ब्लॉंगायन...?

         आज बऱ्याच दिवसांनी माझं ब्लॉंगायन परत एकदाचं सुरु होतयं. मध्यंतरी कामाच्या व्यस्ततेमुळे ब्लॉगकडे ढुंकूनही बघता आले नाही आणि याची दररोज मनात खंतदेखील असायची. मध्यंतरीच्या या काळात प्रवासही भरपूर झाला, मनासारख्या व मनाविरुद्ध घटनाही अनेक घडल्या. त्यामुळे ब्लॉगसाठी बरेचसे विषय मनात दाटले होते पण मोकळा वेळ व कामाचा व्यस्तपणा हे यावेळी एकमेकांच्या व्यस्त मात्रेत ( inversaly proportional to each other ) होते. त्यामुळे मनातले ब्लॉग मनातच राहिले. भिरभिर पडणारा पाऊस, 'पीएमटी'तली गर्दी व त्यातली भांडणे, पावसातला चहा व गरम भजी, नुकताच सुरु होणारा श्रावण, पांढरा व तांबडा रस्सा, 'सिम्बी'चे थेऊर प्रकरण असे एक ना अनेक विषय, उद्या-परवा कधीतरी ब्लॉग लिहू म्हणून डायरीत टिपून ठेवत होतो. त्यातच 'महेंद्र'जींच्या एका पूर्वीच्या ब्लॉगवरील 'ब्लॉगरने आठवड्यात कमीत कमी चार ब्लॉग तरी लिहावेत' ही सूचना सारखी आठवायची पण ब्लॉग न लिहिणं व स्वत:च्या आळशीपणाची लाज वाटणं याखेरीज काहीही करत नव्हतो. आज शेवटी त्या निर्लज्जपणाचीच थोडीशी लाज वाटली व काहीतरी लिहायचं म्हणून पेन हाती घेतलं.
     
          कामाच्या या व्यस्तपणात दोन-तीन पुस्तकं, शनिवार- रविवारच्या पुरवण्या, व घरी येणारी काही मासिके वाचून काढलीत. वाचलेली प्रमुख पुस्तकं म्हणजे चेतन भगतचं 'टू स्टेट्स' व श्रीनिवास ठाणेदारांचं ' ही 'श्री'ची इच्छा'. या दोन्ही पुस्तकांबद्दल बरचसं ऐकलं होतं. विशेषत: ठाणेदारांचं पुस्तक या अगोदर एकदा वाचायला सुद्धा घेतलं होतं, पण कुठं माशी शिंकली कुणास ठाऊक? त्यावेळी ते जेमतेम पंचवीस-तीस पानांच्या पलीकडे जाऊ शकलं नाही. यावेळी मात्र ते एक-दोन बैठकीतच वाचून काढलं. दोन्ही पुस्तकं ठीक वाटलीत, म्हणजे " नाद खुळा..!! " किंवा " जबरदस्त.." म्हणण्याजोगं एकही वाटलं नाही हे यांचं साम्यस्थळ. चेतन भगतकडे काहीच नाविन्य वाटलं नाही. कथा ओढत नेल्यासारखी वाटतेय. पुस्तकात व स्वत:च्या वेब-साईटवरही त्यानं ही कथा कितपत त्याची आहे हे वाचकांनी ठरवायचं असं सांगून उगीचच भाव खाण्याचा व चर्चेत राहून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केलाय हे स्पष्टपणे दिसतंय. बाकी लेखन ठीकाय. कथेतली सुसूत्रता उत्तम आहे. कथा अनेक ठिकाणी घडत असूनसुद्धा त्यात तुटकपणा जाणवत नाही, हे त्याचं यश.


         दुसरं पुस्तक म्हणजे ठाणेदारांचं ' ही 'श्री'ची इच्छा'. मराठी माणूस व त्याची अमेरिकेतील प्रगती ह्याभोवती हे लेखन फिरतंय. पुस्तक तसं ठीक आहे. ठाणेदारांचा प्रवास उल्लेखनीय आहे, यात शंकाच नाही. पण पुस्तकात अधेमध्ये काहीतरी रिकामेपण जाणवते. ते रिकामेपण नेमकं कसलं आहे हेच बऱ्याचदा कळत नाही. म्हणजे उदा. त्यांचं मुंबईतलं जीवन त्यांनी योग्य रेखाटलंय. त्यामानाने त्यांच्या बेळगावातल्या पूर्वायुष्याबद्दल खूपच कमी माहिती पुस्तकात दिलेली आहे. अमेरिकेतल्या जीवनाचे काही प्रश्न अनुत्तरीत आहेत असं वाटतंय.        सुरेश भटांचा एक कवितासंग्रह वाचायला घेतलाय " रंग माझा वेगळा .." मस्तच ! ' रंगुनी रंगात साऱ्या... ', ' मागता न आले म्हणुनी राहिलो मी भिकारी ' यांसारख्या अनेक कविता " लई भारी " वाटल्या.

       थोडासा वेळ काढून फोटोग्राफीही केली. बाकी रविवार वगळता इतर दिवसांची वर्तमानपत्रे फक्त चाळलीत. गेल्या महिन्याभरात फिरायला बाहेर कुठं जाण्याचा योगही आला नाही. यापेक्षाही मोठ्ठ दु:ख  म्हणजे ' राजनीती' पासून ते ' वन्स अपॉन अ टाइम..' पर्यंत एकही चित्रपटाला जाता आलं नाही.

          थोडक्यात काय, हळूहळू आता थोडा-थोडा वेळ मिळत जाईल असं वाटतंय. डोक्यात गर्दी करून असलेले थोडेफार व काही नवीन विषय घेऊन पुन्हा एकदा नव्या जोमानं ब्लॉगायान सुरु करायला हरकत नाही. आजच्या या ब्लॉगायानामुळे पुस्तकांची असो वा नसो मात्र ब्लॉगची व स्वत:ची गेल्या महिन्याभरातली थोडीफार समीक्षा झाल्यासारखं वाटतयं.Comments

  1. इतके सगळे विषय एकाच पोस्ट मधे संपवलेत का? जरा इस्कटूनलि्वायचं नां..
    आणि हो मी कोल्हापूरला येणार आहे बहुतेक पुढल्या आठवड्यात.. :) भेटू या जमलं तर!

    ReplyDelete
  2. धन्यवाद महेंद्र काका. हो मी जर कोल्हापूर मध्ये असेन तर तुम्हाला नक्की भेटीन.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

एक प्रयत्न -गांधीजींना उलगडण्याचा.

मिसकॉल..

यशवंतराव.. (भाग १)