विचार करून देखील हे घाबरत असावेत ?   
सहजच विचार केला की अनेकजण हे मेल का फॉंरवर्ड करत असावेत? त्याची मी माझ्या परीने काही उत्तरे शोधून काढलीत. ती अशी :
         
         १)हा मेल फॉंरवर्ड केल्याने आपलं काहीच जात नाही, उलट काही मिळालं तर फायदाच.
 
 
         २)बऱ्याच जणांना मोकळा वेळ असतो, ते विचार करतात की काही काम नाही तर चला हे मेल फॉंरवर्ड करू. 
 
          ३)मेल मधील भावनिक आवाहनाला फसतात व न पाठवून उगीच कशाला रिस्क घ्यायची म्हणून फॉंरवर्ड करतात.

          ४)अनेकांना हा मेल जवळच्या नातेवाईक अथवा मित्रांकडून आलेला असतो, म्हणून ते डोळे झाकून त्यावरती विश्वास ठेवतात आणि मग तो मेल इतरांना  फॉंरवर्ड करतात.
     
     हे असे मेल्स फॉंरवर्ड करून आपण चुकीचे समाज जन-माणसांमध्ये रुजवत आहोत व दुर्दैवाने यासाठी इंटरनेटसारख्या नवीन आणि वेगवान तंत्रज्ञानाचा आधार घेतला जातोय. डोळस आणि विज्ञानवादी बनायच्या ऐवजी आपण अजूनच अंधश्रद्ध्येच्या आहारी जात आहोत.  देवतेचे चित्र असल्याने हे मेल्स डिलीट करणे नकोसं वाटतं. ठीक आहे, डिलीट करायचे राहू द्या कमीत कमी फॉंरवर्ड करायचे तरी आपण थांबवू शकतो. एवढे जरी झाले तरी  गैर-समज पसरणं थोड्या प्रमाणात तरी कमी होईल असं मला वाटतं.


Friday, June 25, 2010

"Goa is Beautiful in Rains...!!"

             विलोभनीय निसर्ग सौंदर्याची देणगी व सोबतीला देखण्या समुद्रकिनाऱ्यांची सुंदर साथ म्हणजे गोवा ! गोव्यावर सौंदर्याची उधळण  करताना परमेश्वरानं कदाचित एकही हातचा स्वतःकडे ठेवलेला नसावा. गोवा  बघताना मन नकळत कुठेतरी हरवून जातं. गोव्यातल्या सौंदर्याला सुरुवात आहे, शेवट मात्र नाही. जिथं जाऊ, तिथं सौंदर्य...! निसर्ग सौंदर्य आपली पाठ इथं सोडतंच नाही असं वाटंत राहतं. गोव्यात आलं की आपलं कुतूहल जागृत होतं. आपल्याच नकळत आपण लहान मुलासारखे ' जिज्ञासू ' बनून जातो. मग कधीतरी संध्याकाळी एकटेच ' मिरामार ' सारख्या एखाद्या समुद्रकिनाऱ्यावर बसलो असता अनेक प्रश्न मनामध्ये रुंजी घालू लागतात; किंवा भूतकाळातले  सोनेरी क्षण समुद्राच्या लाटांसारखे मन:चक्षु समोर गर्दी करतात. इथलं शांत, सुंदर जीवन मनाला भावतं आणि कधी आपण गोव्याच्या प्रेमात पडतो हे आपल्या लक्षातच येत नाही.
          
            गोव्यातलं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे इथला सायंकाळचा ' सूर्यास्त '. इथल्या सायंकाळच्या सूर्यास्तावर पर्यटक किती फिदा असतात हे तर सर्वज्ञात आहे. समुद्रकिनाऱ्यावरचा हा ' सूर्यास्त ' कितीही वेळा बघितला तरी अजिबात कंटाळा  येत नाही. गोव्यातला प्रत्येक दिवशीचा ' सूर्यास्त ' हा नवीन व ताजा वाटत असतो. सूर्य समुद्रात बुडत असताना, त्याच्या त्या हळुवार बुडत जाण्याच्या लयी विसरता येत नाहीत. कदाचित त्यामुळेच सूर्यास्ताच्या वेळेला आपल्याला थोडंस भावनिक व्हायला होत असावं आणि म्हणूनच की काय समुद्राच्या पाण्यावरून पळत जाऊन चटकन त्याला पकडावं अशी कल्पना केल्याशिवाय राहवत नाही. सूर्यास्ताच्या थोडं अगोदर, सुर्याच्या भोवताली त्याच्या तांबुस- सोनेरी रंगाच्या पसरलेल्या छटा व पाण्यात पडलेलं त्याचं ' प्रतिबिंब 'मनाला मोहवून टाकतं .

            गोव्यातलं  खरं सौंदर्य अजून एक गोष्टीत दडलं आहे, ते म्हणजे इथल्या ' पावसात '. गोव्यातला पाऊस किंवा पावसातला गोवा अनुभवणं याच्यासारखी रम्य  बाब अजून काय असू शकेल ? ' सौंदर्य ' व ' पाऊस ' (Beauty and Rains) या दोहोंचा एवढा सुंदर मिलाफ इतर क्वचितच बघायला मिळत असावा. गोव्यातला पावसाळा देखील गोव्या इतकाच सुंदर. गोव्यात उन्हाळ्यातच सगळीकडे हिरवाई पसरलेली असते. इथला संततधार पाऊस त्यात अजून भर टाकतो. पावसात इथल्या समुद्राला उधाण येतं. कदाचित पाऊस त्याच्यासुद्धा सौंदर्यात भर टाकत असावा. पावसाळ्यातलं धुक्यानं  दाटलेलं समुद्राचं रूप, उन्हाळ्याच्या सुर्यास्तापेक्षासुद्धा जास्त मोहवतं. गोव्याच्या पावसात न भिजणं हे अशक्यकोटीतलं काम ! कात टाकलेली हिरवाई व पुन्हा नव्याने खुललेला निसर्ग आपल्याला साद घालत असतो त्यामुळं इथं पावसात न भिजणं हा पर्यायाच तुम्हाला उपलब्ध नसतो.

         सुंदर गोव्यातला हा एवढा सुंदर पावसाळा ! गोव्यातल्या कुणालाही या पावसाबद्दल विचारा, तो तुम्हाला सांगेल, एकदा का पाऊस सुरु झाला की तो थांबायचं नावही काढंत नाही. पण त्या बरोबर तो हे सुद्धा सांगायला विसरणार नाही  "आमचे गोयं पावसान आणीक सोबीत दिसता "..आणि हे खरंच आहे ..." heavy rains but Goa is very beautiful in rains ", मनीषा कोइराला मागे आपल्या एका मुलाखतीत म्हटली होती.
           

Tuesday, June 1, 2010

चावीप्रवास

                                Blog चं  title वाचून धक्का बसला असेल नां? तुम्हाला कदाचित असं सुद्धा वाटलं असेल की ही कोणती उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त एस.टी. महा-मंडळाने सुरु केलेली एखादी नविन प्रवास योजना आहे की काय ? आणि प्रवासात 'चावी'चा काय संबंध ? मग 'चावी' घेउन प्रवास करायचा की काय ? असे एक ना अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील.पण असं काहीही नाहीये. 'चावीप्रवास' हा खरं तर मी माझ्या पुरत्या तयार केलेल्या  dictionary मधला एक शब्द आहे. गेल्या आठवड्यात  माझ्या रुमची चावी हरवली व ती मी कशी शोधली,शोधताना माझी झालेली अवस्था, हे सारं म्हणजे माझा ' चावीप्रवास '.

                       ही घटना आहे माझ्या सध्याच्या  गोव्यातील National Institute of  Oceanography (NIO) च्या stay मधली. शुक्रवारी संध्याकाळी  Lab. मधून थकून NIO कॉलनीकडे परत येत होतो, मात्र उद्या आणि परवा वीक-एण्ड या कल्पनेने जरा बरं वाटत होतं. रात्री मग मित्र  मंडळी बरोबर निवांत गप्पा मारत जेवत असताना ठरलं की दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी जवळच्या बीच वर जायचं. आमच्यापासून  दिडेक किलोमीटर वर "Vanguinium Valley"  नावाचा एक खूप सुंदर बीच आहे. ह्या बीचचं वैशिष्ट्य म्हणजे हा बीच एवढा स्वच्छ ,सुंदर असून देखील  इथे खूप कमी पर्यटक असतात (कदाचित त्यामुळेच तो एवढा स्वच्छ असावा....???). दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून फ्रेश झालो . आम्हाला समुद्रात डुंबायला  जायचं होतं म्हणून अंघोळ काही केली नाही. साधारण आठ वाजता आम्ही चार-पाच जण बीचवर जाण्यासाठी निघालो, अर्ध्या-पाऊण  तासात तिथं पोचलो.सुरुवातीला विसेक मिनिटं बीच न्याहाळला. मग त्यानंतर बराच वेळ समुद्रात डुंबत राहिलो. त्यानंतर तिथल्या मोठ्या दगडांवर  बसून फोटो काढले. जवळपास  अडीच-तीन तास एन्जॉय केल्यानंतर आम्ही जायला निघालो. परत येत असताना वाटेमध्ये आम्हाला एक बाग दिसली.मग त्या बागेत आम्ही '3 Idiots' च्या विविध पोझिशन्स मध्ये फोटोज काढले. मग वाटेत अनेक ठिकाणी फोटोसेशन करता-करता कॉलनीत कधी आलो ते कळलेच  नाही. आम्ही येइपर्यंत एवढा एन्जॉय केला की कॉलनीत येइतोवर पुरते Exhaust झालो होतो.कॉलनीत मग रूमवर आल्यावर बघतोय तर चावी कुठाय... ? Shorts चे दोन्ही खिसे तपासले तरी चावी सापडेना. मनानं कौल दिला की चावी हरवली आहे ; '...again go back to Vanguinium...!'

                       पुन्हा एकदा बीचवर जायचं जीवावर आलं होतं.पण जावंच लागणार होतं. कारण तसा दुसरा काही पर्याय सुद्धा उपलब्ध नव्हता. सूर्य आता डोक्यावर आला होता. खूप ऊन लागत होतं. इथली हवा दमट असल्यामुळे अगदी  पन्नास मीटर जरी चाललं तरी घामानं अख्खा टी-शर्ट भिजत होता. नुसता भिजत नव्हता तर चांगला भिजुन अंगाला चिकटत होता.

                      मनाचा हिय्या केला व तसाच परत फिरलो....चावी शोधायला ! थोडसं  Calculation केलं व चावी हरवण्याच्या Probable जागा कुठल्या असतील याचा अंदाज बांधला. तशा त्या तीन जागा होत्या,पहिली म्हणजे बीचकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेला एक तिरका कडा,   दुसरी- ' बीचजवळची बाग ', आणि तीसरी- बीचवरील मोठे दगड. या तिन्ही ठिकाणी आम्ही फोटो काढण्यासाठी थांबलो  होतो. चावी या तीन पैकीच कुठल्या तरी एक ठिकाणी असण्याची दाट शक्यता आहे, असं 'बुदधी' सांगत होती पण 'मना'ला मात्र  ते पटंत नव्हतं. त्यामुळे पूर्ण रस्ताभर ते प्रत्येक खड्डा, खाच-खळगा बघायला भाग पाडत होतं. कुठेतरी  वाचलेलं एक वाक्य आठवलं, "When there is a conflict between your head and heart, you listens to your heart..!". माझं सुद्धा अगदी तसंच झालं होतं!
                      
                         ज्या-ज्या ठिकाणी आम्ही फोटो काढले होते, त्या - त्या ठिकाणी पुर्वीच्याच पोझिशनमध्ये बसून मी चावी नेमकी कुठल्या दिशेला व कोणत्या बाजूला पडू शकते याचा पुन्हा एकदा अंदाज बांधला. पहिल्या  ठिकाणीं चावी मिळाली नाही.मग तसाच चालत पुढे बागे जवळ गेलो. बागेत कुठं तरी चावी पडली असेल असं मला राहून-राहून वाटंत होतं. पण तिथं सुद्धा चावी मिळाली नाही. हताश होउन मी बीचकडे निघालो. तिथं जाऊन बघतो तर काय...? समुद्रात ' High -tides' सुरु झाल्या होत्या आणि बीचवरचं पाणी बरंचंस वाढलं होतं.मोठ-मोठ्या लाटा बीच वरील दगडांना येउन जोराने धड़कत होत्या अणि पाणी उंच उडत होते. क्षणभर हे नयनरम्य दृश्यच बघंत इथं बसाव असं वाटंत होतं पण...?

                    नंतर मग मी बीच वरील मला शक्य असलेला प्रत्येक दगड चेक केला, पण चावी काही मिळाली नाही, बहुतेक ती समुद्रात विलीन झाली अशी मी माझी समजुत घातली, आणि  तसाच घरी परत यायला निघालो. बागेपर्यंत आलो तेवढ्यात बाग स्वच्छ करणारी एक बाई एक अरुंद रस्त्यातून जात असताना दिसली.मला थोड़ी शंका आली.ती जवळ-जवळ नजरेआड होणार एवढ्यात मी तिला हाक मारली. ती थांबली. मी धावत-धावत तिच्यापाशी गेलो व तिला चावी बद्दल विचारले.ती  खिशातून एक चावी काढत म्हणाली  " मघाशी बाग साफ करताना ही चावी सापडली. तुमची आहे का? ". ती चावी  माझीच होती. माझा आनंद गगनात मावेना. त्या बाईचे आभार कोणत्या शब्दात मानावेत हेच कळंत नव्हंतं.भारावलेल्या मनानं मी तिला "Thank you" म्हटलं व घरी  आलो.

                  चावी  मिळाल्याचा आनंद तर होताच पण मला मनोमन हसू येत होतं ते माझ्या या चावीप्रवासाचं ! त्यातल्या माझ्या head आणि heart यांच्या भांडणाचं ! परत आल्यानंतर पणजीत जाऊन होटेल मध्ये मच्छीवर ताव मारत 'चावी'चा आनंद द्विगुणित केला. 

Friday, May 28, 2010

दार उघड...

                            आपल्या प्रत्येकाच्या दररोजच्या जगण्यात सुख-दुःखाचे अनेक क्षण येत (व जातसुद्धा) असतात. जसं सुख-दुखाचं तसंच आशा-निराशेचं. Student's life मध्ये तर हे 'फ्रस्ट्रेशन ' जरा जास्तच असतं व ते सुद्धा अगदी छोट्या- छोट्या गोष्टींचं. Exam मध्ये backlog राहिला,  xxx नं चक्क नकार दिला, ह्याला  Practical ला जास्त मार्क्स दिलेत, त्या सरांनी Partiality केली, असे एक ना अनेक प्रश्न ! नेहमी आपण अगदी कॅजुएली म्हणतोच  की  Life म्हणजे हे सगळं चालायचंच ! पण एवढ्या कॅजुएली मात्र आपण सगळ्या प्रश्नांना response  देत नसतो.दुःखाची अथवा निराशेची एखादी वेळ आली की naturally आपले अवसान गळून जाते.मात्र अशा वेळी थांबुनदेखील चालंत नसतं.कारण जग आपल्यासाठी थांबत नसतं.मग त्या समस्येवरती काही ना काही तरी उपाय शोधावा लागतो. उपाय शोधणं ही नंतरची activity आहे, पण त्याच्या पूर्वीच आपल्याला ' स्व:ताला mentally प्रिपेअर ' करावं लागतं, recharged  होण्यासाठी.  हे असे प्रिपेअर करण्याचे (वा recharged  होण्याचे ) अनेक मार्ग आहेत- शांतपणे तासनतास गाणी ऐकणं, Motivational Videos बघणं, Inspiring पुस्तकं वाचणं, झाडाखाली एकटाच बराच वेळ बसणं इ. हे ज्याच्या त्याच्या सोई (व आवडी ) नुसार वेग-वेगळे सुद्धा असू शकतील.
                    
                          कधीतरी असाच एक कवितासंग्रह वाचत असताना एक छान कविता सापडली. खूप आवडली. आता जर कधी कंटाळा आला, थोडसं frustrate वाटलं तर फक्त ही कविता वाचतो अन मग मात्र  सुर सापडतो. ही कविता खाली देत आहे. वरवर पाहता ही कविता लहान मुलांसाठी वाटेल, मात्र त्यातला गर्भितार्थ  हा लहान मुलांपेक्षा मोठ्यांनाच जास्त उपयोगी पडणारा आहे.


चिऊताईसाठी ....


दार उघड...
दार उघड...
चिऊताई, चिऊताई, दार उघड...!

दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील ?
आपलं मन आपणच खात बसशील?

वारा आत यायलाच हवा,
मोकळा श्वास घ्यायलाच हवा,
दार उघड...
दार उघड...
चिऊताई, चिऊताई, दार उघड...!

फुलं जशी असतात
तसे काटे असतात;
सरळ मार्ग असतो
तसे फाटे असतात!

गाणाऱ्या मैना असतात;
पांढरेशुभ्र बगळे असतात;
कधी-कधी कर्कश काळे
कावळेच फक्त सगळे असतात!

कावळ्याचे डावपेच पक्के असतील,
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील !
तरी सुद्धा या जगात वावरावंच लागतं,
आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं!
दार उघड...
दार उघड...
चिऊताई, चिऊताई, दार उघड...!


सगळच कसं  होणार
आपल्या मनासारखं ?
आपलं सुद्धा आपल्याला
होत असतं पारखं!

मोर धुंद नाचतो म्हणून
आपण का सुन्न व्हायचं ?
कोकिळ सुंदर गातो  म्हणून
आपण का खिन्न व्हायचं ?

तुलना करीत बसायचं नसतं गं,
प्रत्येकाचं वेगळपण असतं गं!

प्रत्येकाच्या आत एक
फुलणारं फूल असतं;
प्रत्येकाच्या आत एक
खेळणारं मूल असतं!
फुलणाऱ्या या फुलासाठी,
खेळणाऱ्या या मुलासाठी
दार उघड...
दार उघड...
चिऊताई, चिऊताई, दार उघड...!

निराशेच्या पोकळीमध्ये
काहीसुद्धा घडत नाही!
आपलं दार बंद म्हणून
कुणाचंच अडंत नाही!

आपणच आपला मग
द्वेष करू लागतो!
आपल्याच अंधाराने आपलं
मन भरू लागतो!

पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं,
तुला शोधित फुलपाखरू नाचत आलं!
चिऊताई, चिऊताई, तुला काहीच कळलं नाही!
तुझं घर बंद होतं,
डोळं असून अंध होतं.!

बंद घरात बसून कसं चालेल?
जगावरती रुसून कसं चालेल?

दार उघड...
दार उघड...
चिऊताई, चिऊताई, दार उघड...!


कवी- मंगेश पाडगांवकर 
कवितासंग्रह- बोलगाणी.


Sunday, May 9, 2010

उन्हाळ्याची सुट्टी........" आठवणीतली."              गेल्या काही  दिवसांपूर्वीच  B.Sc.ची Exam  संपली. आमचे सगळ्यांचे  Supervision सुद्धा संपले होते. ज्या सुट्टीची एवढे दिवस वाट पाहत होतो ती उन्हाळ्याची सुट्टी एकदाची सुरु झाली. उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की, माझं मन बालपणातल्या उन्हाळ्याची सुट्टीभोवती पिंगा घालू लागतं. एखाद्या जीर्ण वस्त्रातले एकेक धागे जसे बाहेर यावेत तशा एकेक जुन्या आठवणी जाग्या होऊ  लागतात.
               
              कोल्हापुर जिल्ह्यातालं ' चरण' हे माझं गाव. साधारण १९९४-९५ चा काळ. सगळीकडं जागतिकीकरण सुरु  होऊन  नुकताच काही काळ लोटलेला. त्यावेळी आमच्या चरणाला अजून जागतिकीकरणाची  झळ लागायची होती. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे आम्हा बाल- मंडळीसाठी धम्माल  असायची . सगळी आतेभावंडं उन्हाळ्याची सुट्टी साठी  आजोळी म्हणजे आमच्या घरी आलेली असायची. मग आजी आमच्यापेक्षा त्यांचे खुप लाड करायची, (कारण लेकीची मुलं ना!). घरी असलेले आंबे,काजू,फणसाचे गरे पहिल्यांदा त्यांना द्यायची व मग आम्हाला. त्यावेळी आमच्या शेतात आंब्याची भरपूर झाडे होती. जवळपास  सगळी झाडे आंब्यांनी लदाडलेली असायची. आई सुद्धा लोणच्याच्या आंब्यांचे लोणचे घालीत असे, ते सुद्धा अगदी सात-आठ बरण्या. मग उन्हाळ्याची सुट्टी संपायच्या थोड़े अगोदर किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला त्या बरण्या एकेक करीत मावशी व आत्या यांच्या घरी पोचत्या केल्या जायच्या.
               उन्हाळ्याचं  मला विशेष आकर्षण होतं ते उन्हाळ्यात अगदी सहज मिळणाऱ्या "रान-मेव्या"मुळे. त्यावेळी करवंदं ,जांभळं, काजू, अळू विकणाऱ्या कोकणातल्या  बाया, माणसं  आमच्या  गावी यायच्या. आमच्या गावात दररोज अशा १०-१२ बाया / माणसं यायची. कदाचित त्यांनी गावातील वाड्या  विभागून घेतलेल्या असाव्यात. बऱ्याचदा  एकच बाई करवंदं व जांभळं घेवुन येई. ही बाई/ बाबा (करवंदं ,जांभळं घेवुन येणाऱ्या पुरुषाला आम्ही बाबा म्हणायचो) गल्लीत येताना " करवंदं घ्या करवंदं..." असं ओरडत यायची. मग आमच्यापैकी कुणाचं तरी तिकडे लक्ष जायचं व तो सगळीकड़े ओरडत सुटायचा "अरे करवंदं वाली आली रे...",  मग आम्ही बाकीचे सारे हातातले पत्ते तिथंच टाकुन तसेच करवंदं घ्यायला पळत सुटायचो. त्यावेळी करवंदं व जांभळं ही मक्यावर मिळायची. मक्याने भरलेल्या एका वाटीवर बरोबर एक वाटी करवंदं मिळंत आणि मक्याच्या एका वाटीवर  जांभळं मात्र अर्धीच वाटी मिळायचीत. मग त्यांनी करवंदं / जांभळं  जरा जास्त द्यावीत यासाठी आम्ही सारी पोरे त्यांना, त्यांचं नाव/गाव विचारायचो, त्यांना पाणी  नेऊन द्यायचो. करवंदं / जांभळं,काजू, हे नेहमी मिळंत पण अळू क्वचितंच  मिळायचेत. मला मात्र करवंदं व जांभळानच्यापेक्षा अळू खूप आवडायचेत.
             उन्हाळ्यातलं अजून एक आपुलकीचं व्यक्तिमत्व म्हणजे "गारेगारवाला ". गारेगारवाल्याची वाट आवर्जुन बघत, आम्ही दररोज पत्ते खेळत बसायचो. हा गारेगारवाला त्या वेळी सायकल वरुन यायचा. गारेगारवाला आलाय हे कळायला कुणाला आरडाओरडा करायला लागायचा नाहीं. ह्याचं प्रमुख  कारण होतं ते म्हणजे त्याच्या सायकलला अडकवलेली भली मोठी घंटा! त्यावेळी कदाचित एवढी मोठी घंटा मी देवळानंतर थेट गारेगारवाल्याच्या  सायकललाच बघितली असेल. त्याच्या सायकलला पाठीमागे एक भली मोठी पेटी असायची. त्यात लाल, पिवळ्या, हिरव्या रंगाची गारेगार असत. ( माझी काही आतेभावंड ही मुंबईहून आलेली होती, ती गारेगारला आइस-क्रीम  म्हणत). गारेगारवालासुद्धा गारेगार मका, ज्वारी व पैशांवरती द्यायचा.यात सुद्धा मका व ज्वारीला प्राधान्य व मग पैशाला. करवंदं / जांभळं घेऊन येणाऱ्या  बायका दररोज वेगवेगळ्या असायच्या, गारेगारवाला मात्र तोच असायचा. गावात अलीकडे  करवंदवाली बाईच काय तर गारेगारवाला सुद्धा दिसत नाही, कारण आता 'अमूल' चं दहाचं आइस- क्रीम अगदी छोट्या पान-पट्टीवर सुद्धा मिळतं. 
             मे महिन्याच्या सुट्टीतलं आमचं दररोजचं  outing चं favourite ठिकाण म्हणजे आमच्या गावातली "काजवी". काजवी म्हणजे आमच्या गावच्या डोंगरातली अशी जागा जिथे फक्त काजूची झाडे लावलेली होती. काजवीत काजूची अगदी शंभराहूनही अधिक झाडे होती. (होती...???). आम्ही गल्लीतली सर्व पोरे तेंव्हा सकाळी गारेगार,करवंदं / जांभळं खाऊन झाल्यावर संध्याकाळी म्हैशी घेउन काजवीत जायचो. त्यामुळे आमची तेथे खूप चैन चालायची. तिथे गेल्यावर पहिल्यांदा आमच्यापैकी प्रत्येक जण कुठल्या झाडाला मोठा काजू आहे ते बघायचा. एकदा काजू बघितला की मग मात्र " हा काजू माझा...." असा त्यावर  हक्क सांगितला जायचा. मग एकदा का काजू झाडावर चढून काढला की पोरं त्या काजुच्या बिया फेकून देत. आम्हीसुद्धा सुरुवातीला त्या फेकून द्यायचो, पण काजुच्या बिया फेकून दिल्या की आई ओरडायची, त्यामुळे त्या घरी घेउन यायला लागलो. नंतर पावसाळ्यामध्ये  आई त्याच बिया भाजून त्यातले  काजुगर काढून द्यायची. एके वर्षी तर आईने आम्हा  तिघा भावंडांना काजुच्या ओल्या बिया आणायला लावल्या होत्या. मग त्या दिवशी  आयुष्यात पहिल्यांदा ओल्या काजुगराची भाजी, आम्ही तिघांनी मिटक्या मारत खाल्ली होती.
             
           परवा अगदी सहजच गावी गेलो होतो. संध्याकाळी मित्राबरोबर निवांत गप्पा मारत बसलो होतो. वेळ होता म्हणून मित्र म्हणाला "चल,काजवीतून जाउन येऊ".  त्याच्याबरोबर तिथे गेल्यावर दिसलं की,काजूची झाडं तोडण्याचं काम अगदी युद्ध-पातळीवर सुरू होतं. अनेक जेसीबी'ज, tractor व शेकडो कामगार मिळून काजवीचा डोंगर 'proposed वारणा  कालव्यासाठी' फोड़त होते. ते सारं बघून मानत "कालवा" झाला.तसाच खिन्न मनाने परत आलो. झोपताना मनात एकच विचार आला, ' करवंदवाली बाई, गारेगारवाला बाबा यांच्या बरोबर आपल्या काजवीचंसुद्धा जागतिकीकरण झालं!!' -----------------------------------------------------------------------------------------

वरील पोस्ट दि. २१ मे,२०१० च्या दै. ई-सकाळच्या मुक्तपीठ या सदरात  प्रसिद्ध झाली. (http://www.esakal.com/esakal/20100521/5179597150722905581.htm). या लेखाला प्रकाशित केल्या बद्धल सकाळचे सम्राट फडणीस यांचे आभार.