जागृती यात्रा भाग ६ : 'अरविंद आय केअर'

     बेंगलोरमधून निघाल्यानंतर ट्रेनने रात्रीच्या प्रवासात कर्नाटक, आंध्रप्रदेश ह्या राज्यांच्या सीमा पार करत पहाटेच कधीतरी तमिळनाडूत प्रवेश केला. दररोज सकाळी उठण्यासाठी आम्हाला ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून सूचना दिली जायची. आज मला त्याच्याही अगोदर जाग आली. प्रातर्विधी व अंघोळ उरकल्यानंतर खिडकीशेजारी येऊन बसलो. बाहेर दिसणारे तमिळ फलक, गावातल्या घरांची ती विशिष्ट रचना, गर्द हिरवळीनं बहरलेली भोवतालची सुपीक शेतं, घराभोवती एका ओळीत उभी असलेली नारळाची झाडे, हिरव्यागार गवताचं पसरलेलं लांबसडक कुरण व त्यात चरणाऱ्या गायी, नुकत्याच पडलेल्या सोनेरी उन्हात चमकणाऱ्या केळीच्या बागा असं डोळ्यांचं पारणं फेडणारं विलोभनीय दृश्य दिसत होतं. खिडकीबाहेरचा दिसणारा हा एवढा सुंदर नजरा व हलक्याश्या थंडीच्या या सौंदर्यात भर टाकायला लगेच आलेलं गरमागरम उप्पीट,ब्रेडजाम व वाफाळलेली कॉफी... अहाहा! खरंच आनंदाचा हा क्षण हातातून कधीच निसटू नये असं मनोमन वाटत होतं. आपल्या आयुष्यतले क्षण पकडून ठेबता आले असते तर? असा एक कवीकल्पनेतील विचार माझ्या मनात पटकन उमटून गेला. नाश्ता करत असतानाच मी कॅमेरा काढला व ते क्षण टिपण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागलो. शब्ददेखील अपुरे पडावेत असं हे निसर्गसौंदर्य थोडंच कॅमेराबद्ध होईल? हेलन केलरने किती मस्त म्हटलंय  "The most beautiful things in the world cannot be seen or even touched, they must be felt with the heart". मनातल्या मनात ही सर्व फिलोसोफी सुरु असतानाच थोडयाच वेळात मदुराई येईल, तयार रहा अशी अनाउन्समेंट झाली. गडबडीत सगळं आटोपलं व मदुराईची वाट पाहत दरवाजाजवळ जाऊन उभा राहिलो. 

    मीनाक्षी मंदिरामुळे मदुराईचं तसं मला पहिल्यापासून आकर्षण होतंच. मीनाक्षी मंदिरासाठी जगभर प्रसिद्ध असलेलं हे मदुराई पांड्य राजवटीच्या काळात राज्याची राजधानीचं शहर होतं. मीनाक्षी मंदिरासारखी द्राविडीयन शैलीतील अनेक प्रसिद्ध मंदिरे मदुराईत आहेत. त्यातली बहुतांश मंदिरे ही पांड्य राजांनी बांधलेली आहेत. 'मदुराई'च्या या नावाबद्दल अनेक आख्यायिका आहेत. त्यातली एक प्रसिद्ध आख्यायिका अशी आहे की पूर्वी कधीतरी जेव्हा या नगराला नावच नव्हतं, तेव्हा नगराला नाव द्यायचं म्हणून नगराच्या मध्यभागी सर्व नगरवासी जमले. आता अशा महत्वपूर्ण सोहळ्यात देवाला कसं विसरायचं, म्हणून सर्वांनी त्याची प्रार्थना करायचं ठरवलं. नगरवासींच्या प्रार्थनेने भगवान शिव प्रसन्न झालेत व त्यांनी आशीर्वाद म्हणून आकाशातून सर्व नगरवासींवर मधाचा वर्षाव केला. या घटनेवरून या नगराला 'मधुरापुरी' हे नाव पडले व पुढे त्याचंच मदुराई झालं. आजदेखील मदुराईला कुडल मानगर (चार बंदरांच शहर), मल्लीगाई मानगर (मोगऱ्याचं शहर) आणि थुंगनगरम (कधीही न झोपणारं शहर) आदी नावांनी ओळखलं जातं. मदुराईत कोणी कधीही, कोणत्याही वेळी जावो, तो उपाशी परतणार नाही कारण दिवस व रात्रीच्या हरेक वेळी इथंल्या कुठल्या ना कुठल्या घरात काहीतरी खायचं बनतच असतं म्हणूनच या शहराला कधीही न झोपणारं शहर असं म्हटलं जातं. मदुराई स्टेशनवर उतरल्यावर तिथल्या अन्नानगरमध्ये असलेल्या अरविंद नेत्र रुग्णालयात (Aravind Eye Care) आम्हाला जायचं होतं. मदुराईतील रस्ते स्वच्छ आहेत पण त्यांच्या बाजूला लावलेल्या राजकीय 'अम्मा'च्या फ्लेक्सनी त्या रस्त्यांना अरुंद करून टाकले आहे. वाटेत, बाजारात, दुकानांत पांढरा सदरा व लुंगी या पेहरावातील 'अन्नां'चा भरपूर वावर दिसत होता. तमिळ लोकांचं चित्रपट वेड तर जगजाहीर आहे. मदुराईत काही घरांच्या भिंतींवर फिल्मस्टार्सची मोठी चित्रे रंगवलेली दिसत होती. चित्रांच्या खाली जाहिरातवजा एखादा शब्दही दिसत नव्हता. कदाचित हौस म्हणून घर मालकांनी ती चित्रे रंगवून घेतली असावीत. शहरातले बरेचसे फलक तमिळ व इंग्रजीमध्ये होते. संपूर्ण मदुराईत हिंदीचा अजिबात गंध नाही. नाही म्हणायला,परतीच्या वेळी आम्हाला रेल्वे स्टेशनवर हिंदी कवी मैथिलीशरण गुप्त यांच्या नावाने असलेली एक कुलुपबंद लायब्ररी दिसली. आपल्यासारखंच इथेही अनेक दुकाने,कॉलेज,व कन्या शाळांची नावे 'मीनाक्षी'पासून सुरु होताना दिसतील. भगवान शिवाच्या इच्छेनुसार इथल्या प्रत्येक दुसऱ्या मुलीचं नाव मीनाक्षी ठेवावं असंही मानलं जातं. 

     काही वेळातच आम्ही अन्नानगरातल्या 'अरविंद आय केअर'मध्ये पोहोचलो. अरविंद आय केअरच्या या तीन मजली नवीन वास्तूचं उद्घाटन माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या हस्ते १९९८ मध्ये झालं होतं. हे हॉस्पिटल १९७७ मध्ये डॉ.जी.वेंकटस्वामी यांनी सुरु केलं. तेव्हा ४ डॉक्टर्स व अकरा खाटांचं हे रुग्णालय आता डोळ्यांच्या सर्व सुविधा देणारं जगातलं सर्वात मोठं हॉस्पिटल बनलंय. डॉ.वेंकटस्वामींना प्रेमाने डॉ.व्ही म्हटले जायचे. डॉ.व्हीं'नी त्यांच्या हयातीत या हॉस्पिटलमध्ये एक लाखांहून जास्त डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या. डॉ.व्हीं'चा जन्म १९१८ साली तमिळनाडूमधील वदमलपूरम या गावी झाला. अमेरिकन कॉलेज मदुराई व स्टेनले मेडिकल कॉलेज मद्रास येथे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी १९४५-४८ पर्यंत भारतीय लष्करात वैद्यकीय सेवेत काम केले. नंतर त्यांनी शासकीय वैद्यकीय मदुराई रुग्णालयात ओप्थामोलॉजी विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहिले ते अगदी निवृत्तीपर्यंत. डॉ.व्हीं'नी तिथे भरपूर संशोधन केले. या पदावर २० वर्षे काम केल्यानंतर १९७७ मध्ये डॉ.व्ही निवृत्त झाले. मानवी जगण्यातून अंधत्वाचा अंधार नष्ट करायचा अशा उदात्त ध्येयाने पछाडलेला हा महामानव निवृत्तीनंतर आरामात वेळ काढत कसा बसेल? वयाच्या ५८ व्या वर्षी या 'तरुणा'ने अरविंद आयकेअरची स्थापना केली. योगी अरविंद यांच्या आध्यात्मिक शिकवणीचा डॉ.व्हीं'वरती प्रचंड पगडा होता. अरविंद आय केअरमध्ये हे प्रत्येक छोटया-मोठया गोष्टीत आढळतं. रुग्णालयाला त्यांनी दिलेलं नाव 'अरविंद' ते यामुळेच. डॉ. व्हीं'च्या अथक संशोधनातून साकार झालेल्या वैद्यकीय साधनांतून मोतीबिंदूवर कमीत कमी खर्चात शस्त्रक्रिया करता येई. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात वैद्यकीय सुविधा पोचवताना सरकारला प्रत्येकापर्यंत पोहोचता येणार नाही म्हणून 'अरविंद'सारखी अनेक केंद्रे असायला हवीत असं त्यांना वाटायचं. 

मदुराईतल्या 'अरविंद आय केअरमध्ये  
     सोशल आंत्रप्रीनरशीप कोळून प्यालेल्या 'अरविंद'चं आर्थिक प्रतिरूप (Financial Model) बरचसं वेगळं आहे. गरीब रुग्णांना मोफत उपचार देतानाच मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय हॉस्पिटलपासून दुरावले जाणार नाहीत याची हॉस्पिटल काळजी घेते. पण त्याच वेळी अगरीब रुग्णांच्या उपचारासाठी गरीब रुग्णांना दिल्या जाणाऱ्या एकूण सेवेच्या दर्जात कोणतीच तडजोड होणार नाही याचीही काळजी घेतली जाते. अगरीब रुग्णांकडून मिळणाऱ्या पैशांतून एकूण गरीब रुग्णांपैकी ४०% रुग्णांचे उपचार केले जातात. तसेच 'अरविंद'मधून तयार होणाऱ्या लेन्सेस, सुया, सर्जिकल ब्लेड्स इत्यादी वैद्यकीय साधनांची सुमारे १२० देशांना निर्यात केली जाते. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून अनेकानेक गरजू रुग्णांचे अल्प किमतीत किंवा मोफत उपचार केले जातात.नेहमीप्रमाणे आम्ही सर्वसामान्यांवर या प्रतिरुपाचा परिणाम (Case study of an Impact) तपासण्यासाठी मदुराईपासून २८ किमी एका गावात 'अरविंद'चं केंद्र होतं, तिथं गेलो. तिथला अनुभवही चांगला होता. 'अरविंद'ची उत्तम सेवा, गरजूंसाठी अल्पदरात उपलब्ध उपचार व सोबत असलेली अध्यात्मिक जोड यांमुळे फक्त मदुराईतच नव्हे तर संपूर्ण तमिळनाडूत 'अरविंद'बद्दल कसा विश्वास निर्माण झाला आहे हे तिथं पाहता आलं. डॉ.व्ही नेहमी त्यांच्या हॉस्पिटलची तुलना मीनाक्षी मंदिराबरोबर करायचे. २००६ मध्ये ते निर्वतल्यानंतर अजूनदेखील 'अरविंद' त्यांनी दाखवलेल्या वाटेवर आहे. डॉ.व्हीं'ची बहिण डॉ.नतचेअर, ज्या तिथे आता डॉक्टर आहेत, त्यांना आम्ही भेटल्यानंतर त्या म्हटल्या " पुढे 'अरविंद' असं असेलच हे खात्रीने कोणीही सांगू शकत नाही. इथे येणाऱ्या नव्या डॉक्टर्सवर ते अवलंबून आहे."
    
       मीन-अक्षी म्हणजे जिच्या डोळ्यांचा आकार माशासारखा आहे ती. मत्स्यासारखे सुंदर नेत्र लाभलेल्या देवी पार्वतीचं हे मीनाक्षी मंदिर २००० वर्षांपूर्वी मदुराईत वसलं होतं. आज त्याच मदुराईत 'अरविंद आय केअर' नेत्रसेवेच्या माध्यमातून गरीब-मध्यम वर्गीय गरजूंचं 'बघणं' सोपं करत आहे. सर्वसाधारणपणे एकेकाळी मंदिरातल्या देवाचा लवकर बरा होवो असा आशीर्वाद घेऊन रुग्ण दवाखान्यात भरती होत असे. पण 'अरविंद'मध्ये घेतलेल्या सुंदर नजरेकडून ते मंदिरात असलेल्या देखण्या नेत्रांकडे असा आज मदुराईतल्या रुग्णांचा प्रवास होतोय.

Comments

Popular posts from this blog

एक प्रयत्न -गांधीजींना उलगडण्याचा.

मिसकॉल..

यशवंतराव.. (भाग १)