जागृती यात्रा भाग ११: हरितप्रदेशातून..
खिडकीतून बघताना चोहीकडे सगळं कसं हिरवंगार दिसत होतं. मनाने अलवारसा कौल दिला 'उत्तरप्रदेश' आलं. मुबलक पाणी, सुपिक मृदा आणि आपल्याकडे नसते तशी लांबसडक शेती - 'हरितप्रदेश' व्याख्येला या तीन गोष्टी पुरेशा आहेत. उत्तरप्रदेशात पूर्वांचल या नावाने प्रसिद्ध असणा ऱ्या प्रादेशिक विभागातलं देवरिया हे एक जिल्ह्याचं ठिकाण आहे. देवरियाची विशेष अशी काहीच ओळख नाही पण 'जागृती यात्रा' राबवणाऱ्या जागृती सेवा संस्थानचं हे माहेरघर. देवरियापासून तासाभराच्या अंतरावर असलेलं 'बरपार' हे शशांक मणी (जागृतीचे संचालक) यांचं गाव. स्टेशनवर उतरताच देवरियात 'जागृती'चं ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत झालं. तिथून मग लगेच आम्ही बरपारकडे पोहोचते झालो. अगोदर ठरल्याप्रमाणे 'बिझग्यान वृक्ष' (Bizgyan Tree) या स्वाध्यायासाठी आम्हाला बरपार व आसपासची दोन-तीन गावे पालथी घालायची होती. सर्व संघ मग एकत्र जमले. बिझग्यान ही स्वाध्यायाबरोबरच एकमेकांमध्ये स्पर्धाही असल्याने प्रत्येक संघ आपापली व्यूहरचना रचायच्या तयारीला लागला. गावे छोटी-छोटी व जवळ असल्याने एकदम तीन चार गावांच...