‘उन्हाळी संशोधन पाठ्यवृत्ती कार्यक्रम २०११ ’


         उन्हाळी संशोधन पाठ्यवृत्ती (Summer Research Fellowship) ही भारत सरकारच्या विज्ञानातील तीन अग्रगण्य संस्था अनुक्रमे  इंडियन अकॅडेमी ऑफ सायन्सेस, बंगलोर, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडेमी, नवी दिल्ली व नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस, इंडिया, अलाहाबाद यांच्याकडून दरवर्षी देण्यात येते.  ही पाठ्यवृत्ती हुशार व संशोधनाच्या आवडीने झपाटलेल्या विज्ञान शाखेतील महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांना उन्हाळी प्रकल्पासाठी देण्यात येते. या पाठ्यवृत्तीचा कालावधी दोन महिन्यांचा असतो. विद्यार्थी-शिक्षकांच्या सोयीसाठी हे प्रकल्प उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पूर्ण करता यावेत अशी योजना असते. २०११ मधील या  पाठ्यवृत्तीसाठी विज्ञान शाखेतील विविध विषयांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

पार्श्वभूमी:

               उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड वाढावी हा या पाठ्यवृत्तीमागील  प्रमुख उद्देश आहे. सुरुवातीला म्हणजे अगदी मार्च २००७ पर्यंत ही पाठ्यवृत्ती फक्त इंडियन अकॅडेमी ऑफ सायन्सेस, बंगलोर यांच्याकडून देण्यात येत होती. त्यानंतर मात्र २००७ मध्ये विज्ञानातील  अजून दोन प्रमुख संस्था अनुक्रमे इंडियन नॅशनल सायन्स अकॅडेमी, नवी दिल्ली व नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस, अलाहाबाद यादेखील या उपक्रमात सहभागी झाल्या. या तिन्ही संस्थांना एकत्रित  'अकॅडमिक्स' असे संबोधण्यात येते.  
               १९९५ मध्ये ही पाठ्यवृत्ती अगदी छोट्या पातळीवर सुरु करण्यात आली. १९९५ साली  एकूण फक्त तीन जणांना ही पाठ्यवृत्ती देण्यात आली होती.  मात्र २०१० साली ही संख्या वाढून १२०० पर्यंत पोहोचली. यातूनच या पाठ्यवृत्तीची व्यापकता किती वाढली आहे याचा अंदाज येतो. २०१० साली सर्व विषयांतून एकूण १०३५४ विद्यार्थ्यांनी तर ६६२ शिक्षकांनी या पाठ्यवृत्तीसाठी अर्ज केले होते.  त्यामधून पाठ्यवृत्तीसाठी एकूण १३१२ जणांची निवड झाली परंतु संस्थांनी शेवटी मात्र १२०० जणांना ही पाठ्यवृत्ती बहाल केली.

आवश्यक पात्रता:

वरील पाठ्यवृत्तीसाठी कोणत्याही महाविद्यालयातील खालील विषयांतील  विद्यार्थी अथवा शिक्षक अर्ज करू शकतात.
१ ) कृषी
) पदार्थविज्ञान
३) रसायन शास्त्र 
४) जैविकविज्ञान 
५) गणित 
६) अभियांत्रिकी व संगणकशास्त्र
७) भूशास्त्र 
  
           विद्यार्थ्यांसाठी संस्थांनी तशी कोणतीच आवश्यक पात्रता जाहीर केलेली नाही. मात्र  शक्यतो पदवीच्या अगोदरच्या वर्षात शिकत असलेलेल्या  विद्यार्थ्यांचा
(Pre-final year students of degree) या उपक्रमाला जास्त प्रतिसाद असतो हे दिसून येते. उदा. बी.एस्सीच्या द्वितीय किंवा एम.एस्सीच्या  प्रथम वर्षातील अथवा अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षातील विद्यार्थी ह्या पाठ्यवृत्तीसाठी प्रामुख्याने अर्ज करू शकतात. याचे प्रमुख कारण म्हणजे पदवी संपताना या विद्यार्थ्यांना ह्या  पाठ्यवृत्तीअंतर्गत पूर्ण झालेला प्रकल्प त्यांच्या महाविद्यालयाला सादर करता येतो.

अर्ज प्रक्रिया:

            अर्ज संस्थांच्या वेबसाईटवर दिलेल्या विहित नमुन्यात ऑनलाईन भरायचा आहे. ऑनलाईन अर्ज वरील तिन्ही संस्थांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. (लेखाच्या शेवटी वेब साईट्सची यादी दिलेली आहे). अर्जाबरोबर अर्जदाराचा बायोडाटा व अर्जदाराला जे संशोधन करायचे आहे त्याचे २५० शब्दांत संक्षिप्त वर्णन (Write Up) पाठवावे लागते. सोबत अर्जदाराला ज्या गाईडबरोबर संशोधन करायचे आहे त्याचे नाव पाठवावे लागते. तिन्ही संस्थांशी संलग्नित सर्व गाईड्सची व त्यंच्या संबंधित विषयांची यादी कॅडमिक्सच्या वेबसाईटवर दिलेली आहे. तसेच भरलेल्या अर्जाची प्रिंट घेऊन ती संस्थेला पुन्हा स्पीड पोस्टाने पाठवायची आहे. त्या बरोबर अर्जदार विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित विषयातील एका प्राध्यापकाचे शिफारस पत्र  (Recommendation Letter) बंद लिफाफ्यात संस्थेकडे पाठवावे लागेल. हे पत्र विद्यार्थ्याने न पाठवता संबंधित प्राध्यापकाने थेट संस्थेकडे पाठवायचे आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Coordinator, Science Education Programme, Indian Academy of Sciences, C.V. Raman Avenue, Near Mekri Circle ,Sadashivanagar, Bangalore 560 080. 

निवड प्रक्रिया:

            पाठ्यवृत्तीसाठी निवड झालेल्या अर्जदाराला शक्यतो मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कळवले जाते. यामध्ये त्याला विषयाशी संबंधित संशोधन संस्था व त्याला कॅडमिक्सने दिलेल्या शास्त्रज्ञाची (गाईड) माहिती असते. एकदा मिळालेली संशोधन संस्था व गाईड बदलता येत नाहीत. निवड झालेल्या विद्यार्थी अर्जदाराला रु.६०००/- प्रतिमहिना तर शिक्षक अर्जदाराला रु.९०००/- प्रतिमहिना पाठ्यवृत्ती दिली जाते. तसेच रेल्वेचे द्वितीय श्रेणीचे  येण्या-जाण्याचे भाडे दिले जाते. तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यावर संस्थेचे विज्ञान मासिक ' रेझोनन्स ' दर महिन्याला मोफत पाठवले जाते.

शेवटची मुदत: 
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची मुदत दि. ३१ डिसेंबर,२०१०आहे. तर त्याच अर्जाची प्रिंट काढून ती स्पीड पोस्टाने पाठवण्याची शेवटची मुदत ७ जानेवारी, २०११ आहे.  
 
महत्वाच्या वेब साईट्स: 
www.ias.ac.in

                

                                                      - प्रथमेश आडविलकर 






वरील लेख दि.०९/१२/२०१० च्या दै.लोकसत्तातील " करिअर काऊन्सेलर " या पुरवणीसाठी लोकसत्तामध्ये (http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=123660:2010-12-21-20-00-27&catid=103:2009-08-05-07-14-08&Itemid=116) ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी प्रकाशित केला. त्याबद्दल त्यांचे आभार !
          


दै.सकाळमध्ये दि. २२/१२/२०१० च्या पुणे टुडे च्या " एज्यु मंत्रा " पुरवणीमध्ये (http://72.78.249.107/Sakal/22Dec2010/Normal/PuneCity/PuneToday/page5.htm) प्रकाशित झाला
.
  




Comments

Popular posts from this blog

दुर्गा भागवतांचं लेखन: भाग २ ( ऋतुचक्र )

जागृती यात्रा भाग ११: हरितप्रदेशातून..

उद्योगविश्वातला तारा..