जागृती यात्रा भाग ९ : गाथा 'ग्रामविकासा'ची.


      दक्षिणेतून ट्रेनने उत्तरेत शिरकाव केला. भौगोलिक बदलांनुसार साहजिकच वातावरणात गारवाही हळूहळू वाढत चालला होता. पहाटेच आम्ही ओरिसातील जगन्नाथपूर स्टेशनवर उतरलो. धुक्याने दाटलेल्या जगन्नाथपूरातून वाट काढत बसेसपर्यंत पोहोचलो. सर्व यात्रींना घेवून बसेसनी बहरामपूराकडे प्रयाण केले. बहरामपूरातील 'जो मडीएथ' यांच्या 'ग्रामविकास' या संस्थेला आज भेट द्यायची होती. ग्रामविकासमध्ये 'जो'चं भाषण, त्याच्याशी संवाद त्यानंतर दुपारचं जेवण व नंतर केस स्टडी असा एकदम भरगच्च कार्यक्रम होता. ग्रामविकासला पोचल्यानंतर लगेचच कार्यक्रमास सुरुवात झाली. 'जो' हा मूळचा केरळातल्या कांजीरपल्ली या गावचा. मद्रास विद्यापीठात शिकत असताना अभ्यासेतर कार्यक्रमांत आघाडीवर असलेला 'जो' मद्रास विद्यापीठाच्या स्टूडंटस् युनियनचा अध्यक्ष न बनेल तरच नवल. याच काळात 'जो'ने Young Students Movement for Development (YSMD) ची स्थापना केली. ७०चं दशक हे अस्वस्थतेचं दशक होतं. आफ्रिका, द.अमेरिका, व्हिएतनाम आदी ठिकाणी युवक चळवळींनी जोर पकडला होता. भारतातसुद्धा त्याची ठिणगी कुठे न कुठेतरी पडतच होती. काहीतरी करायचं या ध्येयाने पछाडलेल्या 'जो'ने एक वेगळं साहस म्हणून याच काळात एक वर्षभर सायकलवरून तेव्हा भारत, नेपाळ व बांगलादेश हे तीन देश पिंजून काढले होते. माणसातला परकेपणा अनोळखी असेपर्यंत असतो; ओळख झाली की आपुलकी निर्माण होते, प्रेम निर्माण होतं, तिथे मग जात,धर्म वा देश अशा कोणत्याच सीमा आड येत नाहीत हे 'जो'ला या संपूर्ण प्रवासात जाणवलं. आणि म्हणूनच की काय 'जो' १९७१ च्या बांगलादेश मुक्ती संग्रामातील बांगला शरणार्थींच्या रिलीफ कॅंप्समध्ये काम करायला YSMDच्या ४०० युवकांसहित आला होता. नंतरच्या काळात मग 'जो'ने नैसर्गिक आपत्तीमुळे हैराण झालेल्या ओरिसात काम करायला सुरुवात केली आणि त्यातूनच १९७९मध्ये इथे 'ग्रामविकास'चा जन्म झाला. 
 
ओरिसातील आदिवासींमध्ये लग्नानिमित्त भिंतीवर रेखाटलेलं एक चित्र
      ग्रामविकास ही एक सामाजिक संस्था आहे. जो मडीएथ हे ग्रामविकासचे कार्यकारी संचालक आहेत. सध्या ग्रामविकास मध्ये एकूण ५०० कर्मचारी कार्यरत आहेत. ग्रामविकास अनेक क्षेत्रांत काम करतंय- बायोगॅस, ड्रीप इरिगेशन, शौचालय व्यवस्था, पाणी, स्वच्छता, शिक्षण, महिला सशक्तीकरण  इत्यादी. ग्रामविकास ही पूर्णपणे बहिस्थ आर्थिक निधीवर अवलंबून असलेली संस्था आहे. आदिवासी क्षेत्र असल्यामुळे कामांसाठी लागणारा बराचसा निधी ग्रामविकासला भारत सरकारकडून दिला जातो. काही आंतरराष्ट्रीय संस्थांकडूनही निधी मिळतो. ग्रामीण भागातील पाणी व स्वच्छतेशी संबंधित योजना अचूक राबवल्या जाव्यात यासाठी बऱ्याचदा ही कामे शासनाकडून ग्रामविकासला आउटसोर्स केली जातात. ग्रामस्थांचं १००% सहकार्य ही ग्रामविकासच्या आजपर्यंतच्या कामांची पावती राहिलेली आहे. छोटया गावांतूनही २४ X ७ पाणी उपलब्ध करून देणे हे ग्रामविकासचं सर्वात मोठं यश आहे असं मला वाटतंय. 'जो'च्या भाषणानंतर एका मुलगीने त्याला छान प्रश्न विचारला होता की आदिवासींसाठी शिक्षण हा महत्वाचा मुद्दा असताना तुम्ही काम करायला पाणी व स्वच्छता असे वेगळे विषय का निवडले? 'जो'ने उत्तरही तेवढेच सुंदर दिले होते " पूर्वी जेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा पाहिलं तर आदिवासी बायका ६-७ किलोमीटर लांब असलेल्या अंतरावरून पाणी आणायच्या. इथंल्या आदिवासींच्या प्रथेप्रमाणे पुरुष कधीच पाणी आणत नव्हते. मग एका खेपेत जास्त पाणी आणता यावं म्हणून त्या पोरांना शाळेत पाठवण्याऐवजी पाणी आणायला न्यायच्या. पोरांचा सारा दिवस शाळेबाहेर जायचा आणि दिवसातील १४-१५ तास बायका फक्त पाणी आणण्यातच घालावयाच्या. आता हे चित्र बदललंय. २४ तास पाणी उपलब्ध झाल्याने मुला-मुलींची शाळेतील उपस्थिती चांगली आहे.तसेच त्यांच्या आयांनाही आता इतर कामे करण्यासाठी वेळ मिळत आहे."  ग्रामविकासच्या या निर्भेळ यशामुळे अनेकदा गावांनी शासकीय किंवा ग्रामविकासच्या आर्थिक मदतीवर न अवलंबून राहता स्व-वर्गणीतून गावातील कामे केलेली आहेत. ग्रामविकासच्या प्रयत्नाने बचत गटांची चळवळसुद्धा सुरु झालेली आम्हाला दिसली. आदिवासी खेड्यांत अनेक स्त्रियांशी संवाद साधता आला. काही  स्त्रिया आता राजकारणाच्या माध्यमातून विकास कार्यात स्थिरावताहेत. आदिवासींच्या घरी पूर्वी शौचालय काय बाथरूम्ससुद्धा नसायचीत. ग्रामविकासने इथं आल्यावर याबाबतीत  स्त्रियांना, पहिल्यांदा शौचालय व मग बाथरूम्सबद्दल जागरूक केले. पारंपारिक मानसिकतेमुळे सुरुवातीलादेखील स्त्रिया शौचासाठी शौचालयात जायला संकोच करायच्या. पण ग्रामविकासच्या सातत्यपूर्ण जागृतीने शौचालय-बाथरूम्सचं हे प्रस्थ आता ओरिसात इतकं फैलावलंय की मुली होणाऱ्या नवऱ्याच्या घरी जर शौचालय-बाथरूम असेल तरच  लग्नाला तयार होतात.
ग्रामविकासने त्यांच्या कामांची लावलेली ओरिया भाषेतील ही यादी.
     
       'जो' म्हणतो की खेड्यांत काम करताना माझं एक तत्व आहे ते म्हणजे पहिल्यांदा इथंल्या लोकांचा विश्वास जिंका व मग कामाला सुरुवात करा. त्यामुळेच अजूनही नव्या खेडयात  काम करताना 'जो' तिथंल्या सर्व गावकऱ्यांकडे सहकार्य मागतो. अनेकदा काही गावांत एखादं घर जरी ग्रामविकासची योजना स्वीकारत नसेल तरी 'जो'ने ते काम सोडलेलं आहे. ८५% स्त्रोत वापरून जिथे शासकीय यंत्रणांनी फक्त १५ % बायोगॅसचे प्रकल्प उभे केले तिथे ग्रामविकासने उलटे प्रमाण म्हणजे १५ % स्त्रोत वापरून एकूण  ८५%  बायोगॅस उभारले आहेत. ओरिसातील ९४३ गावांत आतापर्यंत ग्रामविकासने एकूण सत्तर हजार शौचालये बांधून दिलेली आहेत. तरीसुद्धा हे काम अजून संपलेले नाही असे 'जो' ला वाटते. म्हणूनच तो खेदाने म्हणतो की 'India has more Cellphones than toilets.'

     ग्रामविकासनंतर केस स्टडीसाठी आम्ही तमन्ना,बटापल्ली, सिंदुरापूर व कांकीया या आदिवासी गावांना भेट दिली. तिथंल्या प्रकल्पांची माहिती द्यायला स्वत: 'जो' व ग्रामविकासचे काही कार्यकर्ते आले होते. गंजम जिल्ह्यातील या खेडयांत संपूर्ण कंद जमातीची आदिवासी लोकसंख्या आहे. डोंगरातील पाण्याचा साठा करून त्याचं प्रत्येक घरापर्यंत विजेशिवाय केलेले वहन थक्क करणारे होते. शाळा, ग्रंथालये, ग्रामपंचायत इत्यादी सार्वजनिक ठिकाणची शौचालये व मुताऱ्यांची स्वच्छता २४ तास पाणी असल्याने सुखावणारी होती. ग्रामस्थांच्या जबाबदाऱ्या व ग्रामविकासचे योगदान यांनी ग्रामीण स्वच्छतेचा चेहराच बदलला होता. तिथंल्या आदिवासी स्त्रियांशी आम्ही स्त्रीआरोग्य व बालआरोग्य संदर्भात चर्चा केली. घरातल्या पुरुषांशी रोजगार, शेती,  शिक्षण इत्यादी विषयांवर चर्वितचर्वण केले. तमन्नासारख्या ३३९ लोकसंख्येच्या गावात मोठे ग्रंथालय आहे हे बघून आनंद झाला. तिथले ग्रंथपाल श्री.भाग्य यांच्याशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली. दिवसाच्या शेवटी ग्रामविकासने बांधलेल्या एका शाळेत जावून तिथंल्या विद्यार्थ्यांबरोबर आम्हाला मिसळता आलं. अनेकांनी मग त्यांच्याबरोबर ओरिया लोकगीते म्हटली, त्यांच्या तालावर ताल धरत नाच केला. 

ग्रामविकासचे कार्यकर्ते यात्रींशी संवाद साधताना
          दिवस संपला तसं वर्षही संपलं. २०११ या वर्षाचा तो अखेरचा दिवस होता. दिवसभर मात्र आज ३१ डिसेंबर आहे हे कुठेच जाणवत नव्हतं. 'जो' ने आम्हाला व आम्ही ग्रामविकासला गुड बाय केला. सूर्यास्त झाला होता. बस परतीच्या प्रवासाला निघाली होती. नव्या वर्षात. मी डायरी उघडली. दत्ता हलसगीकरांच्या कवितेतील ओळी मला आठवल्या.
     
                        आभाळाएवढी ज्यांची उंची 
                        त्यांनी थोडे खाली यावे
                        ज्यांचे जन्म मातीत मळले
                        त्यांना वरती उचलून घ्यावे.  

     
                          

Comments

Popular posts from this blog

एक प्रयत्न -गांधीजींना उलगडण्याचा.

मिसकॉल..

यशवंतराव.. (भाग १)