जागृती यात्रा भाग १: प्रवास एका प्रवासाचा...


         दिल्लीच्या IGIB (Institute of Genomics and Integrative Biology) त मायाक्रोबायोलोजीमध्ये पीएचडी करणारा नीरज भट. नीरज मूळचा गुजरातमधल्या उनाचा. IGIB त पीएचडीच्या सुरुवातीच्या काळात एका विषयात आवड नाही म्हणून पीएचडीचा विषय बदलला. असं चार-पाच वेळा झालं. पाचवेळा गाईड बदलले म्हणून IGIB त त्याला 'द्रौपदी' म्हणून चिडवताहेत. तो राहतो तिथून जवळच असलेल्या तिमारपूरच्या झोपडपट्टीतील मुलांना दररोज दोन तास शिकवायला तो जातो. गुजरात मध्ये असताना देखील तिथल्या डांग व दहाड जिल्ह्यातील आदिवासींना 'मश्रूम कल्टीवेशन ट्रेनिंग ' देणाऱ्या टीम मध्ये हा असायचा. आदिवासींना कमी श्रमात व बारमाही पोषक अन्न मिळावे यासाठी मश्रूम, ही याच्याच सुपीक डोक्यातून निघालेली आयडिया! पीएचडी नंतर ग्रामीण विकासासाठी त्याला स्वत:ला वाहून घ्यायचंय.
        पुण्याजवळच्या पाबळचा दीपक आडक. पाबळ मधल्या विज्ञान आश्रमात तो अकाऊटंट आहे. पाबळचा विज्ञान आश्रम शालेय शिक्षणामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या मुलांना मोफत विज्ञान-तंत्रज्ञान शिक्षण देवून स्वत:च्या पायावर उभं राहायला मदत करते. आश्रमाच्या एकूणच कार्याने प्रभावित होऊन दीपक इथे आलेला.
        मुरादाबादजवळच्या चितावली नावाच्या छोटया खेड्यातला गिरीराज सिरोही. बहुपेडी व्यक्तिमत्व. आयआयटी रुरकी मधून एमटेक केल्यानंतर आता तो आयएएसची तयारी करतोय. ज्या देशाचं प्राथमिक शिक्षण चांगलं,त्या देशाचं भविष्य उज्ज्वल असं त्याचं म्हणणं. मग मुद्दामच भविष्यातील प्लान्स विचारल्यावर "I don't plan, I work on plans." असं सहजच तो सांगून टाकतो.
        थायलंडचा  एंडी द्वी पुत्रा. तिथल्या स्टेट युनिवर्सिटीमधून तो मानसशास्त्रात बी.ए. करतोय.भविष्यात त्याला सायकोलोजीकल आंत्रप्रिनरशिप या क्षेत्रात काम करायचंय.
         रित्विक चटर्जी, कोलकाता. त्याच्या भाषेत 'कॅल्कात्ता'. पदव्युत्तर शिक्षणानंतर दोन वर्षे तो गांधी फेलोशिप मिळाली. गेली दीड वर्षे गुजरातेतल्या खेड्यातून काम करतोय. पुढच्या आयुष्याबद्दल कन्फ्युज असताना " आय लाईक टू कन्फ्युज " असं म्हणणारा.
         अरविंद थुम्बुर. आंध्रप्रदेशमधल्या खम्माम गावात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतोय. तिथल्या ३ ग्रामपंचायतींचा विशेष अधिकार त्याच्याकडे आहे. पुढे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधून मध्ये डिग्री घेवून काम करायचे आहे.
        गब्रिएल वेन्स्तेईन. ओहिओचा. तिथं तो विद्यार्थी पत्रकार आहे. भारतातलं ग्रामीण जीवन त्याला पत्रकारितेत बद्ध करायचंय.
        हे सारे आणि थोड्याफार फरकाने यांच्यासारखेच इतर एकत्र जमले होते, भारत फिरायला,बघायला,जाणायला. संपूर्ण भारताला जाणून घेताना स्वत:लाच शोधायला. स्वत:तील सुप्त कौशल्यांना अंगी दडलेल्या संवेदनशीलतेला,सृजनशीलतेला साद द्यायला. खरंच आहे ते! महात्मा गांधींनी तरी दुसरं काय केलं होतं? रेल्वेच्या सेकंड क्लासमधून सारा भारत बघितल्यावरच त्यांना भारतातल्या अनेक प्रश्नांची तीव्रता त्यावेळी जाणवली होती. रामकृष्ण परमहंसांनीही विवेकानंदांना भारतदर्शन करायलाच सुचवले होते की!
      
        प्रवास हा माणसाच्या आयुष्यातील एक मोठा मार्गदर्शक असतो. अनेक पुस्तकांपेक्षाही भाराभर ज्ञान तो देवून जातो. साधा भारताचा मध्ययुगीन इतिहास जरी वाचला तरी कळतं की या देशानं, इथल्या विविधतेनं अगदी तेव्हापासून अनेक प्रज्ञावंतांना, दर्यावर्दींना व धर्मगुरूंना आकर्षित केलं होतं. भारताच्या संपूर्ण प्रवासाने त्यांना समृद्ध बनवलं,ज्ञानी केलं. मग यातल्या अनेकांनी या भूमीला आपलसं केल्याचे दाखलेही इतिहास सांगतो. मानवी जीवनाच्या एकूण प्रगतीत व समृद्धीत प्रवासाचं योगदान कल्पनेपलीकडलं आहे. प्रवासामुळे संस्कृती,इतिहास,कला,शिल्प,ज्ञा
न आदी गोष्टींची आदानप्रदान नेहमीच होत राहिली आहे. आपल्या सांस्कृतिक जीवनातील प्रवासाच्या ह्या योगदानामुळेच कदाचित प्रवासवर्णन हा साहित्य प्रकार सुरु झाला असावा. भारताबद्दल तर काय बोलायचं? अनेक संस्कृती,भाषा,धर्म,जाती,खाद्य,अशा वैविध्यपूर्ण गोष्टी एकाच मांडवाखाली नांदत राहिल्या आहेत. या विविधतेतही एकता असलेल्या या देशाचा प्रवास म्हणजे ज्ञान,मनोरंजन व माहितीचा संपूर्ण खजिनाच! असा प्रवास उलगडायला सोबत हवी ती आपल्यासारख्याच आवडी-निवडी असलेल्या समविचारी बोलक्या मनांची.अशा प्रवासात मग एखाद्या पुडीतून बाहेर पडावीत अशी अनेक गुपिते बाहेर पडतात. अनेक कोडी उलगडतात. आवडीच्या इतर गोष्टींची चर्चा होते. सगळ्याच विषयांवर गप्पा होतात, अगदी पुस्तकं,ठिकाणं,राजकारण,शिक्षण, सिनेमा,क्रिकेट यांपासून ते मिडिया,बॉलीवूड,सेक्सपर्यंत. खवय्येगीरीला तर प्रवासात उधा येतं. भारतप्रवास ही तर अख्ख्या भारतातील विविध प्रादेशिक पदार्थ खाण्याची नामी संधी. एखाद्या जेष्ठालासुद्धा मनाने तरुण व्हायला भाग पाडेल असा हा प्रवास असतो.

       समाजाप्रती आपलं काहीतरी देणं आहे आणि स्वत:चं आयुष्य मजेत जगत भविष्यात कोणत्यातरी विधायक कार्यात योगदान द्यायचं,या हेतूनं अंत:प्रेरित असलेले हे युवक जेव्हा अशा प्रवासासाठी जमतात तेव्हा तो प्रवास,प्रवास राहत नाही. तो एक ध्यास होऊन जातो- बदलाचा,परिवर्तनाचा. आणि या साऱ्या युवक-युवतींची आशा,प्रेरणा,आदर्श व कृती नव्या बदलांची नांदी दर्शवतात. युवक या शब्दात मोठी जादू,मोठं आकर्षण भरलेलं आहे. युवक म्हणजे धाडस, युवक म्हणजे जबाबदारी आणि सामर्थ्या
चं द्योतक,युवक म्हणजे प्रचंड आत्मविश्वासाचं कोठार. देशाच्या भविष्याचा व जेष्ठांच्या विश्वासाचा कणा. आणि म्हणूनच दारिद्र्य आणि दैन्य यांत खितपत पडलेल्या भारताचं पुनरुत्थान युवकाच घडवतील असा उदंड विश्वास विवेकानंदांना होता. एवढचं कशाला,एक नवा भारत विणण्याचं काम युवकच करू शकतील असं बाबा आमटेंना वाटायचं म्हणून "युवकांनो, या युगयात्रेत भरती होण्याची सक्ती मी तुमच्यावर करतो आहे."असं म्हणत बाबांनी त्यावेळी त्यांची 'भारत जोडो' यात्रा सुरु केली होती.

       प्रवास आणि कविता यांचं तर फार जवळचं नातं आहे. दोन्हीही आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. प्रवास आणि कवितेत अजून एक साम्य आहे, ते म्हणजे या दोन्हींशी एकदा का गट्टी जुळली की मग ती जन्मभराची होऊन जाते. ग्रीक कवी कावाफीनं त्याच्या अशाच एका कवितेत अज्ञात व साहसी प्रवासाबद्दल सुंदर लिहिलंय. तो म्हणतो


As you set out for Ithaka
hope the voyage is a long one,
full of adventure, full of discovery.
Laistrygonians and Cyclops,
angry Poseidon—don’t be afraid of them:
you’ll never find things like that on your way
as long as you keep your thoughts raised high,
as long as a rare excitement
stirs your spirit and your body.
Laistrygonians and Cyclops,
wild Poseidon—you won’t encounter them
unless you bring them along inside your soul,
unless your soul sets them up in front of you.

Hope the voyage is a long one.
May there be many a summer morning when,
with what pleasure, what joy,
you come into harbors seen for the first time;
may you stop at Phoenician trading stations
to buy fine things,
mother of pearl and coral, amber and ebony,
sensual perfume of every kind—
as many sensual perfumes as you can;
and may you visit many Egyptian cities
to gather stores of knowledge from their scholars.

Keep Ithaka always in your mind.
Arriving there is what you are destined for.
But do not hurry the journey at all.
Better if it lasts for years,
so you are old by the time you reach the island,
wealthy with all you have gained on the way,
not expecting Ithaka to make you rich.

Ithaka gave you the marvelous journey.
Without her you would not have set out.
She has nothing left to give you now.

And if you find her poor, Ithaka won’t have fooled you.
Wise as you will have become, so full of experience,
you will have understood by then what these Ithakas mean.


                                                                       


                                                                                   क्रमश:

Comments

Popular posts from this blog

एक प्रयत्न -गांधीजींना उलगडण्याचा.

यशवंतराव.. (भाग १)