यशवंतरावांची दिल्ली कारकीर्द (भाग २).

    यशवंतरावांनी केंद्रात संरक्षण, परराष्ट्र, गृह, अर्थ इ. महत्वाच्या खात्यांसह देशाचं उपपंतप्रधानपद आदी विविध पदे भूषवलीत हे खरं व ही सारी पदे भूषवणारे यशवंतराव हे पहिलं मराठी व्यक्तिमत्व हेही तेवढंच खरं. पण नाण्याची ही एक बाजू झाली. यशवंतरावांच्या दिल्ली कारकिर्दीला दुसरी एक बाजू होती, जी खूप कमीजणांना माहित असेल. यशवंतराव दिल्लीसाठी नेहमीच होते. पण दिल्ली त्यांच्यासाठी नव्हती. यशवंतरावांनी दिल्लीला आपलं सर्वस्व दिलं पण दिल्लीनं त्यांना कधीच आपलंसं करून घेतलं नाही. अर्थात खुद्द यशवंतरावही याला बरेचसे जबाबदार होते.

      १९६२ साली चीनच्या आक्रमणानंतर केंद्रात नेहरूंना कणखर संरक्षणमंत्र्याची गरज भासू लागली. म्हणून यशवंतरावांना नेहरूंनी केंद्रात बोलवून घेतले. यशवंतरावांची दिल्ली कारकीर्द आरंभीच्या १० वर्षांत त्यांची लोकप्रियता व देशातील मान्यता वाढविणारी ठरली. या काळात महाराष्ट्राच्या राजकारणावरही त्यांची पकड घट्ट राहिली. राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर कोणीही असले तरी सत्तेची खरी सुत्रे त्यांच्याच हातात राहिली. १९६३ मध्ये कन्नमवारांच्या मृत्यूनंतर बाळासाहेब देसाईंसारख्या अनेक मातब्बर मराठा नेत्यांना बाजूला सारून त्यांनी विदर्भातील बंजारा जातीच्या वसंतराव नाईकांना दिले. आपल्या मागेही महाराष्ट्र आपल्या ताब्यात राहील अशी व्यवस्था त्यांना करायची होती आणि आपल्या सर्वंकष अधिकाराला आव्हान देउ शकेल असा माणूस त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसवायचा नव्हता. व त्यांनी ते केले. वसंतराव नाईक हे कुशल प्रशासक व मनमिळावू होते मात्र स्वत:चे सामर्थ्य वाढविणे किंवा त्यासाठी कोणाशी स्पर्धा करणे हा त्यांचा स्वभाव नव्हता. स्वाभाविकपणे, यशवंतराव दिल्लीत बसूनही वसंतरावांमार्फत महाराष्ट्र आपल्या हाती राखू शकले.

     नेहरुंच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या राजकारणातही बदल होत गेले. इंदिरा गांधींना नमविण्याच्या जुन्या काँग्रेस श्रेष्ठींच्या प्रयत्नातून सिंडीकेट काँग्रेस नावाची इंदिराविरोधी आघाडी उभी राहिली. त्या आघाडीने संजीव रेड्डींना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली. तिला आरंभी इंदिरा गांधींनी पाठींबा दिला व यशवंतरावही रेड्डीसमर्थक बनले. पुढे सिंडीकेटला शह द्यायला इंदिरा गांधींनी व्ही.व्ही.गिरी यांची उमेदवारी पुढे रेटून "विवेकाचा कौल देईल" तसे मतदान करण्याचे खुले आवाहनच पक्षाला केले. यशवंतरावांची कोंडी व्हायला खरी सुरुवात इथूनच झाली. पक्षनिष्ठा म्हणत ज्यांच्यासोबत राहिलो ती माणसे मनाने, विचाराने, प्रकृतीने किंवा राजकीय भूमिकांखातरही आपली नाहीत आणि ज्या इंदिरा गांधींविरुद्ध आपण त्यांच्यात अडकलो त्या दीर्घकाळ राजकारणाचे नेतृत्व करणार आहेत हे त्यांना जाणवायला लागले. रेड्डी पडले, गिरी विजयी झाले. सिंडीकेट खचली आणि इंदिरा गांधी समर्थ बनल्या. त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले, संस्थानिकांचे तनखे थांबविले. यशवंतरावांनी या पुरोगामी पावलांचे स्वागत करत गांधींची बाजू नव्याने उचलून धरली. ७१ ची निवडणूक आणि नंतरचा बांगला विजय यांनी इंदिरा गांधींचे रुपांतर एका विजयी देवतेत केले. हा विजयोन्माद १९७४ पर्यंत टिकला. त्यानंतर जे.पींच्या "संपूर्ण क्रांती"ने  प्रथम गुजरात मग बिहार व पुढे सारा देश ढवळून काढायला सुरुवात केली. ५ जून १९७५ या दिवशी अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवून त्यांना सहा वर्षे निवडणूक लढवता येणार नाही असा निकाल दिला. आणि इथे खरी ठिणगी पेटली...
          
    यावर मात करायची तर घटना बाजूला सारणे हा एकमेव उपाय इंदिरा गांधींसमोर होता. २५ जूनला इंदिराबाईंनी देशात अंतर्गत आणीबाणी लागू करून नागरिकांचे मुलभूत अधिकार गोठवले आणि जे.पींसह मोरारजी देसाई, जगजीवनराम, चंद्रशेखर, धारिया हे लोकशाहीचे सारे विरोधक तुरुंगात डांबले. स्वातंत्र्य, समता, न्याय, लोकशाही आणि नीतिधर्म ही सगळी मुल्ये एका बाजूला आणि हुकुमशाही, सत्ता, नागरी अधिकारांचे दमन व इंदिरा गांधींची एकाधिकारशाही दुसऱ्या बाजूला होती. देशाने व सर्व भारतीय जनतेने आपली बाजू निश्चित केली होती. आता यशवंतरावांना यातील एक बाजू निवडायची होती. हा क्षण यशवंतरावांच्या परीक्षेचा होता.यशवंतराव मूल्यनिष्ठतेचा आग्रह धरणारे नेते असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे डोळे लागले होते.

                 ... यशवंतरावांनी इंदिरा गांधींची बाजू घेतली.

     आणि इथे यशवंतरावांचा मूल्यांशी असलेला संबंध संपला. यानंतर सत्तेला चिकटून राहणारा व फक्त पोपटपंची किंवा हांजी हांजी करणारा नेता अशी प्रतिमा त्यांना कायमची चिकटली. यात त्यांनी खूप काही गमावले. नंतरच्या काळात ते सत्तेत राहिले, मोठी पदे त्यांच्या वाट्याला आली, ते देशाचे उपपंतप्रधानही झाले...पण ते पूर्वीचे यशवंतराव राहिले नव्हते. अनुयायांच्या मनात व जनतेच्या दृष्टिकोनात त्यांची प्रतिमा लहान व दयनीय होऊन ढासळली होती.

     यशवंतरावांना त्यांनी मोजलेल्या या किमतीचे मोल कळत होते पण, ज्या पक्षात हयात घालविली त्यासोबत ते शेवटपर्यंत निष्ठावंत राहिले. तडजोडवादी, पडखाऊ, लाचार असली सगळी विशेषणे त्यांनी या काळात अंगावर घेतली. हा माणूस आपल्याला सोडून जाणार नाही याची खात्री पटल्यानंतर इंदिरा गांधी आणि दिल्लीतल्या इतर पुढाऱ्यानीही त्यांना गृहीत धरायला सुरुवात केली. आपले निर्णय त्यांना सांगायचे व त्यांची त्या निर्णयांना संमती असणारच असे समजायचे असाच प्रकार पुढे चालू राहिला.या काळात महाराष्ट्रातील राजकारणही त्यांच्या हातून सुटत गेले व ते तसे सुटत राहील अशाच कारवाया दिल्लीतून चालू ठेवल्या गेल्या. नाईकांनंतर म्हणूनच मुख्यमंत्री म्हणून शंकरराव चव्हाणांना दिल्लीच्या वरदह्स्ताने आणण्यात आले. नंतरच्या काळातही शरद पवारांनी जेव्हा राज्यात वसंतदादांविरुद्ध बंड पुकारून त्यांना पायऊतार व्हायला लावले व जनता पक्षाच्या मदतीने मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली तेव्हा "आपण हे यशवंतरावांच्या सल्यानुसारच करत असल्याचे" चित्र काहीएक न बोलता त्यांनी उभे केले. यशवंतरावांची अडचण ही की पवारांच्या त्या काँग्रेस सोडण्याच्या काळात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांच्याकडेच होते. स्वाभाविकच, तुम्ही पक्षाध्यक्षपदावर असताना तुम्हीच वाढवून मोठा केलेला कार्यकर्ता पक्षाबाहेर पडतोच कसा, असा संशयचिन्हांकित प्रश्न त्यांना विचारला गेला.त्यांच्या जवळ त्याचे खरे उत्तर होते; पण् त्यावर 'दिल्ली'चा विश्वास बसणार नव्हता आणि ज्यांनी त्यांना न विचारता पक्षाविरूद्ध बंड केले होते त्यांच्याशी आपले सर्व संबंध तोडून टाकणे हा यशवंतरावांचा स्वभाव नव्हता. परिणामी, महाराष्ट्र हातात नाही आणि दिल्लीत विश्वास नाही अशा अघांतरी अवस्थेत ह्या थोर नेत्याचे राजकारण जाऊन पोहोचले. विचारवंत, पत्रकार आणि तत्त्वनिष्ठ म्हणवणाऱ्यानी आणीबाणीच्या काळातच त्यांना आपल्या विचारातून वजा केले होते. सारेच विरोधात वा संशयाने पाहणारे आणि विश्वासाने जोडलेली माणसे आपली न राहिलेली अशी एकाकी, विचित्र व प्रचंड दयनीय अवस्था त्यांच्या वाट्याला आली होती.

   चरणसिंगांच्या मंत्रिमंडळात ते उपपंतप्रधान होते, पण ते पद इंदिरा गांधींनी एक खेळी म्हणून त्यांना घ्यायला लावले होते. चरणसिंग सरकारवर विश्वास दर्शवण्याची वेळ आली तेव्हा त्याला दिलेला पाठिंबा इंदिरा गांधींनी काढून घेतला. त्यात यशवंतरावांचे उपपंतप्रधानही गेले. १९८० च्या निवडणुकीत  इंदिरा गांधींच्या नेतृत्वातल्या काँग्रेसने स्वबळावर सत्ता हस्तगत केली. पण त्याचबरोबर काँग्रेस व इंदिरा गांधींना यशवंतरावांचा असलेला उरलासुरला उपयोगही संपला. त्यानंतरचा काळ यशवंतरावांनी नुसती वाट पाहण्यात काढला. पंतप्रधानांचे बोलावणे आले तर जायचे, विचारलेला सल्ला द्यायचा आणि परत आपल्या एकांतात गढायचे. याच काळात वेणूताईंच्या निधनाने त्यांना जवळपास मृतवतच केले. अशा अवस्थेतच त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करावे लागले. ज्या माणसाने महाराष्ट्राची सर्वार्थाने सर्व क्षेत्रांतील पायाभरणी केली, महाराष्ट्राच्या भावी वाटचालीची दिशा निश्चित केली, त्या यशवंतरावांजवळ त्यांच्या अखेरच्या काळात कोणीही नव्हते. त्यांच्या अखेरच्या दिवसांत महाराष्ट्रातला एकही नेता त्यांना बघायला अथवा भेटायला गेला नाही. तशाच अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला. या महान माणसाचा असा शेवट ही एक दुर्दैवी शोकांतिका आहे.

     यशवंतरावांच्या अशा शोकांतिकेची मीमांसा कशी करता येईल? त्यांची अतिरिक्त पक्षनिष्ठा त्यांच्या पडझडीला कारण ठरली म्हणणार की त्यांनी आपली म्हणून जवळ केलेल्या माणसांनी त्यांचा केलेला विश्वासघात या साऱ्याला कारणीभूत ठरवणार? प्रत्येकाची या प्रश्नांची उत्तरे वेगवेगळी असतील. इथं मग काहीजण यशवंतरावांनादेखील दोष देतील पण एक गोष्ट इथे मात्र लक्षात ठेवावी लागेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद चारवेळा व केंद्रातील चार महत्वाची मंत्रीपदे भूषविलेल्या आणि अखेर उपपंतप्रधानपदासारख्या मोठ्या पदावर राहिलेल्या या माणसाने दिल्लीत स्वतःचे घर बांधले नाही की पुण्यामुंबईसारख्या एखाद्या शहरात एखादा फ्लॅट घेतला नाही. डझनांनी साखर कारखाने उभारणाऱ्या या नेत्याच्या नावावर एक एकरही जमीन नव्हती. महाराष्ट्राच्या उभारणीची पायाभरणी करणारा आणि आपल्या असामान्य कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्राला त्याची नवी ओळख मिळवून देणारा लोकमान्यांच्या नंतर हा महाराष्ट्रातला हे एकमेव महानेता होता, हे महाराष्ट्राला कधी विसरता येणार नाही.

                                                                           
                                                                       (समाप्त) 

संदर्भ: लोकराज्य , मार्च २०१२.


  







Comments

Popular posts from this blog

यशवंतराव.. (भाग १)

दुर्गा भागवतांचं लेखन: भाग २ ( ऋतुचक्र )

जागृती यात्रा भाग २: यात्रेबद्दल थोडसं..