जागृती यात्रा भाग ५ : ग्रेट भेट.

         
        हुबळी-धारवाडची सेलको भेट व नंतर होन्नापुरातील ग्रामस्थांशी संवाद झाल्यावर आमची बस हुबळी स्टेशनकडे निघाली. दिवसभरात खूप काही गवसल्यासारखं वाटत होतं. बसमध्ये खिडकीजवळ बसून कर्नाटकातील खेडी बघत निघालो होतो. आपल्याकडे दिसतात तीच नेहमीची दृश्ये भराभर नजरेआड होत होती. हिरवीगार शेतं, रस्त्याने जाणारी गाईगुरे, डोक्यावर गवताचा भर घेऊन जाणाऱ्या बायका, चौकातल्या दुकानांवरचे कानडी फलक इत्यादी दृश्ये बघत असताना बसने धारवाडमध्ये कधी शिरकाव केला तेच कळलं नाही. धारवाडमध्ये प्रवेश करताना सुरुवातीलाच सेलकोच्या गतीला आर्थिक उर्जा देणाऱ्या कर्नाटक ग्रामीण विकास बँकेचं (KGVB) मुख्यालय दिसलं. एका ठिकाणी शाळा सुटली होती. पोरं घरी निघालेली. आमच्या सलग दहा-बारा गाडया दिसताच पोरं हात दाखवत ओरडायला लागलीत. लहानपणचे दिवस आठवलेत. ट्रेन मध्ये गेल्यावर डायरीत हे सगळं टिपायचं व त्यानंतर उद्याच्या भेटीचा गृहपाठ आजच करायचा हे पक्क केलं. त्याला कारणही तसंच होतं. दुसऱ्या दिवशी बेंगलोरमध्ये आम्ही नारायणमूर्तींना भेटणार होतो. इन्फोसिसमधल्या या ग्रेट भेटीची सर्वांनाच उत्सुकता होती. हुबळी स्टेशनवर पोचलो. स्वयंसेवकांनी तिथून कुठल्या प्लाटफॉर्मवर जायचं ते सांगितलं. सगळेच कंटाळले होते व भूकही तडकून लागली होती. सर्व यात्री तसेच ट्रेनमध्ये गेले. १५-२० मिनिटानंतर फ्रेश झाल्यानंतर चहा, कॉफी व नाश्ता आला. गप्पा मारत, दंगा करत खाद्यपदार्थांचा पोट भरून समाचार घेतला. आमच्या ट्रेनमध्ये अनाउन्समेंटची सोय केली गेली होती. नाश्ता झाल्यावर साधारण दहापंधरा मिनिटांनी प्रेझेंटेशनसाठी यात्रींना चेअर कारमध्ये जमा होण्याची सूचना झाली. सेलकोवर अभ्यास करणारा ग्रुप पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन देणार होता. गटानुसार एका वेळी सव्वादोनशे यात्रींनी (राहिलेल्यांनी नंतर) त्यासाठी उपस्थित राहायचे व बाकीच्यांनी हा वेळ गृहपाठासाठी वापरायचा अशी सूचना होती. दोन तास धावत्या ट्रेनमध्ये प्रेझेन्टेशन ऐकायचं, मग प्रश्नोत्तरांचा वेळ, नंतर सूप, जेवण परत पुढील दोन तास दुसरा सेशन रात्रीचा फलाहार, दूध व मग झोप असं आमचं रोजचं 'धावतं' वेळापत्रक होतं. 

        दुसऱ्या दिवशी बेंगलोरच्या 'व्हाईटफिल्ड'वर उतरलो. तिथं सर्वांना " डू'ज व डोन्ट'ज "च्या सूचना मिळाल्या. आम्हाला घेऊन बसेस इन्फोसिसकडे निघाल्या. इन्फोसिसमध्ये पोचल्यानंतर प्रथम सर्वांची तपासणी झाली. नंतर इन्फोसिसचा भव्य कॅम्पस बघितल्यावर आम्ही सगळे सभागृहाकडे गेलो. नारायणमूर्तींचा कार्यक्रम दुपारच्या सत्रात होता. त्याअगोदर सकाळच्या सत्रात नंदिनी बैद्यनाथ यांचं 'Mentorship' या विषयावर व्याख्यान होतं. व्याख्यान ठीक-ठाक झालं. व्याख्यानंतर लंचसाठी इन्फोसिसकडून सर्वांना निमंत्रित करण्यात आलं होतं. स्वादिष्ट व चवदार पदार्थांवर यथेच्छ ताव मारल्यानंतर परत सर्वजण सभागृहात जमले. ज्याला त्याला नारायणमूर्तींना जवळून बघायचे होते म्हणून पुढच्या सीट्स लगेच भरल्या. थोडया वेळातच नारायणमूर्ती आले. श्री. मूर्ती व्यासपीठावर " ते आले, त्यांनी पाहिलं व त्यांनी जिंकलं " असेच अवतरले आणि सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला. स्वागताची औपचारिकता झाल्यावर सभागृहात इन्फोसिसच्या उत्तुंग भरारीवर एक व्हीडीओ दाखवण्यात आला. साधारणता १५ मिनिटांचा हा व्हीडीओ आमच्या बरोबर नारायणमूर्तींनी एखाद्या लहान मुलाला असलेल्या जिज्ञासेप्रमाणे बघितला. 'Powered by Intellect, Driven by values' हे ब्रीदवाक्य असणाऱ्या इन्फोसिसचा लेखाजोखा झाल्यानंतर श्री. मूर्तींची मुलाखत होणार होती. पण औपचारिकता म्हणून श्री. मूर्तींनी छोटेखानी भाषण केले. भाषणात त्यांनी सर्वप्रथम सर्व यात्रींचे स्वागत केले. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या यात्रींमध्ये ग्रामीण-निमशहरी व महिला यात्रींची संख्या सुखावणारी आहे, असे त्यांनी त्यांच्या भाषणात नमूद केले. 
    मुलाखतीदरम्यान बोलताना नारायण मूर्ती.
                                                                   मुलाखतीत नारायणमूर्ती अनेक विषयांवर भरभरून बोलले. त्यात त्यांनी त्यांची विचारसरणी  कम्युनिझम ते कॅपिटालिस्ट कम्युनिझमपर्यंत कशी बदलत गेली ते विस्तृतपणे सांगितले. इन्फोसिसबद्दल बोलताना ते म्हणाले " इन्फोसिसच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतचा सगळा प्रवास करताना आम्ही मूल्यांशी कधीच तडजोड केली नाही. मागील आर्थिक मंदीत इन्फोसिसव्यतिरिक्त इतर सर्व आयटी कंपन्यांनी त्यांच्या किमती कमी केल्या, इन्फोसिसनेही तसे करावे यासाठी त्यांनी दडपण आणले. पण इन्फोसिसने शेवटपर्यंत आपला मुद्दा सोडला नाही. बाकीच्या आयटी कंपन्यांना नंतर त्याचा फटका बसला. मग इन्फोसिसची कृती योग्य असल्याचे मत अनेक कंपन्यांनी प्रांजळपणे आमच्याकडे व्यक्त केले." यात्री जाणू इच्छिताहेत की तुमचे आदर्श कोण आहेत? असा प्रश्न राजने विचारल्यावर सेकंदाचाही विलंब न लावता मूर्ती म्हणाले " महात्मा गांधी. गांधीजी हे नेहमीच माझे प्रेरणास्त्रोत राहिले आहेत. कारण त्यांनी जो बदल तुम्ही पाहू इच्छिता तो बदल तुम्ही स्वत:च व्हा असं सांगितलं होतं. तो बदल मी झालो आणि आज इन्फोसिस इथे आहे." हे सांगताना त्यांच्या प्रत्येक शब्दात इन्फोसिसबद्दलचा त्यांना असलेला अभिमान जाणवत होता. विषयांतर करताना त्यांनी इतर बाबींवर असलेली त्यांची मते मांडली. त्यामध्ये मग आंत्रप्रीनरशिप, आंत्रप्रीनर व मूल्यव्यवस्था,ग्रामीण विकास, महिलांचा अनेक गोष्टींतील सहभाग, इतर विकसित देश, सध्या चर्चेत असलेला भ्रष्टाचार, टीम अण्णा व त्यांचे सहकारी या विषयांचा समावेश होता. प्रश्नोत्तराच्या तासात एका मुलगीने विचारलेल्या 'इन्फोसिस सोडताना तुम्हाला काय वाटलं?' या प्रश्नाला त्यांनी " इन्फोसिस मला माझ्या मुलीसारखीच होती. मुलीचं लग्न होताना ती घर सोडून जात असते, त्यावेळी प्रत्येक बापाला जसं वाटतं तसेच भाव इन्फोसिस सोडताना माझ्या मनात होते.", असं भावूक उत्तर दिलं.  
बेंगलोरमधील पॅनेल डिस्कशन.
    
       नारायण मूर्तींच्या मुलाखतीनंतर जागृती यात्रेच्या संपूर्ण प्रवासातील पहिले पॅनेल डिस्कशन इन्फोसिसमध्ये आयोजित करण्यात आले. विषय होता- 'Technology startups and social impacts'. तंत्रज्ञानावरील एवढा चांगला विषय, प्रचंड उर्जेने भरलेले उद्याचे हे तीन-चारशे तंत्रज्ञ व जिथं हे सारं पार पडतंय तो इन्फोसिसचा कॅम्पस हा जुळून आलेला एक सुंदर योग होता. पॅनेल डिस्कशनमध्ये सहभागी होणारे तज्ञ होते- फणींद्र सामा, वीर कश्यप व अभिनव सिन्हा. हे तिघेही तरुण तंत्रज्ञ. यांतला फणींद्र अनेकांना माहित असेल. प्रसिद्ध 'रेड बस'चा सीइओ. रेडबसने बसची तिकिटे विकण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठया प्रमाणात वापर केला आहे. वीर कश्यप हा 'बाबाजॉब.कॉम'चा सीओओ तर अभिनव हा 'इकोपे'चा संस्थापक आहे. बाबाजॉब.कॉम ही वेबसाईट आपलं दैनंदिन जगणं सोपं करणाऱ्या मनुष्यबळाचा म्हणजे कामवाली, ड्रायव्हर इ.चा पुरवठा वेबसाईट वरून ग्राहकांना करते. तर अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या लोकांना बँकेत खाते उघडण्यास अनेक अडचणी येतात म्हणून अभिनवने इकोपेच्या माध्यमातून त्या गरजूंसाठी सर्व बँक सुविधा देणारे एक मॉडेल उभे केले आहे. पॅनेल डिस्कशनमध्ये तिघांचीही वेगवेगळी मते,वेगळे दुष्टीकोन व त्यांनी एकमेकांशी केलेले वादविवाद यांमुळे ते ऐकताना मजा आली. कोणतेही तंत्रज्ञान असो, ते वापरणाऱ्याच्या दैनंदिन जगण्यावर त्याचा बराच फरक पडून जातो, या गोष्टीवर तिघंही ठाम राहिलेत. मग प्रत्येकाने आपापल्या माहितीतील उदाहरणे देवून ते पटवण्याचा प्रयत्न केला.पॅनेल डिस्कशन खूप छान झालं. केवळ नारायणमूर्तीच नव्हे तर या तिघा तरुण तंत्रज्ञांनीही आमच्यासमोर तंत्रज्ञाच्या माध्यमातून गरजू व अल्पशिक्षित लोकांसाठी तुम्ही भरपूर काही करू शकताय हा संदेश ठेवला होता. हा संदेश त्यांनी कोणत्या भाषणातून दिला नाही तर त्यांच्या कृतीतून त्यांनी प्रत्यक्षात उतरवला होता. या 'ग्रेट' चौघांना भेटून झाल्यावर आम्ही इन्फोसिसचा निरोप घेतला. आता पुन्हा बस, पुन्हा स्टेशन, तीच ट्रेन, तेच शेड्युल फक्त ठिकाण नवं.
       

Comments

  1. sunder zalay...asach lihit raha..Anekanek shubhechha!!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

एक प्रयत्न -गांधीजींना उलगडण्याचा.

मिसकॉल..

यशवंतराव.. (भाग १)