दुर्गा भागवतांचं लेखन: भाग १
सध्या दुर्गा भागवतांचं '
भावमुद्रा ' नावाचं पुस्तक वाचतोय. ' भावमुद्रा ' मध्ये दुर्गाबाईंच्या
काही निवडक लघु निबंधांचा समावेश आहे. दुर्गाबाईंच्या एकूण साहित्यावर एक
ओझरती नजर जरी टाकली तरी आपल्या लक्षात येते की, बाई निसर्गवेड्या आहेत.
त्यांच्या निसर्गप्रेमाचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे त्यांचं ' ऋतुचक्र '.
'ऋतुचक्र' ने दुर्गाबाईंना तमाम मराठी वाचनवेड्या रसिकांच्या हृदयात
स्थान मिळवून दिलेलं आहे. दुर्गाबाईंबद्दल बोलायचं अथवा लिहायचं म्हटलं
तर निसर्गाचा उल्लेख ओघानंच येतो. निसर्गावर दुर्गाबाईंनी अतोनात प्रेम
केले. फक्त निसर्गावरच नव्हे तर निसर्गातल्या प्रत्येक पशु-पक्षी,
जीव-जंतुंवरती त्यांनी प्रेम केलं. निसर्गाचं, सृष्टीचं दर्शन त्यांनी अगदी
डोळे भरून घेतलेलं आहे. त्यातल्या पशु-पक्ष्यांचं व छोट्या जीव-जंतुंचं
जीणं बाईंनी लहान मुलाच्या डोळस कुतूहलानं टिपलेलं आहे. पशु-पक्ष्यांच्या,
जीव-जंतुंच्या बारीक-सारीक हालचालींचा अभ्यास त्यांनी अगदी निरागसपणे
केलेला आहे. त्यामुळेच दुर्गाबाई फक्त मोठे पशु-पक्षीच नव्हे तर फुलपाखरू,
विंचू, कुंभारमाशी, मुंग्या,गांधीलमाशी इ. कीटकांचे जगणे,खाणे, प्रणय व
प्रजनन यांविषयी अधिकाराने लिहू शकतात. दुर्गाबाईंचे सूक्ष्म निरीक्षण थक्क
करायला लावणारे आहे, ह्याची साक्ष यातला प्रत्येक निबंध वाचताना पानोपानी
मिळते.
' वात्सल्याचा आविष्कार ' नावाच्या निबंधात दुर्गाबाईंनी निसर्गातील विविध जीवांचे वात्सल्य व प्रणय प्रकट करण्याच्या तर्र्हाविषयी अत्यंत सुंदर लेखन केलेले आहे. सदर लेखात बाईंचे एक वाक्य आहे " विशेषत: प्रणयाच्या वेळी प्रकट होणारे प्राण्यांचे उत्कट मनोधर्म आणि तितक्याच पण वेगळ्या तर्हेने प्रकट होणारे अपत्यधर्म यांत कोणते अधिक मनोहर व गंभीर ते सांगणे कठीण असते ". खरंच! किती चिंतनपूर्वक हे वाक्य बाईंनी लिहिले असेल ? वर म्हटल्याप्रमाणे, बाईंनी, प्राण्यांचा उत्कट प्रणय बघितलाय तसेच त्या प्राण्यांनी पोटच्या पिला-बाळावर केलेले जीवापाड प्रेम देखील पाहिलेय. बाईंनी विंचवाच्या प्रणयाचे, आपल्याला कधी माहित देखील नसलेले, वेगळेच वर्णन या निबंधात एका ठिकाणी केलेले आहे. विंचवाच्या शृंगारात , प्रणयाच्या अगदी उत्कट क्षणी, मादी विंचूमध्ये काही बदल होतात. नराच्या तृप्तीच्या क्षणी (म्हणजे तो गाफील असताना), मादीमध्ये अचानक मातृभाव निर्माण होतो व त्या वात्सल्यापायी ती नराला मारून टाकते आणि (स्वत:च्या व पिलांच्या पोषणासाठी ) त्याचे भक्षण करते. वाचलं आणि अगदी थक्क झालो! बाईंच्या एवढ्या सूक्ष्म निरीक्षणाला मनापासून सलाम करावासा वाटला. विंचवाच्या बाबतीतल्या या सगळ्या घडामोडीचं (हो घडा आणि मोडीचं...) बाईंच्या शब्दात जसं आहे तसं खाली दिलंय.
इतर प्राण्यांच्या- पक्ष्यांच्या बाबतीतलं पिलांच्या संगोपनाचं असंच वर्णन दुर्गाबाईंनी तुलनात्मक रीतीने केलेलं आहे. त्यात मग मांजर,कुत्रा,गाय आदी पाळीव तर माकड, वाघ हे जंगली किंवा चिमणी,कावळा,कोकिळा इ.पक्षी यांचा संक्षिप्त उल्लेख आढळतो. आश्चर्य म्हणजे अगदी मुंग्या, मधमाश्या, गांधीलमाशी यांसारख्या कीटकांच्या वात्सल्याचा प्रकट साक्षात्कार दुर्गाबाईंनी त्यांच्या लेखणीने घडवलेला आहे. कुंभारीण माशीचं प्रणय-वात्सल्य या दोहोंचा आविष्कार विंचवासारखाच मनाला चटका लाऊन जातो. विविधरंगी सौंदर्याने सजलेल्या एका मादी फुलपाखराची प्रसूती व अखेर यांतल्या पुसत सीमारेषा लेखिकेने प्रचंड कौशल्याने दाखवलेल्या आहेत.
सभोवतालच्या निसर्गाचा ऱ्हास होत असतानाच आज ' सेव्ह टायगर' योजना राबवावी लागते. दुर्गाबाईंनी निसर्गातल्या हरेक घटकाचा - अगदी सूक्ष्म कीटकांपासून ते मोठ्या प्राण्यापर्यंत सर्वांचा तेवढ्याच संवेदनशीलतेने विचार केलेला होता. निसर्गातल्या ह्या साऱ्या जीवांचं हे रहस्यमय जगणं हेच दुर्गाबाईंच्या उर्जेच केंद्र होतं. आज बाई हयात नाहीत. पण आजदेखील भुंग्याचं गुणगुणणं असो वा मधमाश्यांचं फुलाभोवती भिरभिरणं असो; सारं पाहिल्यावर बाईंची प्रकर्षाने आठवण होते. कारण बाई फक्त संवेदनशील लेखिका नव्हत्या तर त्या अस्सल निसर्गप्रेमी होत्या.
Comments
Post a Comment