जागृती यात्रा भाग ३: एका सुप्ताची सुरुवात.

              
          ...अखेर यात्रेचा दिवस उजाडला. भारताच्या २४ राज्यांतून व इतर २३ देशांतून आलेले यात्री सकाळी अकराच्या दरम्यान आयआयटी मुंबईच्या सभागृहाबाहेर जमले होते. सर्व चेहरे एकमेकांना नवीनच. काही ठिकाणी ओळख परेड सुरू होती, तर काही ठिकाणी हातात नाश्त्याच्या प्लेट्स घेऊन नुकताच जमलेला घोळका. कुणी फोनवर बोलण्यात मग्न होते, तर कुणी रजिस्ट्रेशन करण्यात व्यग्र. असा हा सारा विखुरलेला घोळका जेवणाच्या अनाउन्समेंटने एकत्र आला. दुपारच्या जेवणानंतर लगेच ’जागृती यात्रे’च्या उदघाटनाचा कार्यक्रम सुरू होणार होता. सर्वांचं जेवण आटोपलं. हळूहळू एकेक पाय सभागृहाकडे वळू लागले.

                    

             दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. उदघाटक होते जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर. माशेलकरांनी यात्रेचं औपचारिक उदघाटन केलं. पण सगळ्यांना आतुरता होती, ती त्यांच्या भाषणाची. सर्व यात्रींसमोर माशेलकरांनी छान भाषण केले. त्यांच्या भाषणात ’क्रिएटिव्हिटी,एक्सलन्स, इंडियन माइंड्स व एज्युकेशन’ या चारींचा सुंदर मिलाफ जमला होता. सृजनशील उद्योजकता ही विकासासाठी गरजेची असून तिला झपाटलेपण, करुणा व निर्माणशीलता (Passion, Compassion and Innovation) या तीन गोष्टींची जोड द्यायला हवी हे त्यांनी नमूद केले.             डॉ.माशेलकरांच्या भाषणानंतर जागृतीच्या शशांक मणींनी उपस्थित यात्रींशी हसत-खेळत दिलखुलास संवाद साधला. शशांकनी त्यांच्या भाषणात सुरुवातीला यात्रेचं स्वरूप स्पष्ट केलं. तसेच यात्रींच्या निवडप्रक्रियेबद्दल थोडक्यात सांगितलं. ग्रामीण व शहरी या विभाजनाबद्दल बोलताना ते म्हणाले "तुम्ही कुठून आलाय हे कधीच विसरू शकत नाही. आपण प्रत्येकजण आपल्या मुळांशी (Roots) घट्ट जोडले गेलेलो असतो व त्या मुळांचं नातं विषद करण्यासाठी ग्रामीण व शहरी हे विभाजन आवश्यक आहे". शशांकचं हे बोलणं ऐकताना प्रत्येकाला हे तर आपल्याच मनातलं असं वाटत होतं.
पुढे १९९७ ला शशांक व काही युवकांनी पुढाकार घेवून काढलेली आझाद भारत रेल यात्रेची माहिती शशांकने सांगितली. त्यावर एक छोटासा व्हीडिओ बघायला मिळाला. पुढची पिढी सुसंस्कृत व्हावी, यासाठी आधीच्या पिढीला आपल्या इच्छाकांक्षांचा त्याग करावा लागतो. मगच पुढचं जनरेशन, पुढची पिढी घडते, निर्माण होते आणि पर्यायाने देश घडतो. प्रत्येक पिढीच्या बाबतीत हे घडतंच असतं आणि आता तुमच्या पिढीसाठी आम्हाला आमच्या वैयक्तिक इच्छाकांक्षा बाजूला ठेवाव्या लागणार आहेत. शशांकचे  हे शब्द सर्वांना चार्ज करणारे होते.  यात्रेचा मोटो स्पष्ट करताना जेव्हा शशांकने म्हटले "We want to discover one India, but we discovered many Indians.", तेव्हा तर टाळ्यांचा कडकडा झाला. शशांकचं म्हणणं हे की आजचा ३५% भारत हा गरीब आहे व त्या गरिबीत ६० कोटीं भारतीय आपले दिवस कसेतरी काढताहेत. त्या ६० कोटींना हेतू हवाय व हा हेतू त्यांना उद्यम जनित विकासाच्या माध्यमातून साधला जाईल.  भाषणाच्या शेवटी ' यात्रा हा तुमच्या जीवनाला कलाटणी देणारा अनुभव असेल . या यात्रेत इतरांकडून शिका आणि देशाचा शोध घेत असतानाच स्वत:चा शोध घ्यायलाही विसरू नका' असा मैत्रीपूर्ण वडिलकीचा सल्लाही शशांकने दिला. 

            तासाभराच्या ब्रेकनंतर संध्याकाळी 'संगीत-रजनी'ला सुरुवात झाली. प्रसून जोशीचा कवितांचा व तौफिक कुरेशींचा मौखिक तबलावादनाचा कार्यक्रम यामध्ये होता. प्रसूनच्या साऱ्याच कविता आशयपूर्ण. साधा आणि तरल भाव. 'दिल को छु गया ' म्हणतो ना त्या शैलीतल्या. तौफिक  कुरेशींनी आपल्या मौखिक तबलावादनाने तर अख्खे सभागृह डोक्यावर घेतले. कार्यक्रमानंतर तौफिक व प्रसून यांच्या हस्ते फ्लाग ऑफ समारंभ झाला व त्यांनी झेंडा यात्रींकडे सुपूर्द केला. रात्रीच्या  जेवणानंतर यात्रींच्या बसने कुर्ल्याकडे प्रयाण केले. दीडदोन तास सर्वजण प्लाटफॉर्म  वर बसूनच होते.  रात्री एकच्या सुमारास जागृतीची 'नॅशनल ओडिसी ट्रेन ' आली आणि सर्वांनी एकंच कल्ला केला. शिट्ट्या, दंगा, ओरडणे आणि उधाण..सर्वांना अगोदरच योग्य बोगी व कंपार्टमेंटचं वितरण करण्यात आलं होतं. आत गेल्यावर स्थिरस्थावर होण्यास जवळपास अर्धा तास गेला. नंतरचा अर्धा तास सहकारी यात्रींची ओळख, इतर गप्पा आणि फोटो सेशन. हळूहळू सगळेजण झोपण्याच्या तयारीला लागले. रात्री दोन वाजता ट्रेन निघाली-साडे चारशे यात्रींना घेवून एका नव्या प्रवासाला! कदाचित भविष्यातल्या एका दीर्घ आरंभाला! जवळपास सर्व झोपले होते. मला प्रसून जोशीचं आमच्या या यात्रेसाठी लिहिलेलं गीत आठवायला लागलं..  
                                           कुछ बदल रहा कुछ बदलेगे
                                           तब बदलेगा जब बदलेगे
                                           कुछ देखा है कुछ देखेंगे
                                           कुछ लिखा है कुछ लिख देंगे
                                           यारों चलो बदलने की रुत है
                                           यारों चलो सँवरने  की रुत है
                                           हवा कह रही तू ठहरना नही 
                                           गगन कह रहा तू पिघलना नहीं
                                           जमीं कह रही मुझको छूके देख
                                           आँखे मिला सच से डरना नहीं.


Comments

Popular posts from this blog

एक प्रयत्न -गांधीजींना उलगडण्याचा.

मिसकॉल..

यशवंतराव.. (भाग १)