उन्हाळ्याची सुट्टी........" आठवणीतली."



              गेल्या काही  दिवसांपूर्वीच  B.Sc.ची Exam  संपली. आमचे सगळ्यांचे  Supervision सुद्धा संपले होते. ज्या सुट्टीची एवढे दिवस वाट पाहत होतो ती उन्हाळ्याची सुट्टी एकदाची सुरु झाली. उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की, माझं मन बालपणातल्या उन्हाळ्याची सुट्टीभोवती पिंगा घालू लागतं. एखाद्या जीर्ण वस्त्रातले एकेक धागे जसे बाहेर यावेत तशा एकेक जुन्या आठवणी जाग्या होऊ  लागतात.
               
              कोल्हापुर जिल्ह्यातालं ' चरण' हे माझं गाव. साधारण १९९४-९५ चा काळ. सगळीकडं जागतिकीकरण सुरु  होऊन  नुकताच काही काळ लोटलेला. त्यावेळी आमच्या चरणाला अजून जागतिकीकरणाची  झळ लागायची होती. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे आम्हा बाल- मंडळीसाठी धम्माल  असायची . सगळी आतेभावंडं उन्हाळ्याची सुट्टी साठी  आजोळी म्हणजे आमच्या घरी आलेली असायची. मग आजी आमच्यापेक्षा त्यांचे खुप लाड करायची, (कारण लेकीची मुलं ना!). घरी असलेले आंबे,काजू,फणसाचे गरे पहिल्यांदा त्यांना द्यायची व मग आम्हाला. त्यावेळी आमच्या शेतात आंब्याची भरपूर झाडे होती. जवळपास  सगळी झाडे आंब्यांनी लदाडलेली असायची. आई सुद्धा लोणच्याच्या आंब्यांचे लोणचे घालीत असे, ते सुद्धा अगदी सात-आठ बरण्या. मग उन्हाळ्याची सुट्टी संपायच्या थोड़े अगोदर किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला त्या बरण्या एकेक करीत मावशी व आत्या यांच्या घरी पोचत्या केल्या जायच्या.
               उन्हाळ्याचं  मला विशेष आकर्षण होतं ते उन्हाळ्यात अगदी सहज मिळणाऱ्या "रान-मेव्या"मुळे. त्यावेळी करवंदं ,जांभळं, काजू, अळू विकणाऱ्या कोकणातल्या  बाया, माणसं  आमच्या  गावी यायच्या. आमच्या गावात दररोज अशा १०-१२ बाया / माणसं यायची. कदाचित त्यांनी गावातील वाड्या  विभागून घेतलेल्या असाव्यात. बऱ्याचदा  एकच बाई करवंदं व जांभळं घेवुन येई. ही बाई/ बाबा (करवंदं ,जांभळं घेवुन येणाऱ्या पुरुषाला आम्ही बाबा म्हणायचो) गल्लीत येताना " करवंदं घ्या करवंदं..." असं ओरडत यायची. मग आमच्यापैकी कुणाचं तरी तिकडे लक्ष जायचं व तो सगळीकड़े ओरडत सुटायचा "अरे करवंदं वाली आली रे...",  मग आम्ही बाकीचे सारे हातातले पत्ते तिथंच टाकुन तसेच करवंदं घ्यायला पळत सुटायचो. त्यावेळी करवंदं व जांभळं ही मक्यावर मिळायची. मक्याने भरलेल्या एका वाटीवर बरोबर एक वाटी करवंदं मिळंत आणि मक्याच्या एका वाटीवर  जांभळं मात्र अर्धीच वाटी मिळायचीत. मग त्यांनी करवंदं / जांभळं  जरा जास्त द्यावीत यासाठी आम्ही सारी पोरे त्यांना, त्यांचं नाव/गाव विचारायचो, त्यांना पाणी  नेऊन द्यायचो. करवंदं / जांभळं,काजू, हे नेहमी मिळंत पण अळू क्वचितंच  मिळायचेत. मला मात्र करवंदं व जांभळानच्यापेक्षा अळू खूप आवडायचेत.
             उन्हाळ्यातलं अजून एक आपुलकीचं व्यक्तिमत्व म्हणजे "गारेगारवाला ". गारेगारवाल्याची वाट आवर्जुन बघत, आम्ही दररोज पत्ते खेळत बसायचो. हा गारेगारवाला त्या वेळी सायकल वरुन यायचा. गारेगारवाला आलाय हे कळायला कुणाला आरडाओरडा करायला लागायचा नाहीं. ह्याचं प्रमुख  कारण होतं ते म्हणजे त्याच्या सायकलला अडकवलेली भली मोठी घंटा! त्यावेळी कदाचित एवढी मोठी घंटा मी देवळानंतर थेट गारेगारवाल्याच्या  सायकललाच बघितली असेल. त्याच्या सायकलला पाठीमागे एक भली मोठी पेटी असायची. त्यात लाल, पिवळ्या, हिरव्या रंगाची गारेगार असत. ( माझी काही आतेभावंड ही मुंबईहून आलेली होती, ती गारेगारला आइस-क्रीम  म्हणत). गारेगारवालासुद्धा गारेगार मका, ज्वारी व पैशांवरती द्यायचा.यात सुद्धा मका व ज्वारीला प्राधान्य व मग पैशाला. करवंदं / जांभळं घेऊन येणाऱ्या  बायका दररोज वेगवेगळ्या असायच्या, गारेगारवाला मात्र तोच असायचा. गावात अलीकडे  करवंदवाली बाईच काय तर गारेगारवाला सुद्धा दिसत नाही, कारण आता 'अमूल' चं दहाचं आइस- क्रीम अगदी छोट्या पान-पट्टीवर सुद्धा मिळतं. 
             मे महिन्याच्या सुट्टीतलं आमचं दररोजचं  outing चं favourite ठिकाण म्हणजे आमच्या गावातली "काजवी". काजवी म्हणजे आमच्या गावच्या डोंगरातली अशी जागा जिथे फक्त काजूची झाडे लावलेली होती. काजवीत काजूची अगदी शंभराहूनही अधिक झाडे होती. (होती...???). आम्ही गल्लीतली सर्व पोरे तेंव्हा सकाळी गारेगार,करवंदं / जांभळं खाऊन झाल्यावर संध्याकाळी म्हैशी घेउन काजवीत जायचो. त्यामुळे आमची तेथे खूप चैन चालायची. तिथे गेल्यावर पहिल्यांदा आमच्यापैकी प्रत्येक जण कुठल्या झाडाला मोठा काजू आहे ते बघायचा. एकदा काजू बघितला की मग मात्र " हा काजू माझा...." असा त्यावर  हक्क सांगितला जायचा. मग एकदा का काजू झाडावर चढून काढला की पोरं त्या काजुच्या बिया फेकून देत. आम्हीसुद्धा सुरुवातीला त्या फेकून द्यायचो, पण काजुच्या बिया फेकून दिल्या की आई ओरडायची, त्यामुळे त्या घरी घेउन यायला लागलो. नंतर पावसाळ्यामध्ये  आई त्याच बिया भाजून त्यातले  काजुगर काढून द्यायची. एके वर्षी तर आईने आम्हा  तिघा भावंडांना काजुच्या ओल्या बिया आणायला लावल्या होत्या. मग त्या दिवशी  आयुष्यात पहिल्यांदा ओल्या काजुगराची भाजी, आम्ही तिघांनी मिटक्या मारत खाल्ली होती.
             
           परवा अगदी सहजच गावी गेलो होतो. संध्याकाळी मित्राबरोबर निवांत गप्पा मारत बसलो होतो. वेळ होता म्हणून मित्र म्हणाला "चल,काजवीतून जाउन येऊ".  त्याच्याबरोबर तिथे गेल्यावर दिसलं की,काजूची झाडं तोडण्याचं काम अगदी युद्ध-पातळीवर सुरू होतं. अनेक जेसीबी'ज, tractor व शेकडो कामगार मिळून काजवीचा डोंगर 'proposed वारणा  कालव्यासाठी' फोड़त होते. ते सारं बघून मानत "कालवा" झाला.तसाच खिन्न मनाने परत आलो. झोपताना मनात एकच विचार आला, ' करवंदवाली बाई, गारेगारवाला बाबा यांच्या बरोबर आपल्या काजवीचंसुद्धा जागतिकीकरण झालं!!' 



-----------------------------------------------------------------------------------------

वरील पोस्ट दि. २१ मे,२०१० च्या दै. ई-सकाळच्या मुक्तपीठ या सदरात  प्रसिद्ध झाली. (http://www.esakal.com/esakal/20100521/5179597150722905581.htm). या लेखाला प्रकाशित केल्या बद्धल सकाळचे सम्राट फडणीस यांचे आभार.








        
           

Comments

  1. It"s realy nice ! i also gone in past to find wat i had done. what we have done in our childhood, that is not available for today child due to change in nature.so we have to told the story of that .

    KEEP UP IT!( GANESH)

    ReplyDelete
  2. Hi

    it's good yaar. keep it up.
    i read it and felt very imotional about that.
    it really touched heart.
    NADACH KHULAAAAAAAAAAA!!!!!!!!!!!

    ReplyDelete
  3. Raviraj Advilkar,NewZealandMay 14, 2010 at 6:08 AM

    Chhan lihilayas!asach anakhi lihi.vachayala avdel.tuzi pratibhashakti vadhat raho!!!

    ReplyDelete
  4. Dear Shivaji & Raviraj bhaiya, thanks to both of you...

    ReplyDelete
  5. Hi... APJ.

    Really its a nice. Majhya sudda junya aathavani taajhya jhalya.

    Keep writing...

    ReplyDelete
  6. keep on writing..... Share More, Get More

    ReplyDelete
  7. khupach chan
    asach lihit raha!

    ReplyDelete
  8. feeling nostalgic!
    Great writing! Hope to read them all!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

यशवंतराव.. (भाग १)

दुर्गा भागवतांचं लेखन: भाग २ ( ऋतुचक्र )

जागृती यात्रा भाग ३: एका सुप्ताची सुरुवात.