जागृती यात्रा भाग २: यात्रेबद्दल थोडसं..

         गेल्या ब्लॉगमध्ये ज्या युवकांचा उल्लेख केला होता, ते ज्या ज्ञात-अज्ञात भारतप्रवासासाठी जमले होते, तो प्रवास म्हणजे "जागृती यात्रा". जागृती यात्रा ही खंड:प्राय व धर्मनिरपेक्ष भारताची शोध व परिवर्तन यात्रा आहे. ही यात्रा उत्तर प्रदेशातील 'जागृती सेवा संस्थान'कडून दरवर्षी आयोजित केली जाते. राजकीय-सामाजिक,विज्ञान-तंत्रज्ञान व आर्थिक गोष्टींची उत्तम जाण असलेले ध्येयवादी युवक-युवतींची निवड या यात्रेसाठी केली जाते. यात काही आंतरराष्ट्रीय यात्रींचाही सहभाग असतो. जागृती यात्रा ही भारतातील एवढया मोठया प्रमाणावर होणारी एकमेव वार्षिक रेल्वे यात्रा आहे. दरवर्षी ही यात्रा मुंबई येथून २४ डिसेंबरला सुरु होते व साधारणत: जानेवारीच्या दुसऱ्या आठवडयात संपते. या ध्येयवादी युवक-युवतींना उद्योगाच्या माद्यमातून देशासाठी काहीतरी विधायक कार्य करायला प्रेरित करायचं, हा या यात्रेचा हेतू असतो. या यात्रेची ट्यागलाईन एका वाक्यात सांगते त्याप्रमाणे - "1 Train | 12 Destinations | 15 Role Models |15 Days | 450 Youths | 9000 kms ...A Journey of discovery and transformation..."
         
       'जागृती'चा हेतू 'त्या' साठ कोटी भारतीयांवर प्रकाश टाकण्याचा आहे, जे प्रतिदिन रु.४०-१२० च्या दरम्यान उत्पन्नामध्ये आपली गुजराण करतात. या प्रतिदिन उत्पन्नात जगणाऱ्या मनुष्यबळामध्ये कौशल्य-विकास व उद्यम जनित विकासाच्या माध्यमातून सर्वांगीण प्रगती साधण्याचा प्रयत्न 'जागृती' करत आहे. म्हणजे उद्योगावर आधारित व्यक्तीचा,समाजाचा व एकूणच देशाचा विकास हा जागृतीचा मंत्र आहे. इथे 'जागृती'चा दृष्टीकोन भारतातील मध्यमवर्गीय तरुणांची मानसिकता 'नोकऱ्या शोधणारे' पासून 'नोकऱ्या देणारे' बनावी हा आहे. कदाचित त्यामुळे त्यांच्या (तरुणांच्या) बुद्धिमत्तेला व कौशल्यांना न्याय देणारा पर्याय आपोआपच उपलब्ध होईल. वर उल्लेख केलेला ६० कोटींचा वर्ग हा ग्रामीण-निमशहरी भागात राहत असल्याने या यात्रेत देशातील ग्रामीण-निमशहरी युवावर्गाचं वर्चस्व दिसून येतं. यंदाच्या यात्रेत ६३% ग्रामीण-निमशहरी यात्री होते तर एकूण यात्रींपैकी ४०%मुली होत्या.  ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त यात्री हे २०-२५ वयोगटातले होते तर सर्वाधिक वय असलेले (अंदाजे ४५ ते ४८) काही यात्रीसुद्धा यामध्ये होते.                                                      

       जागृतीचा 'उद्यम जनित विकासा'चा दृष्टीकोन अफलातून आहे. जागृतीच्या मते भारतीय जनतेच्या आर्थिक स्थितीची तुलना एखाद्या हिऱ्याच्या स्वरूपाशी केली जाऊ शकते. सोबतच्या चित्रात 
दाखवल्याप्रमाणे भारतीयांची आर्थिक क्षमता तीन भागांत विभागली जाऊ शकते, ज्यात दोन्ही बाजूला त्रिकोण व मध्ये आयत अशी हिऱ्याची रचना आहे. पहिला त्रिकोण त्या २५ कोटींचा- ज्यांचं प्रतिदिन उत्पन्न रु.२०० पेक्षा जास्त आहे तर शेवटचा अतिगरीब लोकसंख्येचा - ज्यांचं प्रतिदिन उत्पन्न रु.४० पेक्षा कमी आहे आणि मधला आयत- आपण मघापासून बोलतो आहोत त्या ६० कोटींचं प्रतिनिधित्व करतो. (चित्रात ५० कोटी दाखवलंय मात्र सुधारित सांख्यिकीनुसार हे प्रमाण ६० कोटींचं आहे.) जागृतीचे लक्ष्य आयतातले 'ते' ६० कोटी आहेत, ज्यामध्ये २० ते ३० या वयोगटातला युवावर्ग मोठया प्रमाणात आहे. २०२५पर्यन्त या आयतात अजून २२ कोटींची भर पडेल. हे तरुण अगतिक नाहीत,यांच्या डोक्यावर छप्पर आहे, खायला अन्न आहे त्यांच्याकडे फक्त जगण्याचा हेतू नाही. रोजगार नाही. जागृतीचं ध्येय त्यांना तो हेतू देणारे 'हात' निर्माण करण्याचं आहे.

       जागृती यात्रा हा एक अद्वितीय अनुभव असतो. जेव्हा देशातील साडेचारशे समविचारी नवयुवकांची फौज एकत्र येते, तेव्हा त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनाचा परिणाम हा नक्कीच ठसा उमटवणारा असतो. यात्रेमध्ये जसे एमएनसीतील दांडगा अनुभव असलेले अनेक आयआयएम-आयआयटीयन्स होते, तसे अगदी भारतातल्या सर्वाधिक मागास व दुर्गम अशा 'कालाहंडी' जिल्ह्यातून आलेले काही यात्रीही होते. देशाच्या चारीही भागातून इथे एकवटलेले हे युवक नारायणमूर्तींपासून ते हरीश हांडे या उद्योजकांना तर जो मडीएथपासून ते अंशू गुप्ता या समाजसेवकांना भेटणार होते. 'जिंदगी मिलेगी ना दोबारा'सारखं पुन्हा हे सारं अनुभवायला मिळेल की नाही माहित नाही म्हणून जॉब्स सोडून येणारे जसे यामध्ये होते, तसे आपल्या विद्यापीठीय परिक्षांवरती या सेमिस्टरपुरतं पाणी सोडून येणारेही होते. एवढंच कशाला, जागृतीच्या या यात्रांसाठी पूर्ण वेळ ज्या लोकांनी वाहून घेतलंय त्यांनी तरी यापेक्षा वेगळं आतापर्यंत काय केलंय? जागृतीचे चेअरमन शशांक मणी हे आयआयटी खरगपूरमधील  इंजिनिअर. बी.टेकनंतर त्यांनी लंडन मधून एमबीए केलं. तिथं काही काळ काम केल्यानंतर भारतात येऊन त्यांनी अशा यात्रेची संकल्पना राबवली. १९९७ साली भारताच्या स्वातंत्र्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली म्हणून अशीच यात्रा त्यावेळी त्यांनी  'आझाद हिंद रेल यात्रा ' या नावाने काढली होती. नंतर काही कारणाने यात्रेत खंड पडला. आता २००७ पासून मात्र दरवर्षी ही यात्रा राबवली जात आहे.

        नुसतं घर नाही तर देश आणि समाजसुद्धा "बांधावा" लागतो. भारत या विकसनशील देशाला असे अनेक 'हात' आपापल्या पातळीवर बांधताहेत. अगदी रोटी,कपडा,मकानपासून ते शिक्षण,आरोग्य व पाण्यापर्यंत. जागृती यात्रा म्हणते तसं "Building India through enterprise"- ती उद्योगाच्या माध्यमातून  नवयुवकांना व पर्यायाने देशाला बांधतेय. कुणी सांगावं, कदाचित जेव्हा उद्याचं एखादं इन्फोसिस हे ओरिसातील 'बटापल्ली' या आदिवासी गावात असेल किंवा उद्याचं 'ताज हॉटेल' हे एखाद्या दुर्गम खेड्यात जेव्हा वसलेलं असेल, तेव्हा ती खरी "जागृती" असेल. जागृतीच्या या आशेला सकारात्मक उर्जेचं बळ मिळो,ही सदिच्छा.

Comments

Popular posts from this blog

यशवंतराव.. (भाग १)

दुर्गा भागवतांचं लेखन: भाग २ ( ऋतुचक्र )

जागृती यात्रा भाग ३: एका सुप्ताची सुरुवात.