जागृती यात्रा भाग ९ : गाथा 'ग्रामविकासा'ची.

दक्षिणेतून ट्रेनने उत्तरेत शिरकाव केला. भौगोलिक बदलांनुसार साहजिकच वातावरणात गारवाही हळूहळू वाढत चालला होता. पहाटेच आम्ही ओरिसातील जगन्नाथपूर स्टेशनवर उतरलो. धुक्याने दाटलेल्या जगन्नाथपूरातून वाट काढत बसेसपर्यंत पोहोचलो. सर्व यात्रींना घेवून बसेसनी बहरामपूराकडे प्रयाण केले. बहरामपूरातील 'जो मडीएथ' यांच्या 'ग्रामविकास' या संस्थेला आज भेट द्यायची होती. ग्रामविकासमध्ये 'जो'चं भाषण, त्याच्याशी संवाद त्यानंतर दुपारचं जेवण व नंतर केस स्टडी असा एकदम भरगच्च कार्यक्रम होता. ग्रामविकासला पोचल्यानंतर लगेचच कार्यक्रमास सुरुवात झाली. 'जो' हा मूळचा केरळातल्या कांजीरपल्ली या गावचा. मद्रास विद्यापीठात शिकत असताना अभ्यासेतर कार्यक्रमांत आघाडीवर असलेला 'जो' मद्रास विद्यापीठाच्या स्टूडंटस् युनियनचा अध्यक्ष न बनेल तरच नवल. याच काळात 'जो'ने Young Students Movement for Development (YSMD) ची स्थापना केली. ७०चं दशक हे अस्वस्थतेचं दशक होतं. आफ्रिका, द.अमेरिका, व्हिएतनाम आदी ठिकाणी युवक चळवळींनी जोर पकडला होता. भारतातसुद्धा त्याची ठिणगी कुठे न कुठेतरी पडत...