जागृती यात्रा भाग ५ : ग्रेट भेट.
हुबळी-धारवाडची सेलको भेट व नंतर होन्नापुरातील ग्रामस्थांशी संवाद झाल्यावर आमची बस हुबळी स्टेशनकडे निघाली. दिवसभरात खूप काही गवसल्यासारखं वाटत होतं. बसमध्ये खिडकीजवळ बसून कर्नाटकातील खेडी बघत निघालो होतो. आपल्याकडे दिसतात तीच नेहमीची दृश्ये भराभर नजरेआड होत होती. हिरवीगार शेतं, रस्त्याने जाणारी गाईगुरे, डोक्यावर गवताचा भर घेऊन जाणाऱ्या बायका, चौकातल्या दुकानांवरचे कानडी फलक इत्यादी दृश्ये बघत असताना बसने धारवाडमध्ये कधी शिरकाव केला तेच कळलं नाही. धारवाडमध्ये प्रवेश करताना सुरुवातीलाच सेलकोच्या गतीला आर्थिक उर्जा देणाऱ्या कर्नाटक ग्रामीण विकास बँकेचं (KGVB) मुख्यालय दिसलं. एका ठिकाणी शाळा सुटली होती. पोरं घरी निघालेली. आमच्या सलग दहा-बारा गाडया दिसताच पोरं हात दाखवत ओरडायला लागलीत. लहानपणचे दिवस आठवलेत. ट्रेन मध्ये गेल्यावर डायरीत हे सगळं टिपायचं व त्यानंतर उद्याच्या भेटीचा गृहपाठ आजच करायचा हे पक्क केलं. त्याला कारणही तसंच होतं. दुसऱ्या दिवशी बेंगलोरमध्ये आम्ही नारायणमूर्तींना भेटणार...